Sunday, October 21, 2018

कपोलकल्पित अाणि सचैल



🔶 कपोलकल्पित🔶

हा शब्द आपण बरेचदा वापरतो.हल्ली तर या शब्दाच्या अर्थाप्रमाणे वागणारे अनेक लोक दिसतात.' काय कपोलकल्पित कथा रंगवली त्याने' किंवा ' उगाच कपोलकल्पित काहीही सांगू नकोस!' अशी वाक्य आपण ऐकतो.यावरून कपोलकल्पित म्हणजे केवळ कल्पनेतील किंवा मनात काहीतरी रचून बोलणे, असा अर्थ प्रतीत होतो.ज्याला हिंदीत आपण 'मनगढन्त' म्हणतो.

      हा शब्द मुळात कसा तयार झाला ते जाणून घेणं मजेशीर आहे.खरेतर 'कपोल' या शब्दाचे दोन अर्थ आहेत.एक गाल आणि दुसरा कपाळ वा गंडस्थळ ( शब्दकोशात दोन्ही नोंदी आहेत) पुढे कालांतराने कपोल म्हणजे कपाळ असाच अर्थ गृहीत धरला जाऊ लागला.त्यामुळेच कपोल म्हणजे कपाळ हाच शब्द रूढ झाला आणि त्यावरूनच पुढे कपोलकल्पित असा शब्द तयार झाला.तो कसा तर कपाळाचा संबंध विचार करण्याशी लावला जातो.विचार करता करता बोट कपाळावर जाते.शिवाय एकाग्र होतानाही आपण कपाळावर लक्ष केंद्रित करतो.त्यामुळेच मग डोक्यात काहीतरी रचून सांगितलेले ते म्हणजे, 'कपोलकल्पित ' असा शब्द तयार झाला.नुसत्या कल्पनेतले असे काही म्हणजे कपोलकल्पित.

🔶सचैल🔶

सचैल स्नान म्हणजे संपूर्ण स्नान; असा आपल्या मनात एक अर्थ दडलेला असतो.खुप फुरसत काढून, स्वच्छ आणि अभ्यंगस्नानाच्या धर्तीवरचं स्नान म्हणजे सचैल स्नान, असे आपल्याला वाटते.पण हा अर्थ खरेतर चुकीचा आहे.'चैल' म्हणजे वस्त्र.त्याला 'स' हा उपसर्ग( पूर्वप्रत्यय) लागला.त्यामुळे त्याचा अर्थ झाला, वस्त्रासह केलेले स्नान म्हणजे सचैल स्नान.त्यामुळे घरी न्हाणीघरात आपण जे करतो, ते बरेचदा सचैल स्नान नसते, पण तीर्थयात्रेला गेले असता, घाईघाईत नेसत्या कपड्यानिशी उरकलेले स्नान मात्र सचैल स्नान ठरेल!       



- डाॅ.अमृता इंदूरकर,नागपूर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#शब्दबोध

No comments:

Post a Comment