Monday, December 9, 2019

आंबेडकरवादाचे समर्थ भाष्यकार:यशवंत मनोहर

🔶आंबेडकरवादाचे समर्थ भाष्यकार:यशवंत मनोहर🔶

➡️ डाॅ.अमृता इंदूरकर

विसाव्या शतकातील वादळी व्यक्तिमत्त्व म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर. आत्मग्लानीत असलेल्या भारतीय जनमानसाला एक नवी विज्ञानसापेक्ष जीवनदृष्टी देण्याचे महत्कार्य बाबासाहेबांनी केले. ६ डिसेंबर ही डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी, महापरिनिर्वाण दिन म्हणून सर्वत्र आदरांजली अर्पण केली जाते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे चतुरस्र व्यक्तिमत्त्व आजही आपणा सर्व भारतीयांना सदैव स्फूर्ती देणारे व दिशादर्शक, प्रेरणादायी आहे. या जीवनसागरात वैचारिकदृष्ट्या भरकटलेल्यांसाठी बाबासाहेब जणूकाही दीपस्तंभ आहेत. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने ‘ज्ञानाचे प्रतीक’ असे संबोधून या भारतमातेच्या सुपुत्राचा गौरव केला आहे. विद्वत्तेचे प्रकांड पंडित, अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, कायदेपंडित, पत्रकार, संसदपटू, समाजसुधारक, राजकीय मुत्सद्दी आणि बौद्ध धम्मचक्र अनुप्रवर्तक असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट वक्ते आणि बुद्धिवादी विचारवंत असल्यामुळे त्यांच्या विचारांचा खोलवर परिणाम समग्र भारतीय जीवनावर झाला. या परिणामापासून मराठी साहित्य तरी त्याला कसा अपवाद असणार? बाबासाहेबांच्या कार्याचा दृश्य परिणाम जसा त्यांच्या हयातीत राजकारणावर, समाजकारणावर आणि धर्मकारणावर दिसू लागला तसा तो साहित्यावर दिसू शकला नाही, पण त्यांच्या मरणोत्तर दलित वर्गातून साहित्यिकांचा असा वर्ग उसळून वर आला की ज्याने मराठी साहित्यांची पुनर्व्यवस्था अपेक्षिली.

 साहित्याबद्दल डाॅ. बाबासाहेबांचे विचार वर्षानुवर्षे चालत आलेल्या वाङ्मयीन विचारधारेपेक्षा निराळे होते. ते म्हणत, ‘what instructs me, amuses me’. मनोरंजनवादी साहित्य आंबेडकरांना व साहित्यात पुढे येऊ घातलेल्या आंबेडकरवादी साहित्याला देखील मान्य नव्हते. जे साहित्य मला प्रेरणा देतं, तेच माझी करमणूक करतं असे त्यांचे स्पष्ट मत होते. वाङ्मयाने कायमच वाचकापुढे मानवाला उपकारक असा उजेड अंथरावा. जीवनाचा गहन अर्थ सांगून वाचकाला अंतर्मुख करावे. साहित्यातून माणुसकीचे अधिक डोळस, समंजस, परिवर्तनदर्शी रूप प्रस्थापित व्हावे. हे करणे म्हणजेच बाबासाहेबांना अपेक्षित असणारे instruct करणारे साहित्य होय.

१९६० पासून दलित साहित्याची निर्मिती होऊ लागली. कथा, कविता, कादंबरी, वैचारिक निबंध या वाङ्मयप्रकारात दलित साहित्याची व नवनव्या साहित्यकारांची भर पडायला लागली, पण या सर्व वाङ्मयप्रकारात बाबुराव बागुल, डाॅ. भालचंद्र फडके प्रा. रा. ग. जाधव या समीक्षकांचा अपवाद वगळता दलित साहित्य समीक्षेचे क्षेत्र मात्र तितकेसे जोरकस, काटेकोर असे नव्हते. या दलित साहित्य समीक्षेला असे काटेकोर अधिष्ठान देण्याचे कार्य आंबेडकरवादी विचारवंत, समीक्षक डाॅ. यशवंत मनोहर यांनी ‘दलित साहित्य : सिद्धान्त आणि स्वरूप’, ‘दलित साहित्य चिंतन’, ‘समाज आणि साहित्यसमीक्षा’, ‘परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि वाङ्मयीन मूल्ये इत्यादी पुस्तकांमधून आंबेडकरवादी सौंदर्यशास्त्राचा आग्रह मांडलेला आहे. मात्र पुढे १९९९ साली आपल्या 'आंबेडकरवादी मराठी साहित्य’ या ग्रंथांची निर्मिती करून एकूणच दलित साहित्य समीक्षेला एक आगळी वेगळी दिशा दाखविलेली आहे. मराठी साहित्यात सुसूत्रपणे आंबेडकरवादाची मांडणी करणारे ते अग्रनायक, प्रथम भाष्यकार ठरले.

एक कवी म्हणून आपल्या काव्याद्वारे मनोहरांनी आपल्या परिवर्तनवादी कवितेला कायमच जडवादी नैतिकतेचे रेखीवपण बहाल केले आहे. तर आपल्या साहित्य समीक्षेतून त्यांनी परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि सौंदर्यमूल्ये यांची एकजीव मांडणी करणाऱ्या जडवादी सौंदर्यविज्ञानाचा ध्यास प्रकट केला आहे. या ध्यासाचे अलीकडचे मूर्त रूप म्हणजे त्यांचा अलिकडे प्रकाशित झालेला ‘साहित्याचे इहवादी सौंदर्यशास्त्र’ हा ग्रंथ, पण ‘आंबेडकरवादी मराठी साहित्य’ या ग्रंथामधून आंबेडकरवादी साहित्याची संज्ञा व संकल्पनेचा जो पाया रचला गेला, त्यावरच आजवरचे आंबेडकरवादी साहित्य वाटचाल करीत आहे, हे नाकारता येत नाही.

एकूणच विविध मराठी वाङ्मयप्रवाहांमधे दलित साहित्य या संज्ञेखाली दलित साहित्याचा प्रारंभ झाला असला तरी या संज्ञेच्या मर्यादित चौकटी पार भेदून डाॅ. मनोहरांनी या साहित्याला आंबेडकरवादी विचारधारेचे बळ दिले आणि जे तेज निर्माण केले त्यातून एकूणच दलित साहित्याचा पैस लांबी, रूंदी, खोली, उंचीने समकालीन साहित्यात अधिकच वेगवान झाला. दलित साहित्याला दलित साहित्य असे न संबोधता आंबेडकरवादी साहित्य का म्हटले पाहिजे किंवा भविष्यात आंबेडकरवादी साहित्य का निर्माण व्हायला पाहिजे, याचा खुलासा करताना डाॅ. मनोहर म्हणतात, ‘बुद्ध फुल्यांना सोबत घेऊन निघालेले आंबेडकरसूत्र ही युगाची गरज आहे. या सूत्राला आपण हृदयात, मेंदूत जागा करून दिली पाहिजे. त्यासाठी दलित हे विशिष्ट सामाजिक स्तराचे वर्णन करणारे सूत्र आपण मनातून काढून टाकले पाहिजे. या ना त्या पातळीवरची विभाजनाची प्रक्रिया आपण थांबविली पाहिजे. जोडण्याच्या, अभिसरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ केला पाहिजे. यापुढे कोणालाही दलित म्हणवून घेणे आवडणार नाही, असे सांस्कृतिक पर्यावरण साकार झाले पाहिजे. त्यामुळे आंबेडकरवादी साहित्य ही संकल्पना आपण स्वीकारणे हे प्रत्यक्ष जीवनक्रांतीच्या दृष्टीने आणि साहित्यक्रांतीच्या दृष्टीने हितावहच ठरणारे आहे."

डाॅ. मनोहरांच्या दृष्टीने जीवननिष्ठेतून जन्माला येणारी ज्ञाननिष्ठा हा philosophy या शब्दाचा अर्थ आहे. दलित साहित्य ही संज्ञा तत्त्वज्ञानाचा निर्देश करीत नाही. ही संज्ञा विवक्षित तत्त्वज्ञानाचे अधोरेखन करीत नाही. ही संज्ञा ढगळ आहे. तिच्यामागे रेखीव असे तात्त्विक अधिष्ठान नाही असे निश्चित, ठोस, तात्त्विक अधिष्ठान त्यांना साहित्याचा आणि जीवनमूल्यांचा परस्परसंबंध असलेल्या आंबेडकरवादी साहित्यविचारात दिसले. 

➡️ डाॅ. मनोहरांनी त्याची सुस्पष्ट कल्पना येण्यासाठी आंबेडकरवादी वाङ्मयदृष्टीची भूमिका स्पष्ट करणारे पाच मुद्दे मांडले आहेत.

१) उदात्त जीवनमूल्ये
२) सर्व जीवनाला कवेत घेणारी कलावंतमनाची व्यापकता
३) अज्ञान, दु:ख, दारिद्र्य दूर होईल हे लक्ष्य
४) उपेक्षितांचे जीवन उन्नत व्हावे ही आंतरिक निष्ठा
५) या जाणिवेचे मानवता असे नाव मानणे

या मुद्द्यांना अनुसरणारी आंबेडकरवादी साहित्यनीती स्पष्ट करणारी वाङ्मयीन मूल्येही डाॅ. मनोहरांनी सांगितली आहेत. त्यांच्या मते झोप उडणे, विचारशक्ती जागी होणे, तंद्री लागणे हा सर्व साहित्याचा हेतू आहे आणि ते मनोरंजनवादी होणार नाही, यासाठी ‘जिवंत’ अभिव्यक्तीची आणि सौंदर्यबंधाची जोड कलाकृती लाभली पाहिजे. असे सौंदर्यसामर्थ्य अर्थातच कलाकृतीत बाहेरून आणून ओतता येत नाही. ते कलाकृतीतील अनुभवात, अनुभवाच्या आशयात आणि या सर्वाचे संयोजन, संघटन करणाऱ्या जीवनदृष्टीतच असते. अभिव्यक्तीचा जिवंतपणा हा तिच्या उत्कटतेचा, प्रत्ययकारितेचा द्योतक आहे. थोडक्यात असे म्हणता येईल की प्रस्तुत ग्रंथाद्वारे आंबेडकरवादी जीवनमूल्ये हीच खऱ्या वाङ्मयीन महत्तेचे सर्जन करणारी सौंदर्यमूल्ये आहेत. असा निष्कर्ष डाॅ. मनोहरांनी काढलेला आहे.

साहित्यिकांना दलित या नाभाभिधानामुळे नकळत झालेला न्यूडगंडाचा स्पर्श डाॅ. मनोहरांच्या या तत्त्वज्ञानात्मक शास्त्रीय मांडणीमुळे पुसून जाऊन त्यांना आत्मशक्तीचा प्रत्यय आला. त्यांच्यातील संघर्षशीलतेला धार चढली. वैचारिक स्वातंत्र्याचे वारे अंगाअंगात भिनून आक्रमकपणे एका सामाजिक संघर्षासाठी त्यांची वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वे पेटून उठली. या ग्रंथाच्या निमित्ताने मनोहरांनी आंबेडकरवादी साहित्यिकांसाठी असा दीपस्तंभ निर्माण केला आहे, की ज्याच्या प्रकाशात आंबेडकरवादी लेखकांच्या पिढ्यानपिढ्या आपल्या उच्च ध्येय आणि उद्दिष्टांकडे सातत्याने अग्रेसर होत राहतील. या ग्रंथाद्वारे डाॅ. यशवंत मनोहरांनी एकूणच दलित साहित्यप्रवाहांचे आंबेडकरवादी विचारधारेच्या अंतर्गत येणाऱ्या मानवतेच्या, समतेच्या अनुषंगाने पुनर्मूल्यांकन केलेले आहे. म्हणूनच डाॅ. यशवंत मनोहर खऱ्या अर्थाने आंबेडकरवादाचे समर्थ भाष्यकार आहे.

(लेखिका भाषाशास्त्री, साहित्यिक आहेत.)

दि.८/१२/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

1 comment: