Saturday, December 28, 2019

भाषिक प्रभावाचे भरजरीपण


🔶भाषिक प्रभावाचे भरजरीपण🔶

➡️ डाॅ.अमृता इंदूरकर

       मानवाचे संपूर्ण जगणे सततच कशा ना कशाच्या प्रभावामुळे कायम परिवर्तनशील असते. मानव कशाने तरी प्रभावित झालाच नसता तर त्याचे जगणे, वागणे, बोलणे, त्याच्या सगळ्या कृती यंत्रासारख्या एकसुरी झाल्या असल्या. त्याच्या आयुष्यात साैंदर्याचा अभाव कायमच राहिला असता. या अशा अभावापेक्षा कशाचा तरी चांगला प्रभाव असणे, विकसिनशिलतेला केव्हाही सहाय्यभूतच ठरणारे आहे. मानवच काय बारकाईने बघितले तर संपूर्ण विश्वच कुठल्या ना कुठल्या प्रभावाने प्रेरित झालेले दिसते. निसर्ग देखील यातून सुटला नाही. सूर्याचा चंद्रावर प्रभाव, चंद्राचा सागरावर प्रभाव, वृक्षांवर वर्ष, अवर्षणाचा प्रभाव इतकेच काय एखाद्या महाकाय वृक्षावर पसरलेल्या वेलीचा त्या संपूर्ण वृक्षावर प्रभाव असतो. निसर्गाचा मानव व प्राण्यांवरील प्रभाव, प्राण्यांवर मानवाचा प्रभाव, मानवावर मानवाचा प्रभाव असे कितीतरी प्रभाव घेऊन आपण जगत असतो. निसर्ग जर का मोठ्या मनाने हा प्रभाव स्वीकारतो तर मानवाची आद्य आेळख असणारी भाषा, त्यावरील पडलेल्या अन्य भाषाप्रभावांबद्दल आपण का संकुचित विचार करतो? उलट ज्याप्रमाणे एखादे तलम वस्त्र त्यावर केल्या गेलेल्या रेशमी अथवा जरतारी कामाच्या प्रभावाने अधिक साैंदर्यपूर्ण बनते, त्याचप्रमाणे एखाद्या भाषेत अन्य भाषेच्या प्रभावातून समाविष्ट झालेल्या नव्या शब्दांमुळे ती भाषा अधिक साैंदर्यपूर्ण लवचिक व समकाळात आपले नावीन्यपूर्ण अस्तित्व टिकवून ठेवणारी भाषा म्हणून लोकप्रिय ठरते. अर्थात इथे भाषिक प्रभाव आणि भाषाभ्रष्टता यांमध्ये गल्लत करता कामा नये. मराठी भाषा देखील आज अन्य भाषांचे प्रभाव मोठ्या मनाने आत्मसात करून भाषेच्या जागतिक व्यापक अशा पटावर खंबीरपणे उभी आहे. प्राचीन काळापासून ते आजपर्यंत मराठीवर बऱ्याच भाषांचा प्रभाव पडलेला आहे. त्यातील काही प्रमुख भाषा प्रभाव आपण विस्ताराने बघूया.

प्रभावाची कारणे :

 विकसित होणारी कोणतीही भाषा एकजिनसी राहू शकत नाही हे आजपर्यंत मराठीची उत्पत्ती व वाढ पाहताना आपल्या ध्यानात आले आहे. कोणतीही जिवंत भाषा आपल्या मूळ स्वरूपात उरत नाही. परकीय आक्रमणे, राज्यक्रांती, दुष्काळादी आपत्ती, वैचारिक क्रांती इत्यादी विविध कारणांनी मानवी समूहांचे भ्रमण व मिश्रण सुरू होते. रीतिरिवाज, चालीरीती, पोषाखपद्धती, वाङमय, आवडीनिवडी यांच्यात देवाणघेवाण सुरू होते. मराठी एक वर्धिष्णू भाषा असल्याने ती या नियमास अपवाद राहिली नाही. वरील सर्व कारणांमुळे जे-जे फरक मानवी जीवनात झाले ते ते मराठी भाषेने नोंदविले आहे. इतर भाषांचे परिणाम घेऊनही मराठी भाषा वाढतच राहिली.

१) संस्कृत भाषेचा प्रभाव

संस्कृत व मराठीचा संबंध अतूट असा आहे.यादवकाळानंतर मराठी भाषेत संतांनी व पंडितांनी जे एेश्वर्यशाली वाङमय निर्माण केले त्याला आधार केवळ संस्कृतच आहे. वेदांचे बीज म्हणजे भगवद्गीता त्यावर कितीतरी मराठी कवींनी लिहिले. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ महाराज यांच्या एकूणच साहित्यनिर्मितीचा आधार संस्कृत साहित्यच होते. पुढे शिवकाळातील मराठी काव्यास पंडिती वळण मिळाले व वामनपंडित, रघुनाथ पंडित, नागेश, विठ्ठल, मोरोपंत यांनी वृत्ते, शब्दरचना, समासप्राचुर्य, अलंकार, शृंगारादी वर्णनाचा अतिरेक इत्यादी बाबतीत संस्कृत भाषेचे अनुकरण केले. अव्वल इंग्रजीच्या काळात शास्त्री पंडितांनी काव्य व नाटक या क्षेत्रांत भाषांतरे केली ती संस्कृत भाषेतील ग्रंथाचीच.
      
 देव, धर्म, संस्कृती, ऐतिहासिक परंपरा, तत्त्वज्ञान, साहित्य, धर्माचार, कुलाचार, व्रतवैकल्ये इत्यादी बाबतीत आजही मराठी जीवन संस्कृतप्रचुर आहे. राजा, देव, देव, दर्शन, नृत्य, मंदिर, मेघ, पृथ्वी, प्रकाश, आकाश, चंद्र, सूर्य, तारा, शिखर, ब्राह्मण, पूजाअर्चा, निर्माल्य, उपचार, उपकार, दीप, पत्र, पुष्प, नैवेद्य, गंध, अभिषेक, मंत्र, घंटा, कलश, मूर्ती, पंचायतन, आसन, तीर्थ, प्रसाद, कथा, कीर्तन, आख्यान, नमन, तिथी, होम, हवन, तर्पण, क्षेत्र, पितामह, भोजन इत्यादी शेकडो तत्सम संस्कृत शब्द आज मराठी म्हणूनच वावरत आहेत. तर घर, हात, नाक, तण, पान, माकड, कमळ, कळशी, कान, पोथी, तोंड, पाय इत्यादी अनेक शब्दाची रूपे संस्कृतापासून आलेली आहेत. ज्यांना तद्भव शब्द म्हटले जाते. याशिवाय ‘अव्यापरेषु व्यापार’, ‘येनकेन प्रकारेण’, ‘पुनश्च हरी: ओम’,‘शुभस्य शीघ्रम्’,‘ प्रथमग्रासे मक्षिकापात’ इत्यादी शेकडो वाक्प्रचार आपण मराठीत वापरतो, ते संस्कृतमधीलच. सुभद्रा, अरविंद, मृणालिनी, पद्मावती, रवींद्र, अनुजा, शकुंतला, अनसूया इत्यादी विशेषनामे संस्कृत आहेत.

२) कन्नडचा प्रभाव :

 प्राचीन काळात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र इत्यादी प्रदेशावर सारख्याच राजवटी असल्याने देवणाघेवाण फार मोठ्या प्रमाणावर होत होती. भक्तीमार्गियांचे मुख्य दैवत विठोबा हे कर्नाटकी वा कानडी असल्याचे सर्वज्ञात आहेतच. शहाजीराजे, व्यंकोजीराजे, राजाराम इत्यादींचा दक्षिणेचा संबंध इतिहासात प्रसिद्ध आहे. तंजावर, बंगलोर, जिंजी, म्हैसूर इत्यादी प्रांतात जी मराठी कुटुंबे गेली, त्यांनी तेथील संस्कार आत्मसात केले. कन्नड, तेलुगू इत्यादी भाषातील काही शब्द ज्ञानेश्वरांच्या काळातील मराठीतही दिसून येतात. आरोगणे, आळ, उंडी, उळीग, गुंडा, गुढी, किडाळ, पोकळ, पहुडणे, कोंदण, तूप, कैवार इत्यादी, कन्नड शब्द जुन्या मराठीत दिसतात. बसव, विरण्णा, कोचाळे, तुवा, आेटा, गड्डा, बांबू, परडी, आेंडा इत्यादी शब्द सीमाप्रदेशात आजही वापरले जातात. ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, ळ हे मूर्धन्य उच्चार द्राविडी भाषांतून मराठीत आले. वस्त्रप्रकारात बंडी, लंगोटी, चोळणा, कांबळे, चिरगूट, गादी, तर उडीद, कलिंगड, पडवळ, चिंच, कोथिंबीर हे धान्य व फळे प्रकारात आेगराळे, गाडगे, तांब्या, हंडा, रोवळी हे उपकरणे प्रकारातील कन्नड शब्द आजही मराठीत वापरले जातात.
याशिवाय इरिंग मिरिंग लवंगा तिरिंग, आपडी थापडी गुळाची पापडी, अडगुले मडगुले, आैंडक चाैंडक इत्यादी खेळ व तत्संबंधी शब्द दक्षिणेकडूनच मराठीत आले.

३) फार्सीचा प्रभाव :

मराठी व फार्सी यांचा संबंध जवळ - जवळ ४५० वर्षांचा आहे. त्यामुळे फार्सीतील स्वर, शब्द, व्याकरणीक वैशिष्ट्ये आणि वाक्यप्रचार मराठीत आलेले आहेत. या खुणा ठिगळाप्रमाणे वर दिसत नाहीत.त्या मराठीच्या मुळाशी आहेत. जाजम, जमीन, ताकद आजमावणे, जिकीर, गरीब, जोर, गपगुमान हे सर्व शब्द फार्सी आहेत उदा. जिकीर हा शब्द जिक्र यावरून आला आहे, शतरंज या खेळासाठी जे अंथरतात त्याला सतरंजी केले.
शब्दसिद्धी, वाक्यरचना, वाक्प्रचार, म्हणी, फार्सीच्या प्रभावातील आहेत. दानत, सरकार, इनाम, तारीख, मजकूर, वजीर, पेशा, जिन्नस, तसवीर असे अनेक शब्द फार्सीतून मराठीत आले. वजा, बाकी अस्सल, एकदा, खुद्द, ही काही विशेषणे फार्सी आहेत. बस्स, अलबत, बेशक, खूप, वाह, शाबास, हाय अशी उद्गारवाची अव्यये फार्सी आहेत. हमेशा, बिलकुल, वारंवार ही क्रियाविशेषणे आणि दम घेणे, खरेदी करणे, नजर राखणे इत्यादी, संयुक्त क्रियापदांवर कार्याचा प्रभाव आहे. अमीर उमराव गरीबगुरीब अक्कलहुशारी, आलमदुनिया असे सामाजिक शब्द फार्सी प्रभावातून आले आहेत.

४) हिंदीचा प्रभाव :

मराठीशी हिंदीचा संबंध नामदेवांच्या काळापासून आहे. बहुतेक मराठी संतांनी हिंदीतून देखील रचना केल्या आहेत. अशा धार्मिक व राजकीय कारणांमुळे हिंदी- मराठी संबंध लक्षात घेण्याजोगा आहे. मराठीवरील हिंदीचा प्रभाव हा स्वर व उच्चारण पातळीवर झालेला नाही, पण बरेचसे रूढ शब्द आणि काही व्याकरणिक वैशिष्ट्ये यातून हा प्रभाव दिसतो. पण, तो कानडी, फार्सी इतका विस्तृत परिणाम करत नाही. हिंदीतील काही शब्द मराठीने जसेच्या तसे स्वीकारले आहेत. उदा. संपन्न, ऋण, धन्यवाद, योगदान, घेरावो वरून घेराव, याशिवाय कुमारी,साैभाग्यवतीच्या जागी श्रीमती, मान्यवर, सबकुछ, कक्ष, भाई, भैय्या, दीदी इत्यादी. मोलमजुरी, रितीरिवाज, धनदाैलत हे तर मराठीत मिसळले आहेत. ‘चोर तर चोर वर शिरजोर’, ‘हाजीर तो वजीर’, ‘छपडा छुपडा धनी का माल’ अशा कितीतरी हिंदीतल्या म्हणी मराठीत रूढ झाल्या आहेत.

५) इंग्रजीचा प्रभाव :

इंग्रजी राजवटीच्या प्रदीर्घ वास्तव्यामुळे मराठीवर इंग्रजीचा फार मोठा प्रभाव आहे. इंग्रजी नेत्यांची भाषा असल्यामुळे तिच्यातील शब्द वापरणे व इंग्रजी संस्कृतीतील अनेक गोष्टी स्वीकारणे अव्वल इंग्रजीच्या काळापासून घडलेले दिसते. त्याकाळात मराठीत लेखन करणारे पुढारी आणि विद्वान इंग्रजीतून प्रथम विद्या संपादन करीत व मग ती मराठीत येत असे. त्यामुळे कालांतराने दैनंदिन जीवनातील शब्द संग्रहाच्या बाबतीत असे म्हणता येते की स्वयंपाक घरापासून सभागृहापर्यंत मराठीत इंग्रजीचा वावर वाढला. टेबल, पेन, बोर्ड, ग्रुप, ग्राऊंड, बेल, फी, साॅरी, इन्स्पेक्टर, शर्ट, कोट, बटन, काॅलर, बूट,डाॅक्टर, व्हिजिट, कंपाऊंडर, डोझ, ड्रेसिंग, रेल्वे स्टेशन, कंडक्टर, कार्ड, मनीऑर्डर, पोस्टऑफिस, न्यूज, हेडलाइन, असे कितीतरी शिक्षणविषयक, पोषाख, दवाखाना, प्रवास, पोस्टांचे व्यवहार, वृत्तपत्रलेखन इत्यादी क्षेत्रांमध्ये इंग्रजी शब्द समाविष्ट झाले. अनेक इंग्रजी वाक्प्रचार मराठीत भाषांतर करून वापरले जाऊ लागले. गेट आऊट, टू बेल ए कॅट, याशिवाय शाॅर्ट व्हिजिट, आेपन डिस्कशन, थ्रो लाईट अपाॅन इत्यादीसारखे छोटी वाक्ये सहजपणे आज मराठीत वापरतात.
        इंग्रजीचा प्रभाव स्वीकारताना मराठी मोडणीचे भान सुटता कामा नये. फारसी, हिंदी आणि इंग्रजी यापैकी फारसीच्या प्रभावाला मराठीचे मराठीपण बदलता आले नाही. इंग्रजीबद्दल मात्र ती भीती आहे. आजही शासकीय आणि ज्ञानात्मक व्यवहार आधी इंग्रजीतून व नंतर देशी भाषांमधून होतात. पण, मराठी ही जिवंत भाषा आहे याचे भान राखून मराठी शिकवणे, शिकणे आणि बोलणे होणे आवश्यक आहे.

(लेखिका भाषाशास्त्री, साहित्यिक आहेत.)

दि.२२/१२/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

2 comments:

  1. मॅडम, खूप छान लिहिता तुम्ही, वाचायला मजा आली.

    ReplyDelete
  2. अनेक इतर प्रवाह मराठीत कसे आले व आणलेले झाले हे छान वाचायला मिळाले

    ReplyDelete