Sunday, November 10, 2019

पुलंचा विठ्ठल..... समूह मनाचा आरसा

🔶पुलंचा विठ्ठल..... समूह मनाचा आरसा🔶

➡️ डाॅ.अमृता इंदूरकर

 नोव्हेंबर महिन्यात काय योग जुळून आला आहे बघा! ५ नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन म्हणून महाराष्ट्र, गोवा आणि जेथे जेथे मराठी भाषाप्रेमी आहेत, तेथे साजरा होतो. यासोबतच यावर्षी ८ नोव्हेंबरला हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीवर्षाची सांगता होत आहे. ‘पु. ल. आणि विनोद’ हे समीकरण इतके एकरूप झाले आहे की जनमानसात त्यांची विनोदी लेखक म्हणून असणारी प्रतिमा वाचकांना अधिक प्रिय आहे. पु. ल. आपल्याला यशस्वी विनोदी लेखक म्हणून जास्त परिचित असले तरी त्यांचे साहित्यिक व्यक्तिमत्त्व मात्र, अष्टपैलू आहे. विनोदी लेखक, नाटककार, एकांकीकाकार, रूपांतरकार, प्रवासवर्णनकार, संगीततज्ज्ञ, दिग्दर्शक, गायक, अभिनेता व अशा सर्व वैशिष्ट्यांनी पु. ल. परिपूर्ण आहेत. पण, एक नाटककार म्हणून त्यांनी एकूणच मराठी नाट्यक्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केलेले आहे. एके ठिकाणी पु. लं. नी म्हटले आहे. ‘मला या ‘जीवन’ वगैरे शब्दांची मोठी धास्ती वाटते. जगण्याला ‘जीवन’ म्हणावे अशी माणसं हजार वर्षांतून एकदा जन्माला येतात. परंतु, रसिकांना आणि पुलंवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना पुलंसारखे व्यक्तिमत्त्व हजार वर्षांतून एकदाच जन्माला येत असते, याची खचितच जाणीव आहे.

 पु. लं. चा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी गावदेवी पुलाजवळच्या हरिश्चंद्र गोरेगावकर रस्त्यावरील कृपाळ हेमराज चाळीत झाला. पु. लं. ची आई लक्ष्मीबाई आणि वडील लक्ष्मणराव देशपांडे हे सामान्य आर्थिक परिस्थितीत जगणारे दाम्पत्य असूनही दोघांनाही नाटकाची आवड होती. नाटकाचा वारसा आपल्याला आईवडिलांकडूनच मिळाला आहे. हे त्यांनी ‘गणगोत’ मध्ये नमूद केले आहे. ते म्हणतात ‘देवाच्या खालोखाल माझ्या वडिलांनी बालगंधर्वाना मानले आणि जाताना मला आणि माझ्या भावडांना ते हाच भक्तिभावाचा वारसा ठेवून गेले. अशा या कलासक्त घराण्याचा वारसा लाभलेल्या पु. लं. ची जेवढी स्वतंत्र व रूपांतरित नाटके लोकप्रिय ठरली तितक्याच त्यांच्या एकांकिकादेखील लोकप्रिय ठरल्या. ‘विठ्ठल तो आला आला’, ‘सांत्वन’, ‘नाही आसू नाही माया’, ‘सारं कसं शांत शांत’, ‘छोटे मासे मोठे मासे’, ‘सदू आणि दादू’ इत्यादी एकांकिका त्यांनी लिहिल्या. यामध्ये ‘विठ्ठल तो आला आला’ ही एकांकिका लोकसमूहाला स्वच्छ आरसा दाखविणारी एकांकिका आहे. प्रत्यक्ष एकांकिकेकडे जाण्याआधी ‘एकांकिका म्हणजे काय’ हे देखील बघणे आवश्यक आहे.

‘एकांकिका’ हा स्वतंत्र वाङ्मयप्रकार म्हणून आता सर्वमान्य झालेला आहे. ‘विश्वकोशा’त एकांकिकेची संकल्पना स्पष्ट केलेली आहे ती अशी, ‘एकांकिका म्हणजे एक अंकी नाटक. एकांकिका नाटकाचे लघुरूप आहे’, अशी एकांकिकेची व्याख्या त्यात आढळते. डाॅ. तारा भवाळकर एकांकिकेची संकल्पना मांडताना म्हणतात की, ‘नाट्यानुभवातील एकरसात्मकता, एककेंद्रित्व आणि एकजिनसीपणा हा या एकाच अंकात जेव्हा नाट्यरूपाने व्यक्त होतो, तेव्हा तिला एकांकिका म्हणता येईल. परंतु, एकांकिकेत एकच घटना, एखादाच प्रसंगानुभव एकरसात्मक, एकजिनसीपणाने प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचा असतो. त्यात व्यक्तिदर्शन, उपकथानके वा उपविषयांना फारसा वाव नसतो. कारण एकांकिकासुद्धा पूर्णाकृती आहे. ती एखाद्या बिंदूसारखी असते. नाटक आणि एकांकिकेत आकाराचा फरक आहे. त्यात पात्रसंख्या निश्चिती करता येत नाही. त्यात एकेरी आशय मांडण्यात येतो व तोदेखील अधिक जटिल, अधिक व्यामिश्र, परिपूर्ण असतो. एखादेवेळी नाटकसुद्धा जो प्रभावी आशय, परिणाम साधू शकत नाही तो एकांकिका साधू शकते. एकांकिकेचे नाटक होऊ शकते. कारण त्याचे सामर्थ्य, आशयाची ताकदच मुळात जबरदस्त असते.
        
‘विठ्ठल तो आला आला’ हा पुलंचा एकांकिकासंग्रह १९६१ साली प्रसिद्ध झाला. या एकांकिकेचे कथाबीज मोठे रोचक आहे. ही एकांकिका घडते ती एका विठ्ठल मंदिरात. तेथे ‘युगे अठ्ठावीस’ ही आरती जोरजोरात चाललेली आहे. मंत्रपुष्पांजली इत्यादीचा वेगवेगळ्या आवाजात गोंधळ सुरू आहे. गाभाऱ्यातील विठ्ठलाच्या कपाळावर आठ्या पडलेल्या आहेत. या गदारोळातच विठ्ठल ‘थांबा’ असे म्हणतो. पण, त्याचे ‘थांबा’ कोणालाच एेकू येत नाही. मग विठ्ठल वैतागून आपल्याच कपाळावर बुक्क्या मारून घेतो. विठ्ठल रागावून बोलतो. पण, विठ्ठलाची दगडी मूर्ती बोलेल यावर कुणाचा विश्वासच बसत नाही. त्यामुळे एकमेकांची बिंगे माहिती असलेले भटजी, मास्तर, वकील, डाॅक्टर, शेटजी, शिंपी, सखुबाई, द्वारकाबाई यांना एकमेकांचा संशय येतो, मग एकमेकांची उणीदुणी बाहेर काढली जातात. भांडणे सुरू होतात. प्रत्येकजण एकमेकांच्या ढोंगावर प्रहार करतो. शेवटी विठ्ठल भटजींच्या कमरेत गुद्दा लगावतो, तेव्हा संघर्षाचा प्रसंग निर्माण होतो.
 
गाभाऱ्यातून आवाज येतो तो पांडुरंगाचा आहे हे आंधळ्या भिकाऱ्याला तेवढे कळते. पण, इतर डोळ्यांना ते कळत नाही. शिवाय त्यांचा आंधळ्याच्या बोलण्यावर विश्वासही नाही. शेवटी भटजी गाभाऱ्यातून आवाज येतो आहे, म्हणून आत जातात, अंगावरची कोळीष्टके झटकत परत येतात. मग ‘बोलणारा विठ्ठल आहे’ हे खरे की खोटे हे तपासून पाहण्यासाठी शेठजी रुपया सोन्याचा करायला सांगतात. पण, तो रूपयाच खोटा असतो. मग विठ्ठल आंधळ्याला डोळस करतो.
 
विठ्ठल मग आपल्या तक्रारी सांगतो. त्याला उभे राहून कंटाळा आला आहे. भटजी नैवेद्य हडप करतो. पितांबर धूत नाही. बेकार उभे राहण्यापेक्षा काही काम द्या म्हणून तो विनंती करतो. पण प्रत्येकजण आपापल्या व्यवसायात आता कुठलाच राम नाही, असे सांगतो. एकप्रकारे जगातल्या भ्रष्टाचाराचे दर्शनच विठ्ठलाला होते. शेवटी सर्वजण ‘तुम्ही आहात तिथेच ठीक आहात’, असे विठ्ठलाला सांगतात. सर्वांच्या सांगण्यावरून विठ्ठल परत देव्हाऱ्यात कर कटेवर ठेवून विटेवर उभा राहतो. जाण्यापूर्वी विठ्ठल आंधळ्याच्या विनंतीवरून त्याला परत आंधळे करतो.

देव गाभाऱ्यात गेल्यावर तो स्थिर आहे की नाही हे भटजीला तपासून पहायला वकील सांगतो आणि तो स्थिर आहे हे लक्षात येताच सर्वजण ‘हेचि दान देगा देवा’ म्हणायला सुरूवात करतात आणि एकांकिका संपते.

‘विठ्ठल तो आला आला’ ही एक फॅण्टसी विनोदी एकांकिका आहे. अद्भुताचा इतका चांगला उपयोग क्वचित कोणी केला असेल. भक्तांचा व पुजाऱ्याचा ढोंगीपणा उघडकीस आणणारी ही पुलंची एकांकिका अर्थपूर्ण आहे. या एकांकिकेतून सामाजिक दंभावर पुलंनी कोरडे आेढले आहेत. या एकांकिकेचा आशय इतका जबरदस्त आहे की बाह्य सजावटीकडे लक्ष जात नाही. विठ्ठलाने प्रत्यक्षात येणे, या फॅण्टसीद्वारे लेखकाने एकप्रकारचे वास्तवच दर्शविले आहे.फॅण्टसी आणि वास्तव असे हे परस्पर विरोधी नाते आहे. पुलंनी सामाजिक वृत्तीचं तथाकथित रूढीचं मूर्तिभंजन विडंबनाच्या शस्त्राने केले आहे. त्यातील नर्मविनोद एेकून वरवर हसू येते, पण पुढच्याच सणाला वाचक विचारगंभीर झाल्याशिवाय राहत नाही. एकप्रकारची विपरितता अधोरेखित केली आहे. आंधळ्याला केवळ आवाजानेच विठ्ठलाची जाणीव होते तर तिथल्या डोळसांना मात्र कळत नाही. भटजींचे पात्र लक्षात घेता धर्म संस्कृतीच्या नावावर जी थोतांडं होतात तिचे खरे आेंगळवाणे रूप आपल्याला यामध्ये दिसते.

विठ्ठलाला सुद्धा लोकं स्वतःच्या स्वार्थासाठी जाऊ देत नाहीत. यावरून जगात एकही क्षेत्र भ्रष्टाचारापासून मुक्त नाही. मग ती भक्ती का असेना हेच पुलंना सांगायचे होते. समाजाच्या डोळ्यांत याद्वारे झणझणीत अंजनच घातले आहे. या एकांकिकेतील सर्व माणसे आपला राग दुसऱ्यांवर काढताना दिसतात. तसे भटजी मास्तरांवर, शेठजी वकिलावर.... हा गोंधळ पाहून वाचकाला प्रकर्षाने जाणवते की यातील माणसे माणसासारखी वागत नाहीत आणि देव देवासारखं वागत नाही. जगातील अनागोंदी पाहून देवालाही वैताग यावा, अशी ही परिस्थिती आहे.'देव' दाखवता आला नसता तर ही एकांकिका उभीच राहू शकली नसती. सुरूवातीला तो बोलतो पण दिसत नाही. त्यामुळे देवळातील मंडळींना प्रत्येकाला आपल्या उण्यावर असलेला कोणी प्रतिस्पर्धीच बोलत आहे, असे वाटते. कारण देवाचेही शोषण करणारा भटजी येथे आहे. ‘ नशिबाचे भोग कुणा चुकले.गप् गुमान विटेवर उभं रावा’ हे आंधळ्याचे वाक्य भारतीय माणसाचा दैव यावरील विश्वास प्रकट करणारे आहे. आंधळाच शेवटी विठ्ठलाला जगाची रीत समजावून सांगतो. म्हणूनच की काय एकांकिकेच्या शेवटी विठ्ठलाला तो पुन्हा आंधळे करून मागतो, कारण जगाचा व्यवहारच तसा आहे.

पुलंचं लिखाण संपूर्णतया स्वतंत्र धाटणीचे आहे. भालचंद्र नेमाड्यांनी ‘देशी’ अशी संकल्पना मांडली आहे. त्याला आशयदृष्ट्या समांतर जाणारी ही कलाकृती वाटते. स्वतंत्र प्रतिभेची झेप घेऊन या एकांकिकेत पुलंनी पात्रागणिक वृत्तीचे काटेकोर निदर्शन केले आहे. पुराणकाळाची व समकाळाची पुलंनी उत्तम सांगड घातलेली दिसते. आजच्या परिस्थितीमुळे देवही कालबाह्य झाला असल्यामुळे त्याच्या हातात केवळ विटेवर उभे राहणेच उरले आहे. जणूकाही आजच्या जगरहाटीत देवही आउटडेटेड झाला आहे.असा एक विचार पुलंनी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे. पुलंनी विठ्ठलालाही माणसांच्या तुलनेने सर्वसामान्य केला आहे. भोवतालच्या जीवनातील हास्यगर्भ नाट्य टिपून त्याचा एकांकिकेच्या रुपाने समर्थपणे आविष्कार करण्याचे कार्य मुख्यत: पुलंनी केले. ‘विठ्ठल तो आला आला’ ही एकांकिका आंतरिक टोचणी उरात बाळगून वरवर हसविणारी कलाकृती आहे. तेवढीच समूहमनाला आरसा दाखविणारीही आहे.

(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)

दि.१०/११/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

No comments:

Post a Comment