Monday, December 9, 2019

आंबेडकरवादाचे समर्थ भाष्यकार:यशवंत मनोहर

🔶आंबेडकरवादाचे समर्थ भाष्यकार:यशवंत मनोहर🔶

➡️ डाॅ.अमृता इंदूरकर

विसाव्या शतकातील वादळी व्यक्तिमत्त्व म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर. आत्मग्लानीत असलेल्या भारतीय जनमानसाला एक नवी विज्ञानसापेक्ष जीवनदृष्टी देण्याचे महत्कार्य बाबासाहेबांनी केले. ६ डिसेंबर ही डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी, महापरिनिर्वाण दिन म्हणून सर्वत्र आदरांजली अर्पण केली जाते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे चतुरस्र व्यक्तिमत्त्व आजही आपणा सर्व भारतीयांना सदैव स्फूर्ती देणारे व दिशादर्शक, प्रेरणादायी आहे. या जीवनसागरात वैचारिकदृष्ट्या भरकटलेल्यांसाठी बाबासाहेब जणूकाही दीपस्तंभ आहेत. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने ‘ज्ञानाचे प्रतीक’ असे संबोधून या भारतमातेच्या सुपुत्राचा गौरव केला आहे. विद्वत्तेचे प्रकांड पंडित, अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, कायदेपंडित, पत्रकार, संसदपटू, समाजसुधारक, राजकीय मुत्सद्दी आणि बौद्ध धम्मचक्र अनुप्रवर्तक असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट वक्ते आणि बुद्धिवादी विचारवंत असल्यामुळे त्यांच्या विचारांचा खोलवर परिणाम समग्र भारतीय जीवनावर झाला. या परिणामापासून मराठी साहित्य तरी त्याला कसा अपवाद असणार? बाबासाहेबांच्या कार्याचा दृश्य परिणाम जसा त्यांच्या हयातीत राजकारणावर, समाजकारणावर आणि धर्मकारणावर दिसू लागला तसा तो साहित्यावर दिसू शकला नाही, पण त्यांच्या मरणोत्तर दलित वर्गातून साहित्यिकांचा असा वर्ग उसळून वर आला की ज्याने मराठी साहित्यांची पुनर्व्यवस्था अपेक्षिली.

 साहित्याबद्दल डाॅ. बाबासाहेबांचे विचार वर्षानुवर्षे चालत आलेल्या वाङ्मयीन विचारधारेपेक्षा निराळे होते. ते म्हणत, ‘what instructs me, amuses me’. मनोरंजनवादी साहित्य आंबेडकरांना व साहित्यात पुढे येऊ घातलेल्या आंबेडकरवादी साहित्याला देखील मान्य नव्हते. जे साहित्य मला प्रेरणा देतं, तेच माझी करमणूक करतं असे त्यांचे स्पष्ट मत होते. वाङ्मयाने कायमच वाचकापुढे मानवाला उपकारक असा उजेड अंथरावा. जीवनाचा गहन अर्थ सांगून वाचकाला अंतर्मुख करावे. साहित्यातून माणुसकीचे अधिक डोळस, समंजस, परिवर्तनदर्शी रूप प्रस्थापित व्हावे. हे करणे म्हणजेच बाबासाहेबांना अपेक्षित असणारे instruct करणारे साहित्य होय.

१९६० पासून दलित साहित्याची निर्मिती होऊ लागली. कथा, कविता, कादंबरी, वैचारिक निबंध या वाङ्मयप्रकारात दलित साहित्याची व नवनव्या साहित्यकारांची भर पडायला लागली, पण या सर्व वाङ्मयप्रकारात बाबुराव बागुल, डाॅ. भालचंद्र फडके प्रा. रा. ग. जाधव या समीक्षकांचा अपवाद वगळता दलित साहित्य समीक्षेचे क्षेत्र मात्र तितकेसे जोरकस, काटेकोर असे नव्हते. या दलित साहित्य समीक्षेला असे काटेकोर अधिष्ठान देण्याचे कार्य आंबेडकरवादी विचारवंत, समीक्षक डाॅ. यशवंत मनोहर यांनी ‘दलित साहित्य : सिद्धान्त आणि स्वरूप’, ‘दलित साहित्य चिंतन’, ‘समाज आणि साहित्यसमीक्षा’, ‘परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि वाङ्मयीन मूल्ये इत्यादी पुस्तकांमधून आंबेडकरवादी सौंदर्यशास्त्राचा आग्रह मांडलेला आहे. मात्र पुढे १९९९ साली आपल्या 'आंबेडकरवादी मराठी साहित्य’ या ग्रंथांची निर्मिती करून एकूणच दलित साहित्य समीक्षेला एक आगळी वेगळी दिशा दाखविलेली आहे. मराठी साहित्यात सुसूत्रपणे आंबेडकरवादाची मांडणी करणारे ते अग्रनायक, प्रथम भाष्यकार ठरले.

एक कवी म्हणून आपल्या काव्याद्वारे मनोहरांनी आपल्या परिवर्तनवादी कवितेला कायमच जडवादी नैतिकतेचे रेखीवपण बहाल केले आहे. तर आपल्या साहित्य समीक्षेतून त्यांनी परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि सौंदर्यमूल्ये यांची एकजीव मांडणी करणाऱ्या जडवादी सौंदर्यविज्ञानाचा ध्यास प्रकट केला आहे. या ध्यासाचे अलीकडचे मूर्त रूप म्हणजे त्यांचा अलिकडे प्रकाशित झालेला ‘साहित्याचे इहवादी सौंदर्यशास्त्र’ हा ग्रंथ, पण ‘आंबेडकरवादी मराठी साहित्य’ या ग्रंथामधून आंबेडकरवादी साहित्याची संज्ञा व संकल्पनेचा जो पाया रचला गेला, त्यावरच आजवरचे आंबेडकरवादी साहित्य वाटचाल करीत आहे, हे नाकारता येत नाही.

एकूणच विविध मराठी वाङ्मयप्रवाहांमधे दलित साहित्य या संज्ञेखाली दलित साहित्याचा प्रारंभ झाला असला तरी या संज्ञेच्या मर्यादित चौकटी पार भेदून डाॅ. मनोहरांनी या साहित्याला आंबेडकरवादी विचारधारेचे बळ दिले आणि जे तेज निर्माण केले त्यातून एकूणच दलित साहित्याचा पैस लांबी, रूंदी, खोली, उंचीने समकालीन साहित्यात अधिकच वेगवान झाला. दलित साहित्याला दलित साहित्य असे न संबोधता आंबेडकरवादी साहित्य का म्हटले पाहिजे किंवा भविष्यात आंबेडकरवादी साहित्य का निर्माण व्हायला पाहिजे, याचा खुलासा करताना डाॅ. मनोहर म्हणतात, ‘बुद्ध फुल्यांना सोबत घेऊन निघालेले आंबेडकरसूत्र ही युगाची गरज आहे. या सूत्राला आपण हृदयात, मेंदूत जागा करून दिली पाहिजे. त्यासाठी दलित हे विशिष्ट सामाजिक स्तराचे वर्णन करणारे सूत्र आपण मनातून काढून टाकले पाहिजे. या ना त्या पातळीवरची विभाजनाची प्रक्रिया आपण थांबविली पाहिजे. जोडण्याच्या, अभिसरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ केला पाहिजे. यापुढे कोणालाही दलित म्हणवून घेणे आवडणार नाही, असे सांस्कृतिक पर्यावरण साकार झाले पाहिजे. त्यामुळे आंबेडकरवादी साहित्य ही संकल्पना आपण स्वीकारणे हे प्रत्यक्ष जीवनक्रांतीच्या दृष्टीने आणि साहित्यक्रांतीच्या दृष्टीने हितावहच ठरणारे आहे."

डाॅ. मनोहरांच्या दृष्टीने जीवननिष्ठेतून जन्माला येणारी ज्ञाननिष्ठा हा philosophy या शब्दाचा अर्थ आहे. दलित साहित्य ही संज्ञा तत्त्वज्ञानाचा निर्देश करीत नाही. ही संज्ञा विवक्षित तत्त्वज्ञानाचे अधोरेखन करीत नाही. ही संज्ञा ढगळ आहे. तिच्यामागे रेखीव असे तात्त्विक अधिष्ठान नाही असे निश्चित, ठोस, तात्त्विक अधिष्ठान त्यांना साहित्याचा आणि जीवनमूल्यांचा परस्परसंबंध असलेल्या आंबेडकरवादी साहित्यविचारात दिसले. 

➡️ डाॅ. मनोहरांनी त्याची सुस्पष्ट कल्पना येण्यासाठी आंबेडकरवादी वाङ्मयदृष्टीची भूमिका स्पष्ट करणारे पाच मुद्दे मांडले आहेत.

१) उदात्त जीवनमूल्ये
२) सर्व जीवनाला कवेत घेणारी कलावंतमनाची व्यापकता
३) अज्ञान, दु:ख, दारिद्र्य दूर होईल हे लक्ष्य
४) उपेक्षितांचे जीवन उन्नत व्हावे ही आंतरिक निष्ठा
५) या जाणिवेचे मानवता असे नाव मानणे

या मुद्द्यांना अनुसरणारी आंबेडकरवादी साहित्यनीती स्पष्ट करणारी वाङ्मयीन मूल्येही डाॅ. मनोहरांनी सांगितली आहेत. त्यांच्या मते झोप उडणे, विचारशक्ती जागी होणे, तंद्री लागणे हा सर्व साहित्याचा हेतू आहे आणि ते मनोरंजनवादी होणार नाही, यासाठी ‘जिवंत’ अभिव्यक्तीची आणि सौंदर्यबंधाची जोड कलाकृती लाभली पाहिजे. असे सौंदर्यसामर्थ्य अर्थातच कलाकृतीत बाहेरून आणून ओतता येत नाही. ते कलाकृतीतील अनुभवात, अनुभवाच्या आशयात आणि या सर्वाचे संयोजन, संघटन करणाऱ्या जीवनदृष्टीतच असते. अभिव्यक्तीचा जिवंतपणा हा तिच्या उत्कटतेचा, प्रत्ययकारितेचा द्योतक आहे. थोडक्यात असे म्हणता येईल की प्रस्तुत ग्रंथाद्वारे आंबेडकरवादी जीवनमूल्ये हीच खऱ्या वाङ्मयीन महत्तेचे सर्जन करणारी सौंदर्यमूल्ये आहेत. असा निष्कर्ष डाॅ. मनोहरांनी काढलेला आहे.

साहित्यिकांना दलित या नाभाभिधानामुळे नकळत झालेला न्यूडगंडाचा स्पर्श डाॅ. मनोहरांच्या या तत्त्वज्ञानात्मक शास्त्रीय मांडणीमुळे पुसून जाऊन त्यांना आत्मशक्तीचा प्रत्यय आला. त्यांच्यातील संघर्षशीलतेला धार चढली. वैचारिक स्वातंत्र्याचे वारे अंगाअंगात भिनून आक्रमकपणे एका सामाजिक संघर्षासाठी त्यांची वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वे पेटून उठली. या ग्रंथाच्या निमित्ताने मनोहरांनी आंबेडकरवादी साहित्यिकांसाठी असा दीपस्तंभ निर्माण केला आहे, की ज्याच्या प्रकाशात आंबेडकरवादी लेखकांच्या पिढ्यानपिढ्या आपल्या उच्च ध्येय आणि उद्दिष्टांकडे सातत्याने अग्रेसर होत राहतील. या ग्रंथाद्वारे डाॅ. यशवंत मनोहरांनी एकूणच दलित साहित्यप्रवाहांचे आंबेडकरवादी विचारधारेच्या अंतर्गत येणाऱ्या मानवतेच्या, समतेच्या अनुषंगाने पुनर्मूल्यांकन केलेले आहे. म्हणूनच डाॅ. यशवंत मनोहर खऱ्या अर्थाने आंबेडकरवादाचे समर्थ भाष्यकार आहे.

(लेखिका भाषाशास्त्री, साहित्यिक आहेत.)

दि.८/१२/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

Sunday, December 8, 2019

मूळ शब्द शोधा क्र.२

🔶मूळ भाषेतील शब्द शोधा🔶

प्रश्न १- ' ताम्बूल' शब्द कोणत्या भाषेतील आहे जो संस्कृतमधे समाविष्ट झाला.
अ) रोमन
ब)तुर्की
क)बंगाली
ड)ऑस्ट्रिक

उत्तर-ड- ऑस्ट्रीक

संस्कृतमधे ऑस्ट्रीक भाषेतून देखील शंभरपेक्षा जास्त शब्द समाविष्ट झालेले आहेत.'ताम्बूल' हा शब्द ऑस्ट्रीक भाषेतून आला आहे.हा शब्द आपण हमखास पौरोहित्य करणार्या भटजींच्या तोंडून पूजाविधींमधे संस्कृतमधून नेहमीच ऐकतो.

प्रश्न २- यवन,यवनिका हे शब्द कोणत्या मूळ भाषेतून संस्कृतमधे आलेत?
अ)ईराणी
ब)यूनानी
क)अर्धमागधी
ड)प्राकृत

उत्तर-ब-यूनानी

सिकंदर भारतात येण्यापूर्वीपासून यूनान व भारतामधे बरेच जुने व्यापारी संबंध होते.या संपर्कामुळेच बरेच शब्द यूनानी भाषेने संस्कृतमधून घेतले तर संस्कृतने यूनानीमधून घेतले.म्हणजेच यूनानी-संस्कृतमधे त्यावेळी भाषिक आदानप्रदान झालेले आहे.परिणामस्वरूप यवन,यवनिका यूनानीमधून सहजच संस्कृतमधे आले व कालांतराने मराठीने देखील घेतले.

प्रश्न ३- ' मिहीर' म्हणजे सूर्य.हा कोणत्या भाषेतून आला ?
अ)अरबी
ब)ईराणी
क)उर्दू 
ड)संस्कृत

उत्तर-ब-ईराणी

भाषावर्गिकरणानूसार भारतीय भाषापरिवारातील 'भारत-ईराणी'ही एक शाखा आहे.या शाखेमधे ईराणी अंतर्गत अवेस्ता,फारसी,पश्तो आदि भाषा येतात.यापैकी कोणत्याही भाषेमधून मिहीर शब्दाचे आदानप्रदान झालेले संभवते;म्हणून इथे पर्यायांमधे सर्वसमावेशक असा ईराणी हा पर्याय दिला आहे.ईराण आणि भारतातील संबंध प्राचीन आहेत.यामुळे ईराणी भाषांमधून शेकडो शब्द भारतात आले.मिहीरप्रमाणे 'बादाम'हा शब्द देखील ईराणमधूनच आलेला आहे.

डाॅ. अमृता इंदूरकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

मूळ भाषेतील शब्द-१

🔶मूळ भाषेतील शब्द शोधा🔶

◾ प्रश्न १- ' प्रावृष' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? ज्याचे मराठीतील बदललेले रूप 'पाऊस' आहे.
अ)मागधी
ब) पाली
क) शौरसेनी
ड)महाराष्ट्री

➡️ उत्तर:-ब -पाली

मराठीत शेकडा सत्तर टक्के शब्द संग्रह संस्कृतनिष्ठ असले तरी मराठी भाषानिर्मीतीसाठी अनेक प्राकृत व अपभ्रंश भाषांची देखील मदत झालेली आहे.एखाद्या शब्दाचे मूळ रूप संस्कृत असले तरी कालांतराने त्यामधे होत जाणारे स्वनलोप,स्वनरूपांतर,वर्णबदल,प्रयोगातील वेगळेपणा,वचनबदल तर उच्चारबदल इत्यादींमुळे ते रूप परिवर्तन होत होत पुढील भाषेत ते बदललेले रूपच तो शब्दच बनून जातात.'प्रावृट्'चे एक वचन प्रावृष आहे पण पुढे वर्णबदल होता होता पालीमधे प्रावृष रूढ झाले व कालांतराने त्याचे पाऊस झाले व मराठीत ते रूढ झाले.  

प्रश्न २- 'तहान'हा शब्द कोणत्या भाषेतील आहे जो मराठीतही सहज वापरल्या जातो?
अ) प्राकृत
ब)अर्धमागधी
क)पैशाची
ड) पाली

➡️ उत्तर:-क-पैशाची

मराठीने पैशाची भाषेतील एक विशेष उचललेला आहे.तो म्हणजे पैशाचीत 'ण'कार नाही,'ण'साठी नेहमी 'न'चा वापर झालेला आहे.मराठीने 'ण'चा 'न'करण्याची प्रवृत्ती पैशाचीकडून घेतलेली आहे.त्यामुळे संस्कृतात आपल्याला तृष्णा दिसते तर पैशाचीमधे त्याचे 'तहान'मधे परिवर्तन झाले आहे जे मराठीने जसेच्या तसे घेतले.

प्रश्न३- 'कुक्कुट' हा कोणत्या भाषाकूळातील शब्द आहे जो संस्कृतमधेही आढळतो?
अ)द्रविड
ब)इंडो-युरोपियन 
क)आस्ट्रिक 
ड)सेमेटिक

➡️ उत्तर:-अ-द्रविड

संस्कृतातही हा शब्द आढळतो.द्रविडकूळातून संस्कृतात साधारणतः एकहजारच्याही वरती शब्द आलेले आहेत.कुक्कुट हा द्रविडकूळातील शब्द आहे.

डाॅ.अमृता इंदूरकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान.

Saturday, December 7, 2019

ते शारदा विश्वमोहिनी!

ते शारदा विश्वमोहिनी!

डाॅ.अमृता इंदूरकर

              सुटीच्या दिवशीची निवांत सकाळ.घरची थोडी कामं आवरून रेडिओ लावून आरामात बसत नाही तोच बऱ्याच वर्षांनी आशाबाईंचे 'जय शारदे वागीश्वरी' हे गाणे कानावर पडले.शांत,प्रसन्न अशा सकाळी गाणे ऐकता ऐकताच आपोआप डोळ्यासमोर त्या मयूरारूढ शारदेची मूर्ती डोळ्यासमोर प्रकटली.तिच्या त्या रूपवर्णनाने शारदा/सरस्वतीचे कितीतरी जुने संदर्भ,तिची विविध रूपे आठवू लागली.
            भारतीय पंरपरेत शारदा आणि सरस्वती या दोन्हींना विद्या व कला यांची देवता म्हणून मानले जाते.यांची कितीतरी नावे आहेत.वाक्,वाग्देवी,वागीश्वरी,
वाणी,शारदा,भारती,वीणापाणी इत्यादी नावांनी ती संबोधली जाते.आध्यात्मिक अर्थाने ती निष्क्रिय ब्रह्माचे सक्रिय रूप आहे.म्हणूनच तिला ब्रह्मा,विष्णू,महेश या सर्वांना गती देणारी शक्ती असे म्हणतात.तिचा वर्ण उज्ज्वल असल्यामुळे ती ज्योतिर्मय ब्रह्माचे प्रतीक आहे. उपनिषदांमधे सरस्वती/शारदेची वाणीशी एकरूपता मानलेली आहे.प्रज्ञावृद्धीसाठी आणि वाणीत गोडवा येण्यासाठी उपनिषदात तिची प्रार्थना केलेली आहे.वाणीची स्फूर्तिदेवता,विज्ञान,साहित्य यांची अधिष्ठात्री देवता ती आहे.


            प्राचीन ग्रंथांमधे शारदावर्णनपर कितीतरी संदर्भ मिळतात.यामधे प्रामुख्याने १) विष्णूधर्मोत्तर पुराण २) अंशुमद भेदागम ३) पूर्ण कारणागम ४) रूपमंडन इत्यादी ग्रंथांमधे तिचे स्वतंत्रपणे वर्णन आले आहे.
           बालपणी शाळेच्या पहिल्या दिवशी जशी राष्ट्रगीताची ओळख होते तशीच 'या कुन्देन्दु तुषार हारधवला' ह्या श्लोकातून ती आपल्या प्रातःस्मरणीय जीवनाचा एक अभिन्न भाग होते.बालपणी केवळ पाठ करून म्हटल्या जाणाऱ्या या श्लोकाचा थोडे मोठे झाल्यावर जेव्हा अर्थ कळतो तेव्हा कुठे अंश मात्र तिने आपल्यावर कृपेचा वरदहस्त ठेवल्याचा समाधान मिळते.

या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्र वस्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना
या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता   
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा

म्हणजेच- कुंद,चंद्र व हिमतुषार यांच्यासारखा जिचा वर्ण आहे.जी शुभ्र वस्त्रांनी आवृत्त आहे,जिचा हात सुंदर वीणेने अलंकृत आहे,जी श्वेत कमलावर बसली आहे,जिची ब्रह्मा,विष्णू (अच्युत),शङ्कर आदी देवगण सर्वकाल वंदना करतात आणि जी सर्व प्रकारच्या जडतेचा नाश करणारी आहे,अशी सरस्वती देवी माझे रक्षण करो.
      याशिवाय पुढील ध्यानश्लोक शारदेचे आध्यात्मिक सामर्थ्य व्यक्त करणारा आहे.

शुक्लां ब्रह्मविचारसारपरमामाद्यां जगद्व्यापिनीं
वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहाम्।
हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां
वन्दे त्वां परमेश्वरीं भगवती बुद्धीप्रदां शारदाम्॥

म्हणजे- शुभ्र वर्णाची म्हणजे सत्वगुणी,ब्रह्मविद्येचे श्रेष्ठ असे सार,विश्वातली आद्य शक्ती,जगताला व्यापून उरलेली,वीणा व पुस्तक धारण करणारी,हातात स्फटिकमण्यांची माळ धारण करणारी,पद्मासनावर बसलेली आणि बुद्धीदात्री अशा त्या भगवती परमेश्वरी शारदेला वंदन करतो.
           बृहदारण्यक उपनिषदात सरस्वतीचे वर्णन आले आहे.सरस्वतीच्या चार भुजा या चार दिशांची प्रतीके आहेत जे तिच्या सर्वव्यापित्वाचे लक्षण आहे.तिच्या हातातील पुस्तक हे स्थूल रूपाने ज्ञानप्राप्तीचे साधन असून,आध्यात्मिक अर्थाने सर्वज्ञानमय अशा वेदांचे प्रतीक आहे.तिच्या हातातली माला ही स्थूल अर्थाने एकाग्रतेचे चिन्ह असून,आध्यात्मिक अर्थाने मातृकावर्ण शक्ती आहे.वीणा ही स्थूल अर्थाने जीवनसंगीताचे प्रतीक व आध्यात्मिक अर्थाने साधकांना सिद्धी व निर्वाण देणारी आहे.तर तिच्या हातातील कमळ हे सृष्टीचे प्रतीक आहे.
         संपूर्ण भारतातील विविध परंपरांमधे ती विविध वाहनारूढ दाखविली आहे.श्वेत हंस हे प्रामुख्याने सरस्वतीचे वाहन कल्पिलेले आहे.सरस्वती कधी हंसावर बसलेली दिसते,तर कधी हंस तिच्या मागे असतो.बौद्ध व जैन परंपरेत मयूर हे तिचे वाहन आहे.महत्त्वाचे म्हणजे हिंदूंप्रमाणेच बौद्ध व जैन धर्मांना पण शारदा/सरस्वती पूज्य आहे.बौद्ध परंपरेत ती मंजुश्रीची पत्नी असल्याचे उल्लेख आढळतात. बौद्धांनी तिचे पाच भिन्न आकार-प्रकार कल्पीलें आहेत ते असे-
१) महासरस्वती--जी द्वादशवर्षा,हिमगौर,द्विभुज,उजवा हात अभयमुद्रेत आणि डाव्या हातात कमळ असलेली.
२)वज्रवीणा सरस्वती--गौर,द्विभुज व वीणावादिनी.
३) वज्रशारदा--कमळात बसलेली,मुकुटात चंद्रकोर,त्रिनेत्र,द्विभुज तसेच कमळ व पुस्तक धारण करणारी.
४) आर्यसरस्वती-- चतुर्दशवर्षा,गौरकांती,डाव्या हातात कमलनाल व त्यावर प्रज्ञापारमितेची पोथी.
५)वज्रसरस्वती--त्रिमुख,षड्भुज,रक्तवर्ण,रक्तकेशी,समोरचे मुख निळे,रक्तकमकमळावर प्रत्यालीढ मुद्रेत बसलेली,हातात कमळ व त्यावर प्रज्ञापारमितेची पोथी. तलवार आणि कात्री ही डाव्या हातातली आयुधे व उजव्या हाती ब्रह्मकपाल,रत्न व चक्र.
         जैनांची श्रुतदेवी म्हणजे सरस्वती च आहे.स्कंदपुराणात शिवाची शक्ती अशा कल्पनेने तिचे रूपध्यान वर्णन केले आहे.
         संपूर्ण भारतात विविध ठिकाणी सरस्वती/शारदेच्या मूर्ती सापडल्या आहेत.उत्तर भारतातल्या सरस्वतीच्या मूर्ती सामान्यपणे द्विभुज किंवा चतुर्भुज आहेत.भारतीय कलेत सरस्वती सन पूर्व दुसऱ्या शतकापासून आढळते.भरहूतच्या कठड्यावर तिची मूर्ती पद्मपीठावरील आहे.मध्ययुगात बंगाल-बिहारमधे ती चतुर्भुज व वीणाधारिणी बनली.तर आंध्र प्रदेशात घंटाशाला येथे जी मूर्ती आहे ती मोहेंजोदडोसारख्या कलेशी साधर्म्य साधते.मथुरेजवळ कंकाली टीला येथे उत्खननात जी मूर्ती आढळली ती जैनकालीन आहे.तर बीकानेर येथे गुप्तकाळातील मूर्तींचे संदर्भ मिळतात.
          अशा या विविध रूपातील शारदा/सरस्वतीचा गौरव ज्ञानदेवांनी आपल्या भावार्थदीपिकेतील मंगलाचरणात केला आहे.ओंकाररूप गणेशाचे रूपक प्रारंभीच्या २० ओव्यांमधे केल्यानंतर २१वी ओवी त्यांनी शारदास्तवनाला अर्पण केली आहे.ज्ञानदेवांना शारदेची थोरवी,महात्म्य वर्णनासाठी फक्त एकच ओवी पुरेशी वाटली यावरून तिचे सामर्थ्य लक्षात येते.
*आता अभिनववाग्विलासीनी।जे चातुर्यकलाकामिनी।*
*ते शारदा विश्वमोहिनी।नमिली मिया॥*
म्हणजेच- अभिनववाग्विलासीनी म्हणजे माधुर्य,लालित्यादी गुण लाभलेली,वाणीचे नवनवीन विलास प्रकट करणारी,चातुर्य आणि कला यांचा जिला विशेष छंद आहे.अशा या साक्षात विश्वालाच मोहविणाऱ्या शारदेला वंदन करतो.
         दासबोधातील शारदास्तवन समासातही शारदेचा गौरव केलेला आहे.ही शारदा योगी लोकांना ध्यानावस्थेत भेटते.साधकांना ज्ञानमार्गातील चिंतनामधे साथ देते.भक्तीमार्गातील पराभक्ती हे शारदेचेच रूप आहे.तर सिद्धपुरूषांच्या अंतःकरणामधील स्वरूपस्थान किंवा समाधी हा शारदेचाच आशीर्वाद आहे.अशी ही शारदा उत्तम ग्रंथनिर्मितीसाठी सदा पूजिली जाते.

अमृतवेल    
डाॅ अमृता इंदूरकर
दि.६/१२/२०१९
नागपूर

Thursday, December 5, 2019

पिंपळ-एक डायरी

पिंपळ-एक डायरी

डाॅ.अमृता इंदूरकर

              दिवाळी नुकतीच संपली होती.संपूर्ण वातावरणात हिवाळ्याची अस्पष्टशी चाहूल लागल्यासारखी वाटत होती.त्यादिवशी विभागात यायला उशीर झाला.मी जरा घाईघाईतच खोलीचे कुलूप उघडले आणि खुर्चीवर येऊन बसले.आल्यावर एरवी आठवणीने खोलीचे दार लोटून,एकांतात बसणारी मी,डोक्यात कामाची घाई असल्यामुळे दार उघडे ठेवून बसले.घाईघाईत शोधनिबंध लिहायला सुरूवात केली;आणि अचानक कानावर कसलीतरी ओळखीची सळसळ ऐकू आली.त्याचा आवेग इतका जास्त होता की ती सळसळ आता माझ्या थेट अंगावरच येणार असे मला वाटले.म्हणून क्षणभर थांबून मी खोलीबाहेर पाहिले.माझ्या खोलीसमोर उभा होता विशाल पिंपळ!सोसाट्याचा वारा सुटला होता आणि हा पिंपळ अशी काही जीवघेणी सळसळ करीत होता की मी क्षणभर विचारमग्न झाले आणि अचानक वर्षानुवर्षे शांत असलेले माझ्या अंतरीचे स्मृतितळ विविध घटना,प्रसंगांचे एकावर एक सूर मारून ढवळून निघू लागले.



             त्या क्षणी मला असे वाटले आजच ह्या पिंपळाला काय झाले.जणुकाही हे सर्व मला विसरू देण्याची का त्याची इच्छा नव्हती?या विभागात मी प्रथम आले ते एक विद्यार्थीनी म्हणून. वर्गात फारशी कुणाशी माझी नव्याने मैत्री झाली नव्हती. रोज वेळेवर येणे,वर्ग मनापासून करणे,वेळ असला तर ग्रंथालयात जाणे नाहीतर सरळ घरी परतणे.पण या साध्या वाटणाऱ्या दिनचर्येत माझ्यासाठी एकच गोष्ट कठीण होती ती म्हणजे दोन तासिकांमधे असणारा वेळ किंवा तास उशीरा सुरू होणार असेल किंवा होणारच नसेल तर पुढच्या तासाची वाट पाहण्यासाठीचा मधला वेळ.नवीन ओळख करून घेऊन बोलणाऱ्यांपैकी मी नव्हते.मग काय!वर्गाबाहेर आल्यावर समोर भव्य पिंपळ दिसायचा.योगायोग असा की ज्या दिवशी मी अस्वस्थ असायची त्या दिवशी ह्याची सळसळ इतकी व्हायची की हक्काचा मित्र जसा विचारतो तसा हा विचारायचा, काय झाले?इतकी उदास का?अस्वस्थ का?मला सांग!मी आहे ना! पुढे असे योगायोग वारंवार घडून यायला लागले. आपण आतून पार उन्मळून पडलेलो असायचो आणि नेमका हा विचारून विचारून बोलते करायचा.माझे उसळणे,कोसळणे समजून घेणारा कोणीतरी मला हवा होता.मनातली घुसमट,वैफल्य,त्वेष,उद्विग्नता सगळे कुठे तरी व्यक्त व्हावे असे सारखे वाटायचे.मग मलाही रोज त्याच्या समोर येऊन उभे राहायचे वेडच लागले.

             मी मनातील गुंतागुतीच्या अतर्क्य जाळ्यातले एक एक धागे उकलण्याचा प्रयत्न करीत होते. तितकाच गुंता अधिक वाढायचा आणि हाती यायचा तो निरगाठीवर निरगाठी पडलेला गुंत्याचा गोळा.प्रत्येक नात्यात हेच,प्रत्येक संवादात हेच.रक्ताच्या नात्याबद्दलही तेच आणि मानलेल्या मैत्री,प्रेम या नात्यांबद्दलही तेच.त्यावेळी नकळतच मर्ढेकरांची,     

नाही कुणी का कुणाचा।बाप-लेक-मामा-भाचा।
मग अर्थ काय बेंबीचा।विश्वचक्री?॥
ह्या ओळी मला माझेच मनोगत वाटू लागल्या.बालकवींची उदासीनता मला माझ्या उदासीनतेशी साधर्म्य सांगू लागली.
कोठून येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचते तेही कळेना
हृदयाच्या अंर्तहृदयाला   

तर ग्रेसची जीवघेणी कातरसंध्या माझ्या भासचक्रात अनाकलनीय,मंत्रभारीत उच्छाद मांडू लागली.मग माझा रोजचा दिनक्रमच ठरून गेला.रिकामा वेळ मिळाला की मी आपली पिंपळासमोर त्याला न्याहाळायला,त्याच्याशी बोलायला लागली.इरावती मला विचारायची की तासनतास या पिंपळाकडे पाहण्यात तुला काय मिळतं? मी अनुत्तरीतच उभी राहत असे.काय सांगणार?आमची मनातल्या मनात वाटावाटी सुरू आहे म्हणून!

            हा पिंपळ त्यावेळी माझ्यासाठी जणुकाही डायरी झाला होता. आपण संपूर्ण दिवस सरल्यावर रात्री डायरी लिहितो आणि दिवसभराचा लेखाजोखा मांडतो.पण माझं मात्र वेगळच सुरू होतं. मी दिवसाचीच नाही तर क्षणाक्षणाची,एक एक भावनांची व्याकूळ,दुखरी स्पंदने त्या पिंपळाच्या प्रत्येक पानावर कोरायचा प्रयत्न करीत होते.प्रत्येक पान माझे आहे आणि या विशाल डायरीची लक्ष लक्ष पाने माझे कागद बनले आहेत असे वाटायचे.माझ्यासाठी तर एक एक पान लागे गळावया हा हिशेबही नव्हता.पिंपळच इतका डेरेदार,विशाल आहे की पानगळ होऊन संपूर्ण निष्पर्ण वृक्ष कधी पाहिलाच नाही.माझ्या मानसिक आंदोलनाचे आघात लीलया पेलायला लगेच नवी पालवी तयार.

           आज तिथपासून ते आजतागायत विभागाशी संबंधित असल्यामुळे माझी पिंपळ डायरी माझ्यासोबत आहे.इतके लिहिले,इतके व्यक्त केले पण ह्याची पाने अजून शिल्लकच आहेत.ती पाने मी आली की जास्तच सळसळतात.जुन्या पानांनी नव्यांना सांगितले,नव्याने कोवळ्यांना सांगितले की ही एकमेव आहे आपल्याशी संवाद साधणारी;तेव्हा हीला आजन्म प्रतिसाद द्या.त्यादिवशी घाईघाईत असूनही हा पिंपळ मला विसरला नाही.त्याने विचारलेच कशाची एवढी घाई?कोणता ताण आहे का?आणि मला माझ्या माणुसपणाची खंत वाटली.हा एवढा हजारो कानांनी ऐकायला आतूर असताना मी मात्र भलतेच ठरीव हक्काचे कान शोधत होती.ह्या पिंपळ डायरीच्या साक्षीने खळकन दोन अश्रू गळले आणि अंतरीचे तळ शांत झाले.ह्या पिंपळाने मला असे काही आश्वस्त केले की मनातली सगळी घुसमट त्या सळसळत्या पानांमध्ये कधी विरली कळलेच नाही!!!

अमृतवेल
डाॅ अमृता इंदूरकर
दि.५/१२/२०१९
नागपूर

Wednesday, December 4, 2019

मराठी रंगभूमीचे विश्वकर्मा : विष्णुदास भावे

मराठी रंगभूमीचे विश्वकर्मा : विष्णुदास भावे

मराठी जनतेचे अद्वितीय प्रीतिस्थान बनलेल्या ह्या नाट्यकलेच्या म्हणजे रंगभूमीच्या जन्माशी विष्णुदास उर्फ विष्णू अमृत भावे या पुरूषाचे नाव कायमचे निगडीत झालेले आहे.ही सांगड इतकी वज्रलेप झालेली आहे की मराठी रंगभूमी अथवा नाट्यकला यांविषयी बोलण्याचा प्रसंग आला असता मराठी रंगभूमीचे जन्मदाते म्हणून विष्णुदासांच्या नावाचा उल्लेख करण्याचा एक शिरस्ताच पडून गेला आहे.विष्णुदासांचे नाव मराठी रंगभूमीचा विश्वकर्मा या पदवीवर अढळपदाने विराजित झालेले आहे.पौराणिक नाटकांचा प्रयोग केव्हा ही, कोठेही होवो, त्या प्रयोगाच्या प्रारंभी सूत्रधाराकडून,
हे शारदे, ब्रह्मतनये, सांगली ग्रामी विष्णुदास कवी आहेत, त्यांना तुझा आशीर्वाद असावा' अशा रितीने आशीर्वाद मागण्यासाठी ज्यांच्या नावाचे उच्चारण निरंतर होत असे ते म्हणजे विष्णुदास भावे.

विष्णुदास भावे बाह्यात्कारी कवी असले तरी सर्वप्रथम ते सांगलीकरांच्या पदरी खासगीकडे एक सामान्य नोकर होते.विष्णुदास भावे ही एक अतिशय बुद्धीमान, कल्पक व हरहुन्नरी व्यक्ती होती.रंगभूमीची संस्थापना त्यांच्या हातून झाली ही निर्भेळ योगायोगाची गोष्ट नसून भावे यांची योग्य तेच खरोखरी तशी होती.लहानपणापासूनच त्यांना कलेची व कारागिरीची आवड होती.ही त्यांची कारागिरी श्रीमंत चिंतामणराव अप्पासाहेब यांच्या नजरेस पडली.श्रीमंतांनी १८४२ साली कर्नाटकी नाटके पाहून आपल्याही दरबारात मराठी नाटके करावीत अशी इच्छा व्यक्त केली.तेव्हा साहजिकच त्यांनी ती कामगिरी विष्णुपंतांवर सोपविली.

जनतेमधे अनादिसिद्ध परंपरेने चालू असलेल्या दाक्षिणात्य रंगभूमीच्या स्वरूपाचे सर्वप्रथम विष्णुदासांनी अवलोकन केले. तिचा जो नमुना सांगली मुक्कामी विष्णुदासांच्या पाहण्यात आला व ज्यावरून त्यांनी आपले नाटक निर्माण केले त्यांचे निश्चित स्वरूप नक्की कसे होते याची माहिती उपलब्ध नाही.खुद्द विष्णुदासांनी त्याला ' ओबडधोबड व बिभत्स' म्हणजेच अचकट- विचकट, ओंगळ,किळसवाणे अशी विशेषणे लावली होती.

विष्णुदासांनी निर्मिलेल्या पौराणिक नाटकांत मात्र भिन्न भिन्न नाटक मंडळ्या व भिन्न भिन्न परंपरा यांच्या विशिष्ट लकबी व प्रयोगपद्धतीत आणि वेशभुषेत निराळेपणा हा असायचा.विष्णुदासांचे चरित्रकार रा.सा.भावे यांचे म्हणणे असे की, 'विष्णुदासांनी आपल्या नाट्याचे स्वरूप शक्य तितके वास्तववादी  असावे याबद्दल फार प्रयत्न केले.चित्रकलेत व मूर्तीकलेत विष्णुदासांचे कौशल्य अप्रतिम असल्यामुळे त्यांनी प्रत्येक भूमिकेच्या वेशभूषेत आणि सजावटीत वैशिष्ट्य आणि वैचित्र्य निर्माण केले.कलानिर्मितीचे तत्त्व या नात्याने वास्तववाद त्यांनी आपल्या कृतीत आणला होता.'

 विष्णुदासांनी 'सीतास्वयंवर' हे पहिले नाटक इ.स.१८४३ साली केले.तेव्हापासून सुमारे ४०-५० वर्षे त्यांनी सुरू केलेला पौराणिक नाटकांचा प्रकार रंगभूमीवर जीवंत होता.त्यानंतर रामायणापैकीच त्यांनी १०नाटके केलीत.त्यांचा नाट्यव्यवसाय पहिली ३० वर्षे तर पूर्णपणे जोमात व भरभराटीत होता.ही जणुकाही जीवंत सामाजिक संस्थाच होती.अर्थात समाजजीवनाच्या इतर अंगांप्रमाणे तिच्यामधे एकसारखा बदल होत असला पाहिजे, जो होत होता हे सत्य आहे.रचनेच्या बाबतीत एक महत्त्वाची सुधारणा विष्णुदासांनी घडवून आणली.कानडी अथवा दाक्षिणात्य नाटके आरंभापासून अखेरपर्यंत एकसुरी, सळनळीत , एकप्रवेशी होते.कथानकाचा ओघ एकप्रवाही,अखंड चालायचा.

विष्णुदासांनी यामधे सुधारणा करून नाटकाची रचना अनेकप्रवेशी केली.ह्या प्रवेशांना कचेऱ्या म्हणत.प्रथम देवांची कचेरी, नंतर राक्षसांची कचेरी, नंतर राक्षसांनी केलेल्या अत्याचाराचे दिग्दर्शन, नंतर देवस्त्रीयांची कचेरी, नंतर देव- राक्षसांचे युद्ध याप्रमाणे स्थूलमानाने प्रवेशांचा आराखडा त्यांनी आखला.आख्यानातील कथाभागाच्या स्वरूपानुसार यांत फरक होत असे.या बदलामुळे  विष्णुदासी पद्धतीची पौराणिक नाटके कानडी प्रदेशातही लोकप्रिय झाली.विष्णुदासी नाटकांचा आशय शब्दात्मक होता.जे काही नृत्य विष्णुदासी नाटकांत घेतले गेले ते कथावस्तुच्या आणि भावनेच्या दृष्टीने निष्प्रयोजन जरी होते, तरी पण रंजन करणारे मात्र होते.गणपतीनंतर मयूरवाहिनी सरस्वतीचा प्रवेश ही विष्णुदासी पौराणिक नाटकांची खास खुण होय.कानडी नाटकात सरस्वती नव्हती.विष्णुदासांनी आपल्या कल्पनेने तिचा समावेश केला.विष्णुदासांच्या कवितेत ओवी,साकी,श्लोक इत्यादी सर्व प्रकार होते पण रागदारीतील पदांच्या मानाने त्यांचे प्रमाण थोडे होते.

स्थानिक गावांमध्ये बरीच वर्षे प्रयोग केल्यानंतर विष्णुदासांनी आपली नाटक मंडळी प्रथमच पुणे व मुंबई या मोठ्या शहरी नेली.मराठी भाषेतील रंगभूमीचे हे अभिनव दर्शन पाहून पुणे व मुंबई येथील विद्वान व रसिक पुढारी मंडळींना आनंद झाला.सर्व महाराष्टाभर विष्णुदासांच्या पौराणिक नाट्यपद्धतीची छाप बसली आणि सर्वत्र तिचे अनुकरण होण्यास सुरूवात झाली. या प्रयोगात आरंभी ' इंद्रजितवध आणि सुलोचना सहगमन' हे आख्यान आणि नंतर ' अश्वमेधयज्ञ आणि लवकुशाख्यान' हे करून दाखविण्यात आले.त्यानंतर विष्णुपंतांनी मुंबईच्या ग्रॅन्टरोड थिएटरमधे ९मार्च १८५३ मधे दुसरा खेळ केला.त्यानंतरच्या प्रयोगात मत्स्य,कूर्म, वराह, नारसिंह या अवतारांची आख्याने आणि रासक्रीडा यांचे प्रयोग केलेत.

विष्णुदासांनी आपली ५२ आख्याने एकत्र करून, त्यांच्या प्रारंभी देवतास्तुतीपर पद्ये जोडून त्यांना दहा पानांची प्रस्तावना लिहून ती जानेवारी १८८५ मध्ये 'नाट्यकवितासंग्रह' या नावाने प्रसिध्द केली.एकंदर ५२ आख्यानांपैकी १९ रामकथेवर आहेत.ही केवळ वाल्मिकी रामायणाच्याच आधाराने रचलेली आहेत असे नव्हे.आनंद रामायणातील अहिमहिरावणकथा,जैमिनी अश्वमेधातील लवकुशाख्यान वगैरे अनेक ठिकाणांहून आलेल्या लोकप्रिय कथांचाही विष्णुदासांनी आपल्या आख्यानांकरिता उपयोग केला.कौरव-पांडव कथा आणि महाभारतातील इतर काही कथा यांवर १४ आख्याने आहेत.श्रीकृष्ण चरित्रावर ६, विष्णुच्या दशावतारांपैकी इतर अवतारांवर ५, आणि फुटकळ ८ याप्रमाणे वर्गवारी आहे.रामकथेवर त्यांचा सर्वाधिक भर होता.१९ आख्यानांमधे श्रीरामचंद्राचे संपूर्ण चरित्र सुसंगत रीतीने आणले होते.त्यांच्या आख्यानांपैकी 'सीतास्वयंवर' , 'इंद्रजितवध आणि सुलोचनासहगमन' , ' रावणनिधन', 'अश्वमेधयज्ञ व लवकुश', 'रासक्रीडा', 'पारिजातक', 'द्रौपदीस्वयंवर', 'वत्सलाहरण', 'कीचकवध', 'सुधन्वा', 'चंद्रहास', 'हरिश्चंद्र सत्वदर्शन', 'वीरभद्र' ही विशेष लोकप्रिय ठरलीत.   

 विष्णुदास भावे स्वतः नाटककार,पद्यकार,दिग्दर्शक, तालीममात्सर, गायन मास्तर,कपडेवाला, रंगवाला सर्व काही तेच होते.या सर्व गोष्टी स्वतः निर्माण करून रंगभूमीचा जो एक साचा त्यांनी निर्माण केला तो पौराणिक नाटक या नावाने पुढे ५०-६० वर्षे चालू राहिला.पण संगीत नाटक, गद्यनाटक इ.नाट्यप्रकारांना देखील तो मूळ पाया म्हणून उपयोगी पडला.सर्व गोष्टी मुळापासून निर्माण करण्याचे काम त्यांच्यानंतर मराठी रंगभूमीवर कोणासच करावे लागले नाही.हे सर्व लक्षात घेतले म्हणजे विष्णुदासांच्या उन्मेषशालिनी प्रतिभेची कल्पना येते.महाराष्ट्राचा भरतमुनी किंवा रंगभूमीचे विश्वकर्मा या पदव्या ज्या त्यांना देण्यात येतात त्या यथार्थ असल्याची खुण पटते.

त्या वेळचा समाज सुसंस्कृत व सद्भिरूचीसंपन्न अशा रंजनसाधनासाठी मुकलेला होता.विष्णुदास निर्मित रंगभूमीने त्यांची ही भूक भागवली.त्यांनी नाटक तयार केले त्यावेळी ती सरंजामशाही समाजव्यवस्थेतील एक निष्पत्ती होती.कारण त्याकाळात मनोरंजनाचे दुसरे साधन नव्हते.त्यातल्या त्यात तमाशा, कीर्तन, व नायकिणींचे नाचगाणे ही परंपराप्राप्त करमणुकीची साधने होती.या तीन साधनांपैकी तमाशा किंवा नायकिणीच्या नाचगाण्याला समाजाने नेमून दिलेल्या नितीनियमांची बंधने होती.कीर्तन हे एकमेव समाजमान्य व दर्जेदार असे मनोरंजनाचे साधन होते.परंतु, सरंजामी पांढरपेशा वर्गास ही साधने अपुरी वाटत होती.म्हणूनच विष्णुदास भाव्यांच्या प्रेरणेमुळे पौराणिक नाटकास प्रारंभ झाला.पण बदलत असलेल्या समाजस्थितीच्या प्रभावाने ही नाटके द्रव्याधिष्ठीत भांडवलशाही समाजव्यवस्थेचा घटक बनली.विष्णुदासांनी इ.स.१८५१ ते१८६२ पर्यंत म्हणजे सुमारे बारा वर्षे नाट्यव्यवसाय केला.या अवधीत त्यांनी उत्तरेस मुंबई पासून दक्षिणेस बेळगावपर्यंतच्या मराठी प्रदेशात एकूण सात दौरे केले.

उपलब्ध पुराव्याप्रमाणे आर्थिक चणचण उद्भवल्यामुळे सातवा दौरा हा त्यांचा शेवटचा दौरा होता.विष्णुदासांनी ४० वर्षे अखंड आणि बिकट परिस्थितीत देखील रंगदेवतेची मनोभावे सेवा केली. पण काळ पुढे बदलत गेला .बदलत्या काळात नवीन गोष्टी मिसळल्या. लोकही बदलले त्याचप्रमाणे त्यांच्या मनोरंजनाच्या संकल्पना बदलल्या.त्यामुळे निश्चितच विष्णुदासांनी सुरू केलेल्या नाटकांचे, प्रयोगांचे स्वरूप बदलले.त्यात काळानुसार नवीनता आली पण आजही फिरून जेव्हा नाटकाचा, त्याच्या इतिहासाचा विचार होतो तेव्हा नकळतच मनात येणारे पहिले नाव म्हणजे- ' आद्य रंगकर्मी विष्णुदास भावे'हे होय.त्यांच्या नावाने साजरा होणाऱ्या आजच्या मराठी रंगभूमी दिनानिमीत्त विष्णुदास भावे यांचे स्मरण.

डाॅ.अमृता इंदूरकर,नागपूर
विश्वस्त

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

Tuesday, November 26, 2019

🔶प्रहसन:अकल्पनीय, असंभाव्य नाट्यप्रकार🔶

🔶प्रहसन:अकल्पनीय, असंभाव्य नाट्यप्रकार🔶

➡️डाॅ.अमृता इंदूरकर
 
प्रसहन: ‘प्र’ म्हणजे अधिक आणि ‘हसन’ म्हणजे हास्य किंवा हसणे. सामान्य पातळीपेक्षा अधिक हसण्याला प्रहसन म्हणतात.

नाट्यप्रकारात मोडणारा प्रहसन किंवा फार्स हा सुखात्मिकेचाच एक प्रकार होय. विनोद निर्मितीचा एकमेव हेतू डोळ्यांपुढे ठेवून निर्माण केलेल्या प्रहसनाची प्रकृती मात्र सुखात्मिकेपेक्षा बरीचशी वेगळी असते. हा हास्यरसोत्पादक नाट्यप्रकार एकांकी असेल किंवा अनेक प्रवेशयुक्त एकांकी असेल किंवा तीन अंकात ऐसपैस पसरलेला असेल. सामान्यपणे कनिष्ठ दर्जाचा विनोद त्यात ठासून भरलेला असतो. पात्रांच्या कृती-उक्तीत अतिशयोक्ती, असंबद्धता, विसंगती, मूर्खपणा, वेडाचार यांचा मालमसाला असतो. तसेच एरवी ज्या घटना असंभाव्य किंवा अवास्तव वाटतील, त्या प्रहसनात गुंफलेल्या असतात.

भरतमुनींनी दशक रुपात प्रहसनाला स्वतंत्र स्थान दिले आहे. त्याने प्रहसनाचे ‘शुद्ध’ व ‘संकीर्ण’ असे दोन प्रकार मानले आहेत. शारदातनय म्हणतो की प्रहसनात एक अंक, दोन संधी, सहा रस असावेत. संस्कृतात दामक, भगवतज्युक, हास्यार्णव, मत्तविलास यासारखी काही प्रहसने सोडली तर फारशी प्रहसनरचना नाही.

➡️ पाश्चात्य फार्सचा उगम

पाश्चात्य फार्सचा उगम हा इसवीसनपूर्व पाचव्या शतकात झाला, असे मानले जाते. जुन्या ग्रीक सुखात्मिकेबरोबर रचलेले हास्योत्पादक लघुनाटक म्हणजे फार्स. Farcire (कोंबून भरणे) या लॅटीन शब्दापासून ‘फार्स’ ही संज्ञा सिद्ध झाली. Mystere म्हणजे बायबलमधील नव्या व जुन्या करारांतील कथांवर आधारलेली नाटके. धार्मिक स्वरूपाच्या या गंभीर नाटकांमध्ये फार्स घुसडले जात असत. युरोपमधील प्रबोधनानंतर फार्सच्या निर्मितीला बहर आला. इटलीमधील फार्स या प्रकारात साचेबंद स्वरूपाची पात्रे असत. मोल्येरच्या फार्समध्ये व्यंगचित्रे असत आणि मानवी जीवनातील विसंगतीचे भेदक, दर्शनही. १९ व्या शतकात फार्सला पुन्हा बहर आला, तो फ्रान्समध्ये. त्याचबरोबर जर्मनी, रशिया, ब्रिटन इत्यादी देशातही तो अवतरला.
घटनाकेंद्री नाट्य!

प्रहसन हे घटनाकेंद्री असते. घटना अतिरंजित व असंभाव्य असतात. त्या वेगाने घडतात व त्यातून माैज निर्माण होते. सुखात्मिकेत ठसठशीत व्यक्तिचित्रण असते तर प्रहसनातील व्यक्ती उथळ, तऱ्हेवाईक व विक्षिप्त स्वभावाच्या आणि साचेबंद व्यक्तिमत्त्वाच्या असतात. विविध क्लृप्त्या योजून हास्य निर्माण करणारे प्रहसन सुखात्मिकेसारखे प्रेक्षकाला अंतर्मुख करीत नाही, मात्र फार्समधील विनोद हा नेहमीच वरकरणी वाटतो, तितका उथळ नसतो. कित्येकदा त्याला कारुण्याची झालर असते. जगप्रसिद्ध अभिनेता चार्ली चॅप्लिनचे मूकपट किंवा मार्क्स बंधूंचे चित्रपट याच फार्सच्या प्रकारात मोडतात. प्रहसनात काहीही घडू शकते आणि कसेही घडू शकते हे खरे आहे. पण सुखात्मिकेप्रमाणेच प्रहसनालाही स्वत:ची अशी सुसंगत रचना असते. प्रहसनाला स्वत:चा असा रचनाबंध असतो. त्यात एकाच वेळी गांभीर्य आणि गंमत यांचा प्रत्यय येतो. त्यातील व्यक्ती व घटना अस्वाभाविक वाटल्या तरी त्यातून मानवी जीवनातील वास्तवावर प्रकाश पडतो. विसंगतीचे चित्र रंगवितानाच प्रहसन संगतीची जाणीव करून देते. प्रहसन हे काही अंशी मुक्त नाट्य म्हणता येईल किंवा जीवनाकडे पाहण्याची ती एक रीत असेही म्हणता येईल. चित्रपट क्षेत्रातील प्रहसनाचे सर्वात बोलके उदाहरण म्हणजे नासिरुद्दीन शहा, विवेक वासवानी, भक्ती बर्वे यांचा ‘जाने भी दो यारों’ हा हिंदी चित्रपट. यामधील मृत सतीश शहाला जीवंत समजून कोफिनमध्ये हलविणे आणि चित्रपटाच्या शेवटी महाभारताचा प्रसंग, या दोन्ही घटना फार्सचा उत्तम नमुना आहेत.

बोलणे, वागणे अतिशयोक्तीचे

प्रहसनात विनोदनिर्मितीवर मुख्यत: भर दिलेला असतो. पात्रांचे वागणे, बोलणे अतिशयोक्तीच्या पातळीवरचे असते. पात्रांना असंभाव्य किंवा चमत्कारिक स्थितीत टाकलेले असते. पात्रांच्या जलद हालचाली, धावपळ, वेड्यावाकड्या मुद्रा, द्वयर्थी बोलणे, स्त्री-पुरूष संबंधविषयक प्रसंग वा बोलणे ही प्रहसनाची वैशिष्ट्ये होत. परंतु, त्याचबरोबर समकालीन जीवनाचे चित्रण करण्याची प्रवृत्तीही प्रहसनामुळे रंगभूमीवर प्रभावीपणे प्रकटली. समाजामध्ये असणारे उपहासात्मक प्रकार विडंबनाचा आश्रय घेऊन प्रहसनातून अवतरले. नाट्यकला केवळ रंजनात्मक न राहाता सामाजिक टीकेसाठी राबवीत, विशिष्ट लकबा किंवा स्वभावदोष असलेली समाजातली प्रतिकरूपे प्रहसनांमधून उभी होऊ लागली. प्रारंभीच्या काळातला नाटकाचा साचेबंदपणा प्रहसनामुळे कमी झाला. अभिनयातील तोचतोचपणा जाऊन अभिनय काैशल्याला वाव मिळाला. त्यामुळे पुढच्या काळात प्रहसने ही पुरक नाटके न राहता स्वतंत्रपणे सादर केली जाऊ लागली.

मराठी फार्सचा अवतार

        मराठी रंगभूमीवर फार्सचा अवतार झाला तो इंग्रजी नाट्यप्रयोगाच्या अनुकरणामुळे पौराणिक नाटकाच्या जोडीला फार्स सादर करण्याची युक्ती अमरचंद वाडीकर नाट्य मंडळीने १८५६ रोजी केली. हा फार्स हास्यकारक व लाैकिक जीवनाचे चित्रण करणारा असा होता. रुचिपालट म्हणून योजण्यात आलेल्या प्रहसनाचे स्वरूप मात्र पुढे पालटत गेले. फार्स म्हणजे केवळ विनोदी स्वरूपाचे प्रहसनवजा असलेले नाट्य अशी जी पुढे समजूत झाली, ती फार्सच्या जन्माच्या वेळी नव्हती. काही ऐतिहासिक स्वरूपाच्या गंभीर अथवा शोकांत नाटकांनासुद्धा फार्स म्हणण्याची पद्धत होती. उदा. नारायणराव पेशवे यांच्या मृत्यूचा फार्स, अफझलखानाच्या मृत्यूचा फार्स. प्रहसनवजा फार्सची नावे त्यांच्या विषयांची कल्पना देणारी, विनोद स्पष्ट करणारी आहेत. उदा. ढोंगी बैराग्याचा फार्स, बासुंदीपुरीचा मनोरंजक फार्स, चहाडखोराचे प्रहसन अथवा कळलाव्या शास्त्राचा फार्स इत्यादी.....

कोटीभास्कर नावाच्या गृहस्थाने एका इंग्रजी नाटकाचा प्रयोग पाहिला. त्या नाटकाच्या शेवटी त्याने एक फार्स केलेलाही पाहिला. त्याच धर्तीवर त्याने ‘सीताहरण’ या पाैराणिक नाटकाच्या अखेरीस अगदी अनपेक्षितपणे जरठ कुमारी विवाहाचे दुष्परिणाम दाखवणारा एक भडक फार्स करून दाखवला. मराठीतील हा पहिला फार्स ठरला. तो फार्स पाहून अनेकांनी फार्स लिहिले. १८७० ते १८९० या वीस वर्षांत फार्सचे प्रमाण जाणवण्याइतपत होते. स्वातंत्र्यप्राप्ती नंतरच्या काळात मात्र व्यक्तिजीवनातील अगर आपल्या समाजातील वैगुण्ये, उणिवा धारदारपणे मांडण्याचे माध्यम म्हणून प्रहसनाचा उपयोग होऊ लागला.

बबन प्रभूंचे योगदान

        मराठी नाट्यसाहित्यात उत्तम असे फार्स देणारे नाव म्हणजे बबन प्रभू. १९५० च्या सुमारास मराठी रंगभूमीवर विनोदाच्या क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावलेले बबन प्रभू यांनी बऱ्याच फार्सचे लेखन केले. झोपी गेलेला जागा झाला, दिनूच्या सासूबाई राधाबाई, पळा पळा कोण पुढे पळतो, घोळात घोळ इत्यादी उत्तमोत्तम फार्स प्रभू यांनी मराठी रंगभूमीला दिले. आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाचा उल्लेख केला, त्या चित्रपटात महाभारताचा जो थिएटरमधला प्रसंग आहे. त्या प्रसंगात थिएटरच्या प्रवेशद्वारावर चालू असलेल्या नाटकांचे फलक दाखविले आहेत. त्यामध्ये एक फलक ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या फार्सचा आहे. दिग्दर्शकाने हा फलक दाखवून केवढी सूचकता साधली आहे, याचा अनुभव येतो. मराठी रंगभूमीवर फार्स रूजला, प्रकटला आणि बहरला तो बबन प्रभूंमुळे यात शंकाच नाही.

(लेखिका भाषाशास्त्री, साहित्यिक आहेत.)

दि.२४/११/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल