Sunday, September 8, 2019

भाषिक समाज : परस्परपूरक सहसंबंध

भाषिक समाज : परस्परपूरक सहसंबंध

➡️ डाॅ. अमृता इंदूरकर

भाषेची निर्मिती समाजातून होते व भाषेचा विकासही समाजात होत असतो. अगदी लोकशाहीच्या व्याख्येच्या धरतीवर सांगायचेच झाले तर असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही- ‘भाषा समाजाची आहे. समाजाकरता आहे आणि समाजाच्या द्वारे तिची निर्मिती होते’. आपण ‘मातृभाषा’ हा शब्द नेहमीच वापरतो. पण, तो एेकल्यावर कुणाला असा भ्रम व्हायला नको की भाषेची उत्पत्ती मातेपासून होते किंवा मातेची कोणती तरी विशिष्ट भाषा आहे म्हणून ‘मातृभाषा’ हा शब्द वापरतो. कारण खरेतर भाषा समाजाद्वारेच पूर्णत: आत्मसात केली जाते. संपूर्ण समाज भाषा शिकवत असतो. फक्त त्याचा प्रारंभ मातेपासून होतो. भाषेचे प्राथमिक पाठ आई देत असते. वस्तूत: लहान मुलापर्यंत पोहोचविण्याचे किंवा लहान मुलाला भाषेशी अवगत करण्याचे कार्य प्रथम माता करीत असते. या तिच्या ऋणाप्रती आभार व्यक्त करण्याकरता आपण मातृभाषा शब्द वापरतो. पण, हेही तितकेच खरे की माता जी भाषा शिकवते ती समाजाचीच संपत्ती आहे. कारण तिने देखील ती तिच्या आईकडूनच आत्मसात केलेली असते. म्हणून समाजाला वगळून भाषेची कल्पना देखील करणे अशक्य. एका दृष्टीने बघितले तर भाषेची उत्पत्ती ही सामाजिक गरजेतून झाली आहे.
भाषिक समाज म्हणजे स्पीच कम्युनिटी, या संकल्पनेचा विचार करता असे जाणवते की ज्या समाजाची भाषा असेल त्या समाजाचा परिणाम स्वाभाविकपणे भाषेवर होत असतो. त्या समाजाचे जे सामाजिक वातावरण असते, त्या वातावरणाचा परिणाम भाषेवर होतो. उदा. कुटुंबसंस्था, विवाहसंस्था इत्यादी संस्थांचा परिणाम भाषेवर होतो. भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंबपद्धती होती. या कुटुंब व्यवस्थेचा परिणाम मराठी व्याकरणावर झालेला दिसतो. मराठीतील वाक्यरचनेत कर्ता प्रथमपदी असून क्रियापद शेवटी असते तर इंग्रजी भाषा समाजात विभक्त कुटुंबपद्धती आहे. त्याचा परिणाम इंग्रजी भाषेवर झालेला दिसतो. इंग्रजी भाषेत कर्त्याबरोबर लगेच क्रियापद येते व इतर शब्द नंतर येतात.

भाषेचा विकास एकटी व्यक्ती करू शकत नाही. आदिमानव जेव्हा एकाकी राहत होता तेव्हा त्याला कुठल्याच भाषेची गरज नव्हती. परंतु, तो एकत्र राहू लागला आणि त्याला दुसऱ्या मानवाशी संपर्क साधण्यासाठी भाषेची गरज निर्माण झाली. याच मानवी समूहात, समाजात राहून त्याने भाषिक विकास केला. भाषेत असणारे शब्द, शब्दांचा अर्थ, त्यांचा वाक्यात उपयोग यांना समाजमान्यता लागते. ती असल्याशिवाय संदेशन कार्य होऊ शकत नाही. प्राचीन काळापासून हा समाजसंबंध भाषेला ठेवावाच लागतो. एवढेच नाही तर समाजाशिवाय भाषेच्या अस्तित्वाला अर्थ नसतो. म्हणूनच सामाजिक भाषाविज्ञानाचा समाजाशी, सामाजिक वातावरणाशी, सामाजातील विविध संस्थांशी समाज जीवनातील व्यवहारांशी संबंध येतो तेव्हा भाषिक समाज (स्पीच कम्युनिटी) ही संकल्पना आकारास येते.

भाषेच्या सामाजिक, सामुदायिक रूपाला सोस्यूरने ‘लाँग्’ (Langue) म्हटले आहे. इंग्रजीमध्ये यासाठी ‘टंग’ असे म्हटले जाते. समूहात प्रचलित अशा भाषेलाच ‘लाँग्’ म्हणतात, कारण त्याचे स्वरूप सामुदायिक असते. कोणत्याही भाषिक समूहाची सदस्य संख्या निश्चित नसते. भाषिक समुदायामध्ये दहा माणसं पण असू शकतात किंवा दहा करोड देखील. एखादी व्यक्ती, भाषिक समुदायाचा भाग असते. कोणतीच एक व्यक्ती संपूर्णत: भाषेला निर्माण करू शकत नाही किंवा भाषेला परिवर्तीत करू शकत नाही. हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती इत्यादी भाषांना कोणत्या व्यक्तीने निर्माण केले नाही किंवा कोणत्या व्यक्तीमध्ये इतके सामर्थ्य नसते की तो त्या भाषेत आमूलाग्र परिवर्तन करेल. विशिष्ट भाषेत एक- दोन नव्या शब्दांचे योगदान देणे हा भाग निराळा. बोलणे हा भाषेचा निकष नाही तर एेकणे देखील महत्त्वाचा निकष आहे. हे दुहेरी आदानप्रदान आहे.

ज्या समाजात भाषिक प्रयोग आणि भाषा आकलन यामध्ये सुसंवादित्व वा परस्पर मेळ असतो त्या समाजाला ‘भाषिक समाज’ (स्पीच कम्युनिटी) म्हणतात. त्या समाजात परस्पर विनिमयासाठी भाषा प्रयोगाची एक संकेतसरणी रुढ असते. निजभाषिकाला या संकेतसरणीचे ज्ञान सुरू होणाऱ्या सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेतून अवगत झालेले असते. बालपणी लहान मूल प्रथम आपल्या कुटुंबातून भाषा अवगत करते व जसजसे ते मोठे होते तसतसे बाहेरच्या समाजात त्याचा उपयोग करते. हे करीत असताना त्या कुटुंबाची भाषिक संकेतसरणी व आजुबाजुच्या समाजाची संकेतसरणी ही जास्तीतजास्त साम्य साधणारी असते. त्यामुळे ते मुलंही नकळतच त्या भाषिक समाजाचा एक अविभाज्य घटक बनते. अशाप्रकार भाषिक समाज बनत असतात. कोणताही भाषिक समाज सामान्यत: पुढील चार तत्त्वांवर अस्तित्वात येतो.

ती तत्त्वे बघूया...

➡️ संप्रषणाचे घनत्व (डेनसिटी आॅफ कम्युनिकेशन)
भाषिक सुसंवादित्वाची घनता ही भाषिक समाजाच्या अस्तित्वाची खूण आहे. हा सुसंवाद परस्परांमध्ये जितका जास्त होईल, तितकाच तो समाज टिकून राहतो व त्याची संवाद साधण्यासाठी घनता अधिक दृढ होते. परस्पर भाषिक विनमयातील अंतर वाढत गेले तर कालांतराने दोन भिन्न भाषिक समाज अस्तित्वात येऊ शकतात. उदा. केरळमध्ये राहणारी, निजभाषिक असणारी व्यक्ती शिक्षणासाठी कमी वयातच मुंबईमध्ये आली तर तिचा निजभाषिकांशी सुसंवाद खंडित झाल्यामुळे आणि आजुबाजुला बोलल्या, एेकल्या जाणाऱ्या मराठीचा प्रभाव जास्त असल्यामुळे ती व्यक्ती आपोआपच स्वत:च्या भाषिक समाजापासून तुटून दुसऱ्या भाषिक समाजात सहजपणे मिसळली जाईल. स्वभाषेचे संवाद घनत्व कमी झाल्यामुळे असे सर्वत्र घडते.

➡️ प्रतिकात्मक एकता (सिंम्बोलिक इन्टिग्रेशन)
त्या त्या भाषिक समाजाच्या एकात्मतेचे प्रतीक म्हणून विशिष्ट भाषा किंवा बोलीस प्रतिष्ठा असते. उदा. दिल्लीच्या भाषिक समाजात पंजाबी, हिंदी, हरयानवी, इंग्रजी इत्यादी विविध भाषा बोलल्या जातात. या विविध भाषा प्रतीक आहेत. ज्या त्या विशिष्ट भाषिक समाजाला एकत्र ठेवतात. नागपुरच्या भाषिक समाजात हिंदी, मराठी, इंग्रजी या भाषा बोलल्या जातात. प्रत्येक समाजात एकापेक्षा जास्त भाषा बोलल्या जात असल्या तरी तो विशिष्ट समाज दिल्लीभाषिक म्हणूनच आेळखला जातो. भाषिक अस्मिता ही सामाजिक अस्मितेचा अविभाज्य घटक असते.

➡️ भाषिक कोश (वर्बल रिपर्टोरे)

विशिष्ट क्षेत्रातील लोक परस्पर विनिमयासाठी ज्या भाषा, बोलींचा प्रयोग करतात त्या सर्वांचा मिळून एक ‘भाषिक कोश’ तयार होतो. उदा. मुंबईचा भाषिक समाज मराठी गुजराती, हिंदी, इंग्रजी भाषांचा वापर करतो. बनारसचा भाषिक समाज भोजपूरी, हिंदी, बांगला, इंग्रजी भाषांचा वापर करतो. मुंबईचा किंवा बनारसच्या समाजाचा भाषिक कोश हा असा त्या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा, बोलींचा मिळून तयार होत असतो. त्या- त्या क्षेत्रातील समाजविशेष, व्यावसायिक, आर्थिक, सामाजिक स्तर यांचा त्या भाषिक कोशावर प्रभाव असतो.या भाषिक कोशात समाविष्ट होणाऱ्या विशिष्ट भाषा व बोलींच्या वापराला अलिखित मान्यता हे त्या भाषिक समाजाचे आणखी एक वैशिष्ट्य असते. त्यामुळे एकाहून अधिक भाषा, बोलींचा परस्पर विनिमयासाठी उपयोग होतो. मुंबईचा मराठी माणूस टॅक्सीत बसल्यावर हिंदी बोलू लागतो, प्रसंग पाहून भाषा विनीमय माध्यम म्हणून वापरण्याचे बंधन नसले तरी किमान कोणकोणत्या भाषेत सामाजिक संज्ञापन होते याचे संकेत त्या भाषिक समाजात रूढ झालेले असतात. मराठी भाषिक समाजातील व्यक्ती आपल्या घरात प्रादेशिक बोली, उपबोली वापरेल, औपचारिक व्यवहारात प्रमाण मराठीचा वापर करेल. मुंबईसारख्या महानगरात हिंदीचा, इंग्रजीचा उपयोग करेल आणि तरीही ती व्यक्ती ‘मराठी भाषक’ म्हणूनच आेळखली जाईल. कारण त्या व्यक्तीची भाषिक अस्मिता!

➡️ भाषिक सवयी

भाषा आणि समाज यात आंतरिक सुसंवाद असतो. त्यामुळे केवळ उच्चारधाटणीवरून बोलणारा मध्यमवर्गीय आहे की कनिष्ठ वर्गीय व्यापारी आहे की अधिकारी, कोकणातला आहे की खानदेशातला, हे आेळखता येते. हेल काढून बोलणारा ‘ळ’ एेवजी ‘य’ किंवा ‘ड’ (कमळ- कमय, बाळ- बाय) उच्चारण करणारा, चहा पिऊन टाकला, सामान घेऊन घेतले अशी द्विक्रियापदे वापरणारा माणूस खानदेशी आहे, हे चटकन आेळखता येते. याउलट नासिक्य उच्चारण करणारा कोंकणीभाषक आहे, हे पटकन समजते. तर ‘वो खाना खा रहे है’ या वाक्याचे ‘तो जेवून राह्यला आहे’ असे हिंदीप्रभावी वाक्य वापरणारा नागपुरी आहे, हे लक्षात येते.
या चार तत्त्वांच्या मदतीने भाषिक समाजाचे (स्पीच कम्युनिटी) आकलन व्हायला मदत होते.


(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
दि.०८/०९/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

1 comment:

  1. चौफेर निरीक्षण, चौकसपणा व भाषेविषयी असलेलं प्रेम या घटकामु़्ळे हा लेख उत्कृष्ट झाला आहे.

    ReplyDelete