मराठी रंगभूमीचे विश्वकर्मा : विष्णुदास भावे
मराठी जनतेचे अद्वितीय प्रीतिस्थान बनलेल्या ह्या नाट्यकलेच्या म्हणजे रंगभूमीच्या जन्माशी विष्णुदास उर्फ विष्णू अमृत भावे या पुरूषाचे नाव कायमचे निगडीत झालेले आहे.ही सांगड इतकी वज्रलेप झालेली आहे की मराठी रंगभूमी अथवा नाट्यकला यांविषयी बोलण्याचा प्रसंग आला असता मराठी रंगभूमीचे जन्मदाते म्हणून विष्णुदासांच्या नावाचा उल्लेख करण्याचा एक शिरस्ताच पडून गेला आहे.विष्णुदासांचे नाव मराठी रंगभूमीचा विश्वकर्मा या पदवीवर अढळपदाने विराजित झालेले आहे.पौराणिक नाटकांचा प्रयोग केव्हा ही, कोठेही होवो, त्या प्रयोगाच्या प्रारंभी सूत्रधाराकडून,
हे शारदे, ब्रह्मतनये, सांगली ग्रामी विष्णुदास कवी आहेत, त्यांना तुझा आशीर्वाद असावा' अशा रितीने आशीर्वाद मागण्यासाठी ज्यांच्या नावाचे उच्चारण निरंतर होत असे ते म्हणजे विष्णुदास भावे.
विष्णुदास भावे बाह्यात्कारी कवी असले तरी सर्वप्रथम ते सांगलीकरांच्या पदरी खासगीकडे एक सामान्य नोकर होते.विष्णुदास भावे ही एक अतिशय बुद्धीमान, कल्पक व हरहुन्नरी व्यक्ती होती.रंगभूमीची संस्थापना त्यांच्या हातून झाली ही निर्भेळ योगायोगाची गोष्ट नसून भावे यांची योग्य तेच खरोखरी तशी होती.लहानपणापासूनच त्यांना कलेची व कारागिरीची आवड होती.ही त्यांची कारागिरी श्रीमंत चिंतामणराव अप्पासाहेब यांच्या नजरेस पडली.श्रीमंतांनी १८४२ साली कर्नाटकी नाटके पाहून आपल्याही दरबारात मराठी नाटके करावीत अशी इच्छा व्यक्त केली.तेव्हा साहजिकच त्यांनी ती कामगिरी विष्णुपंतांवर सोपविली.
जनतेमधे अनादिसिद्ध परंपरेने चालू असलेल्या दाक्षिणात्य रंगभूमीच्या स्वरूपाचे सर्वप्रथम विष्णुदासांनी अवलोकन केले. तिचा जो नमुना सांगली मुक्कामी विष्णुदासांच्या पाहण्यात आला व ज्यावरून त्यांनी आपले नाटक निर्माण केले त्यांचे निश्चित स्वरूप नक्की कसे होते याची माहिती उपलब्ध नाही.खुद्द विष्णुदासांनी त्याला ' ओबडधोबड व बिभत्स' म्हणजेच अचकट- विचकट, ओंगळ,किळसवाणे अशी विशेषणे लावली होती.
विष्णुदासांनी निर्मिलेल्या पौराणिक नाटकांत मात्र भिन्न भिन्न नाटक मंडळ्या व भिन्न भिन्न परंपरा यांच्या विशिष्ट लकबी व प्रयोगपद्धतीत आणि वेशभुषेत निराळेपणा हा असायचा.विष्णुदासांचे चरित्रकार रा.सा.भावे यांचे म्हणणे असे की, 'विष्णुदासांनी आपल्या नाट्याचे स्वरूप शक्य तितके वास्तववादी असावे याबद्दल फार प्रयत्न केले.चित्रकलेत व मूर्तीकलेत विष्णुदासांचे कौशल्य अप्रतिम असल्यामुळे त्यांनी प्रत्येक भूमिकेच्या वेशभूषेत आणि सजावटीत वैशिष्ट्य आणि वैचित्र्य निर्माण केले.कलानिर्मितीचे तत्त्व या नात्याने वास्तववाद त्यांनी आपल्या कृतीत आणला होता.'
विष्णुदासांनी 'सीतास्वयंवर' हे पहिले नाटक इ.स.१८४३ साली केले.तेव्हापासून सुमारे ४०-५० वर्षे त्यांनी सुरू केलेला पौराणिक नाटकांचा प्रकार रंगभूमीवर जीवंत होता.त्यानंतर रामायणापैकीच त्यांनी १०नाटके केलीत.त्यांचा नाट्यव्यवसाय पहिली ३० वर्षे तर पूर्णपणे जोमात व भरभराटीत होता.ही जणुकाही जीवंत सामाजिक संस्थाच होती.अर्थात समाजजीवनाच्या इतर अंगांप्रमाणे तिच्यामधे एकसारखा बदल होत असला पाहिजे, जो होत होता हे सत्य आहे.रचनेच्या बाबतीत एक महत्त्वाची सुधारणा विष्णुदासांनी घडवून आणली.कानडी अथवा दाक्षिणात्य नाटके आरंभापासून अखेरपर्यंत एकसुरी, सळनळीत , एकप्रवेशी होते.कथानकाचा ओघ एकप्रवाही,अखंड चालायचा.
विष्णुदासांनी यामधे सुधारणा करून नाटकाची रचना अनेकप्रवेशी केली.ह्या प्रवेशांना कचेऱ्या म्हणत.प्रथम देवांची कचेरी, नंतर राक्षसांची कचेरी, नंतर राक्षसांनी केलेल्या अत्याचाराचे दिग्दर्शन, नंतर देवस्त्रीयांची कचेरी, नंतर देव- राक्षसांचे युद्ध याप्रमाणे स्थूलमानाने प्रवेशांचा आराखडा त्यांनी आखला.आख्यानातील कथाभागाच्या स्वरूपानुसार यांत फरक होत असे.या बदलामुळे विष्णुदासी पद्धतीची पौराणिक नाटके कानडी प्रदेशातही लोकप्रिय झाली.विष्णुदासी नाटकांचा आशय शब्दात्मक होता.जे काही नृत्य विष्णुदासी नाटकांत घेतले गेले ते कथावस्तुच्या आणि भावनेच्या दृष्टीने निष्प्रयोजन जरी होते, तरी पण रंजन करणारे मात्र होते.गणपतीनंतर मयूरवाहिनी सरस्वतीचा प्रवेश ही विष्णुदासी पौराणिक नाटकांची खास खुण होय.कानडी नाटकात सरस्वती नव्हती.विष्णुदासांनी आपल्या कल्पनेने तिचा समावेश केला.विष्णुदासांच्या कवितेत ओवी,साकी,श्लोक इत्यादी सर्व प्रकार होते पण रागदारीतील पदांच्या मानाने त्यांचे प्रमाण थोडे होते.
स्थानिक गावांमध्ये बरीच वर्षे प्रयोग केल्यानंतर विष्णुदासांनी आपली नाटक मंडळी प्रथमच पुणे व मुंबई या मोठ्या शहरी नेली.मराठी भाषेतील रंगभूमीचे हे अभिनव दर्शन पाहून पुणे व मुंबई येथील विद्वान व रसिक पुढारी मंडळींना आनंद झाला.सर्व महाराष्टाभर विष्णुदासांच्या पौराणिक नाट्यपद्धतीची छाप बसली आणि सर्वत्र तिचे अनुकरण होण्यास सुरूवात झाली. या प्रयोगात आरंभी ' इंद्रजितवध आणि सुलोचना सहगमन' हे आख्यान आणि नंतर ' अश्वमेधयज्ञ आणि लवकुशाख्यान' हे करून दाखविण्यात आले.त्यानंतर विष्णुपंतांनी मुंबईच्या ग्रॅन्टरोड थिएटरमधे ९मार्च १८५३ मधे दुसरा खेळ केला.त्यानंतरच्या प्रयोगात मत्स्य,कूर्म, वराह, नारसिंह या अवतारांची आख्याने आणि रासक्रीडा यांचे प्रयोग केलेत.
विष्णुदासांनी आपली ५२ आख्याने एकत्र करून, त्यांच्या प्रारंभी देवतास्तुतीपर पद्ये जोडून त्यांना दहा पानांची प्रस्तावना लिहून ती जानेवारी १८८५ मध्ये 'नाट्यकवितासंग्रह' या नावाने प्रसिध्द केली.एकंदर ५२ आख्यानांपैकी १९ रामकथेवर आहेत.ही केवळ वाल्मिकी रामायणाच्याच आधाराने रचलेली आहेत असे नव्हे.आनंद रामायणातील अहिमहिरावणकथा,जैमिनी अश्वमेधातील लवकुशाख्यान वगैरे अनेक ठिकाणांहून आलेल्या लोकप्रिय कथांचाही विष्णुदासांनी आपल्या आख्यानांकरिता उपयोग केला.कौरव-पांडव कथा आणि महाभारतातील इतर काही कथा यांवर १४ आख्याने आहेत.श्रीकृष्ण चरित्रावर ६, विष्णुच्या दशावतारांपैकी इतर अवतारांवर ५, आणि फुटकळ ८ याप्रमाणे वर्गवारी आहे.रामकथेवर त्यांचा सर्वाधिक भर होता.१९ आख्यानांमधे श्रीरामचंद्राचे संपूर्ण चरित्र सुसंगत रीतीने आणले होते.त्यांच्या आख्यानांपैकी 'सीतास्वयंवर' , 'इंद्रजितवध आणि सुलोचनासहगमन' , ' रावणनिधन', 'अश्वमेधयज्ञ व लवकुश', 'रासक्रीडा', 'पारिजातक', 'द्रौपदीस्वयंवर', 'वत्सलाहरण', 'कीचकवध', 'सुधन्वा', 'चंद्रहास', 'हरिश्चंद्र सत्वदर्शन', 'वीरभद्र' ही विशेष लोकप्रिय ठरलीत.
विष्णुदास भावे स्वतः नाटककार,पद्यकार,दिग्दर्शक, तालीममात्सर, गायन मास्तर,कपडेवाला, रंगवाला सर्व काही तेच होते.या सर्व गोष्टी स्वतः निर्माण करून रंगभूमीचा जो एक साचा त्यांनी निर्माण केला तो पौराणिक नाटक या नावाने पुढे ५०-६० वर्षे चालू राहिला.पण संगीत नाटक, गद्यनाटक इ.नाट्यप्रकारांना देखील तो मूळ पाया म्हणून उपयोगी पडला.सर्व गोष्टी मुळापासून निर्माण करण्याचे काम त्यांच्यानंतर मराठी रंगभूमीवर कोणासच करावे लागले नाही.हे सर्व लक्षात घेतले म्हणजे विष्णुदासांच्या उन्मेषशालिनी प्रतिभेची कल्पना येते.महाराष्ट्राचा भरतमुनी किंवा रंगभूमीचे विश्वकर्मा या पदव्या ज्या त्यांना देण्यात येतात त्या यथार्थ असल्याची खुण पटते.
त्या वेळचा समाज सुसंस्कृत व सद्भिरूचीसंपन्न अशा रंजनसाधनासाठी मुकलेला होता.विष्णुदास निर्मित रंगभूमीने त्यांची ही भूक भागवली.त्यांनी नाटक तयार केले त्यावेळी ती सरंजामशाही समाजव्यवस्थेतील एक निष्पत्ती होती.कारण त्याकाळात मनोरंजनाचे दुसरे साधन नव्हते.त्यातल्या त्यात तमाशा, कीर्तन, व नायकिणींचे नाचगाणे ही परंपराप्राप्त करमणुकीची साधने होती.या तीन साधनांपैकी तमाशा किंवा नायकिणीच्या नाचगाण्याला समाजाने नेमून दिलेल्या नितीनियमांची बंधने होती.कीर्तन हे एकमेव समाजमान्य व दर्जेदार असे मनोरंजनाचे साधन होते.परंतु, सरंजामी पांढरपेशा वर्गास ही साधने अपुरी वाटत होती.म्हणूनच विष्णुदास भाव्यांच्या प्रेरणेमुळे पौराणिक नाटकास प्रारंभ झाला.पण बदलत असलेल्या समाजस्थितीच्या प्रभावाने ही नाटके द्रव्याधिष्ठीत भांडवलशाही समाजव्यवस्थेचा घटक बनली.विष्णुदासांनी इ.स.१८५१ ते१८६२ पर्यंत म्हणजे सुमारे बारा वर्षे नाट्यव्यवसाय केला.या अवधीत त्यांनी उत्तरेस मुंबई पासून दक्षिणेस बेळगावपर्यंतच्या मराठी प्रदेशात एकूण सात दौरे केले.
उपलब्ध पुराव्याप्रमाणे आर्थिक चणचण उद्भवल्यामुळे सातवा दौरा हा त्यांचा शेवटचा दौरा होता.विष्णुदासांनी ४० वर्षे अखंड आणि बिकट परिस्थितीत देखील रंगदेवतेची मनोभावे सेवा केली. पण काळ पुढे बदलत गेला .बदलत्या काळात नवीन गोष्टी मिसळल्या. लोकही बदलले त्याचप्रमाणे त्यांच्या मनोरंजनाच्या संकल्पना बदलल्या.त्यामुळे निश्चितच विष्णुदासांनी सुरू केलेल्या नाटकांचे, प्रयोगांचे स्वरूप बदलले.त्यात काळानुसार नवीनता आली पण आजही फिरून जेव्हा नाटकाचा, त्याच्या इतिहासाचा विचार होतो तेव्हा नकळतच मनात येणारे पहिले नाव म्हणजे- ' आद्य रंगकर्मी विष्णुदास भावे'हे होय.त्यांच्या नावाने साजरा होणाऱ्या आजच्या मराठी रंगभूमी दिनानिमीत्त विष्णुदास भावे यांचे स्मरण.
डाॅ.अमृता इंदूरकर,नागपूर
विश्वस्त
विश्वस्त
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
No comments:
Post a Comment