पिंपळ-एक डायरी
डाॅ.अमृता इंदूरकर
दिवाळी नुकतीच संपली होती.संपूर्ण वातावरणात हिवाळ्याची अस्पष्टशी चाहूल लागल्यासारखी वाटत होती.त्यादिवशी विभागात यायला उशीर झाला.मी जरा घाईघाईतच खोलीचे कुलूप उघडले आणि खुर्चीवर येऊन बसले.आल्यावर एरवी आठवणीने खोलीचे दार लोटून,एकांतात बसणारी मी,डोक्यात कामाची घाई असल्यामुळे दार उघडे ठेवून बसले.घाईघाईत शोधनिबंध लिहायला सुरूवात केली;आणि अचानक कानावर कसलीतरी ओळखीची सळसळ ऐकू आली.त्याचा आवेग इतका जास्त होता की ती सळसळ आता माझ्या थेट अंगावरच येणार असे मला वाटले.म्हणून क्षणभर थांबून मी खोलीबाहेर पाहिले.माझ्या खोलीसमोर उभा होता विशाल पिंपळ!सोसाट्याचा वारा सुटला होता आणि हा पिंपळ अशी काही जीवघेणी सळसळ करीत होता की मी क्षणभर विचारमग्न झाले आणि अचानक वर्षानुवर्षे शांत असलेले माझ्या अंतरीचे स्मृतितळ विविध घटना,प्रसंगांचे एकावर एक सूर मारून ढवळून निघू लागले.
त्या क्षणी मला असे वाटले आजच ह्या पिंपळाला काय झाले.जणुकाही हे सर्व मला विसरू देण्याची का त्याची इच्छा नव्हती?या विभागात मी प्रथम आले ते एक विद्यार्थीनी म्हणून. वर्गात फारशी कुणाशी माझी नव्याने मैत्री झाली नव्हती. रोज वेळेवर येणे,वर्ग मनापासून करणे,वेळ असला तर ग्रंथालयात जाणे नाहीतर सरळ घरी परतणे.पण या साध्या वाटणाऱ्या दिनचर्येत माझ्यासाठी एकच गोष्ट कठीण होती ती म्हणजे दोन तासिकांमधे असणारा वेळ किंवा तास उशीरा सुरू होणार असेल किंवा होणारच नसेल तर पुढच्या तासाची वाट पाहण्यासाठीचा मधला वेळ.नवीन ओळख करून घेऊन बोलणाऱ्यांपैकी मी नव्हते.मग काय!वर्गाबाहेर आल्यावर समोर भव्य पिंपळ दिसायचा.योगायोग असा की ज्या दिवशी मी अस्वस्थ असायची त्या दिवशी ह्याची सळसळ इतकी व्हायची की हक्काचा मित्र जसा विचारतो तसा हा विचारायचा, काय झाले?इतकी उदास का?अस्वस्थ का?मला सांग!मी आहे ना! पुढे असे योगायोग वारंवार घडून यायला लागले. आपण आतून पार उन्मळून पडलेलो असायचो आणि नेमका हा विचारून विचारून बोलते करायचा.माझे उसळणे,कोसळणे समजून घेणारा कोणीतरी मला हवा होता.मनातली घुसमट,वैफल्य,त्वेष,उद्विग्नता सगळे कुठे तरी व्यक्त व्हावे असे सारखे वाटायचे.मग मलाही रोज त्याच्या समोर येऊन उभे राहायचे वेडच लागले.
मी मनातील गुंतागुतीच्या अतर्क्य जाळ्यातले एक एक धागे उकलण्याचा प्रयत्न करीत होते. तितकाच गुंता अधिक वाढायचा आणि हाती यायचा तो निरगाठीवर निरगाठी पडलेला गुंत्याचा गोळा.प्रत्येक नात्यात हेच,प्रत्येक संवादात हेच.रक्ताच्या नात्याबद्दलही तेच आणि मानलेल्या मैत्री,प्रेम या नात्यांबद्दलही तेच.त्यावेळी नकळतच मर्ढेकरांची,
नाही कुणी का कुणाचा।बाप-लेक-मामा-भाचा।
मग अर्थ काय बेंबीचा।विश्वचक्री?॥
ह्या ओळी मला माझेच मनोगत वाटू लागल्या.बालकवींची उदासीनता मला माझ्या उदासीनतेशी साधर्म्य सांगू लागली.
कोठून येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचते तेही कळेना
हृदयाच्या अंर्तहृदयाला
तर ग्रेसची जीवघेणी कातरसंध्या माझ्या भासचक्रात अनाकलनीय,मंत्रभारीत उच्छाद मांडू लागली.मग माझा रोजचा दिनक्रमच ठरून गेला.रिकामा वेळ मिळाला की मी आपली पिंपळासमोर त्याला न्याहाळायला,त्याच्याशी बोलायला लागली.इरावती मला विचारायची की तासनतास या पिंपळाकडे पाहण्यात तुला काय मिळतं? मी अनुत्तरीतच उभी राहत असे.काय सांगणार?आमची मनातल्या मनात वाटावाटी सुरू आहे म्हणून!
हा पिंपळ त्यावेळी माझ्यासाठी जणुकाही डायरी झाला होता. आपण संपूर्ण दिवस सरल्यावर रात्री डायरी लिहितो आणि दिवसभराचा लेखाजोखा मांडतो.पण माझं मात्र वेगळच सुरू होतं. मी दिवसाचीच नाही तर क्षणाक्षणाची,एक एक भावनांची व्याकूळ,दुखरी स्पंदने त्या पिंपळाच्या प्रत्येक पानावर कोरायचा प्रयत्न करीत होते.प्रत्येक पान माझे आहे आणि या विशाल डायरीची लक्ष लक्ष पाने माझे कागद बनले आहेत असे वाटायचे.माझ्यासाठी तर एक एक पान लागे गळावया हा हिशेबही नव्हता.पिंपळच इतका डेरेदार,विशाल आहे की पानगळ होऊन संपूर्ण निष्पर्ण वृक्ष कधी पाहिलाच नाही.माझ्या मानसिक आंदोलनाचे आघात लीलया पेलायला लगेच नवी पालवी तयार.
आज तिथपासून ते आजतागायत विभागाशी संबंधित असल्यामुळे माझी पिंपळ डायरी माझ्यासोबत आहे.इतके लिहिले,इतके व्यक्त केले पण ह्याची पाने अजून शिल्लकच आहेत.ती पाने मी आली की जास्तच सळसळतात.जुन्या पानांनी नव्यांना सांगितले,नव्याने कोवळ्यांना सांगितले की ही एकमेव आहे आपल्याशी संवाद साधणारी;तेव्हा हीला आजन्म प्रतिसाद द्या.त्यादिवशी घाईघाईत असूनही हा पिंपळ मला विसरला नाही.त्याने विचारलेच कशाची एवढी घाई?कोणता ताण आहे का?आणि मला माझ्या माणुसपणाची खंत वाटली.हा एवढा हजारो कानांनी ऐकायला आतूर असताना मी मात्र भलतेच ठरीव हक्काचे कान शोधत होती.ह्या पिंपळ डायरीच्या साक्षीने खळकन दोन अश्रू गळले आणि अंतरीचे तळ शांत झाले.ह्या पिंपळाने मला असे काही आश्वस्त केले की मनातली सगळी घुसमट त्या सळसळत्या पानांमध्ये कधी विरली कळलेच नाही!!!
अमृतवेल
डाॅ अमृता इंदूरकर
दि.५/१२/२०१९
नागपूर
No comments:
Post a Comment