Tuesday, December 25, 2018

बडतर्फ,पाखरं

🔶बडतर्फ🔶

‘अमक्या-अमक्या कारणाने एखाद्याला बडतर्फ केले’ अशा पद्धतीची वाक्ये आपण वर्तमानपत्रात अनेकदा वाचतो. मूळ फारसी शब्द ‘बर्तरफ्’. ज्याचा अर्थ आहे कामावरून, पदावरून पदच्यूत करणे, काढून टाकणे, बाजूस करणे. ऐतिहासिक लेख संग्रहांमधे ‘मुरादखान याची फौज अगदी बर्तर्फ केली’ असा उल्लेख आहे. शिवाय दिल्ली येथील मराठय़ांची राजकारणे या लेखसंग्रहामधे ‘जन्रेल इष्टवरिस यास हिंदुस्थानचे फौजेचा बहालीबर्तर्फीचा मुख्त्यार केला आहे.’ म्हणजे जन्रेलला कुणाला बहाली द्यायची व कुणाला बर्तर्फी द्यायची त्यासाठी नेमला आहे.

🔶पाखरं🔶

एखाद्यावर मायेची पाखर घालणे असा वाक्प्रयोग आपण नेहमीच करतो. पाखर घालणेचा संबंध पक्ष्याच्या पंखांशी जोडून हा वाक्प्रयोग तयार झाला. पाखर हा शब्द मूळ कोणत्या भाषेतून आला याबाबत निश्चिती नाही. संस्कृत, प्राकृत, िहदी यांमधून आला असावा असे भाषा अभ्यासकांचे मत आहे. कारण हिंदीत ‘पांखी’ म्हणजे पक्षी. पक्षी रात्रीच्या वेळी आपल्या पिलांना पंखाखाली घेतात किंवा कोंबडी संरक्षणासाठी म्हणून पिलांना पंखाखाली घेते त्यावरून पंख – पाखरू – पाखर असा संबंध जोडता जोडता पाखर घालणे शब्दप्रयोग रूढ झाला. ‘पाखर’चा दुसरा अर्थ आहे;  हत्तीचे किंवा घोडय़ाचे चिलखत. युद्धामध्ये हत्ती, घोडे यांच्या शरीराला इजा होऊ नये म्हणून संरक्षणार्थ जे लोखंडी चिलखत, झूल घालतात त्याला देखील पाखर म्हणतात. दोन्ही अर्थामधे संरक्षण करणे हा समान अर्थ दिसतो त्यामुळे त्याच अर्थावरून पाखर घालणे हा वाक्प्रयोग मराठीत रूढ झाला हे निश्चित.

डॉ.अमृता इंदूरकर,नागपूर

amrutaind79@gmail.com

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#शब्दबोध

Saturday, December 22, 2018

वासलात,वैराण


🔶वासलात🔶

‘कुटुंबकलहामुळे वर्षांनुवर्षांपासून स्थगित राहिलेल्या इस्टेटीची वासलात लावली.’ एखादा लांबलेला निर्णय, कोर्ट केस प्रकरणसंबंधित प्रलंबित निर्णय, एखादे रेंगाळलेले काम इत्यादी गोष्टी जेव्हा तडीस जातात, त्यांचा निकाल लागतो तेव्हा आपण म्हणतो ‘त्या कामाची वासलात लावली’. वासलात म्हणजे निकाल, निर्णय, हिशेब हा अर्थ आपल्या परिचयाचा आहे. मूळ अरबी  ‘वासिलात्’ या स्त्रीलिंगी शब्दापासून वासलात शब्द तयार झाला आहे. वासिलात् म्हणजे एका बाबीखाली आलेल्या सर्व रकमांची जमा. यासंदर्भात इतिहासाचार्य राजवाडे यांनी खडर्य़ाच्या लढाईच्या पत्रव्यवहारातील एक उदाहरण दिले आहे- ‘तहा पासोन वासलातीचा ऐवजही माघारा देविला’. पण ‘वासलात’चे अजून बरेच अर्थ आहेत जे क्वचितच वापरले जात असतील. वसूल, जमा, उत्पन्न व त्याचा हिशोब, जमाखर्च, हिशोब लिहिताना काढावयाची एक रेघ, हकिकत, गोष्ट, खटका, काम, शेवट, फैसला, व्यवस्था, तजवीज, परिणाम, अखेर इतके वासलातचे अर्थ आहेत.

🔶वैराण🔶

‘वैराण वाळवंटातून प्रवास करताना दिशांचा निश्चित अंदाज येत नाही. किंवा कथा, कादंबरीतून हमखास वाचनात येणारे वाक्य म्हणजे, ‘माझ्या वैराण आयुष्यात आता कुठलाच ओलावा उरलेला नाही’. तर ग्रेस यांच्या कवितेमध्येही याचा उल्लेख येतो.  वैराण दिशांचा जोग, चांदणे नदीच्या पाण्यावर निजलेले ..
वरील पहिल्या उदाहरणांवरून वैराण म्हणजे वालुकामय निर्जल प्रदेश हा अर्थ कळतो. फारसी ‘वैरान्’वरून वैराण शब्द तयार झाला आहे. फारसीमधे वैरान् म्हणजे उद्ध्वस्त, पडीक, ओसाड, उजाड. मराठीतही हाच अर्थ जसाच्या तसा आला फक्त वैरान्मधील ‘न’ जाऊन ‘ण’ आला इतकाच काय तो बदल. कदाचित हिंदीमधील ‘विरान’ शब्द यावरूनच आला असावा. ‘हमारी पुरखों की हवेली अब वीरान हो गयीं’ कारण फारसीमध्ये ‘वैरानी’ हा शब्द गैरआबादी, नासाडी, ओसाडी यासाठी वापरला जातो.

डॉ.अमृता इंदूरकर,नागपूर
amrutaind79@gmail.com
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#शब्दबोध

Sunday, October 21, 2018

कपोलकल्पित अाणि सचैल



🔶 कपोलकल्पित🔶

हा शब्द आपण बरेचदा वापरतो.हल्ली तर या शब्दाच्या अर्थाप्रमाणे वागणारे अनेक लोक दिसतात.' काय कपोलकल्पित कथा रंगवली त्याने' किंवा ' उगाच कपोलकल्पित काहीही सांगू नकोस!' अशी वाक्य आपण ऐकतो.यावरून कपोलकल्पित म्हणजे केवळ कल्पनेतील किंवा मनात काहीतरी रचून बोलणे, असा अर्थ प्रतीत होतो.ज्याला हिंदीत आपण 'मनगढन्त' म्हणतो.

      हा शब्द मुळात कसा तयार झाला ते जाणून घेणं मजेशीर आहे.खरेतर 'कपोल' या शब्दाचे दोन अर्थ आहेत.एक गाल आणि दुसरा कपाळ वा गंडस्थळ ( शब्दकोशात दोन्ही नोंदी आहेत) पुढे कालांतराने कपोल म्हणजे कपाळ असाच अर्थ गृहीत धरला जाऊ लागला.त्यामुळेच कपोल म्हणजे कपाळ हाच शब्द रूढ झाला आणि त्यावरूनच पुढे कपोलकल्पित असा शब्द तयार झाला.तो कसा तर कपाळाचा संबंध विचार करण्याशी लावला जातो.विचार करता करता बोट कपाळावर जाते.शिवाय एकाग्र होतानाही आपण कपाळावर लक्ष केंद्रित करतो.त्यामुळेच मग डोक्यात काहीतरी रचून सांगितलेले ते म्हणजे, 'कपोलकल्पित ' असा शब्द तयार झाला.नुसत्या कल्पनेतले असे काही म्हणजे कपोलकल्पित.

🔶सचैल🔶

सचैल स्नान म्हणजे संपूर्ण स्नान; असा आपल्या मनात एक अर्थ दडलेला असतो.खुप फुरसत काढून, स्वच्छ आणि अभ्यंगस्नानाच्या धर्तीवरचं स्नान म्हणजे सचैल स्नान, असे आपल्याला वाटते.पण हा अर्थ खरेतर चुकीचा आहे.'चैल' म्हणजे वस्त्र.त्याला 'स' हा उपसर्ग( पूर्वप्रत्यय) लागला.त्यामुळे त्याचा अर्थ झाला, वस्त्रासह केलेले स्नान म्हणजे सचैल स्नान.त्यामुळे घरी न्हाणीघरात आपण जे करतो, ते बरेचदा सचैल स्नान नसते, पण तीर्थयात्रेला गेले असता, घाईघाईत नेसत्या कपड्यानिशी उरकलेले स्नान मात्र सचैल स्नान ठरेल!       



- डाॅ.अमृता इंदूरकर,नागपूर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#शब्दबोध