Sunday, August 25, 2019

कवित्वाची पाक सुराही: अमृता प्रीतम

कवित्वाची पाक सुराही: अमृता प्रीतम

©डाॅ.अमृत इंदूरकर

'अक्षरो का हुस्न, कागज की अमानत है’ असे म्हणणाऱ्या किंवा ‘मेरी सारी रचना क्या; कविता और क्या कहानी और उपन्यास मैं जानती हूँ, एक गैरकानूनी बच्चे की तरह है,’ अशी कबुली देणाऱ्या किंवा ‘हर व्यक्ती की पीडा उसकी अपनी होती है, पर कई बार इन पीडाओं की आकृतियाँ मिल जाती है।’ असे आपल्या साहत्यानिर्मितीचे एक कारण सांगणाऱ्या हिंदी-पंजाबी कवयित्री अमृता प्रीतम अाज आपल्यामध्ये असत्या तर समस्त भारतीयांनी येत्या ३१ ऑगस्टला पूर्ण होणारे त्यांचे जन्मशताब्दीवर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले असते. खरंच विश्वास बसला असता का, की अमृता प्रीतम यांनी वयाची शंभरी गाठली? नक्कीच नाही!
भारतीय साहित्यविश्वाचा विचार केल्यास या साहित्यविश्वाला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक उंचीवर नेण्याचे कार्य कोणी केले असेल तर ते अमृता प्रीतम यांनी पंजाबी आणि तितकेच हिंदी वाङ्मयाला त्यांच्या साहित्यकृतींनी सौंदर्य प्रदान केले आहे, सकस बनविले आहे. अमृता प्रीतम यांच्याशिवाय पंजाबी हिंदी वाङ्मयाचा विचार परिपूर्ण होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे. ३१ ऑगस्ट १९१९ साली जन्मलेल्या अमृता यांचा साहित्यिक पिंड मूलत: कविव्यक्तिमत्त्वाचा आहे. असे असले तरी त्यांनी कादंबरी, कथा, ललित- गद्य आत्मचरित्र, डायरी, पत्रे, वैचारिक मूल्यांकनावर आधारित निबंध इत्यादी वाङ्मयप्रकार लीलया हाताळले आहेत. त्यावर आपला एक वैशिष्ट्यपूर्ण अमीट असा ठसा उमटवला आहे. अमृता प्रीतम यांचे एकूण १६ काव्यसंग्रह आहेत. त्यापैकी ‘कागज ते कैनवास’ साठी १९८१ साली ज्ञानपीठ पुरस्काराने त्या सन्मानित केल्या गेल्या. हा बहुमान प्राप्त झालेल्या त्या पंजाबी साहित्यामधील पहिल्या कवयित्री ठरल्या.


एका कवीला शेवटी काय प्रिय असते? कोणत्याही अभिजात साहित्यिकाला, कवीला त्याची लेखणी, कलम प्रिय असते. तीच खरी त्याच्या सुख- दु:खाची साथीदार असते ही कलमच त्याच्या काव्य-व्यक्तिमत्त्वाचा खरा मापदंड असते. प्रत्येक कवी स्वत:च्या काव्य-व्यक्तिमत्त्वाचा, निर्मिती प्रक्रियेचा, कविता -कलम यांचे त्याच्या आयुष्यात कोणते स्थान आहे या सर्वांचा सतत विचार करीत असतो. अमृता प्रीतमही त्या जाणीवा व्यक्त करताना अपवाद ठरल्या नाहीत. त्यांच्यासाठी त्यांचा आपल्या कलमवर असा काही भरोसा होता की जसा एखाद्या भक्ताचा त्याच्या ईश्वरावर असतो तसा. या कलमला उद्देशून त्यांनी म्हटले आहे ‘ईश्वर जैसा भरोसा तेरा’ कारण आयुष्यात असे कितीतरी दिवस आले जेव्हा या कलमलाच गळ्याजवळ घेऊन रडल्या आहेत. त्या म्हणतात, ‘यह कलम मेरे लिए सदा हाजिर-नाजिर, खुदा के समान रहा है। इसे आँखो से देख सकती हूँ, हाथों से छू सकती हूँ और एक सूने कागजों की तरह इसके गले लग सकती हूँ,’ या लेखणीनेच अमृता प्रीतम यांना त्यांच्या आयुष्य-कहाणीचा शोध घ्यायला कायमच साथ दिली. त्यांची काव्यकहाणी नेहमीच आदी आणि अंताच्या शोधात राहिली आहे.
पण, प्रत्येक कवीचा शोध हा काही फार सुखावणारा नसतोच प्रत्येकाचे दु:ख हे त्याचेच असते, पण सामान्य व्यक्ती या दु:खाला कुठलाच आकार देऊ शकत नाही. मात्र, कवी आपल्या सृजन दु:खाला नेहमीच कलात्मक सौंदर्याने परिपूर्ण असा आकार देऊ शकतो. आयुष्यातले छोटे- छोटे आघात देखील कवीला प्रतिभाहीन करतात म्हणजे त्या आघाताचे दु:ख आणि त्या दुु:खामुळे ती प्रतिभा कवीचा साथ सोडते, असे दुहेरी दु:ख कायमच कवीच्या वाट्याला येते. म्हणूनच अमृता प्रीतम म्हणतात,


कलम ने आज गीतों का काफिया तोड दिया
मेरा इश्क यह किस मुकाम पर आ गया है।


एकीकडे रुसलेल्या कवितेचे दु:ख असले तरी दुसरीकडे त्यांना आपल्या कवयित्री असण्याचा सार्थ अभिमान होता. जेव्हा जेव्हा मृत्यूपासून आयुष्याचा एक-एक क्षण उधार घेतला आहे तेव्हा तेव्हा माझ्या गीतांनी या क्षणांची किंमत अदा केली आहे, असे आपल्या कवितेत त्या मोठ्या अभिमानाने म्हणत.


अमृता प्रीतम यांच्या कवितेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांची कविता ‘ककनूसी नस्ल’ ची आहे. हा शब्द त्यांचाच आहे. अमृता यांना सूर्यप्रतिमेचे प्रचंड आकर्षण होते. त्यांच्या काव्यातून या सूर्यप्रतिमा, तेजप्रतिमा इतक्या ठिकाणी प्रकाशमान होताना दिसतात की सूर्याला त्या आपल्या प्रत्येक रचनेचे जणू काही अर्घ्यच देत आहेत की काय असे वाटावे. ककनूस म्हणजे फिनिक्स पक्षी. तो स्वत:चीच राख सूर्याला अर्पण करतो. या सूर्याला त्यांनी कधी केशरदुधाचा कटोरा म्हटले, त्याची लाली म्हणजे मेहंदी आहे. अशी कल्पना केली. वैयक्तिक प्रेमकवितांमध्ये तर या सूर्यप्रतिमा असंख्य किरण सर्वदूर पसरावेत, तशा विखुरल्या आहेत. त्याशिवाय त्यांच्या सामाजिक कवितांमध्ये देखील या सूर्यप्रतिमेला आवाहन केलेले आहे. त्या एवढ्यावरच नाही थांबल्या तर सूर्याच्या या सर्व रुपांव्यतिरिक्त सूर्यासोबत संभोगाची देखील कल्पना केली आहे. नि:संशय या कल्पनेने एका उत्तम कलात्मक रचनेला जन्म दिला आहे.


एक कटोरा धूप का
मैं एक साँस मे पी लूूँ
और एक टुकडा धूप का
मैं अपनी कोख मे रख लूूँ
और इस तरह शायद
जन्म-जन्म का जाडा बीत जाये...


अमृत प्रीतम यांच्या कवितांचा एक मोठा भाग प्रेमजाणिवेनी व्यापलेला आहे. ती त्यांच्या काव्याची केंद्रवर्ती जाणीव आहे. त्यांच्या प्रेमकवीतांचा मूर्त चेहरा स्वत: अमृता प्रीतमच आहेत, इतक्या त्या सहज आहेत. त्यांच्या प्रेमकविता जे अनुभवलं, जसं अनुभवलं त्यातून साकार झाल्या आहेत. प्रेमातल्या विविध अनुभूतींना त्यांनी एका सच्चेपणाने कवितेतून मांडले आहे. त्या त्यांच्या प्रेमाचे वर्णन. ‘सच्छे दुध जैसी मेरी मुहब्बत’ असे एका वाक्यात करायच्या. त्यांच्या कवितेतील सजन जितका सत्यरूप आहे तितकाच स्वप्नरूप आहे. जितका परका आहे तितकाच आपला आहे. प्रेमात आकंठ बुडालेल्या व्यक्तीला एक तर त्याची मुहब्बत हवी असते, नाहीतर मोक्ष हवा असतो. त्याचे प्रेम हे ईश्वरस्वरूप कधी होते, हे त्यालाही कळत नाही. या प्रियकरायमध्ये जेव्हा ईश्वररूप दिसायला लागले तेव्हा अमृता प्रीतम म्हणतात,


‘खुदा का इक अन्दाज तू
औ’ फजर की नमाज तू
अल्लाह की इक रजा भी तू
यह सारी कायनात तू
खुदा की मुलाकात तू’


माणसाला दु:खात नेहमीच ईश्वराचे स्मरण होत असते. मनातून सततच ईश्वराशी संवाद साधत सर्वकाही सांगितले जाते. पण, प्रेमव्यथा सांगायला ईश्वराचे स्मरण करावे आणि त्याचवेळी प्रियकरच ईश्वराच्या जागी दिसावा इततकी तद्रूपता अमृता प्रीतमना देखील आश्चर्यचकीत करून गेली. आपल्या प्रेमाने आता आपल्या मनातील ईश्वराचा दर्जा प्राप्त केला आहे, हे जेव्हा त्यांना जाणवले तेव्हा त्या म्हणाल्या ‘अल्लाह, यह कौन आया है। कि तेरी जगह जबान पर। अब उसका नाम आया है?’


इतकी भावविव्हळ कविता लिहिणाऱ्या अमृता प्रीतम यांचे कवयित्री म्हणून तितकेच उग्र रूप त्यांच्या सामाजिक कवितांमधून दिसते. त्यांनी फाळणीचा घाव झेलला, सोसला असल्यामुळे त्यांच्या सामाजिक कवितांना एक वेगळीच धार आहे. फाळणीवर आधारित ‘मजबूर’ कविता भारतमातेची अगतिकता व्यक्त करते.


‘मेरी माँ की कोख मजबूर थी
आजादियों की टक्कर में
उस चोट का निशान हूँ
उस हादसे की लकीर हूँ
जो मेरी माँ के माथे पर
लगनी जरूर थी’


स्वत:च्या फायद्यासाठी जे जनतेचे आहे, त्याचीच निर्लज्जासारखी चोरी करणारे नेते, त्यांच्या कवी नजरेतून सुटले नाहीत. ‘मेरा शहर एक लम्बी बहस की तरह है। असे त्या म्हणतात. या शहरातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू कशी पोखरली गेली आहेे, स्वार्थाचा, विकृतीचा किडा लागून कशी सडली आहे, हे त्यांनी ‘शहर’ कवितेतून सांगितले आहे. ‘घोर काली घटा’ या पंजाबी कवितेत तर खालच्या दर्जाची पत्रकारिता, धार्मिकतेवरून अंदाधुंदी माजवणे, समाज आणि राजनीतीचा केलेला वैचारिक चिखल यावर त्यांनी प्रखर, भडक शब्दांत व्यक्त झाल्या आहेत.


एक कवयित्री म्हणून त्यांच्या शैलीचा जेव्हा विचार आपण करतो, तेव्हा त्यांच्या काव्यशैलीतील रूपक, प्रतिमांची श्रीमंती लक्षणीय आहे हे प्रकर्षाने जाणवते. आपली प्रत्येक संवेदना, जाणीव व्यक्त करताना त्यांनी समस्त निसर्गच प्राशन केला आहे आणि या निसर्गावरच मानवी भाव-भावनांचे आरोपण करीत एक-एक रूपकात्मक काव्यफुले त्या उधळत आहेत, असे वाटते.


भारतीय पंजाबी, हिंदी साहित्यजगतामध्ये एक कवयित्री म्हणून अमृता प्रीतम यांची छबी अशी आहेे; ज्यांनी जीवन जगण्यामध्ये आणि कविता रचण्यामध्ये कधीही एक विभाजक रेषा निर्माण केली नाही. ती इतकी पारदर्शी आहे की त्यांच्या कवितांना जाणणे म्हणजे स्वत:ला कुठे ना कुठे ओळखणे आणि या जगाच्या समस्त प्राणस्पंदनाला मानव हृदयाच्या स्पंदनाशी सन्मुख होणे आहे.


(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
२५/०८/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

Monday, August 12, 2019

श्रावण झड बाहेरी....श्रावण गळतो दूर....

श्रावण झड बाहेरी....श्रावण गळतो दूर....
©डाॅ.अमृता इंदूरकर
             तापलेल्या धरतीला शांत करणारा आषाढ- श्रावण! आपल्या थेंबाथेंबातून सृजनाचे हिरवे सोहळे साजरे करणारा श्रावण! पोळलेल्या मनांवर आपल्या श्रावणसरींचे शिंपण करून मनाला निववणारा, सावरणारा श्रावण! पोपटांनी खाऊन खाली पडलेल्या पिकलेल्या लिंबोण्याच्या कडूसर, ओलसर गंधाने भारलेले रस्ते, श्रावणातली झड किंचित कमी होत नाही तर दडी मारुन बसलेल्या दयाळ पक्ष्याचा तार सप्तकातील सूर, कधी नव्हे ती मोकळ्या मैदानावर साचलेल्या पाण्यातील किडे खायला उतरलेल्या टिटवीची कर्कश आरोळी आणि विजेच्या, टेलिफोनच्या निर्जीव तारांवरून वर्गातील शहाण्या मुलांप्रमाणे रांग लावून टप टप गळणारे पावसाचे थंड थेंब आणि मुसळधार पावसात चिंब भिजलेल्या ललनेने एका जागी थांबून पाऊस थांबवण्याची शांतपणे वाट पहावी तशी चिंब भिजलेली, पानं पानं अंगाभोवती गुंडाळलेली हिरवी हिरवी झाडे. या श्रावणांची जितकी रुपे वर्णन करावीत, तितकी कमीच. कारण हा श्रावण याही पलीकडे अजून बराच आहे. जसा आपल्या मनातला तसा दुसऱ्यांच्याही मनातला. हे दुसरे कवीमन असेल तर मग या श्रावणाला चढलेला काव्यसाज त्याचे सौंदर्य अधिकच खुलविणारा ठरतो.
          श्रावणातली पावसाची पहिली दमदार सर आली की नकळतच आपले मन बालपणीचा ठेका धरते आणि गुणगुणायला लागते *श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे* बालकवींची ही अजरामर कविता. हा श्रावणमास तर बालकवींच्या भोवती फेर धरून आनंदाने नाचत होता. जिकडे बघावे तिकडे श्रावणसौंदर्याच्या खुणा विखुरल्या होत्या. वरती बघावे तर नभोमंडपात इंद्रधनुचा दुहेरी गोफ विणलेले मंगल तोरण दिसते. सूर्यास्त होता होता तरुशिखरे, गृहशिखरे पिवळ्या पिवळ्या ऊन रंगात रंगून जातात. आकाशात जमलेल्या जलदांना विविध संध्याराग सुंदरतेचे रुप रेखतात. मधूनच दूरवर उडणारी बगळ्यांची माळ ही जणू काही कल्पसुमाची माळ भासते. वरून खाली उतरताना ही माळा अवनीवर उतरणारे ग्रहगोलच भासतात. समस्त पशू, पक्षी, गोप, गोपी हा आनंद सोहळा साजरा करण्यात दंग असतात. कुठे सुवर्णचंपक फुलतो तर कुठे केवडा दरवळतो आणि पारिजात तर जणू काही सत्यभामेच्या रोष दूर करायलाच फुलतो. गावातल्या सुंदर बालांना या फुलांचे वेड लागले नाही तरच नवल. या फुलांच्या मोहापायी गावातील सुंदर बाला हातात परडी घेऊन फुले, पत्री खुडायला नगरवेशीपर्यंत जातात. हा श्रावणहर्ष त्यांच्या हृदयात मावत नाही तेव्हा त्यांच्या मुखातून श्रावण महिन्याच्या गीत गायनास प्रारंभ होतो.
           बालकवींनी हा श्रावणहर्ष थुई थुई उडणाऱ्या कारंज्याप्रमाणे व्यक्त केला. तर कवी अनिलांचा श्रावणहर्ष अंतर्मुख करणारा आहे. मनाची फार अस्वस्थ करणारी भावना कवी अनिल व्यक्त करतात.
श्रावण झड बाहेरी, मी अंतरी भिजलेला
पंखी खुपसून चोच एक पक्षी निजलेला...
बाहेर अखंड श्रावणझड सुरु आहे. आणि मी मात्र अंतर्मनातून भिजलो आहे. मन कसे सुप्तावस्थेत गेले आहे एखाद्या चोच खुपसून निजलेल्या पक्ष्याप्रमाणे. आकाशाच्या हृदयालाही हा ओला भार सोसवत नाही आहे थेंब थेंब पाझरून, विझलेला लांब दिवस चिंब करीत, तो देखील संततधार पाझरतो. जळात पसरलेल्या उथळ पालवीमध्ये मध्येच कुठेतरी काहीतरी क्षणमात्र हालचाल होते. तशीच मनाच्या तळात कुठेतरी अव्यक्त स्वरूपाची स्मृतिरुप क्षणजीवी हालचाल होते. कधीतरी काहीतरी आठवून मनाचे तळ ढवळल्या जातात आणि आपलेच प्रतिबिंब धूसर होते हे जाणून कवी अनिल म्हणतात,
चळते प्रतिबिंब जरा स्थिर राहुन थिजताना
बिंदुगणिक उठलेले क्षीण वलय विरताना
अशा झिमझिमणाऱ्या पाऊसवाऱ्यालाही एक स्थायी लय धरून असते.पण श्रावणाने केलेल्या या संमोहनाच्या निद्रेतून माझ्यातील शब्दांना देखील जाग कशी येणार असा प्रश्न शेवटी अनिल विचारतात.एका कवीमनाची शब्दविरहीत झड कधी थांबणार असा प्रश्न ते स्वतःलाच करतात.
            हा श्रावण डोळ्यांनी, कानांनी कितीही प्राशन करा, अगदी अंगांगावर गच्च माखुन घेतला, सर्वदूर पसरलेली हिरवाई सर्वांगावर लिंपून जरी घेतली तरी तनामनाचे समाधान होणार आहे का? हेच मर्ढेकर ' आला आषाढ-श्रावण'या कवितेतून म्हणत आहेत.हा आषाढ-श्रावण आपल्या परीने कितीही लुटला तरी 'किती चातकचोचीने/प्यावा वर्षाऋतू तरी? अशी अवस्था होते. इथे मर्ढेकरांनी चातकचोच म्हटले.पावसाच्या पाण्यावरच आपली वर्षभराची तहान भागविणारा चातक असा कितीसा?त्याची चोच अशी ती केवढी असणार?माणसासाठी अशा चातकचोचीची प्रतिमा वापरून श्रावण उपभोगण्यातला अपुरेपणा,असमाधान मर्ढेकरांनी चपखलपणे व्यक्त केले.या कवितेचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रत्येक कडव्याच्या दोन ओळी निसर्गसौंदर्य व्यक्त करतात व पुढच्या दोन ओळी रस्ते, घरे,घरावरील वाळणारे कपडे अशा वस्तुंचेही वर्णन करतात.पण यामुळे कवितेच्या सौंदर्याला,रसास्वादाला कुठेही बाधा येत नाही.एकीकडे ओल्या झालेल्या काळ्या ढेकळांचा गंध कळ्यांत भरला जातो तर दुसरीकडे काळा डांबरी रस्ता देखील निर्मळ, निवांत होतो.चाळीचाळीतून ओली चिरगुटे चिंब होतात आणि त्याच वेळी ओल्या कौलांमधे जणुकाही मेघ भरून जरा खाली येऊन त्या कौलांची लाली हुंगतात.पक्षी झाडावर बसल्या बसल्या ओल्या पानातल्या रेषा वाचतात आणि आख्खे रान पोपटी रंगाची नक्षी काढण्यात गर्क होते.अशावेळी मर्ढेकरांना अचानक यमदेवाची व विजेची आठवण होते.
                 खरेतर श्रावणसौंदर्य आणि यमाचा काय संबंध पण श्रावण हे सृजनाचे प्रतिक. या सृजनसोहळ्याला बघून विनाशाचे प्रतिक असणारा यम आणि वीज जरा ओशाळतात अशी ते कल्पना करतात. कारण वीजही कोसळली तर हे सौंदर्यच नष्ट होईल या भावनेने ती ओशाळते. अशी ओलसर गोडी आलेल्या भावनेने मनातील तापलेल्या तारा निवांत संथ होतात; सर्व दिशा पंथ, देखील निवतात.
            रिमझिम रेशिमधारांमध्ये झाडाझाडातून, पानापानातून पाडगावकरांचा श्रावणातील हा घननीळ सर्वत्र हिरवा मोरपिसारा फुलवत बरसत राहतो. श्रावणात हा पाऊस जिथे तिथे हिरव्या पाचूचा गिलावा करीत असतो. पाडगावकर हे निसर्गसौंदर्य अचूक टिपतात.
पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले
माझ्या भालावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा
पानोपानी विखुरलेल्या शुभशकुनाच्या खुणा बघून अंतर्यामीचा सूरही गवसतो आणि मन त्या आनंदातच रममाण होते. कोरड्या श्रावणाची तर आपण कल्पनाही करू शकत नाही. मग तो पावसाचा असो नाहीतर प्रेमाचा. असे कोरडेपण स्मृतिरुपाने जेव्हा ग्रेस यांना व्याकूळ करते तेव्हा हे थेंब उणे ऊन माळावर जळत असल्याचे वाटते आणि श्रावणाच्या ओलसर पारदर्शी काचेवर तडे गेल्याचे त्यांना दिसते. ग्रेस यांची 'श्रावण' ही कविता तर निसर्गातील श्रावणाचा आणि मनातील श्रावणाचा विलक्षण असा मेळ साधणारी कविता आहे. बाहेर श्रावण दूरपर्यंत गळतो आहे नदीला पूर येतोय तर आत हा श्रावण दूरपर्यंत रडतो आहे असा की मनातील तयमालाही त्याचा सूर प्राप्त होत आहे. या श्रावणाची धून एका मनाला स्तनांवर गळणाऱ्या निळ्या अस्मानावर आसक्त व्हायला भाग पाडते तर दुसऱ्या मनाला सगुण  फुलांच्या मंद क्षितीजात जडते.  मनाची ही द्वंद्वांत्मक अवस्था या श्रावणाच्या गारुडामुळेच होते. शांता शेळके यांचा श्रावण तर ओळखीची -अनोळखीची गूढ जाणीव घेऊन येणारा आहे. घडी करून फडताळात जपून ठेवलेल्या पैठणीला देखील कितीक श्रावणांचा गंध अजूनही चिकटला आहे. श्रावण आणि सणवार यांचा स्त्रीशी येणारा जीवाभावाचा संबंध आणि त्याच्या आठवणी शांताबाईंनी अगदी हळुवार शब्दांत टिपल्या आहेत.
धूप, कापूर, उदबत्त्यांतून जळत गेले किती श्रावण
पैठणीने या जपले तन.... एक मन.
आजतागायत मराठी कवींनी या श्रावणाची विविधांगी रुपे आपल्या काव्यातून रंगवली. तरी या श्रावणाचे वर्णन परिपूर्ण थोडीच झाले आहे. हा आषाढ, श्रावण रसिकचोचीने कितीही प्यायला तरी तो शिल्लक राहणारच आहे परत तृषार्ततेने तितकाच अधीर, तितकाच हळूवार...
(लेखिका समीक्षक,भाषाशास्त्र अभ्यासक आहेत)
संपर्क-mail id- amrutaind79@gmail.com
११/०८/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल