🔶ग्रंथ : ज्ञानाचे शाश्वत माध्यम🔶
➡️ डाॅ.अमृता इंदूरकर
वाचकं ज्ञानदं बाल्ये
तारूण्य शिलरक्षकम्।
वार्धक्ये दु:खहरणं
हितं सद्ग्रंथवाचनं।।
मानवाच्या वयाच्या विविध टप्प्यांमध्ये कायमस्वरूपी साथ देणारे कोणी असेल तर ते ग्रंथ होत किती सहजपणे हे सुभाषित आपल्याला सुचवते की वय कोणतेही असो, पण त्या-त्या वयात ग्रंथ वाचन आपल्याला काय काय प्रदान करतात.
'उत्तम ग्रंथ वाचन केल्याने लहान वयात ज्ञानप्राप्ती होते, तारुण्यात चारित्र्य रक्षण होते, वृद्धत्वात दु:ख निवारण होते म्हणून सतत चांगले वाचन करावे!' मंडळी नुकताच १५ आॅक्टोबरला आपण सर्वांनी वाचन प्रेरणा दिवस आणि भारताचा अभिमान असणारे वैज्ञानिक, संशोधक डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम याचा जन्मदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने आजच्या ज्ञान- विज्ञान- तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर ग्रंथ आजही ज्ञानाचे शाश्वत माध्यम आहेत, यावर प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न आहे.
एका एका क्षणाने, एका एका कणाने हे जग पुढे जात आहे. विज्ञानाची कास धरून नव्याने उलगडणाऱ्या ज्ञानाच्या महाद्वारांना सन्मुख होणे ही वर्तमान जगाची गरज आहे. वेळेलाच गतिमान करून, जगण्याची अधिक गती पकडण्याकडे प्रत्येक व्यक्तीचा कल दिसतो. मग यासाठी विज्ञानानुकूल होणे क्रमप्राप्तच आहे. पुढे विज्ञानाकडून तंत्रज्ञान अवगत करणे साहजिकच आले, पण मुळात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे आधी ज्ञान संपादन केले तर विज्ञान मिळवता येईल आणि विज्ञान मिळविले तर तंत्रज्ञान अवगत होईल. उन्नतीकडे जाणाऱ्या, विकास घडवून आणणाऱ्या या तीन पायऱ्या आहेत. ज्ञान- विज्ञान- तंत्रज्ञान. यामधल्या ज्ञानाच्या पहिल्या पायरीला वगळून आपण पुढे जाऊ म्हटले तर ते अशक्य आहे. कारण ज्ञानाचा मुलभूत पाया पक्का असणे सर्वात महत्त्वाचे आहे. ज्ञान संपादन करणे म्हणजे आपली मुळं पक्की करणे होय. ज्ञानाची मुळं पक्की असली तर मग विज्ञान, तंत्रज्ञानाचा आपोआपच विकास होतो.
ज्ञान जितके सोप्या, सहज मार्गाने मनुष्याला मिळेल तितका त्याचा विकास होईल. उदा. घ्यायचेच झाले तर ज्ञान संपादन करण्याचे श्वाश्वत माध्यम म्हणजे ‘ग्रंथ’. या ग्रंथामधून पायाभूत ज्ञान प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला एक विधायक दृष्टीकोन मिळतो आणि त्यानुसार तो त्या ज्ञानाच्या आधारावरच नवनवे शोध लावू शकतो. आता विज्ञान, तंत्रज्ञानाने ज्ञानसंपादनाची माध्यमे बरीच बदलली आहेत. प्रारंभी कागद बनला. मग त्यापासून ग्रंथनिर्मितीची प्रेरणा मिळाली व ग्रंथ तयार झाले. यासंदर्भात ग्रंथनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कागदाचा जन्म कसा व कुठे झाला याचा थोडक्यात इतिहास समजून घेणे रोचक ठरेल.
अगदी प्राचीन काळी, कागदाचा शोध लागण्यापूर्वी लिहिण्यासाठी व चित्रे काढण्यासाठी दगड, विटा, हाडे, धातूंचे पत्रे जनावराची चामडी, रेशमाचे किंवा लिननचे कापड, काही झाडांची पाने, साली, गुळगुळीत केलेल्या लाकडी फळ्या इत्यादींचा उपयोग करीत. प्राचीन काळी चिनी लोक बांबूच्या कामट्यांच्या पट्ट्यांवर लेखन करीत. प्राचीन इजिप्तमधील लोकांनी बनविलेला ‘पपायरस’ नावाचा पदार्थ, मात्र कागदासारखा व वापरण्यात कागदाइतकाच सोयीचा असे. तो नाईल नदीच्या किनाऱ्यावर वाढणाऱ्या एका जातीच्या बोरूपासून तयार केलेला असे. तर दुसरीकडे अलेक्झांड्रिया येथील ख्रि. पू. तिसऱ्या शतकातील फिलडेल्फस टाॅलेमी यांच्या ग्रंथालयातील पुस्तके चामड्यावर लिहिलेली होती, असे म्हणतात. कागद तयार करण्याचा शोध प्रथम चीनमध्ये लागला, असे मत प्रचलित आहे. इ. स. १०५ साली त्साइ लून याने लावला.
भारतात देखील कागदासारखा उपयोग प्राचीन काळापासून दीर्घकाळपर्यंत करण्यात आला, ते म्हणजे ताडपत्र व भूर्जपत्र यावर. भारतातील व मध्य आशियातील जुने संस्कृत ग्रंथकार भूर्जपत्रावर लिहित. भारतावर स्वाऱ्या करणाऱ्या मुसलमानांबरोबर कागद करण्याची कला भारतात आली, असे कित्येक युरोपियन विद्वानांचे मत आहे. परंतु, ख्रि. पू. ३१७ च्या सुमारास अलेक्झांडर यांच्याबरोबर भारतात आलेल्या निआर्कस यांनी हिंदू लोक रुई (कापूस) कुटून कागद तयार करतात, अशी माहिती लिहून ठेवली आहे. यावरून तितक्या प्राचीन काळीही भारतात कागद तयार होत असे असे दिसते. त्याचा उपयोग मात्र विस्तृत प्रमाणात होत नसे. कालांतराने काश्मिरात व पंजाबात हाताने कागद तयार करण्याच्या गिरण्या निघाल्या. त्यांची वाढ झाली व नंतर तसेच कारखाने राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल, कर्नाटक व तामिळनाडू या प्रदेशात निघाले. त्या कारखान्यात साध्या कापडाच्या व गोणपाटाच्या चिंध्या आणि रद्दी कागद यांच्या लगद्यापासून कागद तयार करीत. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात या कारखान्यांनी तयार केलेला कागद चांगल्या दर्जाचा व टिकाऊ असे व कागदाच्या धंद्यात चांगली भरभराट झाली. त्यानंतर ब्रिटीश राजवटीत मात्र त्यांच्या यंत्राच्या सहाय्याने तयार झालेला स्वस्त कागद येऊ लागला व तोच कागद पुढे स्वीकारला गेला. याच प्रवाहात पुढे पुस्तक छपाई सुरू झाली व ग्रंथनिर्मिती होऊ लागली.
ग्रंथनिर्मिती झाल्यानंतर स्वाभाविकच ग्रंथालय ही संकल्पना जन्माला आली. भारतातील पहिले ग्रंथालय १८२८ साली रत्नागिरी येथे स्थापन झाले. अर्थातच हे ग्रंथालय ब्रिटीश अमदानीत स्थापन झाले. ग्रंथालय ही एक सामाजिक संस्था आहे. ग्रंथाचे महत्त्व लक्षात घेऊन भारतातील ग्रंथालय चळवळीचा प्रारंभ बडोदा नरेश श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी केला. पुढे याच चळवळीला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सशक्त पाठिंबा देऊन जनमानसात ग्रंथांप्रती महत्त्व पटवून देण्याचे कार्य केले. जसजसा ग्रंथ व ग्रंथालय संकल्पनेचा विकास झाला तसतसे काळानुरूप त्यामध्ये स्थित्यंतरे येत गेली. ग्रंथशास्त्र म्हणजे Library Science ही स्वतंत्र अभ्यासशाखा तयार झाली. यामुळे ग्रंथ संस्कृतीचे महत्त्व पटत गेले व अधिक चांगल्या पद्धतीने ग्रंथसंवर्धन होऊ लागले.
वर्तमानात मात्र तंत्रज्ञानाची कास धरून लोकं टेक्नोसॅव्ही होण्याचा प्रयत्न करीत आहेत. साहजिकच या विचारसरणीचा परिणाम ग्रंथांवरही पडला आहे. लोकांना आजकाल, पुस्तक हातात घेऊन वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय करणे आहे, असे वाटते किंवा कागदाचा अतिरिक्त वापर होत असल्याने मानवाने आता ‘पेपरलेस’ होणे महत्त्वाचे असे काही तंत्रज्ञानप्रेमींना वाटते. पण, इथे महत्त्वाचा मुद्दा असा की ज्ञानाचा व्यावहारिक पातळीवरील वापर हाच खरा ज्ञानसंवर्धन करणारा ठरतो. उदा : शालेय पातळीवरच्या विद्यार्थ्यांना आपण ग्रंथरहित, पुस्तकरहित ठेऊन कसे ज्ञान देणार? आजकाल शाळांमध्ये educom सारखे तंत्रज्ञान आल्यामुळे दृश्य पातळीवरील त्यांच्या ज्ञानात नक्कीच भर पडते, पण अभ्यासाची गोडी लागण्यासाठी त्यांना नेमलेल्या सचित्र पुस्तकाची आकर्षकता, त्या कोऱ्या पुस्तकाचा स्पर्श इतर माध्यमातून कसा येणार? हातात पुस्तक घेऊन वर्णमाला, पाढे, अंक, अक्षरे, शब्द, कविता लघुगोष्टी इत्यादींचे जे वाचन होते, त्याचा परिणाम बालमनावर भाषा-काैशल्य आत्मसात करण्याच्या दृष्टीने अधिक होतो. ‘विवेकवैराग्यदशका’ त समर्थ रामदासांनी वाचन, लेखनाला फार महत्त्व दिले आहे. ते म्हणतात, *‘लिहिणे नाही, वाचणे नाही। पुसणे नाही सांगणे नाही। नेमस्तपणाचा अभ्यास नाही।’* ग्रंथ वाचनाबाबतही समर्थ फार मोलाचा सल्ला देताना दिसतात, *‘काही वाची, चर्चा करी। एकांती जाऊन विवरी। प्रेचात येईल तो घ्यावा। अर्थ मनी।’* समर्थांना जी वाचन प्रक्रिया वाचनध्यास अपेक्षित आहे. त्या पद्धतीचा अनुभव संगणक, लॅपटाॅप यांवर कसा येणार! ग्रंथवाचनातील ही एकाग्रता, साधना यंत्र माध्यमातून कशी येणार?
७० ते ८० टक्के भारतीय जनता ग्रामीण जीवनाशी निगडीत आहे. या पार्श्वभूमीवर गावागावातील विद्यार्थी ग्रंथरहित ज्ञान कसे संपादन करणार? संपूर्ण भारतातील सर्वच ज्ञानशाखा शालेय पातळीपासून उच्चशिक्षणापर्यंत ग्रंथरहित होण्यासाठी कमीतकमी १०० वर्षाचा अवकाश लागेल. इतकेही करून ग्रंथाला मरण नाहीच. कारण व्यक्ती विनाश पावते पण तिचे विचार ग्रंथरूपाने काळाच्या पटावर अविनाशी, चिरंतन राहतात.
संपूर्ण महाराष्ट्रात वर्षाकाठी २४० च्या आसपास साहित्यसंमेलने होतात. ज्यांची सुरूवातच ग्रंथदिंडीपासून होते. म्हणजे ज्याच्या कृपेने आपण या संमेलनाचा एक घटक झालो त्या ग्रंथाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा आहे. याशिवाय अशा ठिकाणी भरणाऱ्या ग्रंथमेळाव्याची व्यावहारिक देवाण-घेवाण ही एक व्यवहार्य बाजू मानली तरी यामधून व्यापक स्वरूपाचे ग्रंथ आदान-प्रदान घडून येते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात लेखन व वाचन यांचा फार माैलिक शब्दात गाैरव केला आहे. आणि ग्रंथोपजिविये विशेषी लोकी इये। दृष्टादृष्ट विजये। हो आवे।’ म्हणजेच ज्यांची ग्रंथावर उपजीविका चालते म्हणजे लेखक व वाचक असे दोन्ही. ज्ञानदेवांना इथे केवळ लाैकिक अर्थाने उपजीविका म्हणायचे नाही तर साहित्यनिर्मिती करणारे लेखक, साहित्यिक व या लेखनाचा आस्वाद घेणारे ज्ञानोपासक वाचन असे म्हणायचे आहे. ६०० वर्षांपूर्वी ज्ञानदेवांनी ग्रंथ- लेखक- वाचक, या एकाच सूत्रामध्ये गुंफलेल्या तीनही घटकांचा गाैरव केलेला आहे. यावरून ग्रंथाचे महात्म्य केवढे असेल, याचा आपल्याला प्रत्यय येतो. हे ग्रंथ महात्म्य ज्यांना समजले तेच पुढे दृष्ट म्हणजे लाैकिक व अदृष्ट म्हणजे पारलौकिक यावर विजय मिळवू शकतात, असे ज्ञानदेवांनी लक्षणेने सूचित केले. यावरून हे स्पष्ट होते की जग कितीही विज्ञान, तंत्रज्ञानमार्गी झाले तरी ज्ञानसंपादनाची जी काही नैसर्गिक माध्यमे आहेत ती शाश्वतच आहे. म्हणूनच ग्रंथ हे ज्ञानाचे शाश्वत माध्यम आहेत.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
दि.२०/११/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
No comments:
Post a Comment