Tuesday, November 26, 2019

🔶प्रहसन:अकल्पनीय, असंभाव्य नाट्यप्रकार🔶

🔶प्रहसन:अकल्पनीय, असंभाव्य नाट्यप्रकार🔶

➡️डाॅ.अमृता इंदूरकर
 
प्रसहन: ‘प्र’ म्हणजे अधिक आणि ‘हसन’ म्हणजे हास्य किंवा हसणे. सामान्य पातळीपेक्षा अधिक हसण्याला प्रहसन म्हणतात.

नाट्यप्रकारात मोडणारा प्रहसन किंवा फार्स हा सुखात्मिकेचाच एक प्रकार होय. विनोद निर्मितीचा एकमेव हेतू डोळ्यांपुढे ठेवून निर्माण केलेल्या प्रहसनाची प्रकृती मात्र सुखात्मिकेपेक्षा बरीचशी वेगळी असते. हा हास्यरसोत्पादक नाट्यप्रकार एकांकी असेल किंवा अनेक प्रवेशयुक्त एकांकी असेल किंवा तीन अंकात ऐसपैस पसरलेला असेल. सामान्यपणे कनिष्ठ दर्जाचा विनोद त्यात ठासून भरलेला असतो. पात्रांच्या कृती-उक्तीत अतिशयोक्ती, असंबद्धता, विसंगती, मूर्खपणा, वेडाचार यांचा मालमसाला असतो. तसेच एरवी ज्या घटना असंभाव्य किंवा अवास्तव वाटतील, त्या प्रहसनात गुंफलेल्या असतात.

भरतमुनींनी दशक रुपात प्रहसनाला स्वतंत्र स्थान दिले आहे. त्याने प्रहसनाचे ‘शुद्ध’ व ‘संकीर्ण’ असे दोन प्रकार मानले आहेत. शारदातनय म्हणतो की प्रहसनात एक अंक, दोन संधी, सहा रस असावेत. संस्कृतात दामक, भगवतज्युक, हास्यार्णव, मत्तविलास यासारखी काही प्रहसने सोडली तर फारशी प्रहसनरचना नाही.

➡️ पाश्चात्य फार्सचा उगम

पाश्चात्य फार्सचा उगम हा इसवीसनपूर्व पाचव्या शतकात झाला, असे मानले जाते. जुन्या ग्रीक सुखात्मिकेबरोबर रचलेले हास्योत्पादक लघुनाटक म्हणजे फार्स. Farcire (कोंबून भरणे) या लॅटीन शब्दापासून ‘फार्स’ ही संज्ञा सिद्ध झाली. Mystere म्हणजे बायबलमधील नव्या व जुन्या करारांतील कथांवर आधारलेली नाटके. धार्मिक स्वरूपाच्या या गंभीर नाटकांमध्ये फार्स घुसडले जात असत. युरोपमधील प्रबोधनानंतर फार्सच्या निर्मितीला बहर आला. इटलीमधील फार्स या प्रकारात साचेबंद स्वरूपाची पात्रे असत. मोल्येरच्या फार्समध्ये व्यंगचित्रे असत आणि मानवी जीवनातील विसंगतीचे भेदक, दर्शनही. १९ व्या शतकात फार्सला पुन्हा बहर आला, तो फ्रान्समध्ये. त्याचबरोबर जर्मनी, रशिया, ब्रिटन इत्यादी देशातही तो अवतरला.
घटनाकेंद्री नाट्य!

प्रहसन हे घटनाकेंद्री असते. घटना अतिरंजित व असंभाव्य असतात. त्या वेगाने घडतात व त्यातून माैज निर्माण होते. सुखात्मिकेत ठसठशीत व्यक्तिचित्रण असते तर प्रहसनातील व्यक्ती उथळ, तऱ्हेवाईक व विक्षिप्त स्वभावाच्या आणि साचेबंद व्यक्तिमत्त्वाच्या असतात. विविध क्लृप्त्या योजून हास्य निर्माण करणारे प्रहसन सुखात्मिकेसारखे प्रेक्षकाला अंतर्मुख करीत नाही, मात्र फार्समधील विनोद हा नेहमीच वरकरणी वाटतो, तितका उथळ नसतो. कित्येकदा त्याला कारुण्याची झालर असते. जगप्रसिद्ध अभिनेता चार्ली चॅप्लिनचे मूकपट किंवा मार्क्स बंधूंचे चित्रपट याच फार्सच्या प्रकारात मोडतात. प्रहसनात काहीही घडू शकते आणि कसेही घडू शकते हे खरे आहे. पण सुखात्मिकेप्रमाणेच प्रहसनालाही स्वत:ची अशी सुसंगत रचना असते. प्रहसनाला स्वत:चा असा रचनाबंध असतो. त्यात एकाच वेळी गांभीर्य आणि गंमत यांचा प्रत्यय येतो. त्यातील व्यक्ती व घटना अस्वाभाविक वाटल्या तरी त्यातून मानवी जीवनातील वास्तवावर प्रकाश पडतो. विसंगतीचे चित्र रंगवितानाच प्रहसन संगतीची जाणीव करून देते. प्रहसन हे काही अंशी मुक्त नाट्य म्हणता येईल किंवा जीवनाकडे पाहण्याची ती एक रीत असेही म्हणता येईल. चित्रपट क्षेत्रातील प्रहसनाचे सर्वात बोलके उदाहरण म्हणजे नासिरुद्दीन शहा, विवेक वासवानी, भक्ती बर्वे यांचा ‘जाने भी दो यारों’ हा हिंदी चित्रपट. यामधील मृत सतीश शहाला जीवंत समजून कोफिनमध्ये हलविणे आणि चित्रपटाच्या शेवटी महाभारताचा प्रसंग, या दोन्ही घटना फार्सचा उत्तम नमुना आहेत.

बोलणे, वागणे अतिशयोक्तीचे

प्रहसनात विनोदनिर्मितीवर मुख्यत: भर दिलेला असतो. पात्रांचे वागणे, बोलणे अतिशयोक्तीच्या पातळीवरचे असते. पात्रांना असंभाव्य किंवा चमत्कारिक स्थितीत टाकलेले असते. पात्रांच्या जलद हालचाली, धावपळ, वेड्यावाकड्या मुद्रा, द्वयर्थी बोलणे, स्त्री-पुरूष संबंधविषयक प्रसंग वा बोलणे ही प्रहसनाची वैशिष्ट्ये होत. परंतु, त्याचबरोबर समकालीन जीवनाचे चित्रण करण्याची प्रवृत्तीही प्रहसनामुळे रंगभूमीवर प्रभावीपणे प्रकटली. समाजामध्ये असणारे उपहासात्मक प्रकार विडंबनाचा आश्रय घेऊन प्रहसनातून अवतरले. नाट्यकला केवळ रंजनात्मक न राहाता सामाजिक टीकेसाठी राबवीत, विशिष्ट लकबा किंवा स्वभावदोष असलेली समाजातली प्रतिकरूपे प्रहसनांमधून उभी होऊ लागली. प्रारंभीच्या काळातला नाटकाचा साचेबंदपणा प्रहसनामुळे कमी झाला. अभिनयातील तोचतोचपणा जाऊन अभिनय काैशल्याला वाव मिळाला. त्यामुळे पुढच्या काळात प्रहसने ही पुरक नाटके न राहता स्वतंत्रपणे सादर केली जाऊ लागली.

मराठी फार्सचा अवतार

        मराठी रंगभूमीवर फार्सचा अवतार झाला तो इंग्रजी नाट्यप्रयोगाच्या अनुकरणामुळे पौराणिक नाटकाच्या जोडीला फार्स सादर करण्याची युक्ती अमरचंद वाडीकर नाट्य मंडळीने १८५६ रोजी केली. हा फार्स हास्यकारक व लाैकिक जीवनाचे चित्रण करणारा असा होता. रुचिपालट म्हणून योजण्यात आलेल्या प्रहसनाचे स्वरूप मात्र पुढे पालटत गेले. फार्स म्हणजे केवळ विनोदी स्वरूपाचे प्रहसनवजा असलेले नाट्य अशी जी पुढे समजूत झाली, ती फार्सच्या जन्माच्या वेळी नव्हती. काही ऐतिहासिक स्वरूपाच्या गंभीर अथवा शोकांत नाटकांनासुद्धा फार्स म्हणण्याची पद्धत होती. उदा. नारायणराव पेशवे यांच्या मृत्यूचा फार्स, अफझलखानाच्या मृत्यूचा फार्स. प्रहसनवजा फार्सची नावे त्यांच्या विषयांची कल्पना देणारी, विनोद स्पष्ट करणारी आहेत. उदा. ढोंगी बैराग्याचा फार्स, बासुंदीपुरीचा मनोरंजक फार्स, चहाडखोराचे प्रहसन अथवा कळलाव्या शास्त्राचा फार्स इत्यादी.....

कोटीभास्कर नावाच्या गृहस्थाने एका इंग्रजी नाटकाचा प्रयोग पाहिला. त्या नाटकाच्या शेवटी त्याने एक फार्स केलेलाही पाहिला. त्याच धर्तीवर त्याने ‘सीताहरण’ या पाैराणिक नाटकाच्या अखेरीस अगदी अनपेक्षितपणे जरठ कुमारी विवाहाचे दुष्परिणाम दाखवणारा एक भडक फार्स करून दाखवला. मराठीतील हा पहिला फार्स ठरला. तो फार्स पाहून अनेकांनी फार्स लिहिले. १८७० ते १८९० या वीस वर्षांत फार्सचे प्रमाण जाणवण्याइतपत होते. स्वातंत्र्यप्राप्ती नंतरच्या काळात मात्र व्यक्तिजीवनातील अगर आपल्या समाजातील वैगुण्ये, उणिवा धारदारपणे मांडण्याचे माध्यम म्हणून प्रहसनाचा उपयोग होऊ लागला.

बबन प्रभूंचे योगदान

        मराठी नाट्यसाहित्यात उत्तम असे फार्स देणारे नाव म्हणजे बबन प्रभू. १९५० च्या सुमारास मराठी रंगभूमीवर विनोदाच्या क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावलेले बबन प्रभू यांनी बऱ्याच फार्सचे लेखन केले. झोपी गेलेला जागा झाला, दिनूच्या सासूबाई राधाबाई, पळा पळा कोण पुढे पळतो, घोळात घोळ इत्यादी उत्तमोत्तम फार्स प्रभू यांनी मराठी रंगभूमीला दिले. आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाचा उल्लेख केला, त्या चित्रपटात महाभारताचा जो थिएटरमधला प्रसंग आहे. त्या प्रसंगात थिएटरच्या प्रवेशद्वारावर चालू असलेल्या नाटकांचे फलक दाखविले आहेत. त्यामध्ये एक फलक ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या फार्सचा आहे. दिग्दर्शकाने हा फलक दाखवून केवढी सूचकता साधली आहे, याचा अनुभव येतो. मराठी रंगभूमीवर फार्स रूजला, प्रकटला आणि बहरला तो बबन प्रभूंमुळे यात शंकाच नाही.

(लेखिका भाषाशास्त्री, साहित्यिक आहेत.)

दि.२४/११/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

No comments:

Post a Comment