श्रावण झड बाहेरी....श्रावण गळतो दूर....
©डाॅ.अमृता इंदूरकर
तापलेल्या धरतीला शांत करणारा आषाढ- श्रावण! आपल्या थेंबाथेंबातून सृजनाचे हिरवे सोहळे साजरे करणारा श्रावण! पोळलेल्या मनांवर आपल्या श्रावणसरींचे शिंपण करून मनाला निववणारा, सावरणारा श्रावण! पोपटांनी खाऊन खाली पडलेल्या पिकलेल्या लिंबोण्याच्या कडूसर, ओलसर गंधाने भारलेले रस्ते, श्रावणातली झड किंचित कमी होत नाही तर दडी मारुन बसलेल्या दयाळ पक्ष्याचा तार सप्तकातील सूर, कधी नव्हे ती मोकळ्या मैदानावर साचलेल्या पाण्यातील किडे खायला उतरलेल्या टिटवीची कर्कश आरोळी आणि विजेच्या, टेलिफोनच्या निर्जीव तारांवरून वर्गातील शहाण्या मुलांप्रमाणे रांग लावून टप टप गळणारे पावसाचे थंड थेंब आणि मुसळधार पावसात चिंब भिजलेल्या ललनेने एका जागी थांबून पाऊस थांबवण्याची शांतपणे वाट पहावी तशी चिंब भिजलेली, पानं पानं अंगाभोवती गुंडाळलेली हिरवी हिरवी झाडे. या श्रावणांची जितकी रुपे वर्णन करावीत, तितकी कमीच. कारण हा श्रावण याही पलीकडे अजून बराच आहे. जसा आपल्या मनातला तसा दुसऱ्यांच्याही मनातला. हे दुसरे कवीमन असेल तर मग या श्रावणाला चढलेला काव्यसाज त्याचे सौंदर्य अधिकच खुलविणारा ठरतो.
श्रावणातली पावसाची पहिली दमदार सर आली की नकळतच आपले मन बालपणीचा ठेका धरते आणि गुणगुणायला लागते *श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे* बालकवींची ही अजरामर कविता. हा श्रावणमास तर बालकवींच्या भोवती फेर धरून आनंदाने नाचत होता. जिकडे बघावे तिकडे श्रावणसौंदर्याच्या खुणा विखुरल्या होत्या. वरती बघावे तर नभोमंडपात इंद्रधनुचा दुहेरी गोफ विणलेले मंगल तोरण दिसते. सूर्यास्त होता होता तरुशिखरे, गृहशिखरे पिवळ्या पिवळ्या ऊन रंगात रंगून जातात. आकाशात जमलेल्या जलदांना विविध संध्याराग सुंदरतेचे रुप रेखतात. मधूनच दूरवर उडणारी बगळ्यांची माळ ही जणू काही कल्पसुमाची माळ भासते. वरून खाली उतरताना ही माळा अवनीवर उतरणारे ग्रहगोलच भासतात. समस्त पशू, पक्षी, गोप, गोपी हा आनंद सोहळा साजरा करण्यात दंग असतात. कुठे सुवर्णचंपक फुलतो तर कुठे केवडा दरवळतो आणि पारिजात तर जणू काही सत्यभामेच्या रोष दूर करायलाच फुलतो. गावातल्या सुंदर बालांना या फुलांचे वेड लागले नाही तरच नवल. या फुलांच्या मोहापायी गावातील सुंदर बाला हातात परडी घेऊन फुले, पत्री खुडायला नगरवेशीपर्यंत जातात. हा श्रावणहर्ष त्यांच्या हृदयात मावत नाही तेव्हा त्यांच्या मुखातून श्रावण महिन्याच्या गीत गायनास प्रारंभ होतो.
बालकवींनी हा श्रावणहर्ष थुई थुई उडणाऱ्या कारंज्याप्रमाणे व्यक्त केला. तर कवी अनिलांचा श्रावणहर्ष अंतर्मुख करणारा आहे. मनाची फार अस्वस्थ करणारी भावना कवी अनिल व्यक्त करतात.
श्रावण झड बाहेरी, मी अंतरी भिजलेला
पंखी खुपसून चोच एक पक्षी निजलेला...
पंखी खुपसून चोच एक पक्षी निजलेला...
बाहेर अखंड श्रावणझड सुरु आहे. आणि मी मात्र अंतर्मनातून भिजलो आहे. मन कसे सुप्तावस्थेत गेले आहे एखाद्या चोच खुपसून निजलेल्या पक्ष्याप्रमाणे. आकाशाच्या हृदयालाही हा ओला भार सोसवत नाही आहे थेंब थेंब पाझरून, विझलेला लांब दिवस चिंब करीत, तो देखील संततधार पाझरतो. जळात पसरलेल्या उथळ पालवीमध्ये मध्येच कुठेतरी काहीतरी क्षणमात्र हालचाल होते. तशीच मनाच्या तळात कुठेतरी अव्यक्त स्वरूपाची स्मृतिरुप क्षणजीवी हालचाल होते. कधीतरी काहीतरी आठवून मनाचे तळ ढवळल्या जातात आणि आपलेच प्रतिबिंब धूसर होते हे जाणून कवी अनिल म्हणतात,
चळते प्रतिबिंब जरा स्थिर राहुन थिजताना
बिंदुगणिक उठलेले क्षीण वलय विरताना
बिंदुगणिक उठलेले क्षीण वलय विरताना
अशा झिमझिमणाऱ्या पाऊसवाऱ्यालाही एक स्थायी लय धरून असते.पण श्रावणाने केलेल्या या संमोहनाच्या निद्रेतून माझ्यातील शब्दांना देखील जाग कशी येणार असा प्रश्न शेवटी अनिल विचारतात.एका कवीमनाची शब्दविरहीत झड कधी थांबणार असा प्रश्न ते स्वतःलाच करतात.
हा श्रावण डोळ्यांनी, कानांनी कितीही प्राशन करा, अगदी अंगांगावर गच्च माखुन घेतला, सर्वदूर पसरलेली हिरवाई सर्वांगावर लिंपून जरी घेतली तरी तनामनाचे समाधान होणार आहे का? हेच मर्ढेकर ' आला आषाढ-श्रावण'या कवितेतून म्हणत आहेत.हा आषाढ-श्रावण आपल्या परीने कितीही लुटला तरी 'किती चातकचोचीने/प्यावा वर्षाऋतू तरी? अशी अवस्था होते. इथे मर्ढेकरांनी चातकचोच म्हटले.पावसाच्या पाण्यावरच आपली वर्षभराची तहान भागविणारा चातक असा कितीसा?त्याची चोच अशी ती केवढी असणार?माणसासाठी अशा चातकचोचीची प्रतिमा वापरून श्रावण उपभोगण्यातला अपुरेपणा,असमाधान मर्ढेकरांनी चपखलपणे व्यक्त केले.या कवितेचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रत्येक कडव्याच्या दोन ओळी निसर्गसौंदर्य व्यक्त करतात व पुढच्या दोन ओळी रस्ते, घरे,घरावरील वाळणारे कपडे अशा वस्तुंचेही वर्णन करतात.पण यामुळे कवितेच्या सौंदर्याला,रसास्वादाला कुठेही बाधा येत नाही.एकीकडे ओल्या झालेल्या काळ्या ढेकळांचा गंध कळ्यांत भरला जातो तर दुसरीकडे काळा डांबरी रस्ता देखील निर्मळ, निवांत होतो.चाळीचाळीतून ओली चिरगुटे चिंब होतात आणि त्याच वेळी ओल्या कौलांमधे जणुकाही मेघ भरून जरा खाली येऊन त्या कौलांची लाली हुंगतात.पक्षी झाडावर बसल्या बसल्या ओल्या पानातल्या रेषा वाचतात आणि आख्खे रान पोपटी रंगाची नक्षी काढण्यात गर्क होते.अशावेळी मर्ढेकरांना अचानक यमदेवाची व विजेची आठवण होते.
खरेतर श्रावणसौंदर्य आणि यमाचा काय संबंध पण श्रावण हे सृजनाचे प्रतिक. या सृजनसोहळ्याला बघून विनाशाचे प्रतिक असणारा यम आणि वीज जरा ओशाळतात अशी ते कल्पना करतात. कारण वीजही कोसळली तर हे सौंदर्यच नष्ट होईल या भावनेने ती ओशाळते. अशी ओलसर गोडी आलेल्या भावनेने मनातील तापलेल्या तारा निवांत संथ होतात; सर्व दिशा पंथ, देखील निवतात.
रिमझिम रेशिमधारांमध्ये झाडाझाडातून, पानापानातून पाडगावकरांचा श्रावणातील हा घननीळ सर्वत्र हिरवा मोरपिसारा फुलवत बरसत राहतो. श्रावणात हा पाऊस जिथे तिथे हिरव्या पाचूचा गिलावा करीत असतो. पाडगावकर हे निसर्गसौंदर्य अचूक टिपतात.
पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले
माझ्या भालावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा
माझ्या भालावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा
पानोपानी विखुरलेल्या शुभशकुनाच्या खुणा बघून अंतर्यामीचा सूरही गवसतो आणि मन त्या आनंदातच रममाण होते. कोरड्या श्रावणाची तर आपण कल्पनाही करू शकत नाही. मग तो पावसाचा असो नाहीतर प्रेमाचा. असे कोरडेपण स्मृतिरुपाने जेव्हा ग्रेस यांना व्याकूळ करते तेव्हा हे थेंब उणे ऊन माळावर जळत असल्याचे वाटते आणि श्रावणाच्या ओलसर पारदर्शी काचेवर तडे गेल्याचे त्यांना दिसते. ग्रेस यांची 'श्रावण' ही कविता तर निसर्गातील श्रावणाचा आणि मनातील श्रावणाचा विलक्षण असा मेळ साधणारी कविता आहे. बाहेर श्रावण दूरपर्यंत गळतो आहे नदीला पूर येतोय तर आत हा श्रावण दूरपर्यंत रडतो आहे असा की मनातील तयमालाही त्याचा सूर प्राप्त होत आहे. या श्रावणाची धून एका मनाला स्तनांवर गळणाऱ्या निळ्या अस्मानावर आसक्त व्हायला भाग पाडते तर दुसऱ्या मनाला सगुण फुलांच्या मंद क्षितीजात जडते. मनाची ही द्वंद्वांत्मक अवस्था या श्रावणाच्या गारुडामुळेच होते. शांता शेळके यांचा श्रावण तर ओळखीची -अनोळखीची गूढ जाणीव घेऊन येणारा आहे. घडी करून फडताळात जपून ठेवलेल्या पैठणीला देखील कितीक श्रावणांचा गंध अजूनही चिकटला आहे. श्रावण आणि सणवार यांचा स्त्रीशी येणारा जीवाभावाचा संबंध आणि त्याच्या आठवणी शांताबाईंनी अगदी हळुवार शब्दांत टिपल्या आहेत.
धूप, कापूर, उदबत्त्यांतून जळत गेले किती श्रावण
पैठणीने या जपले तन.... एक मन.
पैठणीने या जपले तन.... एक मन.
आजतागायत मराठी कवींनी या श्रावणाची विविधांगी रुपे आपल्या काव्यातून रंगवली. तरी या श्रावणाचे वर्णन परिपूर्ण थोडीच झाले आहे. हा आषाढ, श्रावण रसिकचोचीने कितीही प्यायला तरी तो शिल्लक राहणारच आहे परत तृषार्ततेने तितकाच अधीर, तितकाच हळूवार...
(लेखिका समीक्षक,भाषाशास्त्र अभ्यासक आहेत)
संपर्क-mail id- amrutaind79@gmail.com
संपर्क-mail id- amrutaind79@gmail.com
११/०८/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल
#अमृतवेल
No comments:
Post a Comment