मातीशी एकरूप झिंजीर सांज...आणि...
डाॅ अमृता इंदूरकर
वाचक हो, या सदरातील मागील लेखात साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांच्यातील क्रांतिकारक नाटककार आपण अनुभवला. प्रस्तुत लेखात कवी म्हणून विष्णू वाघ कसे निराळे आहेत, ते पाहू. वाघ एक नाटककार म्हणून परखड, सडेतोड, आक्रमक आहेत. मात्र, कवी म्हणून त्यांच्यामधील हळूवार, संवेदनशील पिंड प्रामुख्याने जाणवतो. कवी म्हणूनही त्यांचे भरपूर योगदान आहे.
झिंजीर झिंजीर सांज, फील गुड फेणी, सुशेगाद, वाघनखे, लोकोपनिषद, बच्चूभायची वाडी, सूदिरसूक्त हे कोकणी आणि ‘ती बाई मीच आहे’ ही त्यांची काव्यसंपदा प्रसिद्ध आहे. हे सर्व कवितासंग्रह बघितले तर असे लक्षात येते की आपल्या काव्याची नाळ मातीशी जुळवून ठेवतच त्यांच्या काव्यजाणिवांचा विकास झाला आहे. बालपणी मिळालेल्या सामाजिकतेच्या बाळकडूचे प्रतिबिंब त्यांच्या जवळ जवळ सर्वच काव्यामध्ये उमटलेले दिसते. वाघ हे आपल्या कवितेमार्फत समाज, संस्कृती, रीतिरिवाज, स्त्री मन या सर्वांनाच पुढे नेणारे कवी आहेत. या सर्व काव्यसंग्रहातून त्यांच्या प्रतिभेचे विविध पैलू अनुुवायला येतात. पण एक कवी म्हणून मात्र शेवटपर्यंत ते कायमच आत्ममग्न, अंतर्मुख राहिले.
विष्णू वाघ यांच्या काव्यपिंडाचे मूळ शोधायचे झाल्यास त्यांच्या ‘झिंजिर झिंजिर सांज’ या काव्यसंग्रहामध्ये ते मिळते. माझ्या डोंगरीत घुमे। पिढ्या-पिढ्यांचा रे ढोल।। मंद वाजते सुवारी। तिला काळजाची ओल।।असा आपल्या जन्मभूमीचा गौरव ‘माझी डोंगरी डोंगरी’ या कवितेतून ते करतात. जेथे आपण जन्मलो तेथल्या पारंपरिक लोक जीवनाशी, लोकसंस्कृतिशी कसे एकरूप झालाे आहोत, हे काव्याद्वारे लोकसाहित्याच्या अंगाने काव्यमय रुपात मांडायची वाघ यांची हातोटी वेगळीच आहे. गोव्यातील लोकजीवनामध्ये घडणाऱ्या विविध सामान्य, पण निरंतर अशा गोष्टींचे प्रभावी उल्लेख ‘झिंजीर सांज’ मध्ये येतात.
गोमंतकीय भूमीला लगडून आलेल्या ख्रिश्चन आणि पोर्तुगीज मिथकांचे दर्शन या कवितांमधून घडते. त्यांच्या सुवारी, इंत्रूज, धेंडलो, देवचार, भूतावळ, इंगर्ज, मेरी, रोंबाट या कवितांना अस्सल लोकजीवनाचा सुगंध लगडलेला आहे. गोव्यातील शिमग्याच्या सणातील वाजणाऱ्या ढोल, ताशा आणि कांसाळ्याच्या नादातून निर्माण होणारा आवाज ‘घणचे कटर घण’हा त्यांना गोव्याच्या मातीतला आदीताल वाटतो. म्हणून गोव्याच्या भूमिपुत्राचा उल्लेख करताना ते म्हणतात, ‘घणचे कटर घण। पेटव रे भुईपुता। जिविताचे रण।’. हा शिमग्याचा जळणारा सण साजरा करण्यासाठी थोडी राख चाचपून ठिणगीचा कण शोधू, असे त्या भूमीपुत्राला आवाहन करतात. इंत्रूज म्हणजे अनंत उर्जा. न संपणाऱ्या अनंत उर्जेचा आनंददायी महोत्सव. पोर्तुगाल, स्पेन, ब्राझिल, अर्जेंटिना इथे याला ‘कार्निव्हल’ म्हणतात. तोच हा इंत्रूज. तो साजरा होत असताना प्रत्येकाला आनंदाचे उधाण येते, त्याचे वर्णन करताना वाघ म्हणतात, ‘पेड पिंपळाचे तिथे। देव शिंपतो गुलाल। भिडे काळजा काळीज। मिठी होते लालेलाल।’
‘धेंडलो’ ही गोव्यातील शेतकऱ्याच्या उत्सवावरील आहे. पाऊसपाणी बऱ्यापैकी झाले, शेती- भाती उत्तमरीत्या पिकली की कापणीचा आनंद व्यक्त करणारा हा ‘धेंडलो’. पण वाघ यांनी वर्णन केलेला ‘धेंडलो’ मात्र वाचकाचे मन विव्हळून टाकणारा आहे. पावसाने अवकृपा केली असल्याने हा धेंडलो नवसाला देखील पावला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ‘सुकले आसू डोळ्यांतले। भिजले गाणे गळ्यातले’ अशी झाली आहे. ‘सुंवारी’ ही कविता गोव्यातील आदिम लोकवादन प्रकारावर आधारीत आहे. तिच्या नादाची लय साधून त्यावर, अजाणता गर्भारपण भोगावं लागलेली एक कुमारी, वेदनेच्या झळा भोगते त्याचे वर्णन चपखल बसवले आहे. ‘नभाखाली माडावरी। वाजते सुंवारी। पोटातला गर्भ माये। लागतो जिव्हारी।’
सर्वत्र अंधार होता आणि या अंधारात प्रणवाच्या हुंकाराची खळबळ झाली आणि असे म्हणतात की तेव्हा मायेच्या गर्भातून विश्वाची निर्मिती झाली. म्हणजे मूळ माया या सृष्टी जन्माला कारणीभूत ठरली. पण, हे झाले ऋग्वेदाच्या नासदीय सूक्तांमधील सृष्टी उत्पत्तीचे ज्ञान. हेच ज्ञान मात्र जेव्हा विष्णू वाघ यांनी शेतकरी स्त्रियांच्या ‘धालो’ या लोकगीतातून ऐकले, तेव्हा त्यांना जाणवले की जणूकाही आपल्या आया-बहिणींच्या या गीतातून साक्षात वेदच ऐकला. धालो उत्सवात या स्त्रिया स्वत:ला ‘सरगीच्या देवरंभा’ म्हणवून घेतात. म्हणजे स्वर्गातील देवरंभा! आम्ही सरगीच्या देवरंभा साक्षात नक्षत्रांची चंद्रप्रभा चुंबून आलो आहोत. आम्ही ‘शारदेच्या रतनजुई। परमळाया आलो भुई। गंध मोर थुई थुई।’ असे त्या म्हणतात. यामध्ये वाघ यांनी गोव्याच्या लोकजीवनाचा अविभाज्य अंग बनलेले खारवी-गाबती, देवचार, जागोजागी दिसणारे खुरीस (क्रूस), शेतातली खोप, ग्रामदेवतेच्या पायाशी कौल घेणारा कोकणी माणूस, दर्या, किनारा अशा कितीतरींवर एकेक स्वतंत्र कविता लिहिली आहे. बालपणापासून हे सर्व मनात साठवून, जपून ठेवलेलं कवितेतून व्यक्त करताना जणू काही मनाची अवस्था त्या सागरातील भांग पाण्यासारखी होते. जिथे भरतीही नसते आणि सुकतीही नसते. अशा झिंजिर सांजवेळी आकाशात चंद्र असताना दगड पाण्यात भिरकावला की जणूकाही पाण्यात चांदणचुरा पडल्याचा भास होतो. या कविता लिहिताना अशीच काहीशी अवस्था विष्णू वाघ यांची झाली असणार म्हणून ते म्हणतात. ‘थरथरल्या हातांनी। लावला लामणदिवा। चंद्रिमाची चूड घेऊन। धाव आता देवा। सैरावैरा पाणियाला। कशी घालू बांध...... झिंजिर झिंजिर सांज।’
कल्पना करा की समस्त कवी-कवयित्रींना प्रतिभारुपी परमन प्रवेशाचे वरदान नसते तर काय झाले असते? कवयित्रिंनी पुरुषांचे मन व्यक्त होणाऱ्या कविता लिहिल्या नसत्या तसेच कवी देखील कवितेतून स्त्रीमन व्यक्त करण्यास असमर्थ ठरले असते. पण, जेव्हा एखादा कवी याच्याही पलिकडे जाऊन म्हणतो ‘ती बाई मीच आहे’ तेव्हा त्याला नक्की काय म्हणायचे असतेे? याचे उत्तर विष्णू सूर्या वाघ त्यांच्या अगदी अलिकडचा कवितासंग्रह ‘ती बाई मीच आहे’ मधून देतात. प्रत्येक स्त्रीमध्ये सूक्ष्म रुपात स्त्रीत्व असते, या पुरुषातील बाईच्या शोधातून वाघ यांची ही दीर्घकविता जन्माला आली आहे. वैचारिक पातळीवर पुरुषामध्ये वसत असलेल्या बाईनेच या कविता लिहिल्या आहेत, असे वाघ स्वत: म्हणतात. हे समस्त विश्व बाईने व्यापलेले आहे. त्यावर असा एकही कोपरा नसेल जिथे फक्त पुरुष आहे, पण एकही बाई नाही. बाईच्या या विश्व व्यापकतेला समजून वाघ तिच्या असण्याचा व्यापक पट स्पष्ट करताना ती घरी-दारी, बंगल्यात-शहरात, चॅनलवर-पॅनलवर, जत्रेत-यात्रेत, मैफलीत-सहलीत, कवितेत-कवेत, श्वासात-ध्यासात, ग्लासात, पूजेत-मजेत, पदरात -उघडी - नागडी, विझवणारी - निजवणारी, अबोल- बोलकी अशी कितीतरी रुपे मांडली आहेत, पण शेवटी दोन्हीकडून थापा खाणारी मुकीच ढोलकी असते ती, असेही सांगतात.
वाघ यांच्या कविमनातील बाईचे पहिले रुप तीन प्रतिमांना साकारणारे आहे. पहिली आई, दुसरी आजी, तिसरी मुलगी. म्हणजे स्त्रीच्या जीवनात येणाऱ्या तीन स्थित्यंतरांना लक्षात घेऊन या तीन बाया साकार होतात. मुलीचा उल्लेख करता करता वाघ समस्त पुरुषप्रधान व्यवस्थेलाच एक बोचरा प्रश्न विचारतात की मुलीशी लग्न केल्यानंतर तुम्ही तिचे नाव बदलता. तिच्या बापाच्या जागी तुमचे नाव येते, पण खरंच का मग तुम्ही बापाची जागा घेता का? इथे तर तुमच्या असण्या-नसण्यावरुन बाईला विशेषणे लावली जातात. कुमारी- सौभाग्यवती- सवाष्ण -विधवा असा क्रम पिढ्यानपिढ्या चालत आला आहे, पण तुम्ही मात्र आयुष्यभर श्री किंवा मिस्टरच. समाजात चार वर्षाच्या मुलीपासून तर वृद्धेपर्यत ही बाई पुरूषाच्या वासनांध नजरेतून कधी सुटत नाही. शेतात पुरूषाच्या बरोबरीने राबणारी बाई असो किंवा मोलमजुरी करणारी मजूर बाई, मेहनताना तिला मात्र पुरुषापेक्षा अर्धाच दिला जातो. कारण काय तर ती बाई आहे म्हणून? खानदानी घरातली बाई असो किंवा गरिबीत जिवाचा आटापिटा करत जगणारी बाई, तिच्या बाजूला बसून तिच्या हातच्या गरम भाकऱ्या खाताना मात्र तिच्या करपलेल्या काळजाचा वास पुरुषांना कसे बरे येत नाही? खुळचट अंधश्रद्धेच्या लोकसमजुतीतून या बाईला देवाच्या नावाने सोडून दिले जाते. गावातल्या तमाम पुरुषांना लचके तोडायला तर कधी झारखंड, राजस्थान, छत्तीसगड, सारख्या ठिकाणी स्वत:च्या चारित्र्याची जपणूक करणाऱ्या बाईला अशुभ ठरवून डाकीण, चेटकीण ठरवून भर गावात निर्वस्त्र केले जाते.
बाईला अशी वागणूक देणाऱ्या समाजातील लोकांच्या मनोवृत्तीची पाळंमुळं वाघ यांना पूर्वसुरींमध्ये दिसतात. प्रत्येक धर्मात प्रारंभापासूनच धर्मकार्यापासून स्त्रीला ठेवले आहे. यावर ते प्रश्न विचारतात की तिला कधी गायत्री मंत्र म्हणण्याचा, यज्ञोपवित घालण्याचा अधिकार दिला नाही. तिला कायमच मशिदीत जाऊन नमाज पढण्यासाठी मज्जाव केला जातो. चर्चमध्ये कधीही प्रिस्ट होउन ‘सेरमन’ सांगण्याचा अधिकार बहाल केला? कधी साध्वी म्हणून वापरुन घेतली तर कधी धर्माच्या नावाचे साखळदंड तिच्या पायात अडकवले. पुराणात दक्षाला देखील जेव्हा जाणीव होते की स्त्री निर्माण केली नाही तर सृष्टीचे सृजनचक्र चालणार नाही, मग दक्ष साठ कन्यांना जन्माला घालतो. म्हणजे नक्की कोणत्या स्वार्थातून या स्त्रियांचा जन्म झाला आहे, हे वेगळे सांगायला नको.
अहल्या, सावित्री, सीता, शकुंतला, सत्यवती, गांधारी, कुंती, द्रौपदी यांसारख्या भारतीय परंपरेत आदर्श असणाऱ्या स्त्रिया. मदर मेरी, मारिया या ख्रिश्चन धर्मातील पूज्य स्त्रिया आणि मुस्लिम धर्मात जिच्या संरक्षणासाठी कुराणालाही झाकून ठेवलंत शरीयतच्या काळ्या बुरख्याआड, अशा सर्व स्त्रिया आज आपल्यासमोर श्रद्धास्थानावर आहेत, पण खरंच का तेव्हा त्यांच्या वाट्याला खरा मान-सन्मान, आदर मिळाला एक बाई म्हणून? असा प्रश्न वाघ यांनी वारंवार विचारला आहे.
पुराणकाळापासून वर्तमानकाळापर्यंत बायांची विटंबना करणारी रुपे मांडल्यानंतर शेवटी वाघ यांनी या स्त्रीमधल्या शक्तीचेही रुप उलगडले आहे. गार्गी, मैत्रेयी सारख्या वेदांच्या अधिकारी बनल्या. कृष्णाला मदत करणारी सत्यभामाही आहे, पुत्राला या आर्यावर्ताचा राजा करणारी शकुंतलाही आहे. साक्षात ज्ञानियांच्या राजाला उपदेश करणारी मुक्ताबाई आहे, भरल्या बाजारी डोईचा पदर पाडून जाणारी जनाबाई आहे. शिवबाला स्वराज्य प्रेरणा देणारी जिजाऊ पण आहे. तुकारामाच्या भक्तीचा जळता अंगार पदरात बांधून घेणारी आवली पण आहे. वैधव्यावर मात करणाऱ्या पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर आहेत. ताराराणी, झाशीची राणी, कित्तूरची चन्नमा, रजिया सुलतान, ज्योतिबांची ढाल बनणारी सावित्रीबाई आहे. भीमाच्या पाठीशी असणारी रमाई आहे.
आज अशी कितीतरी स्त्रीची प्रेरणादायी रूपे आहेत. ज्यांनी इतिहास घडविला, देश बनविला, तरीही कवी वाघ यांचा शेवटचा उद्गार वाचकांना अंतर्मुख करतो,
यातली प्रत्येकजण
निश्चितपणे आहेच एक ठिणगी
पण प्रत्येकवेळी स्वतंत्रपणे पेटणारी
आणि म्हणूनच
तुमच्या निगरगट्ट मानसिकतेने
अद्यापही न स्वीकारलेली
ती बाई मीच आहे!
यातली प्रत्येकजण
निश्चितपणे आहेच एक ठिणगी
पण प्रत्येकवेळी स्वतंत्रपणे पेटणारी
आणि म्हणूनच
तुमच्या निगरगट्ट मानसिकतेने
अद्यापही न स्वीकारलेली
ती बाई मीच आहे!
ज्या दिवशी प्रत्येक पुरुष त्याच्यात वास करणाऱ्या या बाईच्या विविधांगी रूपाला खऱ्या अर्थाने समजेल, त्या दिवशी ‘ती बाई आहे बरं’ असा वेगळा उल्लेखही करण्याची गरज पडणार नाही.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
२८/०७/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल
#अमृतवेल