Sunday, June 16, 2019

भाषा संपादन प्रक्रिया-भाग ३

भाषा संपादन प्रक्रिया-भाग ३
डाॅ. अमृता इंदूरकर
          वयाच्या चवथ्या वर्षापर्यंत लहान मुलांचा स्वतंत्र शब्दकोश तयार होत असतो. एखाद्या क्रियेसाठी वस्तूसाठी, कशाहीसाठी रुढ शब्दापेक्षा त्याच्या मनोकोशात तयार झालेला शब्द अधिक योग्य ठरत असतो. इथूनच पुढे मुलांची वाक्यरचना विकसनाची प्रक्रिया सुरु होते. प्रत्यक्ष भाषा संपादन कसे होते हे आपण काही उदाहरणाद्वारे मागे बघितले. या लेखात त्यापुढील टप्पे बघूया..

६) वाक्यरचना विकसन : Developing sytax)
           याआधी बघितलेली मुलांची भाषिक स्वतंत्र रचना ही वाक्यविकसन होताना देखील कायम असते. एखाद्या लहान मुलाला कुणी मोठ्या व्यक्तीने सांगितलेले वाक्य जसे ऐकले तसे परत म्हणायला सांगितले तर ते मूल त्यांच्या स्वतंत्र शैलीमध्ये ते वाक्य म्हणून दाखवेल. उदा. 'जी म्याऊ चोरुन दूध पिते ती जोरात पळते’, मूल त्याच्या शैलीत ‘म्याऊ दूध पिते ती जोरात पळते’, असेही म्हणू शकतो, पण व्यक्त होताना मनात भाव, मात्र मोठ्यांनी म्हटलेल्या वाक्याचा असतो.
भाषा विकसनाच्या अंतर्गत लहान मुलांच्या वाक्य विकसन प्रक्रियेवर बराच सखोल अभ्यास झालेला आहे. वयाच्या त्या-त्या टप्प्यावर या वाक्य विकसनाचे वेगवेगळे टप्पे देखील आहेत. काही प्रश्नांचे स्वरूप असणारे आहेत. तर काही नकार दर्शविणारे वाक्य निर्माण करणारे आहेत. हे कोणते व कसे आहेत ते आपण बघू या. यामध्ये वाक्यविकसनाचा पहिला टप्पा १८ ते २६ महिन्यांमधला, दुसरा टप्पा २२ ते ३० महिन्यांमधला आणि तिसरा टप्पा २४ ते ४० महिन्यांमधला आहे. यामध्ये सामान्य मुलांमध्ये हा काळ कमी जास्त होऊ शकतो.
७. प्रश्न निर्माण करणे (Forming questions)
          प्रश्न निर्माण करण्याच्या पातळीमध्ये लहान मुलांच्या पहिल्या पातळीमध्ये दोन पद्धती असतात. भाषा आत्मसात करताना या विशिष्ट टप्प्यांत त्यांना ‘काय- कुठे’ पद्धत बरोबर अवगत होते. यालाच इंग्रजीत wh- form (where, who) म्हणतात. बोलण्यातून आपले भाव व्यक्त करण्यासाठी पालक एक तर सुरुवातीला किंवा शेवटी उच्चारामध्ये उतार, चढाव आणत या ‘काय- कुठे', पद्धतीचा अवलंब मुलांसमोर करतात. जसे - ‘म्याऊ कुठे आहे?’, ‘घोडा कुठे गेला?’, ‘खुर्चीत बसतो का?’, ‘भू- भू काय खातो?’ इत्यादी अशा  काय कुठे प्रश्नाचे अनुकरण मुलं लगेच करू लागतात.
       दुसऱ्या पद्धतीमध्ये वरील उदाहरणापेक्षा थोडे अधिक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात. पण, यामध्ये देखील उच्चारातील चढाव मात्र कायम असतो. असे आढळले आहे की, असे काय- कुठे प्रश्न मुलांकडून अधिकाधिक वापरल्या जातात. जसे- ‘पुस्तकाचे नाव काय आहे?’, ‘तुला खायचे आहे काय?’, ‘तो भू- भू बघितला का?’, ‘तू का हसतो आहेस?’ इत्यादी.
        तिसऱ्या पद्धतीमध्ये या प्रश्न स्वरूपात कर्ता आणि क्रियापदाची बऱ्यापैकी उलटापालट करून वापरण्याची गरज निर्माण व्हायला लागते. जसे- ‘मी जाऊ शकते का?’ आणि ‘मी जाऊ का?’ पण, अशी उलटापालट कितीही झाली तरी हे wh form प्रश्न संपत नाहीत. उलट पाचव्या- सहाव्या वर्षी शाळेत जायला सुरुवात झाल्यावर मुलं या wh form पद्धतीचा शिक्षकांशी संवाद साधताना अधिक वापर करतात. कारण तो त्यांना सोयीचा वाटतो. शिवाय या पद्धतीतून बालसुलभ कुतुहलाला भाषिक पद्धतीने सुयोग्य असे व्यक्तही होता येते. फार गुंतागुंत अथवा उलटापालट नसलेले मोठ्यांचे बोलणे सहज आत्मसात केले जाते. असे करताना खरे तर मुलांना बरेचदा शब्दांतर्गत येणाऱ्या क्रियापदांचा निश्चित वापर आत्मसात व्हायला वेळ लागतो. तरी आपलेही बोलणे आता मोठ्यांसारखे आहे या सुखावून जाणाऱ्या भावनेसाठी अशी वाक्यरचना लवकर आत्मसात करतात. जसे, ‘मला एक मिळेल का बिस्किट?’ किंवा ‘मला एक बिस्किट मिळेल का?’, ‘मला मदत करशील का?’, ‘हे कसे उघडते?’, ‘तू काय केलं?’, ‘मला हे जमलं का?’, ‘हे पिल्लू का उभे राहत नाही?’ इत्यादी...
८) नकारार्थी वाक्य तयार करणे :(Forming Negatives)
          नकारार्थी वाक्यरचनेत मुलांचा प्रारंभी फक्त नाही-नको हे दोनच शब्द वापरण्याकडे कल असतो. जसे- ‘नाही पडला’, ‘नको मला’, ‘तिकडे नको बसू’, ‘हा टेडी बियर नाही’ इत्यादी...
       दुसऱ्या पातळीत या ‘नाही, नको’ ची विविध रूपे वापरायला सुरुवात होते. क्रियापदाला जोडून हे नकार अधिक करुन येतात जसे- ‘मला हे नको आहे, ती आई नाही आहे, तू डान्स नाही करू शकत, मला हे नाही येत’, इत्यादी...
        तिसऱ्या पातळीपर्यंत येता- येता प्रारंभी वापर असणारे नाही, नको हळूहळू कमी व्हायला लागतात. आणि या नाहिशी संबंधित अधिक मोठी वाक्यरचना तयार होऊ लागते. ही पातळी बरीच उशीरा आत्मसात होते. जसे, मी त्याला पकडू शकत नाही, तो ते घेत नाही, ती जाऊ देत नाही मला, हे आईस्क्रीम नाही!’ इत्यादी नव्या वाक्यरचनांना प्रारंभ होतो.
९)अर्थ विकसन (Developing Semantics)
          भाषा संपादनाची प्रक्रिया संपूर्णपणे अवगत होणे म्हणजे लहान मुलांना भाषा आत्मसात झाली असे नव्हे. तर मुले भाषेद्वारे जे जे आत्मसात करतात व त्याचा संवादासाठी वापर करतात, त्यामध्ये अर्धविकसनही महत्त्वाचे असते. म्हणजे केवळ शब्द अवगत होऊन उपयोग नसतो तर अर्थही तितकाच महत्त्वाचा. बरेचदा असे होते की घरी मुलाला विशिष्ट शब्दाचा विशिष्ट अर्थ समजावून सांगितलेला असतो, पण नेमके बाहेर कुठेतरी त्या शब्दाचा अर्थ कुणाकडून विचारला गेला तर ते मूल त्याच्या भावार्थ कोशात जो अर्थ कायमचा पक्का झाला आहे, तोच सांगते.
   एका मुलाला सांगितले होते की, ‘माशी घाण असते. ती सगळीकडे जंतू पसरवते’. अन्य व्यक्तीने त्याला ‘जंतू म्हणजे काय?’ असे विचारले असता मुलाने ‘जंतू असं काहीतरी आहे, त्याच्यासोबत माशी खेळत असते,’ असे उत्तर दिले. यावरून जंतूचा अर्थ त्या मुलाच्या मनात कसा आहे हे स्पष्ट होते. अशाच प्रकारे मुलांच्या दैनंदिन जीवनातील क्रियेला, वस्तूंना त्याचा मूळ अर्थ माहीत असूनही आपला स्वतंत्र असा अर्थच गृहीत धरतात व तोच वापरतात.
उदाहरणार्थ-
मूल : आई, माझे डोळे काळे झाले आता!
आई : हो रात्र झाली आहे. त्यामुळे तुला खूप झोप आली आहे.
मूल : हो म्हणून माझे डोळे खूप काळे झाले आहेत.
आई : अरे.... म्हणजेच तुला खूप झोप आली आहे.
मूल : नाही... माझे डोळे खूप काळे झाले आहे.
यावरून हे स्पष्ट होते की मुलाच्या मनातील झोप येणे या क्रियेचा अर्थ डोळे काळे होणे, असा आहे.
याला अर्थाचा अतिविस्तार (Overextension) असे म्हणतात. बरेचदा एखाद्या शब्दाचा अर्थविस्तार अन्य वस्तूंच्या सारख्या आकार, ध्वनी, हालचाली, पोत इत्यादी वरून साम्य दाखविणारा ठरतो. म्हणजे ‘बॉल’ या शब्दाचा अर्थविस्तार हा सर्व गोल आकाराच्या वस्तूंना लागू होतो. जसे चंद्र, संत्र, मोसंबी, गोल बटाटा, टोमॅटो, कपाटाच्या दाराचे गोल नाॅब इत्यादी. इतकेच नाही तर भरल्या ढेमसाच्या भाजीला ‘बॉलची भाजी’ असे देखील मूल म्हणते. यासारखीच अनेक उदाहरणे आहेत. चपटा काळपट वाल (घेवडा) कानाच्या आकाराशी सामर्थ्य साधणारा असतो म्हणून ती कानाची भाजी असते. अंकुरीत मुग- मटकीची उसळ ही शेपटीवाल्या दाण्याची उसळ होते. इंग्रजीत सिझरचे (कात्री) सिझो होते व पुढे सगळ्या मेटलच्या वस्तूंना सिझो म्हटले जाते. प्रत्येक वस्तूची अर्थनिश्चिती करण्याच्या बालसुलभ कुतूहलापोटी हा अर्थ अतिविस्तार घडून येतो.
      मुलांच्या वाक्यविकासामध्ये अर्थ अतिविस्तारिकरणाची एक अंतर्गत व्यवस्था लागलेली असते. म्हणजे विशिष्ट आकाराच्या वस्तूला बघून अन्य तशाच आकारांना मुलं अर्थानुसारी तोच शब्द वापरत असले तरी मूळ अर्थाची वस्तू मात्र अचूकपणे ओळखू शकतात. यामध्ये ते सरमिसळ करीत नाही. एका सर्वेक्षणात २ ते ३ वयोगटातील मुलांचा गट ‘अॅपल’ म्हणून जवळपास सर्व गोल आकाराच्या वस्तूंना अॅपलच संबोधित करीत होता. जसे टोमॅटोला, बॉलला. पण ज्यावेळी त्याच्या समोर टोमॅटोचा ढीग व अॅपलचा ढीग ठेवला असता व अॅपल कोणते आहे विचारले असता त्याने बरोबर अॅपलच उचलले.
साधारणत: पाच वर्षांपर्यंत मुलं भाषा संपादनाचा जास्तीत जास्त आवाका आत्मसात करतात. म्हणूनच पाच वर्षानंतर नव्याने अन्य भाषेचा संपर्क आल्यास कोणतेही मूल ती देखील भाषा आत्मसात करू लागले. ही प्रक्रिया प्रथम, भाषेतून सुरु होऊन इतर नव्या भाषा आत्मसात करण्यापर्यंत कार्य करीत राहते. अशाप्रकारे भाषा संपादन प्रक्रियेच्या भाग १, २ व ३ मध्ये आपण एकूण ९ टप्पे बघितले, ज्याद्वारे मूल भाषा संपादन करीत असते.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
दि.१६/०६/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

1 comment:

  1. भाषाभ्यासांती आलेले ज्ञान, ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची धडपड ही तर भिडतेच पण या लेखात जे लहान मुलांचे व त्यांच्या विचार करण्याच्या रीतीचे जे निरीक्षण केलेले आहे ते अफाट आहे, दाद देण्याजोगे.

    ReplyDelete