Sunday, June 30, 2019

हरिपाठातील नामसंकीर्तन महात्म्य

हरिपाठातील नामसंकीर्तन महात्म्य
डाॅ. अमृता इंदूरकर
          ज्येष्ठाच्या पाठीवर जसा अाषाढ येतो तसाच ज्येष्ठ म्हणजे निवृत्तीनाथ तर अाषाढ म्हणजे ज्ञानदेव, असा विचार दरवर्षी अाषाढ येऊ घातला की मनात येताेच. अाजचा योगही पहा कसा जुळून अाला अाहे. अाज संत निवृत्तीनाथांची पुण्यतिथी देखील अाहे. अाजच्या या निवृत्तीनाथांच्या पुण्यतिथीच्या पर्वावर पुढे येऊ घातलेल्या अाषाढी एकादशीचा कौल घेऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचे महात्म्य उलगडण्याची संधी, हेही भाग्यच अाहे!
         प्राचीन काव्याचा एकूणच कालखंड बघितला तर संख्यात्मकदृष्ट्या संतांची व त्यांच्या काव्यनिर्मितीची श्रीमंती अापल्या लक्षात येते. त्यातही संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनातल्या माऊलीचे मूर्त रुपच. ज्ञानदेवांच्या साहित्यसंपदेचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. एक तत्त्वज्ञानात्मक व दुसरा भावात्मक. कारण त्यांच्या साहित्यातील ईश्वरी अस्तित्वाचे दार्शनिक स्वरुप वेगळ्या अंगांनी जाताना दिसते, तर भावनात्मक स्वरुप वेगळ्या अंगांनी जाताना दिसते. ‘चांगदेवपासष्टी’, ‘अमृतानुभव’ हे ग्रंथ त्यांचे दार्शनिकत्व सिद्ध करणारे अाहेत. या दोन्ही ग्रंथांत आध्यात्मिक तत्त्वज्ञानच स्पष्ट झालेले दिसते. ‘ज्ञानेश्वरी’ च्या बाबतीत थोडक्यात बोलायचे झाले तर ज्ञानेश्वरी ही खरोखर शब्दशः ‘भावार्थदीपिका’ अाहे. तत्त्वज्ञानाचा व भक्तिमय काव्याचा मनोज्ञ संगम यात झालेला अाहे. ‘जे जे भूत भेटेल तें तें भगवंत मानणे’ हाच ज्ञानदेवांच्या मते खरा भक्तियोग होय. ज्ञानेश्वरी ही ज्ञानदेवांसाठी अात्मानुभव होती. पण, ज्ञानदेवांची अभंगरचना, हरिपाठ मात्र त्यांचा स्वानुभव ठरते.
          ज्ञानदेवांनी रचलेले हरिपाठ म्हणजे सामान्य, अतिसामान्य समृद्ध भक्ताचा वेद अाहेत. या हरिपाठाची महती अशी की सामान्य भक्त पारंपरिक, आध्यात्मिक, कर्मठ अशा तत्त्वज्ञानापर्यंत पोहचू शकत नाही म्हणून ज्ञानदेवांनी हरिपाठाच्या रुपाने त्या तत्त्वज्ञानाचे सार अधिक सोपे, सरल करून केवळ नामभक्तीचा ठेवा हाती दिला. ज्ञानेश्वरीतही काही अशी नामसंकीर्तनगौरव अाढळतो, पण तो मुख्यत: गीतेतील सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता: अश्या श्लोकांवरील भाष्याच्या आलेला आहे.पण हरिपाठात मात्र नामस्मरण मार्गाचा स्वतंत्र थाट बघायला, अनुभवायला मिळतो. किंबहुना, त्यासाठीच त्याची निर्मिती झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्या समृद्ध जीवांना कर्मठ शक्ती, ईश्वरपूजा जमत नाही त्यांनी काय मग भक्ती करणे सोडून द्यायचे? नाही! या समस्येवरचा उपाय म्हणजेच ‘हरिपाठ’.
          हरिपाठात ज्ञानदेवांनी सरल, सहजभक्तीच्या अाड येणाऱ्या पाच समस्यांचा, अडसरांचा प्रामुख्याने उल्लेख केला अाहे. त्या समस्या म्हणजे
१)योगयागविधी २)तीर्थव्रतनेम ३)जप-तपकर्म ४) योगयागक्रिया ५) यज्ञयागक्रिया.
एखाद्या सिद्ध पुरुषाला, हठयोग्याला या मार्गाने उपचारांनी परमेश्वरप्राप्ती होणे कठीणच. मग त्यांनी कोणत्या मार्गावरून जायचे जेणेकरून ईश्वरसान्निध्य मिळेल तर यासाठी ज्ञानदेव हरिपाठाच्या प्रारंभीच फारच साधेपणाने अावाहन करतात.
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।तेणे मुक्ती चारी साधियेल्या।।
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी।।

शुद्ध मनाने फक्त या इष्टदेवतेच्या दारात क्षणभरच उभे रहा, तिथेच तुम्हाला चारही मुक्ती प्राप्त होतील. कारण पाप-पुण्याच्या हिशोबात भक्तीच जास्त वजा होत असते. तेव्हा भक्तीमध्ये पुण्याच्या हिशोब न करता नि:स्वार्थपणे हरिचा जप करा. कारण तो हरी अाणि अापला अात्मा हे जणूकाही जीवशिवएैक्य अाहे. हा हरी चराचरात वास करतो. ‘भरला घनदाट हरि दिसे’ मग ‘वाया तू दुर्गम न घाली मन’. त्या हरीच्या प्राप्तीसाठी मग व्यर्थच दुर्गम मार्ग का निवडतोस? ज्ञानदेव या हरीचे स्वरुप स्पष्ट करताना म्हणतात,
अव्यक्त निराकार नाही ज्या अाकार। जेथोनि चराचर त्यासी भजे।।’ शेवटी काय तर या सृष्टीमधली प्रत्येक गोष्ट त्या-त्या वैशिष्ट्यांसकट अात्मसात केली तरच ती अाकळते व प्राप्तही होते. यासाठी ते उदाहरण देतात की भाव विरहित भक्ती, भक्तीविरहित मुक्ती, बळविरहित शक्ती बोलू व दाखवू नये. उलट लोकांना दाखविण्यासाठी करण्यात येणारा योगयागविधि हा सिद्धीचा मार्ग तर नव्हेच उलट दंभमार्ग प्रकट करणारा अाहे. नाना तिर्थांची भ्रमंती करून मुखातील हरिनामात चित्तच नसेल तर ते सर्व व्यर्थच अाहे. उलट जो निर्मळ मनाने हरिचे उच्चारण करील त्याच्या अनंत-पापराशी क्षणमात्रच लयाला जातील, हा विश्वास ज्ञानदेव सामान्यांना देतात.
          दुसरी समस्या म्हणजे ‘तीर्थव्रतनेम’. केवल उपचार म्हणून तीर्थ, व्रत, नेम हे सर्व व्यर्थ अाहे, जर त्या कारणांमध्ये भावनेचा अभाव असेल तर अशा भावविरहित व्रतवैकल्याने मिळविलेली उपाधी वायाच जाणार. कारण सातत्याने हरीचा उच्चार हा यंत्रवत पद्धतीने होऊ शकत नाही. ही गोष्ट भावनेने अाकळण्याची अाहे म्हणून ते म्हणतात, ‘भावबळे अाकले येऱ्हवी नाकळे’. किमान भावनेने हा नाममहिमा समजण्याचा प्रयत्न केला तर कळेलही नाहीतर एरव्ही कळणारच नाही. अर्थात हेही वाटते तितके सोपे नाही, ज्याप्रमाणे जमिनीवर सांडलेल्या पाऱ्याचा कण पकडणे, उचलणे कठीण असते, त्याप्रमाणेच हे नाममहात्म्य अाहे.
‘पारियाचा रवा घेता भूमीवरी। यत्न परोपरी साधन तैसे। अाज नामस्मरण खूप केले, उद्या काहीच नाही, मग पुन्हा कालांतराने सोयीने असे नामस्मरण काही कामाचे नाही. ते तितकेच सहज,अनायास यायला हवे. कारण ‘रामकृष्ण’ नामाच्या नित्य स्मरणाने कळिकाळही दूर राहतो. अापल्या दैनंदिन जीवनाच्या अाचरणातील अनंत पापांचे कळप जळत जळत पुढे जातात. इतकी या नामाची सिद्धी अाहे.

        तिसरी समस्या अाहे ‘जप-तप-कर्म.’ ज्ञानदेव म्हणतात, सगळ्या वेदशास्त्र- श्रुती- स्मृती- पुराण यांचे सार एकच ते म्हणजे ‘नारायण’. त्यांच्या प्राप्तीसाठी खूप जप, कठोर तप, त्यातून येणाऱ्या कर्मकांडात्मक क्रिया या सर्व श्रम वाया घालविणाऱ्या अाहेत. उलट हरिनामाचे एकमेव शास्त्र असे अाहे जे कुळगोत्र वर्ज्य मानते. अात्मसिद्धीच्या दृष्टीने हे सगळे निरर्थक उपाधींचे अवडंबर अाहे. 
        चवथी ‘योगयोगक्रिया’ व पाचवी ‘यज्ञयोगक्रिया’ या समस्या देखील मानवाचे श्रम व्यर्थ ठरविणाऱ्या अाहेत. या अवडंबर मार्गापेक्षा नाम श्रेष्ठ अाहे. या नाममहात्म्यातून ज्ञानदेवांनी अप्रत्यक्षपणे व्रतधर्माचा, वर्णधर्माचा अधिक्षेप सुचविलेला अाहे. ‘योगयोग क्रिया धर्माधर्म माया। गेले ते विलया हरिपाठी।।’कारण जाती, वित्त, गोत्र, कुळ, शील हा विचारच मुळात लौकिक पातळीवरचा अाहे. नाम तर याहीपलीकडचे म्हणजे अलौकिक अाहे. नामसंकीर्तन हे या लटिक्या संसारातून तरून जाण्याचे सर्वात सोपे साधन अाहे. त्यासाठी काळवेळेची शुद्धी पाहावी लागत नाही. उलट नामसंकीर्तन हे कार्य ज्याप्रमाणे एखादा भ्रमर सुमनकालिकेमध्ये नकळतच गुंततो. त्याप्रमाणे हे नामसंकीर्तन व्हायला हवे.
           ज्ञानदेव सांगतात की मनाच्या मार्गाने जो जातो अाणि वासनेला बळी पडतो तो हरिनामसंकीर्तनातून मिळणाऱ्या अानंदाला मुकतो. ‘मनोमार्गे गेला तो तेथे मुकला’. पण, जो रामकृष्ण नामात तल्लीन होतो. त्याला उन्मनीच्या अानंदाचा लाभ होतो. रामकृष्णनामी उन्मनीच्या अानंदाचा लाभ होतो.
‘रामकृष्णनामी उन्मनी साधिली। तयासी लाधली सकल सिद्धी।’ हरिपाठाद्वारे ज्ञानदेव हेच सांगण्याचा प्रयत्न करीत अाहेत की, माणसाचे मन व या मनाचे व्यापार फार अतर्क्य असतात. मानवी स्वभाव फारच सहजरीत्या अापल्या इच्छा, अाकांक्षा, मोह यांना बळी पडून जीवनात त्यांनाच प्राधान्य देत असतो. या मनोव्यापारात मोडणारा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे नीती, अनीती, पाप-पुण्य, धर्म-अधर्म, कर्म- अकर्म माणुस अापल्या श्रद्धेची, भक्तीची, धर्माची, पुण्याची टक्केवारी शेवटी यावरूनच तपासत असतो. पण हरिनामाचा व यावरील सर्व गोष्टींचा एकमेकांशी काहीच संबंध नसतो. तुमचा धर्म, पुण्य कर्म हे काही भक्ती मोजण्याचे मापक नसते. नामभक्तीचे जग या सर्वांच्या पलीकडचे अाहे. कोणते भक्तीतत्त्व निश्चित करायचेच असेल तर ज्ञानदेव म्हणतात,
एकतत्त्व नाम दृढ धरी मना। हरीसी करुणा येईल तुझी।।
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद। वाचेसी सद्गद जपा अाधी।।
‘हरिनाम’ हे एकमेव तत्त्व मनात दृढपणे, कायम ठेवले तर हरीची प्राप्ती होणारच कारण ‘रामकृष्णगोविंद’ हे नामच इतके सोपे अाहे की ज्याला कोणत्या कर्मकांडी बैठकीची गरजच नाही. ज्याला रामाचा अाचार, कृष्णाचा विचार मनोमनी कळला तो रामकृष्णगोविंदमय झाला. या २६ व्या हरिपाठातून रामकृष्ण गोविंद नामसंकीर्तनाची महती ज्ञानदेवांनी सांगितली व शेवटी जाता जाता ते एका सूचनेकडे लक्ष वेधतात. ते म्हणतात, या हरिपाठाचे नित्यपठण करावे असे सांगतातच, पण पुढे म्हणतात, ‘असावे स्वस्थ चित्त एकाग्री मन। उल्हासे करून स्मरण जीवी।। अशा पद्धतीने हे नामसंकीर्तन व्हायला पाहिजे.
या हरिपाठातून हे स्पष्ट होते की, ‘हरिविण सौजन्य नेणे काही’ अशी ज्ञानदेवांची श्रद्धा अाहे. हरिपाठातील अभंगवाणीतून अाशय अभिव्यक्तीनुरुप प्रकट होणारी सहज सुलभता फारच तरल अाहे. एकूणच असे म्हणता येईल की हरिपाठात भक्तीचा अोलावा, तत्त्वज्ञानाचे सुलभीकरण, नाममहात्म्याची तल्लीनता यांचा अद्भुत असा त्रिवेणी संगमच झाला अाहे.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
दि.३०/०६/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

Sunday, June 16, 2019

भाषा संपादन प्रक्रिया-भाग ३

भाषा संपादन प्रक्रिया-भाग ३
डाॅ. अमृता इंदूरकर
          वयाच्या चवथ्या वर्षापर्यंत लहान मुलांचा स्वतंत्र शब्दकोश तयार होत असतो. एखाद्या क्रियेसाठी वस्तूसाठी, कशाहीसाठी रुढ शब्दापेक्षा त्याच्या मनोकोशात तयार झालेला शब्द अधिक योग्य ठरत असतो. इथूनच पुढे मुलांची वाक्यरचना विकसनाची प्रक्रिया सुरु होते. प्रत्यक्ष भाषा संपादन कसे होते हे आपण काही उदाहरणाद्वारे मागे बघितले. या लेखात त्यापुढील टप्पे बघूया..

६) वाक्यरचना विकसन : Developing sytax)
           याआधी बघितलेली मुलांची भाषिक स्वतंत्र रचना ही वाक्यविकसन होताना देखील कायम असते. एखाद्या लहान मुलाला कुणी मोठ्या व्यक्तीने सांगितलेले वाक्य जसे ऐकले तसे परत म्हणायला सांगितले तर ते मूल त्यांच्या स्वतंत्र शैलीमध्ये ते वाक्य म्हणून दाखवेल. उदा. 'जी म्याऊ चोरुन दूध पिते ती जोरात पळते’, मूल त्याच्या शैलीत ‘म्याऊ दूध पिते ती जोरात पळते’, असेही म्हणू शकतो, पण व्यक्त होताना मनात भाव, मात्र मोठ्यांनी म्हटलेल्या वाक्याचा असतो.
भाषा विकसनाच्या अंतर्गत लहान मुलांच्या वाक्य विकसन प्रक्रियेवर बराच सखोल अभ्यास झालेला आहे. वयाच्या त्या-त्या टप्प्यावर या वाक्य विकसनाचे वेगवेगळे टप्पे देखील आहेत. काही प्रश्नांचे स्वरूप असणारे आहेत. तर काही नकार दर्शविणारे वाक्य निर्माण करणारे आहेत. हे कोणते व कसे आहेत ते आपण बघू या. यामध्ये वाक्यविकसनाचा पहिला टप्पा १८ ते २६ महिन्यांमधला, दुसरा टप्पा २२ ते ३० महिन्यांमधला आणि तिसरा टप्पा २४ ते ४० महिन्यांमधला आहे. यामध्ये सामान्य मुलांमध्ये हा काळ कमी जास्त होऊ शकतो.
७. प्रश्न निर्माण करणे (Forming questions)
          प्रश्न निर्माण करण्याच्या पातळीमध्ये लहान मुलांच्या पहिल्या पातळीमध्ये दोन पद्धती असतात. भाषा आत्मसात करताना या विशिष्ट टप्प्यांत त्यांना ‘काय- कुठे’ पद्धत बरोबर अवगत होते. यालाच इंग्रजीत wh- form (where, who) म्हणतात. बोलण्यातून आपले भाव व्यक्त करण्यासाठी पालक एक तर सुरुवातीला किंवा शेवटी उच्चारामध्ये उतार, चढाव आणत या ‘काय- कुठे', पद्धतीचा अवलंब मुलांसमोर करतात. जसे - ‘म्याऊ कुठे आहे?’, ‘घोडा कुठे गेला?’, ‘खुर्चीत बसतो का?’, ‘भू- भू काय खातो?’ इत्यादी अशा  काय कुठे प्रश्नाचे अनुकरण मुलं लगेच करू लागतात.
       दुसऱ्या पद्धतीमध्ये वरील उदाहरणापेक्षा थोडे अधिक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात. पण, यामध्ये देखील उच्चारातील चढाव मात्र कायम असतो. असे आढळले आहे की, असे काय- कुठे प्रश्न मुलांकडून अधिकाधिक वापरल्या जातात. जसे- ‘पुस्तकाचे नाव काय आहे?’, ‘तुला खायचे आहे काय?’, ‘तो भू- भू बघितला का?’, ‘तू का हसतो आहेस?’ इत्यादी.
        तिसऱ्या पद्धतीमध्ये या प्रश्न स्वरूपात कर्ता आणि क्रियापदाची बऱ्यापैकी उलटापालट करून वापरण्याची गरज निर्माण व्हायला लागते. जसे- ‘मी जाऊ शकते का?’ आणि ‘मी जाऊ का?’ पण, अशी उलटापालट कितीही झाली तरी हे wh form प्रश्न संपत नाहीत. उलट पाचव्या- सहाव्या वर्षी शाळेत जायला सुरुवात झाल्यावर मुलं या wh form पद्धतीचा शिक्षकांशी संवाद साधताना अधिक वापर करतात. कारण तो त्यांना सोयीचा वाटतो. शिवाय या पद्धतीतून बालसुलभ कुतुहलाला भाषिक पद्धतीने सुयोग्य असे व्यक्तही होता येते. फार गुंतागुंत अथवा उलटापालट नसलेले मोठ्यांचे बोलणे सहज आत्मसात केले जाते. असे करताना खरे तर मुलांना बरेचदा शब्दांतर्गत येणाऱ्या क्रियापदांचा निश्चित वापर आत्मसात व्हायला वेळ लागतो. तरी आपलेही बोलणे आता मोठ्यांसारखे आहे या सुखावून जाणाऱ्या भावनेसाठी अशी वाक्यरचना लवकर आत्मसात करतात. जसे, ‘मला एक मिळेल का बिस्किट?’ किंवा ‘मला एक बिस्किट मिळेल का?’, ‘मला मदत करशील का?’, ‘हे कसे उघडते?’, ‘तू काय केलं?’, ‘मला हे जमलं का?’, ‘हे पिल्लू का उभे राहत नाही?’ इत्यादी...
८) नकारार्थी वाक्य तयार करणे :(Forming Negatives)
          नकारार्थी वाक्यरचनेत मुलांचा प्रारंभी फक्त नाही-नको हे दोनच शब्द वापरण्याकडे कल असतो. जसे- ‘नाही पडला’, ‘नको मला’, ‘तिकडे नको बसू’, ‘हा टेडी बियर नाही’ इत्यादी...
       दुसऱ्या पातळीत या ‘नाही, नको’ ची विविध रूपे वापरायला सुरुवात होते. क्रियापदाला जोडून हे नकार अधिक करुन येतात जसे- ‘मला हे नको आहे, ती आई नाही आहे, तू डान्स नाही करू शकत, मला हे नाही येत’, इत्यादी...
        तिसऱ्या पातळीपर्यंत येता- येता प्रारंभी वापर असणारे नाही, नको हळूहळू कमी व्हायला लागतात. आणि या नाहिशी संबंधित अधिक मोठी वाक्यरचना तयार होऊ लागते. ही पातळी बरीच उशीरा आत्मसात होते. जसे, मी त्याला पकडू शकत नाही, तो ते घेत नाही, ती जाऊ देत नाही मला, हे आईस्क्रीम नाही!’ इत्यादी नव्या वाक्यरचनांना प्रारंभ होतो.
९)अर्थ विकसन (Developing Semantics)
          भाषा संपादनाची प्रक्रिया संपूर्णपणे अवगत होणे म्हणजे लहान मुलांना भाषा आत्मसात झाली असे नव्हे. तर मुले भाषेद्वारे जे जे आत्मसात करतात व त्याचा संवादासाठी वापर करतात, त्यामध्ये अर्धविकसनही महत्त्वाचे असते. म्हणजे केवळ शब्द अवगत होऊन उपयोग नसतो तर अर्थही तितकाच महत्त्वाचा. बरेचदा असे होते की घरी मुलाला विशिष्ट शब्दाचा विशिष्ट अर्थ समजावून सांगितलेला असतो, पण नेमके बाहेर कुठेतरी त्या शब्दाचा अर्थ कुणाकडून विचारला गेला तर ते मूल त्याच्या भावार्थ कोशात जो अर्थ कायमचा पक्का झाला आहे, तोच सांगते.
   एका मुलाला सांगितले होते की, ‘माशी घाण असते. ती सगळीकडे जंतू पसरवते’. अन्य व्यक्तीने त्याला ‘जंतू म्हणजे काय?’ असे विचारले असता मुलाने ‘जंतू असं काहीतरी आहे, त्याच्यासोबत माशी खेळत असते,’ असे उत्तर दिले. यावरून जंतूचा अर्थ त्या मुलाच्या मनात कसा आहे हे स्पष्ट होते. अशाच प्रकारे मुलांच्या दैनंदिन जीवनातील क्रियेला, वस्तूंना त्याचा मूळ अर्थ माहीत असूनही आपला स्वतंत्र असा अर्थच गृहीत धरतात व तोच वापरतात.
उदाहरणार्थ-
मूल : आई, माझे डोळे काळे झाले आता!
आई : हो रात्र झाली आहे. त्यामुळे तुला खूप झोप आली आहे.
मूल : हो म्हणून माझे डोळे खूप काळे झाले आहेत.
आई : अरे.... म्हणजेच तुला खूप झोप आली आहे.
मूल : नाही... माझे डोळे खूप काळे झाले आहे.
यावरून हे स्पष्ट होते की मुलाच्या मनातील झोप येणे या क्रियेचा अर्थ डोळे काळे होणे, असा आहे.
याला अर्थाचा अतिविस्तार (Overextension) असे म्हणतात. बरेचदा एखाद्या शब्दाचा अर्थविस्तार अन्य वस्तूंच्या सारख्या आकार, ध्वनी, हालचाली, पोत इत्यादी वरून साम्य दाखविणारा ठरतो. म्हणजे ‘बॉल’ या शब्दाचा अर्थविस्तार हा सर्व गोल आकाराच्या वस्तूंना लागू होतो. जसे चंद्र, संत्र, मोसंबी, गोल बटाटा, टोमॅटो, कपाटाच्या दाराचे गोल नाॅब इत्यादी. इतकेच नाही तर भरल्या ढेमसाच्या भाजीला ‘बॉलची भाजी’ असे देखील मूल म्हणते. यासारखीच अनेक उदाहरणे आहेत. चपटा काळपट वाल (घेवडा) कानाच्या आकाराशी सामर्थ्य साधणारा असतो म्हणून ती कानाची भाजी असते. अंकुरीत मुग- मटकीची उसळ ही शेपटीवाल्या दाण्याची उसळ होते. इंग्रजीत सिझरचे (कात्री) सिझो होते व पुढे सगळ्या मेटलच्या वस्तूंना सिझो म्हटले जाते. प्रत्येक वस्तूची अर्थनिश्चिती करण्याच्या बालसुलभ कुतूहलापोटी हा अर्थ अतिविस्तार घडून येतो.
      मुलांच्या वाक्यविकासामध्ये अर्थ अतिविस्तारिकरणाची एक अंतर्गत व्यवस्था लागलेली असते. म्हणजे विशिष्ट आकाराच्या वस्तूला बघून अन्य तशाच आकारांना मुलं अर्थानुसारी तोच शब्द वापरत असले तरी मूळ अर्थाची वस्तू मात्र अचूकपणे ओळखू शकतात. यामध्ये ते सरमिसळ करीत नाही. एका सर्वेक्षणात २ ते ३ वयोगटातील मुलांचा गट ‘अॅपल’ म्हणून जवळपास सर्व गोल आकाराच्या वस्तूंना अॅपलच संबोधित करीत होता. जसे टोमॅटोला, बॉलला. पण ज्यावेळी त्याच्या समोर टोमॅटोचा ढीग व अॅपलचा ढीग ठेवला असता व अॅपल कोणते आहे विचारले असता त्याने बरोबर अॅपलच उचलले.
साधारणत: पाच वर्षांपर्यंत मुलं भाषा संपादनाचा जास्तीत जास्त आवाका आत्मसात करतात. म्हणूनच पाच वर्षानंतर नव्याने अन्य भाषेचा संपर्क आल्यास कोणतेही मूल ती देखील भाषा आत्मसात करू लागले. ही प्रक्रिया प्रथम, भाषेतून सुरु होऊन इतर नव्या भाषा आत्मसात करण्यापर्यंत कार्य करीत राहते. अशाप्रकारे भाषा संपादन प्रक्रियेच्या भाग १, २ व ३ मध्ये आपण एकूण ९ टप्पे बघितले, ज्याद्वारे मूल भाषा संपादन करीत असते.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
दि.१६/०६/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

Sunday, June 2, 2019

भाषा संपादन प्रक्रिया-भाग २

भाषा संपादन प्रक्रिया-भाग २
डाॅ.अमृता इंदूरकर
         मुलाला येणारा भाषापूर्ण ध्वनीचा वापर त्याला एकप्रकारचा सामाजिक, भाषिक दृष्टिकोन अथवा भूमिका देत असतो. कारण घरी पालक लगेच या बडबडण्याला प्रतिसाद देत असतात. इथे लहान मुलांचे भाषेच्या जगतात पहिले भाषिक, सामाजिक योगदान घडून येत असते....
मागील लेखात भाषा संपादन प्रक्रियेची पहिली पातळी (Cooing and babbling) बघितली होती. या लेखात त्याच्या पुढील पातळ्या बघूया.
२. एक शब्द संपादन पातळी (One word Stage)
             बारा ते अठरा महिन्यांच्या दरम्यान अाधी सतत एेकलेले व त्यामुळे अाता अोळखण्याजोगे असे लहानात लहान विविध शब्दसमूह (Single Unit) मुलं बोलायला लागतात. भाषा अात्मसातीकरणामध्ये या कालावधीला ‘एक शब्द संपादन पातळी’ म्हणतात. यामध्ये अगदी दैनंदिन जीवनात सतत संपर्कात येणाऱ्या कितीतरी वस्तूंचा, व्यक्तींचा समावेश असतो. जसे दुदू (दूध), म्याऊ (मांजर), भाता (भात), हम्मा (गाय), भू-भू (कुत्रा), बिशकित (बिस्किट) फूऽऽ (फूल), छछा (ससा), अाबा (अाजोबा) अाजी, पापा, आत (हात), पाय, नाई नाई, ये-ये इत्यादी. अर्थात प्रांताप्रमाणे ते बदलत जातात.
       याच कालावधीत या ‘एक शब्द पातळी’ चा एक वेगळा प्रकारही तयार होतो. तो म्हणजे अगदी लहानात लहान शब्दसमूह जे खरेतर छोटेखानी वाक्य किंवा शब्दसमूह असतात, ते लहान मुलांच्या भाषाविकसन प्रक्रियेत छोटे शब्दसमूह अथवा सिंगल युनिट ठरतात.
जसे, ‘हे काय?’,‘कुठे जायचं?’
‘काकाची पमपम’,* *‘ताईची खोली’इत्यादी. ज्या वातावरणात व जो संदर्भ जोडत ही वाक्ये तयार होतात ती मुलांसाठी शब्दच असतात.
लहान मुलांच्या भाषा संपादन प्रक्रियेत यांना वाक्य म्हणणे चुकीचे ठरू शकते. कारण लहान मुलांसाठी काका व त्याची गाडी एकच असतात. ज्या खोलीत ताई झोपते ती खोली व ताई एकच असतात. अशा शब्दसमूहांना *‘होलोफ्रेस्टिक’* अशी संज्ञा वापरली जाते. ज्यामध्ये शब्द एखादा वाक्प्रयोग किंवा वाक्य उच्चारदृष्ट्या समानच गृहीत धरला जाते. यामुळे लहान मुलांचे भाषा संपादन प्रक्रियेतील शब्दविश्व अधिकाधिक व्यापक होत राहते. त्याचप्रमाणे त्याचा प्रत्यक्ष वापर करण्यास मुलही उद्युक्त होत असते.
३) द्वैभाषा संपादन पातळी (Two Word Stage)
          अठरा ते वीस महिन्यांच्या दरम्यान जेव्हा लहान मुलांचे शब्दभांडार ५० च्या पुढे जाते, तेव्हा लहान मुल अापोअाप दोन शब्द संपादन करते. याच दरम्यान मुल दोन वर्षांचे होत अालेले असते. या काळात अवगत असलेल्या शब्दांनी व भर पडत असणाऱ्या शब्दांची मदत घेऊन कितीतरी शब्दांच्या मदतीने संयोगाने दोन शब्द उच्चारायला प्रारंभ होतो. जसे बाळाची खुर्ची, अाई जेवते, अाॅफिस गेले, भुर्रर्र जाऊ इत्यादी. अर्थात या दोन शब्दांचे संदर्भ वेळोवेळी लहान मुलांच्या कल्पनेत बदलत असतात. कारण संपूर्ण वाक्याच्या मदतीने लहान मुलं तो संदर्भ स्पष्ट करू शकत नाहीत. जसे ‘बाळाची खुर्ची’ असे म्हणताना ‘माझी खुर्ची’ असेही सांगायचे असते किंवा बाळाला खुर्चीत बसायचे अाहे, हे पण सांगायचे असू शकते किंवा या वस्तूला ‘बाळाची खुर्ची’ म्हणतात, एवढेच म्हणायचे असते. हे संदर्भ लहान मुलाच्या मनातला संदर्भ- रोख अोळखून समजून घ्यावे लागतात.
अशा शब्दांच्या उच्चारामागे लहान मुलांचा संवाद साधण्याचा हेतू निर्माण असतो. घरातील मोठे जसा संवाद साधतील, त्याच पद्धतीने मुलही संवाद साधायचा प्रयत्न करू लागते. इथे लहान मूल केवळ शब्द उच्चारत नसते तर आपलेही बोलणे हे घरातील सदस्यांची संवाद साधण्यातील एक योगदान होय, याची सतत निश्चिती करीत असते. दोन वर्षांचे झाल्यानंतर जेव्हा मुलं २०० ते ३०० शब्द संवादाच्या माध्यमातून व्यक्त व्हायला लागते, तेव्हा ते मुलं त्या शब्दाच्या पाचपट त्या शब्दांचे अर्थ समजण्यास पात्र होत असते. म्हणून मग या वयाचे मुल घरातील संवादामध्ये रंजन करणारे एक महत्त्वाची सहभागी व्यक्ति बनते.
४) भाषेची शब्दरुप साखळी (Telegraphic Speech)
          दोन ते अडीच वर्षाच्या दरम्यान मुलं मोठ्या प्रमाणात शब्दांचा वापर करून बोलण्यास सुरुवात करतात. असंख्य शब्दांचा सतत वापर करून ही भाषा आत्मसात करण्याचा अधिकाधिक प्रयत्न असतो. अशा व्यक्त होण्याचे एक सूक्ष्म वैशिष्ट्य असे की, शब्द मर्यादित असले तरी त्या शब्दांचे विविधांगी शब्दाविष्कार प्रकट व्हायला लागतात. या पातळीला भाषेची
‘शब्दरूप साखळी’ किंवा ‘टेलिग्राफिक स्पिच’ म्हणतात. शब्दांची विविधरुपी साखळी हे या पातळीचे प्रमुख वैशिष्ट्य अाहे. ही शब्दसाखळी कदाचित छोट्या वाक्प्रयोगात असेल किंवा छोट्या वाक्यात देखील असेल जसे ‘मी अोली होली’ (झाली हा शब्द वापरायचा हे बरेचदा कळत नाही) दूध पिऊ शकते नाही, बाबा गेले... टाटा (अाॅफिस शब्द सुचत नाही). इथे लहान मुल वाक्यरचना तयार करण्याची क्षमता बऱ्यापैकी अात्मसात करते अाणि शक्यतो वाक्याचा क्रम मोठ्याप्रमाणे बरोबर करण्याचा प्रयत्न देखील करते. अर्थात या वाक्यरचनेत लहान मुलाचे स्वतंत्र असे व्याकरण तयार होत असते.
        या दोन -अडीच वर्षांच्या कालावधीत लहान मुलांचे शब्दभांडार त्यांच्या शारिरीक वाढीसोबत देखील सहजपणे वाढत जाते. उड्या मारणे, धावणे यांसारख्या क्रिया जसजशा जमल्या की तसतसे नवे शब्द बोलण्यात अापोअाप यायला लागतात. बऱ्याचदा तिसऱ्या वर्षापर्यंत रोजचे नवे शब्दभांडार शंभरच्या पलीकडे जायला लागते. शिवाय मोठ्यांच्या उच्चारपद्धती, लकबी या अात्मसात करण्याकडे अधिक अोढा वाढतो. थोडक्यात घरातील ज्याच्या बोलण्याचा प्रभाव अधिक पडतो. त्यानुसार ही भाषा संपादन प्रक्रिया विकसित होते.
५) प्रत्यक्ष भाषा संपादन (Aquisition Process)
         एकूणच भाषाविचारात असे गृहीत धरले जाते की, लहान मुलांना भाषा शिकवल्या जातात. पण, खरेतर मुलं ज्या पद्धतीने भाषेचा वापर करतात, ते पाहता मुलांना भाषा शिकवल्या जातात या विधानाला काहीच अाधार मिळत नाही. घरात कधीच कुणी अगदी तान्हे असल्यापासून प्रत्यक्ष मुलाला, प्रत्यक्ष भाषा शिकवायला किंवा सूचना देत, घेऊन बसत नाही. अापणही असे कुठे अाजपर्यंत बघितले नाही की लहान मुलांचं डोकं अापोअाप शब्दांनी, वाक्यांनी भरले गेले अाहे. लहान मुलांच्या बाबतीत मुख्य हाच उद्देश असतो की त्याने स्वत:हून स्वतंत्र रचना करून त्याला जो मार्ग सोयीचा असेल, त्याने ती भाषा वापरली पाहिजे. लहान मुलांचे भाषाविकसन हे विविध शब्द रचनांचा प्रयोगरुप वापर करून ते संवाद प्रक्रियेस पात्र अाहेत की नाहीत, यामध्येच अधिक अाहे.
         वयाच्या चौथ्या वर्षानंतर मोठ्या मंडळींकडून ज्या लहान मुलांच्या बोलण्यातील चुका सुधारण्यात येतात, त्या प्रयत्नांना फार कमी यश येते. बरेचदा मोठ्या व्यक्तीने वारंवार सांगितलेली दुरुस्ती एेकूनही किंवा लक्षात येऊनही लहान मुलं त्याने जो स्वतंत्र्यरीत्या शब्द तयार केला अाहे, तोच वापरण्यावर भर देते. चौथ्या वर्षा लहान मुलं मोठ्यांच्या बोलण्याचे अनुकरणही करीत नाहीत अाणि मोठ्यांनी सुचविलेली दुरुस्ती देखील स्वीकारत नाही, असा पण एक टप्पा येतो. उदाहरणादाखल पुढील संवाद बघूया.
मूल : मी त्याला पडताना पाहितलं!
अाई : म्हणजे तुला ‘पाहिलं’ म्हणायचं अाहे का?
मूल : नाही, मी त्याला पडताना पाहितलं!
अाई : तुला ‘बघितलं’ म्हणायचं अाहे का? एकतर पाहिलं म्हण किंवा बघितलं म्हण.. पाहितलं असे म्हणायचे नाही.
मूल : नाही मी त्याला जोरात पडताना पाहितलं!!!
अशा पद्धतीने वयाच्या चवथ्या वर्षापर्यंत लहान मुलांचा स्वतंत्र शब्दकोश तयार होत असतो. एखाद्या क्रियेसाठी वस्तूसाठी, कशाहीसाठी रुढ शब्दापेक्षा त्याच्या मनोकोशात तयार झालेला शब्द अधिक योग्य ठरत असतो. इथूनच पुढे मुलांची वाक्यरचना विकसनाची प्रक्रिया सुरु होते. ती कशी? ते पुढच्या वेळी बघूया.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
दि.०२/०६/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल