Monday, March 25, 2019

मर्ढेकरांच्या कवितेतील 'ती'

मर्ढेकरांच्या कवितेतील 'ती'
-डॉ.अमृता इंदूरकर
नुकताच महिला दिन साजरा झाला. खरेतर ८ मार्च हा एक दिवस महिला दिनाचा निश्चित असला तरी जगात हा महिनाभर महिला दिन कुठल्या ना कुठल्या रुपाने साजरा होतच राहतो. शेवटी महिला दिन म्हणजे काय? तर समस्त विश्वाला व्यापून असणारी, या विश्वाच्या केंद्रस्थानी असणारी ‘ती’. ‘ती’ च्याबद्दल जाणवणाऱ्या सर्व भावभावनांना व्यक्त करण्याचे एक निमित्त. मनापासून कुटुंबापर्यंत. कुटुंबापासून जगापर्यंत कब्जा केलेली ती एकरुपा नसून शतरुपा आहे. नुसते ‘ती’ म्हटले तरी प्रत्येकाच्या मनात ज्या ‘ती’ चे रुप कोरले गेले आहे, त्या सर्वच ‘ती’ क्षणात नजरेसमोर येतात. मराठी साहित्याला लेखिका म्हणून आणि लेखनविषय म्हणून या ‘ती’ने इतके व्यापले आहे की ‘ती’च्या शिवाय मराठी साहित्य प्राण नसलेल्या देहासारखे ठरेल. एक मराठी कवी माणूस बा. सी. मर्ढेकरांना या ‘ती’ ची जी रुपे दिसली ती त्या काळात क्वचितच कुणाला दिसली असतील. २० मार्च हा मर्ढेकरांचा स्मृतिदिन. यानिमित्ताने मर्ढेकरांच्या कवितेमधली ‘ती’ कशी होती? कोणकोणत्या रुपामध्ये होती? याचे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एक पुनर्मूल्यात्मक सिंहावलोकन करू या.
प्रामुख्याने तीन रुपे
मर्ढेकरांच्या एकूणच स्त्री चित्रणात्मक कवितांमधून तीन रुपे प्रामुख्याने आढळतात. स्त्रीप्रती असणारी त्यांची मातृपूजक कवीवृत्ती. समाजात वावरणाऱ्या स्त्रीच्या शोषणाची चित्रे आणि प्रेयसीरुपात भेटणारी स्त्री. अशा तीन रुपांमधून मर्ढेकरांच्या कवितेतील ‘ती’ आपल्याला भेटते. ‘शिशिरागम’ हे मर्ढेकरांचे पहिले कथाकाव्य त्यांच्या प्रेमव्याकूळ भावनांचे चित्रण करणारे काव्य आहे. प्रेमभंगातून निर्माण होणाऱ्या प्रेमनिराशेच्या गर्तेतून शिशिरागमातील नायकाला त्याची मातृपूजक वृत्ती वाचवते, असे त्यांनी चित्रण केले आहे. प्रेमभंग होताच नायकाला प्रकर्षाने जाणवते की, आयुष्यात एकवेळ बाई नसते पण आई तर असते. ‘माय असते. बाईल जरी नाही, प्रेमवंता तारी प्रेमवंचिताही’. प्रेमभंगाच्या असह्य दु:खावर फक्त आईच आपल्या ममतेची फुंकर घालून ते दु:ख सहन करण्याचे बळ मिळवून देते, असे हा नायक म्हणतो. ‘आई! येत म्हणून मस्तक तुझ्या अंकावरी ठेवण्या’.
मंगलमय मर्म
पुढे ‘काही कविता व आणखी काही कविता’ या कवितासंग्रहात स्त्री संवेदनेचा मेळ साधणाऱ्या, मातृगौरवाच्या विविध अशा छटा लक्षणीय पद्धतीने त्यांनी साकारल्या आहेत. संपूर्ण महानगराचा जडपणा आपल्या अंतरंगात वागवणारी मुंबापुरी मर्ढेकरांना न्हालेल्या, सोज्वळ, मोहक गर्भवतीसारखी भासते. त्यांची ही प्रतिमा स्त्रीत्वामध्ये साठवलेले मंगलमय मर्म उलगडणारी आहे. ‘पांडुर संध्या चौथ्या प्रहरी’ या कवितेत चार महिन्याचा गर्भ गळालेल्या मोलकरणीचे चित्रण करताना ‘पांडुर संध्या चौथ्या प्रहरी। विव्हळते नारी लाल फाटुनी’ या ओळींमधून चवथ्या प्रहरानंतर आरक्त झालेली संध्याकाळ जणू काही आकाशी सगळीकडे आपला लालपणा पसरून विव्हळते, तशीच चार महिन्याचा गर्भ गळालेली मोलकरीण विव्हळते, अशी कल्पना केली आहे. या तीव्रतेवर कळस म्हणून की काय, अशा या मोलकरणीचे मानसिक, शारिरीक दु:ख समजून घेणारी तिची मालकीण तिला मोठ्या मायेने जवळ बसवून घास भरविते. आजच्या स्त्रीवादी कविता, स्त्रीवादाचे शिक्कामोर्तब व्हावे यासाठी पाळीच्या स्त्रावामध्येच अडकलेल्या दिसतात. तिथे मर्ढेकरांनी मात्र मोलकरीण आणि मालकीणीमधील मालकीणीच्या रुपाने मातृत्व हरवलेल्या जखमेचे मनावरील व्रण हळूवारपणे भरून काढताना दिसतात. स्त्रीच स्त्रीची मनोवेदना, उदरवेदना समजून घेऊ शकते, हे अतिशय सूचकपणे, लक्षणेने सांगतात.
मातृत्वाचा गौरव
मातृत्वाच्या उंबरठ्यावर उभ्या असणाऱ्या भावी मातेचे इतके मंगलकारी, तरल, हळूवार वर्णन मर्ढेकरांसारखा कवी जेव्हा करतो तेव्हा रसिकवाचक अक्षरश: या मांगल्यभावनेत चिंब भिजतो. ‘बाळगुनी हा पोटी इवला गोळा’ या कवितेत आईच्या रक्तरुपी गंगेतून निघालेले रसद्रव्याचे ओढे, नाले त्या इवल्या इवल्या अवयवांना उगविण्यासाठी जाऊन मिळतात, असे ते म्हणतात.
‘रसद्रव्याचे ओढे नाले
तव रक्ताच्या गंगेलागी
कितीक मिळती झुळझुळ, इवले
अवयव उगवित इवल्या अंगी...’
तर ‘पोरसवदा होतीस’ या कवितेतून कालपरवापर्यंत जिच्या पायांमध्ये वारा खेळायचा ती अल्लड आज मोगरीची कळी जशी टपोरते तशी मातृत्वाच्या चाहुलीने टपोरली आहे. जिच्या कुशीतून उद्या छोट्या जीवाची साखळी पडणार आहे, अशा या भावी मातेचे मर्ढेकर ‘थांब उद्याचे माऊली। तीर्थ पायांचे घेईतो’ असे म्हणून गौरव करतात. ‘बोंड कपाशीचे फुटे’ या कवितेतून भेटणारी ग्रामीण स्त्री सकाळपासून रात्रीपर्यंत शेतात राबताना, भाकरी थापताना सतत पतीला आपला साजशृंगार आवडेल का? माझ्या हातची भाकर गोड लागेल का? याचाच विचार करते. पुरुषाच्या बरोबरीने शेतात राबराब राबणाऱ्या स्त्रीच्या मनातील सुखाच्या इवल्या इवल्या कल्पना देखील मर्ढेकरांनी जणू काही स्त्रीमन जाणून वर्णन केल्या. या सर्वच मातृत्वाचा गौरव करणाऱ्या कवितांमधून मर्ढेकर स्त्रीमध्ये नात्याचं असणाऱ्या महन्मंगलयतेतून प्रकटणारी शुभकारकता, सुखदायकता, परोपकारी वृत्ती, वात्सल्य ह्यांचे तितकेच निर्मळ चित्रण करतात.
अलक्षित स्त्रियांची व्यथा
आपल्या अवतीभवती असणाऱ्या संसाराचे जीवाख्य फार भयावह आहे. त्यातही या जीवाख्यात सर्वात अधिक भरडल्या जाते ती म्हणजे समाजातील प्रत्येक स्तरातील स्त्री. हक्काच्या नवऱ्यापासून तर स्त्रीला वेश्या बनवून तिच्या मनाचे, शरीराचे शोषण करणाऱ्या पुरुषी मनोवृत्तीच्या पार्श्वभूमीवर समाजगटातील या अलक्षित स्त्रियांची व्यथा, त्यांच्या शोषणाचे चित्रण मर्ढेकर अतिशय कलात्मक पद्धतीने मांडतात. मुंबईतील गिरगावातील गोंधळलेल्या आणि चिंचोळ्या अशा गल्लीमध्ये जगणाऱ्या बायका संसाराच्या निबरट, टणक खाईमध्ये पिचून हाडबंडले झाल्या. पतीच्या वासनेला कंटाळलेल्या असल्या तरी वाट्याला आलेल्या इवल्या जीवनात त्याही परिस्थितीत घरकामात चिमणे जीवन रेखाटण्याचा प्रयत्न करतात. ‘उष्टीभांडी उरकून बसल्या/ विणीत चिमणे जीवन..’ भरतकाम करताना वापरलेल्या पक्षांच्या प्रतिमा तेवढ्याच तिच्या स्वप्नांची फक्त कापडावरच पूर्तता करतात. त्या गल्ल्यांमधून फिरणारा कुल्फी-मलईवाल्याच्या जास्वंदी, नारिंगी बाटल्या या जणू स्त्रीचेच प्रतीक आहे.
वेश्येची व्यथा
तारुण्यात कधीकाळी रंगीबेरंगी सुंदर बाटल्यांप्रमाणे असणाऱ्या या स्त्रीया कामासक्त पतींकडून हाताळल्या जाऊन आता काळ्या, चिमट झाल्या तरी अखेरपर्यंत या वासनाचक्रातून त्यांची सुटका कधीच होत नाही, हे मर्ढेकर उपहात्मक शैलीत सर्वात मोठे विदारक सत्य मांडतात. सामान्य स्त्रीयांची ही परिस्थिती तर, जिच्यावर वेश्या होणे लादले गेले तिची काय अवस्था असणार? मर्ढेकरांपूर्वीपर्यंत कुठल्याच कवीने इतकी निर्भीडपणे वेश्येची व्यथा मांडली नव्हती. १९५९ चा काळ लक्षात घेतला तर वेश्येवरची कविता हेच मुळात पचण्यासारखे, रुचण्यासारखे नसताना मर्ढेकरांनी तर थेट वेश्येच्या अवस्थेचे वर्णन केले आहे. पोटच्या गोळ्याच्या क्षुधाशांतीसाठी आपल्या नग्न देहाचे प्रदर्शन करणारी, भीक मागत फिरणारी आई मर्ढेकरांना दिसली तर दुसरीकडे मुलाला पाठीशी बांधून काम करणारी, जगण्याची धडपड करणारी वडारीण सडक्या मनाच्या भोंदूच्या वासनेची शिकार होणार असते.
अध:स्तरातील स्त्रीघटक
कांदेवाडी, ठाकूरद्वारा यांच्या नाक्यावरील तंग हवेलीत राहणारी वेश्या रोज आपल्या गिऱ्हाईकासाठी ‘उत्साहाची ठिगळ चोळी’ घालून बसते. शिळ्या स्तनाग्रांना झाकण्यासाठी. तिच्या तारुण्याची रात्र संपून म्हातारपणाचा दिवस उगवतो तरी तिच्या भांग फाटून फाटून टक्कल होऊ घातलेल्या दिनक्रमात काहीच बदल होत नाही. मर्ढेकरांची ‘अशीच होती नकटी एक’ ही कविता तर वयोवृद्ध झालेल्या वेश्येच्या हलाखीचे वर्णन करते. दोन वेळच्या घासासाठी ढेप झालेल्या उरोजांचे प्रदर्शन करून ग्राहक मिळविण्याचा क्षीण प्रयत्न ती रोज करीत असते. या अवस्थेला पाहून मर्ढेकरांमधील कवी उद्विग्न होऊन-

काय हलाखी स्त्रीत्वाची ही,
माणुसकीचे काय विडंबन!
भोगशून्य करी भोगव्यथेचे
लिंग-गंड प्रच्छन्न प्रदर्शन!
अशी खंत व्यक्त करतात. त्या काळात समाजातील सर्वात अध:स्तरातील स्त्रीघटक कवीच्या काव्यनिर्मितीचा विषय होणे, ही सामान्य बाब निश्चितच नव्हती. अर्थात अशा काव्यनिर्मितीसाठी कलावंतांच्या अस्सल अभिव्यक्ती स्वातंत्र्याची प्रचंड मोठी किंमत त्यांनी मोजली. तत्कालीन समाजरक्षकांकडून अशा वेश्येवरील कविता आणि तिचे वास्तव जीवन मांडणाऱ्या मर्ढेकरांवर अश्लीलतेचा खटला भरला गेला. समस्त समाजाला आधारभूत ठरणाऱ्या स्त्री या घटकाबद्दल एक कवी म्हणून मर्ढेकरांच्या मनातील सहानुभूतीच्या, तिच्या वेदनेशी सहकंप पावणाऱ्या कक्षा किती व्यापक होत्या याची साक्ष वारंवार पटते.
व्याकूळ सौंदर्यरुप
मर्ढेकरांच्या कवितेतून व्यक्त होणारी प्रेयसीरुपी स्त्री ही तितकी वारंवार ठळकपणे चित्रित झाली नाही. ‘काही कविता’ आणि ‘आणखी काही कविता’ या संग्रहामध्ये तर अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच कविता त्यांनी लिहिल्या. कुणालाही हवेहवेसे वाटणारे असे प्रेयसीचे आदर्श रुप मर्ढेकरांनी ‘दवांत आलीस भल्या पहाटे’ या कवितेतून साकारले आहे. या कवितेची मोहिनी इतकी जबरदस्त आहे की, आजच्या प्रियकरातदेखील अशा प्रेयसी रुपाची अभिलाषा असणार. पूर्वायुष्यात येऊन गेलेल्या प्रेयसीच्या स्मृतिजन्य आठवणींना उच्चतम असे कलात्मक व्याकूळ सौंदर्यरुप बहाल केले आहे. ‘भटकत फिरलो भणंग आणिक’, ‘रहा तिथे तू’ या कवितांमधून प्रेयसीचे रुप परस्थ आहे. आयुष्यात प्रेयसीचे असणे म्हणजे ‘सांडावी जशी थेंबाची सर। चांदण्यात कुणी झाडावरली’ इतके अलवार आहे. तर दुसऱ्या कवितेत स्मृतीत जपून ठेवलेल्या प्रेयसीला अापल्या हृदय तडकलेल्या ठिकाणीच रहा, असे म्हणतात.
मर्ढेकरांच्या एकूणच विविध स्तरातील ‘ती’ ची कवितांमधून प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे मर्ढेकरांनी या कविता लिंगभेदाच्या पलिकडे जाऊन लिहिल्या. या कवितांमधून त्यांना gender identity पेक्षा human indenty महत्त्वाची वाटली. ती स्त्री असण्याआधी एक जिवंत व्यक्ती आहे. जिला समाज स्त्री म्हणतो, अशा व्यक्तीचे मन केवळ स्त्रीवाद सिद्ध करण्याच्या हेतूने व्यक्त केले नाही. वास्ततवादी शब्दांचा मितव्यय असणाऱ्या प्रतिमांनी हे चित्रण केले आहे, जे स्त्रीशोषणाच्या मूलस्रोतापर्यंत वाचकाला घेऊन जाते आणि हृदयाला हात घालून अंतर्मुख करतो.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
डॉ.अमृता इंदूरकर,नागपूर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

Saturday, March 9, 2019

वाक्याची व्यापकता

वाक्याची व्यापकता
→ डाॅ. अमृता इंदूरकर
जरा कल्पना करा की, अापण जी भाषा बोलतो त्यामध्ये वाक्यरचनाच नसती अाणि केवळ शब्दच शब्द असते तर? कठीण अाहे ना! वाक्यरहित भाषेची कल्पना करणे? व्यावहारिक पातळीवर हे शक्यही नाही. कारण भाषिक व्यवहार अाणि संदेशनाच्या दृष्टीने वाक्य फार महत्त्वाची अाहेत. मग वाक्य तयार कसे होतात? विशिष्ट स्वनिमांच्या (भाषेत उपयोजिले जाणारे ध्वनी) मदतीने एकत्रीकरणाने पदीम (शब्द) तयार होतात. या शब्दांकडे वाक्याचा एक घटक म्हणून पाहिले जाते. पण, केवळ अनेक पदिम किंवा शब्द एकत्र येण्याने वाक्य तयार होत नाही.
वाक्यातील हे पदिम कोणत्या तरी नियमांनी एकत्र येतात. त्यांचे एक रचनासूत्र असते. त्यांची काही तत्त्वे असतात जी पदिमसमूहातून म्हणजेच वाक्यामधून स्पष्ट होत असतात. भाषेच्या उच्चारणात वाक्य ही सर्वात मोठी रचना मानली जाते. ती अर्थपूर्ण असते. ती लहानही असू शकते. वाक्यांश उपवाक्य, वाक्य, निरनिराळे, व्याकरणिक प्रवर्ग, विविध वाक्यरचना यांचा समावेश वाक्यविचारात होतो.
वाक्याची व्याख्या?
वाक्याची व्याख्या शक्य अाहे का? ढोबळमानाने एक पूर्ण विचार व्यक्त करणारा शब्द किंवा शब्दसमूह म्हणजे वाक्य, अशी एक व्याख्या करता येईल. वाक्य म्हणजे लहानातलहान संपूर्ण सार्थ अशी एक संकल्पना म्हणता येईल. हजारो वर्षांपूर्वी भर्तृहरिने देखील या विचाराचे समर्थन केले अाहे.
पदे न वर्णा विद्यन्ते वर्णेष्नवयूवा न च।
वाक्यात् पदानामत्यन्तं प्रविवेको न कश्चन।
(वाक्यपदीय, ब्रह्मकांड)
अर्थात : ज्याप्रमाणे वर्णामध्ये अवयव नसतात त्याचप्रमाणे पदांमध्ये वर्ण किंवा वाक्यामध्ये पद नसतात.
म्हणजेच भाषेमध्ये संपूर्ण वाक्याची सत्ता वास्तविक अाहे. इतर घटक नाही, हे भर्तृहरिना म्हणायचे अाहे. अाधुनिक भाषाशास्त्रज्ञांनी वाक्याच्या बाह्य स्वरूपावरून, रूपावरून काही व्याख्या केल्या अाहेत.
अाॅटो थेस्पर्सन म्हणतात, ‘वाक्य हे संपूर्ण स्वतंत्र मानवी उच्चारण अाहे. ते स्वतंत्रपणे राहू शकते किंवा तसे राहण्याचे त्याच्याजवळ सामर्थ्य अाहे’. तर ..
ब्लूमफिल्ड म्हणतो, ‘उच्चारणातील दुसऱ्या कोणत्याही मोठ्या रचनेचा भाग नसलेली रचना (किंवा रूप) म्हणजे वाक्य’. तर हाॅकेट म्हणतो, ‘रचनेमध्ये दुसऱ्या कोणत्याही मोठ्या व्याकरणिक रुपाचा भाग नसलेले व्याकरणिक रुप’.
वरील पाश्चात्य भाषावैज्ञानिकांनी वाक्याची व्याख्या देण्याचा प्रयत्न केला असला तरी त्या व्याख्या अंतिम नाहीत. कारण वाक्यविचाराचा पसारा अफाट अाहे.
वाक्य विचारात शब्दानुसारी वाक्याचा विचार करावा लागतो. शिवाय अर्थदृष्ट्याही विचार करावा लागतो. उदा. ‘मेजावर लेखणी अाहे’, हे मराठीतील वाक्य इंग्रजीमध्ये The pen is on the table, असे होते. या वाक्यामध्ये पाहिले तर लक्षात येईल की जे मराठीमध्ये पदिम अाहे- ‘मेजावर’ तो इंग्रजीत एक उपवाक्य अाहे. - On the table. या वरून वाक्याचे व रचनेचे केले जाणारे विभाजन हे अभ्यासाच्या सोयीसाठी असते. त्यामुळे भाषविज्ञानात वाक्याची व्याख्या करण्यापेक्षा वाक्याचे विश्लेषण करणे अधिक महत्त्वाचे मानले गेले अाहे. म्हणजेच अदोष वाक्यलक्षणाच्या मागे न लागता काय गोष्टी असल्यास एखादा उच्चारणखंड वाक्य मानता येईल, याचा विचार करणे वाक्यविचारासाठी अधिक उपयुक्त ठरेल.
हा वाक्यविचार तीन गोष्टींच्या मदतीने होऊ शकतो. १) सार्थता २) सामर्थ्य ३) अाकांक्षा.
१) सार्थता : वाक्यामधील शब्द सार्थ हवेत हे प्रमुख.
२) सामर्थ्य : वाक्यामधील निरनिराळ्या शब्दांच्या अर्थामध्ये विरोध असंगती असता कामा नये. उदा. तो चाकूने जेवतो, झाडाला घोड्यांनी पाणी घालतो... अशा पद्धतीची उच्चारणे वाक्य ठरत नाहीत. या वाक्यामध्ये व्याकरणिक योग्यता असली तरी अर्थदृष्ट्या ती सदोष अाहेत. म्हणजे व्याकरणिक अाणि अर्थसंबंधी अशा दोन्ही योग्यता वाक्यात असायला हवी.
३) अाकांक्षा : वाक्यामधील शब्दांना एकमेकांबाबत काहीतरी अाकाक्षा असायला हवी. उदा. देवदत्त गावाला जातो. हे तीन शब्द एकमेकांप्रती अाकांक्षा बाळगणारे अाहेत. देवदत्त उच्चारल्यावर कोण जातो? याचे उत्तर मिळते. गावाला म्हटल्यावर कुठे अाणि जातो म्हटल्यावर परत कोण जातो? यांचेही उत्तर मिळते. अशा वाक्य अंतर्गत अाकांक्षेमधूनच संपूर्ण अर्थप्राप्ती होते.शब्दक्रमही महत्त्वाचा
परंतु, वाक्यविचाराला केवळ या गोष्टींनी परिपूर्णता येत नाही. वाक्यामध्ये शब्दक्रम देखील तितकाच महत्त्वाचा अाहे. कोणत्या शब्दानंतर कोणता शब्द यायला हवा, याचे वाक्यामध्ये फार महत्त्व अाहे. शब्दक्रमाची एक निश्चित पद्धती अाहे. कोणत्याही शब्दाला कोणत्याही क्रमावर ठेवता येत नाही. शिवाय सगळ्या भाषांमधील वाक्यांचा शब्दक्रम हा समान नसतो.
मराठीत कर्ता- कर्म- क्रियापद या क्रमानुसार वाक्य तयार होते. उदा. तो पुस्तक वाचत अाहे. या शब्दक्रमानुसार इंग्रजी वाक्य लिहायचे झाले तर He the book reads अशा क्रमाने वाक्य तयार होईल. जे चूक अाहे. कारण इंग्रजीमध्ये कर्ता-क्रिया-कर्म अशा पध्दतीनं शब्दक्रम असतो. म्हणजेच व्याकरणिक शब्दक्रमाची अट पूर्ण करणारा क्रम असायला हवा. याशिवाय अर्थानुसार शब्दक्रमही तेवढाच महत्त्वाचा अाहे. जसे शिकारीने वाघाला मारले यामध्ये शिकारी अाणि वाघ यांचा शब्दक्रम बदलता येणार नाही. नाहीतर वाक्याचा अर्थच बदलून जाईल.
संदेशनाचे माध्यम
सुरुवातीला अापण वाक्य म्हणजे शब्दांचा समूह अशी व्याख्या बघितली होती. पण कोणतीच भाषा इतकी एकसुरी नसते. भाषा ही संदेशनाचे माध्यम असल्यामुळे प्रत्येकवेळी शब्दांचा समूह म्हणजेच वाक्य असे निश्चितच नसते. तर कधी-कधी एक साधा शब्द देखील संपूर्ण वाक्याची पूर्तता करतो. यासाठी काही संवाद पाहू.
संवाद १ : मंजु- तु घरी कधी येशील?
सोनाली - उद्या. अाणि तू?
मंजु - परवा
सोनाली - अाणि मोना गेली का?
मंजु - हो
संवाद - २ : अोम - तुझे जेवण झाले का?
सोम- हो झाले तुझे?
अोम - ऊहूं
वरील दोन्ही संवाद वाचल्यावर सहज लक्षात येते की परवा हो, तुझे, ऊहूं हे शब्द म्हणजेच संपूर्ण वाक्य अाहेत. फक्त उच्चारते वेळी त्या शब्दाच्या अवती-भवती येणाऱ्या वाक्यपूर्तता करणाऱ्या शब्दांचा लोप झाला. त्यामुळे वाक्य-विचारामध्ये वाक्याची सार्थता जेवढी महत्त्वाची, तेवढीच अाकलनाप्रती नि: संदिग्धता देखील महत्त्वाची ठरते.
भाषेमध्ये जेव्हा काही अपवादात्मक वाक्ये समोर येतात तेव्हा Syntax ambiguity म्हणजे वाक्य संदिग्धता निर्माण होते. उदा. लठ्ठ सरदार पत्नी, या वाक्यामध्ये लठ्ठ सरदाराची लठ्ठ पत्नी की सरदाराची लठ्ठ पत्नी याचा बोध होत नाही. कच्चे पेरू अाणि अांबे करंडीत ठेवले यामध्ये कच्चे पेरू अाहेत की कच्चे अांबे अाहेत की दोन्ही कच्चे अाहेत, हे कळत नाही.
इंग्रजीतही संदिग्धता
इंग्रजीमध्येही अशी संदिग्धता अाढळते. Old Womens Hostel या वाक्यात वृद्ध बाईचे होस्टेल की बाईचे जुने होस्टेल की बाई अाणि हाेस्टेल दोन्ही जुने, हा बोध होत नाही. प्रत्येक भाषेमध्ये अशी वाक्यसंदिग्धता असते, जी दैनंदिन संदेशनाच्या गरजेतून निर्माण होते. पण, वाक्यातील उतार-चढाव, शब्दाघात, सुरावली यामुळे विशिष्ट वाक्यांचे संदर्भ बोलण्याऱ्यालाही अवगत असतात अाणि एेकणाऱ्यालाही अात्मसात होतात. वाक्यविचारामध्ये महत्त्वाचे ठरणारे हे सर्व घटक लक्षात घेता भाषाविज्ञानात वाक्यविचाराची अधिक संगती लावण्यासाठी वाक्याचा पृष्ठस्तरीय व अंत:स्तरीय पातळीवर अभ्यास केला गेला अाणि काही प्रमाणात वाक्यविचाराच्या अभ्यासाला निश्चित दिशा प्राप्त झाली.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

Sunday, February 24, 2019

अलक्षित समाजवास्तवाचा वेध घेणारा नाटककार

अलक्षित समाजवास्तवाचा वेध घेणारा नाटककार

— डाॅ. अमृता इंदूरकर

सर्वप्रथम १९८० च्या सुमारास दलित नाटकाचा प्रारंभ झाला असला तरी नाटक या स्वतंत्र वाङ्मय प्रवाहाचा विचार करता त्याचा आरंभ १९५६ साली म. भी. चिटणीस यांच्या ‘युगयात्रा’ या नाटकाने झाला. परंपरेने दलितांवर हाेणाऱ्या अत्याचाराचे चित्रण प्रस्तुत नाटकातून येत असले तरी या नाटकाने पुढील दलित नाट्यलेखकांना लेखनाची प्रेरणा दिली. त्यातूनच त्या काळात वि. तु. जाधव, नामदेव व्हटकर, मा. का. कारंडे याशिवाय अधिक पुढे टेक्सास गायकवाड, कमलाकर डहाट, अरुणकुमार इंगळे, रामनाथ चव्हाण, प्रकाश त्रिभुवन, संपत जाधव, गोपाळ सोनारीकर, रुस्तुम अचलखांब, हेमंत खोब्रागडे, दत्ता भगत आणि शिल्पा मुंब्रसकर या नाटककार मंडळींनी आपल्या नाट्यलेखनातून दलितांच्या व्यथा, वेदनेला शब्दरूप दिले. 

साहित्यात जेव्हाही एखादा नवा प्रवाह निर्माण होतो, त्यावेळी त्यामध्ये लेखन करणाऱ्यांमुळे तो एका उंचीवर गेलेला असतो. पण कालौघात त्या प्रवाहामध्ये देखील नव्या जाणीवांच्या अभावामुळे एक प्रकारचे आवर्त तयार होते व कलाकृतींचा प्रभाव कमी व्हायला लागतो. अशावेळी या प्रवाहाला नव्याने केवळ उंचीच नाही तर खोली, व्यापकता व घनता याचे वेगळे परिमाण देणारा, या जाणिवांमधल्या नव्या कक्षांचा वेध घेणारा ताकदीचा लेखक हवा असतो. दलित नाट्यप्रवाहाबाबत मधल्या काळात काहीसे असेच झाले होते. पण, ही मरगळ दूर करणारा, वेगळ्या वाटा चोखाळणारा नाटककार दलित रंगभूमीला १९८० साली प्रेमानंद गज्वी यांच्या रुपाने मिळाला. 

१५ जून १९४७ रोजी जन्मलेले प्रेमानंद गज्वी यांची चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळगाव ही जन्मभूमी. बालपण नागपूर जिल्ह्यातील कारगाव येथे गेले. जन्माने वैदर्भीय असणाऱ्या गज्वी यांची कर्मभूमी मात्र मुंबई आहे. २२, २३ तसेच आज २४ व उद्या २५ फेब्रुवारीला नागपुरात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे प्रेमानंद गज्वी हे नियोजित अध्यक्ष आहेत, ही गौरवाची बाब आहे. गज्वी यांच्या निमित्ताने समाजातील विविध रूढी, परंपरा, अन्यायांना आपल्या नाट्यकृतीतून वाचा फोडणारा, वेगळ्या विषयांना नाट्यरूप देणारा एक अग्र नाटककार संमेलनाध्यक्ष म्हणून प्राप्त झाला आहे. 

एक नाटककार म्हणून आपली लेखनप्रेरणा, त्याचे बीज कशामध्ये आहे हे स्पष्ट करताना ते म्हणतात, ‘हे जग सुंदर कसे होईल या ध्यासातून मानवीमन, समाजभान, राष्ट्रमत, जनमत समजून घेण्याच्या चिंतनशिलतेतून वाङ्मयीन लेखन व समाज संरचनात्मक कार्य घडले आहे.’ नाटककार म्हणून गज्वी यांचा मूळ पिंड गंभीर लेखकाचा आहे. नातेसंबंधातील गुंतागुंत, कौटुंबिक तिढे तर कधी अतिजिव्हाळ्याचे संबंध यांचे चित्रण करण्यापेक्षा समाजामध्ये आजही कितीतरी अलक्षित असे वास्तव अव्यक्तच आहे. हे सामाजिक, राजकीय अलक्षित वास्तव गज्वींना नेमके टिपण्यात अधिक रस आहे. जेणेकरून त्यांचा प्रेक्षक सततच विचारप्रवृत्त झाला पाहिजे. नाटक बघणाऱ्या, वाचणाऱ्या प्रत्येकाला हे वाटले पाहिजे की, आपण ज्या समाजात सुखेनैव जगत आहोत, त्याच समाजात जगणाऱ्या काहींचे आयुष्य इतके विद्रूप भीषण आहे की, आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. या आंतरिक निकडीतूनच ‘एक गाव, एक पाणवठा’ सारखी एकांकिका सर्वप्रथम जन्माला आली. ‘देवनवरी’ हे त्यांचे पहिले नाटक जे खरेतर जयवंत देसाई यांच्या आग्रहाखातर एकांकिकेचे नाटक झाले. देवदासी म्हणजे देवाला सोडलेली, देवाशी लग्न झालेली अशी स्त्री. जिला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नाही. म्हणायला देवाला सोडलेली, पण दुसऱ्या बाजूने समाज उपभोग्य स्त्री. अशा या देवदासीवरील कलाकाराची बातमी वर्तमानपत्रात वाचून गज्वी यांच्यासारख्या समाजसंवेदनशील नाटककाराला ‘देवनवरी’ चे नाट्यकथाबीज सापडते. देवनवरीबद्दल नाटककार विजय तेंडुलकर म्हणतात, ‘आपल्यापाशी असलेल्या माध्यमातून गज्वींनी एक सामाजिक, अन्याय बोलका केला आहे. कोणत्याही अन्यायात त्यांना तीव्र नाट्य दिसते. अन्याय सहन केलेल्यांमध्ये सहजपणे ते नाट्य धरतात. आपल्याला जाणवलेल्या आशयाशी प्रामाणिक राहू इच्छितात.’ 
यानंतर गज्वी यांनी ग्रामीण जीवनातील जातीय गुंता उलगडणारे ‘वांझ माती’ हे नाटक वेठबिगारांचा मुक्तीसंघर्ष मांडणारे ‘तनमाजोरी’ हे नाटक, समर्थ रामदासांना एका वेगळ्या आयामातून मांडणारे ‘जय जय रघुवीर समर्थ’ ही नाटके लिहिली. स्वातंत्र्योत्तर काळापासूनच समस्याकेंद्री विद्रोही नाटकेच लिहिली जात होती. पुढे त्यामध्ये तोचतोचपणा यायला लागला होता. नेमक्या याचवेळी गज्वी यांनी या तोचतोचपणावर मात करीत दलित रंगभूमीच्या सर्वच सीमारेषा ओलांडल्या. त्या ओलांडणारे निमित्त ठरलेले नाटक म्हणजे ‘किरवंत’. जे गज्वी यांच्या नाट्यवाङ्मयाच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरते व गज्वी ‘किरवंतकार’ म्हणून ओळखले जाऊ लागले. आतापर्यंत स्वजातीतील दु:खवेदनेचा वेध घेणारे गज्वी ‘किरवंत’ मधून मात्र जातीमर्यादा ओलांडून केवळ वेदनेशी, समस्येशी नाते जोडताना दिसतात. केवळ दलितच नाही तर समाजात जो जो उपेक्षित, शोषित, बहिष्कृत, तिरस्कृत आहे, त्या सर्वांना कवेत घेणारी ही गज्वींची रुढ अर्थाच्या दलित चौकटीच्याही पलीकडे जाऊन बघणारी जीवनदृष्टी दिसते. 

किरवंत म्हणजे मरणोत्तर क्रिया करणारा ब्राह्मण. कोंकणात हा ब्राह्मण किरवंत म्हणविला जातो. धर्मशास्त्रानुसार मरणकार्य हे पुण्याचे काम असले तरी प्रत्यक्षात मात्र, ब्राह्मण समाजाकडूनच दलितांसारखे बहिष्कृत जगणे यांच्या वाट्याला येते. कुठल्याही मंगलकार्यात या किरवंतांना निमंत्रण नसते. आज ब्राह्मण समाजाला देखील माहीत नसेल की, ब्राह्मणांमध्येही किरवंत प्रकार असतो आणि त्याच्या वाट्याला ते ब्राह्मणत्वही इतर ब्राह्मणांमुळे प्राप्त होत नाही. ‘किरवंत’ मधून गज्वी यांनी समान-जाती यांच्यातील श्रेष्ठ-कनिष्ठ प्रवृत्तीमुळे एखाद्या समाजगटाला दलितत्व लाभते आणि दुसरा श्रेष्ठ ठरतो. प्रत्यक्ष धर्म-मते आणि व्यवहार यात सोयीने सुसंगती-विसंगती येत असते हे मांडण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकाला लाभलेले सामाजिक परिणाम व त्यातून व्यक्त झालेली दलित जाणीव लक्षणीय ठरते. प्रत्यक्ष दलित जीवनाशय नसूनही हे नाटक दलित नाटक ठरते. 

या व्यतिरिक्त राजकीय पार्श्वभूमीवर गज्वी यांनी एक वैचारिक द्वंद्व निर्माण करणारे नाटक लिहिले, ते म्हणजे ‘गांधी-आंबेडकर’. दोन महापुरुषांच्या वैचारिक भिन्नतेच्या कारणांचा शोध घेणारे हे नाटक आहे. अस्पृश्यता कायमची नष्ट झाली पाहिजे, हा हेतू या दोघांचाही असून या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी तेव्हाही दोघे एकत्र का नाही येऊ शकले, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या गरजेतून हे नाटक आकाराला आले. एकाच नाटकात दोन नायक घेऊन संपूर्ण नाटकच त्यांच्याभोवती फिरते ठेवणे, ही अजब किमया गज्वींना यात साधली आहे. इतक्या गंभीर विषयामध्ये या दोन नायकांना जोडणारा दुवा म्हणजे चक्क विदुषक हे पात्र म्हणजे तर गज्वींमधल्या अनवट प्रयोगशील नाटककाराला व्यक्त करते. शिवाय एक लेखक म्हणून, व्यक्ती म्हणून गज्वी यांच्या विचारतराजूंना आंबेडकरांकडे झुकला ना महात्मा गांधीकडे हे अतिशय महत्त्वाचे. 

यानंतर गज्वी यांनी विविध विषयांना स्पर्श करणारी बरीच नाटके लिहिली. ‘पांढरा बुधवार, रंगयात्री, नूर मोहम्मद साठे, शुद्ध बीजापोटी, व्याकरण, अभिजात जंतू, द बुद्धा, छावणी, घोटभर पाणी, बेरीजवजाबाकी, कृष्णविवर, उतारा’ या एकांकिकांचे लेखनही केले. या सर्वच कलाकृतींमधून केवळ दलित नाटककार असे मर्यादित न राहता समाज- माणूस, माणूस- माणूस, समाज- समाज यांचा संघर्ष व यातील आंतरसंबंधाचा वेध घेतला. हे करताना त्यांची शैली देखील प्रयोगशील राहिली. या शैलीचा अविष्कार प्रचारकी नव्हता, आवेशपूर्ण नव्हता, पण प्रेक्षकांपर्यंत वास्तवाची दाहकता पोहोचवणारा होता.

प्रेमानंद गज्वी हे नव्वद टक्के नाटककार आहेत तर उरलेल्या दहा टक्क्यांमध्ये त्यांच्यामध्ये एक कवी, कथाकार, कादंबरीकार, वैचारिक लेखन, पटकथाकार इत्यादी वाङ्मयप्रकारांचे पैलू देखील आहेत. कवी मनाचे भावविश्व उलगडणारा ‘एकतारी’ हा कवितासंग्रह ‘लागण’ आणि ​‘ढिवर डोंगा’ या कथा. याशिवाय वैदर्भीय बोली भाषेतील ग्रामीण जीवनाचा वेध घेणारी ‘जागर’ ही कादंबरी, ‘हवे पंख नवे’ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर : चरित्र आणि चारित्र्य दर्शन यावर आधारित कादंबरी. वैचारिक लेखनामध्ये त्यांनी भारताचा पाच हजार वर्षांचा सामाजिक- सांस्कृतिक- राजकीय- धार्मिक चळवळीचा इतिहास ‘बोधी कला- संस्कृती’ मधून मांडला. ज्ञानासाठी कला... हे सूत्र सिद्ध करणारी वाङ्मयीन मांडणी ‘आर्ट फॉर नॉलेज’ मधून केली. १९९० साली दूरदर्शनवरील ‘घर’ या मालिकेचे पटकथा, संवाद, गीत लेखन, अजिंठा- वेरूळचा अभ्यास दौरा आयोजित करून स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकलांचा अभ्यास केला आणि या आगळ्या-वेगळ्या उपक्रमावर ‘अजिंठा नाट्यलेणी’ या ग्रंथाची संकल्पना व संपादन त्यांनी केले. जवळ- जवळ सर्व वाङ्मय प्रकारांमध्ये मुशाफिरी करणारे नाटककार प्रेमानंद गज्वी ९९ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष आहेत. ही सर्व नाट्यरसिकांसाठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. 

(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
डॉ.अमृता इंदूरकर,नागपूर

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

Sunday, February 3, 2019

तुम्ही द्वैभाषिक की बहुभाषिक?

तुम्ही द्वैभाषिक की बहुभाषिक?

तुम्हाला भाषा आवडतात का?भाषा कुणाला नाही आवडत? सर्वांनाच आवडतात. कारण भाषा हा मानवाच्या विचारांचा आरसा आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची मातृभाषा त्याला प्रिय असतेच. पण, मातृभाषेव्यतिरिक्त तुम्हाला इतर भाषा देखील आवडतात का? मातृभाषेव्यतिरिक्त अजून किती व कोणकोणत्या भाषा तुम्हाला अवगत आहेत? नव्या, विविध भाषा परिश्रमपूर्वक आत्मसात करायला व तद्भाषी व्यक्तीशी, समुहाशी संवाद साधायला आवडतं का? असे केल्याने तुमच्या भाषिक व्यक्तिमत्त्वामध्ये फरक जाणवतो का? फार वेगळे वाटतात नाही का हे सर्व प्रश्न! कारण आपल्या अवतीभोवती असे कितीतरी लोक असतात किंवा विशिष्ट समुदाय असतो जो एकापेक्षा अधिक भाषा अवगत असणारा असतो. कदाचित आपणही त्यातलेच असाल. पण, मुळात व्यक्तीने द्वैभाषिक किंवा बहुभाषिक असणे हे आपल्याला वाटते तितके सोपे नाही. समाजशास्त्रीय भाषाअभ्यासाअंतर्गत या दोन्ही संकल्पनांना फार महत्त्व आहे.

संज्ञापन व्यवहार

एखादी व्यक्ती किंवा विशिष्ट प्रांतातील, देशातील समाजगट दोन भाषांमधून भाषाव्यवहार करते, तेव्हा या प्रकारच्या संज्ञापन व्यवहाराला द्वैभाषिकता म्हणतात. उदाहरणार्थ, कॅनडात फ्रेंच व इंग्लिश या दोन भाषांतून संज्ञापन व्यवहार चालतो. म्हणून कॅनडा हे द्वैभाषिक राष्ट्र मानले जाते. एखादी व्यक्ती द्वैभाषिक संज्ञापन करू शकते. तेव्हा तिला दोन भाषा अवगत असतात. मात्र, या दोन भाषांपैकी एका भाषेवर त्या व्यक्तीचे प्रभुत्व असते, तर दुसरी भाषा कामकाजापुरती, प्रसंगानुरूप, औपचारिक संज्ञापनव्यवहारात ती उपयोगात आणत असते.

अभ्यासक्रमात द्वितीय भाषा म्हणून मातृभाषेखेरीज अन्य भाषेचा अभ्यास करून जी भाषा शिकली जाते, ती निजभाषिकाने कमावलेली भाषा असते. त्यामुळे या कमावलेल्या भाषेत आणि निजभावेच्या संपादनात अंतर असते. म्हणूनच कॅनडासारख्या द्वैभाषिक राष्ट्रात द्वैभाषिक शाळा (Bilingual Schools) असून फ्रेंच व इंग्रजी या दोन्ही भाषांत समान प्रभुत्व असावे, यासाठी द्वैभाषिक माध्यमाचा अवलंब केलेला दिसून येतो.

कारणीभूत गोष्टी

द्वैभाषिकतेच्या संदर्भात अजून एका प्रकाराचा समाज भाषाविज्ञानाने विचार केलेला आहे, हे समजून घेण्यास उपयोगी पडतो. तो म्हणजे ‘एककालिन द्वैभाषिकत्व’ (Simultaneous Bilingualism). लहान मूल जेव्हा एकाच वेळी दोन भाषा शिकते त्यावेळी ते एककालिन द्वैभाषिक बनत असते. लहान मूल एककालिन द्वैभाषिक बनण्यामागे पुढील गोष्टींचा प्रभाव कारणीभूत असतो.

१) अशा मुलांच्या पालकांची दोन भाषांमध्ये बोलण्याची क्षमता असणे.
२) पालक किती व कशा प्रमाणात मुलांशी बोलताना या दोन भाषांचा वापर करतात.
३) घरातील लहान मूल (Sibling) कुटुंबातील इतर सदस्यांसोबत कोणती भाषा बोलते.
४) मूल बाहेर त्यांच्या लोकसमुदायामध्ये कोणत्या भाषेचा वापर करतात.
५) कोणत्या भाषेतून मूल शिक्षित होत असतं किंवा शिक्षण घेत असतं.

अशा पद्धतीचे एककालिन द्वैभाषिकत्व दाक्षिणात्य लोकांमध्ये बघायला मिळते. दाक्षिणात्य कुटुंबात वाढणारे मूल एकाचवेळी तामिळ व इंग्रजी अशा दोन्ही भाषा शिकत असते. पाश्चात्य देशात ट्युनिशिया आणि मोरोक्को येथे बराच उच्चभ्रू समाज असा आहे जो फ्रेंच आणि अरेबिक या दोन भाषांच्या बाबतीत एककालिन द्वैभाषिकत्व जपताना दिसतो. समाजात अशा कितीतरी कुटुंबांमधील मुलं पालकांकडून घरी एक भाषा शिकतात, शाळेमधून दुसरी आणि विविध भाषक मित्रपरिवाराकडून तिसरी. इथूनच पुढे एकभाषिकत्व, द्वैभाषिकत्व अथवा एककालिन द्वैभाषिकत्व आणि बहुभाषिकत्व अशा पद्धतीने भाषाअर्जनाला प्रारंभ होतो. Monolingual - Bilingual- Multilingual, असा हा क्रम असतो.

स्थायी द्वैभाषिक समाजगट

समाजातील द्वैभाषिकतेचा अनेक अंगांनी अभ्यास केला जातो. या द्वैभाषिक उपयोजनामागे सामाजिक स्तरभेदांचा जो परस्परसंबंध असतो ते देखील एक प्रमुख कारण आहे. सामान्यत: निम्नस्तरीय लोक एकभाषिक असतात, परंतु उच्चवर्गीय, अभिजन हे द्वैभाषिक असतात. सामान्य माणूस दुसरी भाषा प्रसंगपरत्वे समजू शकतो. परंतु, लिहू व बोलू शकत नाही. हिंदी जाणणारा एखाद्या वेळेस पंजाबी समजू शकेल, पण लिखित स्वरूपातील गुरुमुखी पंजाबी वाचू व लिहू शकणार नाही. पण, समाजात काही द्वैभाषिक संज्ञापन व्यवहार करणारा समुदायही आहे. अशांना स्थायी द्वैभाषिक (Stable Bilingual) समाजगट म्हणतात.

मग बहुभाषिकता म्हणजे काय ते पण जाणून घेऊ या. सर्व भाषिक जातींना लागू होणारी बहुभाषिक व्यक्तीची संज्ञा समजून घ्यायची असेल तर ती अशी -

बहुभाषिकता म्हणजे?

बहुभाषिक व्यक्तीला पॉलिग्लॉट (Pollyglot) म्हणतात. पॉली म्हणजे बहु आणि ग्लॉट म्हणजे भाषा/ भाषी म्हणजेच बहुभाषी, अशी ही संज्ञा आहे. एखाद्या व्यक्तीच्या किंवा समाजाच्या, देशाच्या संज्ञापन व्यवहारात तीन किंवा त्याहून अधिक भाषांचा उपयोग केला जातो. तेव्हा अशा संज्ञापन व्यवहाराला बहुभाषिकता म्हणतात. जागतिक लोकसंख्येच्या प्रमाणात एकभाषकापेक्षा बहुभाषकांची संख्या जगात अधिक आहे. एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक भाषांमध्ये मौखिकरीत्या, लिखित स्वरुपात किंबहुना गायनामधूनही सक्रीय असते तर काही भाषांमध्ये त्याच व्यक्तीची श्राव्यक्षमता, वाचनक्षमता ही थोडी अक्रियाशील असते. पण, रितसर ती भाषा ग्रहण न करताही समजू शकते, अशा दोन तीन किंवा त्याहीपेक्षा अ​धिक भाषा अवगत असणाऱ्या व्यक्तीला बहुभाषिक आणि त्रैभाषिक, असे देखील म्हणतात.

नेटीव्ह स्पिकर

भारत, मलेशिया, आफ्रिका, इस्रायल, सिंगापूर ही राष्ट्रे बहुभाषिक राष्ट्रे म्हणून ओळखली जातात. एखादा देश बहुभाषिक म्हणून ओळखला जातो, याचा अर्थ त्या देशातील सर्वच माणसांना तीन किंवा अधिक भाषांचे ज्ञान असतेच, असे नाही. कारण सर्वप्रथम बहुभाषिक व्यक्ती बालपणापासून त्याची प्रथम भाषा/ मातृभाषा आत्मसात केलेला असतो. अर्थात ही मातृभाषा ती व्यक्ती कोणतेही औपचारिक भाषिक शिक्षण न घेता आत्मसात करते. त्यानंतर औपचारिक शिक्षण घेताना ती व्यक्ती आपोआपच एककालिन द्वैभाषिकत्व आत्मसात करते. पण, एक जन्मजात भाषा येणारा म्हणून ज्याला आपण ‘नेटीव्ह स्पिकर’ म्हणतो. पुढे तो कितीही नव्या भाषा शिकत गेला तरी प्रत्येकवेळी इतर भाषा शिकताना त्याची मातृभाषा/ प्रथम भाषा या भाषाअर्जन प्रक्रियेवर अधिक प्रभाव टाकणारी ठरत असते.

इंग्रजीला जागतिक भाषा म्हणतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती जी इंग्रजीभाषक नाही, ती प्रथम शिकलेल्या मातृभाषेची संगती लावतच इंग्रजी भाषा शिकत असते आणि याच पद्धतीने हळूहळू पुढे गरज भासेल तसे बहुभाषिकत्व प्राप्त करीत असते. अर्थात एखादी भाषा आत्मसात करणे आणि संपूर्ण शिक्षणच एखाद्या भाषेच्या माध्यमातून आत्मसात करणे या दोन प्रक्रियांमध्ये फरक आहे.

सामान्यत: एखादी व्यक्ती बहुभाषिक बनते ती पुढीलप्रमाणे -

१) एक भाषा उत्तम प्रकारे समजते, बोलता येते.
२) एकाच भाषेत उत्तम प्रकारे लिहिता येते.
३) त्या त्या लघुक्षेत्रानुसार विशिष्ट भाषेचा उपयोग करण्याचे संकेत ठरलेले असतात.
उदाहरणार्थ, मुंबईतील गुजराती व्यापारी घरी गुजराती बोलेल. व्यवसायक्षेत्रात, बाजारात मराठी अथवा हिंदी बोलेल. गिऱ्हाईक कोणता भाषक आहे ते समजून आणि परकीय प्रांतात अथवा देशात व्यवसायासंबंधी गेला असता इंग्रजी बोलेल.
आपल्या भाषिक समाजात ज्ञान, विज्ञानाची भाषा, धर्माची भाषा आणि व्यक्तिगत संभाषणाची भाषा असे भाषिक गट पडल्यामुळे हे गट व्यक्तीला बहुभाषिक बनण्यासाठी कायमच मदतनीस म्हणून सिद्ध होतात. भारतात असे भाषिक वैविध्य असल्याकारणाने भारतात त्रिभाषासूत्राचा वापर होतो.
नव्या सर्वेक्षणानुसार मानसोपचारतज्ञ देखील म्हणतात की, व्यक्ती जितकी बहुभाषिक असेल तितका त्या व्यक्तीचा मेंदू सक्रीय असतो. तेव्हा सर्वच भाषांवर प्रेम करा आणि नवनव्या भाषा आत्मसात करीत राहा. स्वत:ला एकभाषिकत्वाकडून बहुभाषिकत्वाकडे घेऊन जा!

धन्यवाद!

डॉ.अमृता इंदूरकर

(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)