तुम्ही द्वैभाषिक की बहुभाषिक?
तुम्हाला भाषा आवडतात का?भाषा कुणाला नाही आवडत? सर्वांनाच आवडतात. कारण भाषा हा मानवाच्या विचारांचा आरसा आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची मातृभाषा त्याला प्रिय असतेच. पण, मातृभाषेव्यतिरिक्त तुम्हाला इतर भाषा देखील आवडतात का? मातृभाषेव्यतिरिक्त अजून किती व कोणकोणत्या भाषा तुम्हाला अवगत आहेत? नव्या, विविध भाषा परिश्रमपूर्वक आत्मसात करायला व तद्भाषी व्यक्तीशी, समुहाशी संवाद साधायला आवडतं का? असे केल्याने तुमच्या भाषिक व्यक्तिमत्त्वामध्ये फरक जाणवतो का? फार वेगळे वाटतात नाही का हे सर्व प्रश्न! कारण आपल्या अवतीभोवती असे कितीतरी लोक असतात किंवा विशिष्ट समुदाय असतो जो एकापेक्षा अधिक भाषा अवगत असणारा असतो. कदाचित आपणही त्यातलेच असाल. पण, मुळात व्यक्तीने द्वैभाषिक किंवा बहुभाषिक असणे हे आपल्याला वाटते तितके सोपे नाही. समाजशास्त्रीय भाषाअभ्यासाअंतर्गत या दोन्ही संकल्पनांना फार महत्त्व आहे.
संज्ञापन व्यवहार
एखादी व्यक्ती किंवा विशिष्ट प्रांतातील, देशातील समाजगट दोन भाषांमधून भाषाव्यवहार करते, तेव्हा या प्रकारच्या संज्ञापन व्यवहाराला द्वैभाषिकता म्हणतात. उदाहरणार्थ, कॅनडात फ्रेंच व इंग्लिश या दोन भाषांतून संज्ञापन व्यवहार चालतो. म्हणून कॅनडा हे द्वैभाषिक राष्ट्र मानले जाते. एखादी व्यक्ती द्वैभाषिक संज्ञापन करू शकते. तेव्हा तिला दोन भाषा अवगत असतात. मात्र, या दोन भाषांपैकी एका भाषेवर त्या व्यक्तीचे प्रभुत्व असते, तर दुसरी भाषा कामकाजापुरती, प्रसंगानुरूप, औपचारिक संज्ञापनव्यवहारात ती उपयोगात आणत असते.
अभ्यासक्रमात द्वितीय भाषा म्हणून मातृभाषेखेरीज अन्य भाषेचा अभ्यास करून जी भाषा शिकली जाते, ती निजभाषिकाने कमावलेली भाषा असते. त्यामुळे या कमावलेल्या भाषेत आणि निजभावेच्या संपादनात अंतर असते. म्हणूनच कॅनडासारख्या द्वैभाषिक राष्ट्रात द्वैभाषिक शाळा (Bilingual Schools) असून फ्रेंच व इंग्रजी या दोन्ही भाषांत समान प्रभुत्व असावे, यासाठी द्वैभाषिक माध्यमाचा अवलंब केलेला दिसून येतो.
कारणीभूत गोष्टी
द्वैभाषिकतेच्या संदर्भात अजून एका प्रकाराचा समाज भाषाविज्ञानाने विचार केलेला आहे, हे समजून घेण्यास उपयोगी पडतो. तो म्हणजे ‘एककालिन द्वैभाषिकत्व’ (Simultaneous Bilingualism). लहान मूल जेव्हा एकाच वेळी दोन भाषा शिकते त्यावेळी ते एककालिन द्वैभाषिक बनत असते. लहान मूल एककालिन द्वैभाषिक बनण्यामागे पुढील गोष्टींचा प्रभाव कारणीभूत असतो.
१) अशा मुलांच्या पालकांची दोन भाषांमध्ये बोलण्याची क्षमता असणे.
२) पालक किती व कशा प्रमाणात मुलांशी बोलताना या दोन भाषांचा वापर करतात.
३) घरातील लहान मूल (Sibling) कुटुंबातील इतर सदस्यांसोबत कोणती भाषा बोलते.
४) मूल बाहेर त्यांच्या लोकसमुदायामध्ये कोणत्या भाषेचा वापर करतात.
५) कोणत्या भाषेतून मूल शिक्षित होत असतं किंवा शिक्षण घेत असतं.
अशा पद्धतीचे एककालिन द्वैभाषिकत्व दाक्षिणात्य लोकांमध्ये बघायला मिळते. दाक्षिणात्य कुटुंबात वाढणारे मूल एकाचवेळी तामिळ व इंग्रजी अशा दोन्ही भाषा शिकत असते. पाश्चात्य देशात ट्युनिशिया आणि मोरोक्को येथे बराच उच्चभ्रू समाज असा आहे जो फ्रेंच आणि अरेबिक या दोन भाषांच्या बाबतीत एककालिन द्वैभाषिकत्व जपताना दिसतो. समाजात अशा कितीतरी कुटुंबांमधील मुलं पालकांकडून घरी एक भाषा शिकतात, शाळेमधून दुसरी आणि विविध भाषक मित्रपरिवाराकडून तिसरी. इथूनच पुढे एकभाषिकत्व, द्वैभाषिकत्व अथवा एककालिन द्वैभाषिकत्व आणि बहुभाषिकत्व अशा पद्धतीने भाषाअर्जनाला प्रारंभ होतो. Monolingual - Bilingual- Multilingual, असा हा क्रम असतो.
स्थायी द्वैभाषिक समाजगट
समाजातील द्वैभाषिकतेचा अनेक अंगांनी अभ्यास केला जातो. या द्वैभाषिक उपयोजनामागे सामाजिक स्तरभेदांचा जो परस्परसंबंध असतो ते देखील एक प्रमुख कारण आहे. सामान्यत: निम्नस्तरीय लोक एकभाषिक असतात, परंतु उच्चवर्गीय, अभिजन हे द्वैभाषिक असतात. सामान्य माणूस दुसरी भाषा प्रसंगपरत्वे समजू शकतो. परंतु, लिहू व बोलू शकत नाही. हिंदी जाणणारा एखाद्या वेळेस पंजाबी समजू शकेल, पण लिखित स्वरूपातील गुरुमुखी पंजाबी वाचू व लिहू शकणार नाही. पण, समाजात काही द्वैभाषिक संज्ञापन व्यवहार करणारा समुदायही आहे. अशांना स्थायी द्वैभाषिक (Stable Bilingual) समाजगट म्हणतात.
मग बहुभाषिकता म्हणजे काय ते पण जाणून घेऊ या. सर्व भाषिक जातींना लागू होणारी बहुभाषिक व्यक्तीची संज्ञा समजून घ्यायची असेल तर ती अशी -
बहुभाषिकता म्हणजे?
बहुभाषिक व्यक्तीला पॉलिग्लॉट (Pollyglot) म्हणतात. पॉली म्हणजे बहु आणि ग्लॉट म्हणजे भाषा/ भाषी म्हणजेच बहुभाषी, अशी ही संज्ञा आहे. एखाद्या व्यक्तीच्या किंवा समाजाच्या, देशाच्या संज्ञापन व्यवहारात तीन किंवा त्याहून अधिक भाषांचा उपयोग केला जातो. तेव्हा अशा संज्ञापन व्यवहाराला बहुभाषिकता म्हणतात. जागतिक लोकसंख्येच्या प्रमाणात एकभाषकापेक्षा बहुभाषकांची संख्या जगात अधिक आहे. एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक भाषांमध्ये मौखिकरीत्या, लिखित स्वरुपात किंबहुना गायनामधूनही सक्रीय असते तर काही भाषांमध्ये त्याच व्यक्तीची श्राव्यक्षमता, वाचनक्षमता ही थोडी अक्रियाशील असते. पण, रितसर ती भाषा ग्रहण न करताही समजू शकते, अशा दोन तीन किंवा त्याहीपेक्षा अधिक भाषा अवगत असणाऱ्या व्यक्तीला बहुभाषिक आणि त्रैभाषिक, असे देखील म्हणतात.
नेटीव्ह स्पिकर
भारत, मलेशिया, आफ्रिका, इस्रायल, सिंगापूर ही राष्ट्रे बहुभाषिक राष्ट्रे म्हणून ओळखली जातात. एखादा देश बहुभाषिक म्हणून ओळखला जातो, याचा अर्थ त्या देशातील सर्वच माणसांना तीन किंवा अधिक भाषांचे ज्ञान असतेच, असे नाही. कारण सर्वप्रथम बहुभाषिक व्यक्ती बालपणापासून त्याची प्रथम भाषा/ मातृभाषा आत्मसात केलेला असतो. अर्थात ही मातृभाषा ती व्यक्ती कोणतेही औपचारिक भाषिक शिक्षण न घेता आत्मसात करते. त्यानंतर औपचारिक शिक्षण घेताना ती व्यक्ती आपोआपच एककालिन द्वैभाषिकत्व आत्मसात करते. पण, एक जन्मजात भाषा येणारा म्हणून ज्याला आपण ‘नेटीव्ह स्पिकर’ म्हणतो. पुढे तो कितीही नव्या भाषा शिकत गेला तरी प्रत्येकवेळी इतर भाषा शिकताना त्याची मातृभाषा/ प्रथम भाषा या भाषाअर्जन प्रक्रियेवर अधिक प्रभाव टाकणारी ठरत असते.
इंग्रजीला जागतिक भाषा म्हणतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती जी इंग्रजीभाषक नाही, ती प्रथम शिकलेल्या मातृभाषेची संगती लावतच इंग्रजी भाषा शिकत असते आणि याच पद्धतीने हळूहळू पुढे गरज भासेल तसे बहुभाषिकत्व प्राप्त करीत असते. अर्थात एखादी भाषा आत्मसात करणे आणि संपूर्ण शिक्षणच एखाद्या भाषेच्या माध्यमातून आत्मसात करणे या दोन प्रक्रियांमध्ये फरक आहे.
सामान्यत: एखादी व्यक्ती बहुभाषिक बनते ती पुढीलप्रमाणे -
१) एक भाषा उत्तम प्रकारे समजते, बोलता येते.
२) एकाच भाषेत उत्तम प्रकारे लिहिता येते.
३) त्या त्या लघुक्षेत्रानुसार विशिष्ट भाषेचा उपयोग करण्याचे संकेत ठरलेले असतात.
उदाहरणार्थ, मुंबईतील गुजराती व्यापारी घरी गुजराती बोलेल. व्यवसायक्षेत्रात, बाजारात मराठी अथवा हिंदी बोलेल. गिऱ्हाईक कोणता भाषक आहे ते समजून आणि परकीय प्रांतात अथवा देशात व्यवसायासंबंधी गेला असता इंग्रजी बोलेल.
आपल्या भाषिक समाजात ज्ञान, विज्ञानाची भाषा, धर्माची भाषा आणि व्यक्तिगत संभाषणाची भाषा असे भाषिक गट पडल्यामुळे हे गट व्यक्तीला बहुभाषिक बनण्यासाठी कायमच मदतनीस म्हणून सिद्ध होतात. भारतात असे भाषिक वैविध्य असल्याकारणाने भारतात त्रिभाषासूत्राचा वापर होतो.
नव्या सर्वेक्षणानुसार मानसोपचारतज्ञ देखील म्हणतात की, व्यक्ती जितकी बहुभाषिक असेल तितका त्या व्यक्तीचा मेंदू सक्रीय असतो. तेव्हा सर्वच भाषांवर प्रेम करा आणि नवनव्या भाषा आत्मसात करीत राहा. स्वत:ला एकभाषिकत्वाकडून बहुभाषिकत्वाकडे घेऊन जा!
धन्यवाद!
डॉ.अमृता इंदूरकर
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
खूपच छान
ReplyDeleteखुप छान माहिती
ReplyDeleteखूपच छान!
ReplyDeleteअगदी बरोबर खूप छान माहिती दिली आहे आपण
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteमॅडम, तुम्ही एखादे पुस्तक का नाही लिहीत? खूप छान लिहिता, खूप छान माहिती देता, त्यातून तुमचा अभ्यास, तुमचे ज्ञान दिसून येते. तुम्ही पुस्तक लिहिले तर ते खरंच चांगलच असेल.
ReplyDeleteविलक्षण.
ReplyDelete