Sunday, August 25, 2019

कवित्वाची पाक सुराही: अमृता प्रीतम

कवित्वाची पाक सुराही: अमृता प्रीतम

©डाॅ.अमृत इंदूरकर

'अक्षरो का हुस्न, कागज की अमानत है’ असे म्हणणाऱ्या किंवा ‘मेरी सारी रचना क्या; कविता और क्या कहानी और उपन्यास मैं जानती हूँ, एक गैरकानूनी बच्चे की तरह है,’ अशी कबुली देणाऱ्या किंवा ‘हर व्यक्ती की पीडा उसकी अपनी होती है, पर कई बार इन पीडाओं की आकृतियाँ मिल जाती है।’ असे आपल्या साहत्यानिर्मितीचे एक कारण सांगणाऱ्या हिंदी-पंजाबी कवयित्री अमृता प्रीतम अाज आपल्यामध्ये असत्या तर समस्त भारतीयांनी येत्या ३१ ऑगस्टला पूर्ण होणारे त्यांचे जन्मशताब्दीवर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले असते. खरंच विश्वास बसला असता का, की अमृता प्रीतम यांनी वयाची शंभरी गाठली? नक्कीच नाही!
भारतीय साहित्यविश्वाचा विचार केल्यास या साहित्यविश्वाला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक उंचीवर नेण्याचे कार्य कोणी केले असेल तर ते अमृता प्रीतम यांनी पंजाबी आणि तितकेच हिंदी वाङ्मयाला त्यांच्या साहित्यकृतींनी सौंदर्य प्रदान केले आहे, सकस बनविले आहे. अमृता प्रीतम यांच्याशिवाय पंजाबी हिंदी वाङ्मयाचा विचार परिपूर्ण होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे. ३१ ऑगस्ट १९१९ साली जन्मलेल्या अमृता यांचा साहित्यिक पिंड मूलत: कविव्यक्तिमत्त्वाचा आहे. असे असले तरी त्यांनी कादंबरी, कथा, ललित- गद्य आत्मचरित्र, डायरी, पत्रे, वैचारिक मूल्यांकनावर आधारित निबंध इत्यादी वाङ्मयप्रकार लीलया हाताळले आहेत. त्यावर आपला एक वैशिष्ट्यपूर्ण अमीट असा ठसा उमटवला आहे. अमृता प्रीतम यांचे एकूण १६ काव्यसंग्रह आहेत. त्यापैकी ‘कागज ते कैनवास’ साठी १९८१ साली ज्ञानपीठ पुरस्काराने त्या सन्मानित केल्या गेल्या. हा बहुमान प्राप्त झालेल्या त्या पंजाबी साहित्यामधील पहिल्या कवयित्री ठरल्या.


एका कवीला शेवटी काय प्रिय असते? कोणत्याही अभिजात साहित्यिकाला, कवीला त्याची लेखणी, कलम प्रिय असते. तीच खरी त्याच्या सुख- दु:खाची साथीदार असते ही कलमच त्याच्या काव्य-व्यक्तिमत्त्वाचा खरा मापदंड असते. प्रत्येक कवी स्वत:च्या काव्य-व्यक्तिमत्त्वाचा, निर्मिती प्रक्रियेचा, कविता -कलम यांचे त्याच्या आयुष्यात कोणते स्थान आहे या सर्वांचा सतत विचार करीत असतो. अमृता प्रीतमही त्या जाणीवा व्यक्त करताना अपवाद ठरल्या नाहीत. त्यांच्यासाठी त्यांचा आपल्या कलमवर असा काही भरोसा होता की जसा एखाद्या भक्ताचा त्याच्या ईश्वरावर असतो तसा. या कलमला उद्देशून त्यांनी म्हटले आहे ‘ईश्वर जैसा भरोसा तेरा’ कारण आयुष्यात असे कितीतरी दिवस आले जेव्हा या कलमलाच गळ्याजवळ घेऊन रडल्या आहेत. त्या म्हणतात, ‘यह कलम मेरे लिए सदा हाजिर-नाजिर, खुदा के समान रहा है। इसे आँखो से देख सकती हूँ, हाथों से छू सकती हूँ और एक सूने कागजों की तरह इसके गले लग सकती हूँ,’ या लेखणीनेच अमृता प्रीतम यांना त्यांच्या आयुष्य-कहाणीचा शोध घ्यायला कायमच साथ दिली. त्यांची काव्यकहाणी नेहमीच आदी आणि अंताच्या शोधात राहिली आहे.
पण, प्रत्येक कवीचा शोध हा काही फार सुखावणारा नसतोच प्रत्येकाचे दु:ख हे त्याचेच असते, पण सामान्य व्यक्ती या दु:खाला कुठलाच आकार देऊ शकत नाही. मात्र, कवी आपल्या सृजन दु:खाला नेहमीच कलात्मक सौंदर्याने परिपूर्ण असा आकार देऊ शकतो. आयुष्यातले छोटे- छोटे आघात देखील कवीला प्रतिभाहीन करतात म्हणजे त्या आघाताचे दु:ख आणि त्या दुु:खामुळे ती प्रतिभा कवीचा साथ सोडते, असे दुहेरी दु:ख कायमच कवीच्या वाट्याला येते. म्हणूनच अमृता प्रीतम म्हणतात,


कलम ने आज गीतों का काफिया तोड दिया
मेरा इश्क यह किस मुकाम पर आ गया है।


एकीकडे रुसलेल्या कवितेचे दु:ख असले तरी दुसरीकडे त्यांना आपल्या कवयित्री असण्याचा सार्थ अभिमान होता. जेव्हा जेव्हा मृत्यूपासून आयुष्याचा एक-एक क्षण उधार घेतला आहे तेव्हा तेव्हा माझ्या गीतांनी या क्षणांची किंमत अदा केली आहे, असे आपल्या कवितेत त्या मोठ्या अभिमानाने म्हणत.


अमृता प्रीतम यांच्या कवितेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांची कविता ‘ककनूसी नस्ल’ ची आहे. हा शब्द त्यांचाच आहे. अमृता यांना सूर्यप्रतिमेचे प्रचंड आकर्षण होते. त्यांच्या काव्यातून या सूर्यप्रतिमा, तेजप्रतिमा इतक्या ठिकाणी प्रकाशमान होताना दिसतात की सूर्याला त्या आपल्या प्रत्येक रचनेचे जणू काही अर्घ्यच देत आहेत की काय असे वाटावे. ककनूस म्हणजे फिनिक्स पक्षी. तो स्वत:चीच राख सूर्याला अर्पण करतो. या सूर्याला त्यांनी कधी केशरदुधाचा कटोरा म्हटले, त्याची लाली म्हणजे मेहंदी आहे. अशी कल्पना केली. वैयक्तिक प्रेमकवितांमध्ये तर या सूर्यप्रतिमा असंख्य किरण सर्वदूर पसरावेत, तशा विखुरल्या आहेत. त्याशिवाय त्यांच्या सामाजिक कवितांमध्ये देखील या सूर्यप्रतिमेला आवाहन केलेले आहे. त्या एवढ्यावरच नाही थांबल्या तर सूर्याच्या या सर्व रुपांव्यतिरिक्त सूर्यासोबत संभोगाची देखील कल्पना केली आहे. नि:संशय या कल्पनेने एका उत्तम कलात्मक रचनेला जन्म दिला आहे.


एक कटोरा धूप का
मैं एक साँस मे पी लूूँ
और एक टुकडा धूप का
मैं अपनी कोख मे रख लूूँ
और इस तरह शायद
जन्म-जन्म का जाडा बीत जाये...


अमृत प्रीतम यांच्या कवितांचा एक मोठा भाग प्रेमजाणिवेनी व्यापलेला आहे. ती त्यांच्या काव्याची केंद्रवर्ती जाणीव आहे. त्यांच्या प्रेमकवीतांचा मूर्त चेहरा स्वत: अमृता प्रीतमच आहेत, इतक्या त्या सहज आहेत. त्यांच्या प्रेमकविता जे अनुभवलं, जसं अनुभवलं त्यातून साकार झाल्या आहेत. प्रेमातल्या विविध अनुभूतींना त्यांनी एका सच्चेपणाने कवितेतून मांडले आहे. त्या त्यांच्या प्रेमाचे वर्णन. ‘सच्छे दुध जैसी मेरी मुहब्बत’ असे एका वाक्यात करायच्या. त्यांच्या कवितेतील सजन जितका सत्यरूप आहे तितकाच स्वप्नरूप आहे. जितका परका आहे तितकाच आपला आहे. प्रेमात आकंठ बुडालेल्या व्यक्तीला एक तर त्याची मुहब्बत हवी असते, नाहीतर मोक्ष हवा असतो. त्याचे प्रेम हे ईश्वरस्वरूप कधी होते, हे त्यालाही कळत नाही. या प्रियकरायमध्ये जेव्हा ईश्वररूप दिसायला लागले तेव्हा अमृता प्रीतम म्हणतात,


‘खुदा का इक अन्दाज तू
औ’ फजर की नमाज तू
अल्लाह की इक रजा भी तू
यह सारी कायनात तू
खुदा की मुलाकात तू’


माणसाला दु:खात नेहमीच ईश्वराचे स्मरण होत असते. मनातून सततच ईश्वराशी संवाद साधत सर्वकाही सांगितले जाते. पण, प्रेमव्यथा सांगायला ईश्वराचे स्मरण करावे आणि त्याचवेळी प्रियकरच ईश्वराच्या जागी दिसावा इततकी तद्रूपता अमृता प्रीतमना देखील आश्चर्यचकीत करून गेली. आपल्या प्रेमाने आता आपल्या मनातील ईश्वराचा दर्जा प्राप्त केला आहे, हे जेव्हा त्यांना जाणवले तेव्हा त्या म्हणाल्या ‘अल्लाह, यह कौन आया है। कि तेरी जगह जबान पर। अब उसका नाम आया है?’


इतकी भावविव्हळ कविता लिहिणाऱ्या अमृता प्रीतम यांचे कवयित्री म्हणून तितकेच उग्र रूप त्यांच्या सामाजिक कवितांमधून दिसते. त्यांनी फाळणीचा घाव झेलला, सोसला असल्यामुळे त्यांच्या सामाजिक कवितांना एक वेगळीच धार आहे. फाळणीवर आधारित ‘मजबूर’ कविता भारतमातेची अगतिकता व्यक्त करते.


‘मेरी माँ की कोख मजबूर थी
आजादियों की टक्कर में
उस चोट का निशान हूँ
उस हादसे की लकीर हूँ
जो मेरी माँ के माथे पर
लगनी जरूर थी’


स्वत:च्या फायद्यासाठी जे जनतेचे आहे, त्याचीच निर्लज्जासारखी चोरी करणारे नेते, त्यांच्या कवी नजरेतून सुटले नाहीत. ‘मेरा शहर एक लम्बी बहस की तरह है। असे त्या म्हणतात. या शहरातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू कशी पोखरली गेली आहेे, स्वार्थाचा, विकृतीचा किडा लागून कशी सडली आहे, हे त्यांनी ‘शहर’ कवितेतून सांगितले आहे. ‘घोर काली घटा’ या पंजाबी कवितेत तर खालच्या दर्जाची पत्रकारिता, धार्मिकतेवरून अंदाधुंदी माजवणे, समाज आणि राजनीतीचा केलेला वैचारिक चिखल यावर त्यांनी प्रखर, भडक शब्दांत व्यक्त झाल्या आहेत.


एक कवयित्री म्हणून त्यांच्या शैलीचा जेव्हा विचार आपण करतो, तेव्हा त्यांच्या काव्यशैलीतील रूपक, प्रतिमांची श्रीमंती लक्षणीय आहे हे प्रकर्षाने जाणवते. आपली प्रत्येक संवेदना, जाणीव व्यक्त करताना त्यांनी समस्त निसर्गच प्राशन केला आहे आणि या निसर्गावरच मानवी भाव-भावनांचे आरोपण करीत एक-एक रूपकात्मक काव्यफुले त्या उधळत आहेत, असे वाटते.


भारतीय पंजाबी, हिंदी साहित्यजगतामध्ये एक कवयित्री म्हणून अमृता प्रीतम यांची छबी अशी आहेे; ज्यांनी जीवन जगण्यामध्ये आणि कविता रचण्यामध्ये कधीही एक विभाजक रेषा निर्माण केली नाही. ती इतकी पारदर्शी आहे की त्यांच्या कवितांना जाणणे म्हणजे स्वत:ला कुठे ना कुठे ओळखणे आणि या जगाच्या समस्त प्राणस्पंदनाला मानव हृदयाच्या स्पंदनाशी सन्मुख होणे आहे.


(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
२५/०८/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

Monday, August 12, 2019

श्रावण झड बाहेरी....श्रावण गळतो दूर....

श्रावण झड बाहेरी....श्रावण गळतो दूर....
©डाॅ.अमृता इंदूरकर
             तापलेल्या धरतीला शांत करणारा आषाढ- श्रावण! आपल्या थेंबाथेंबातून सृजनाचे हिरवे सोहळे साजरे करणारा श्रावण! पोळलेल्या मनांवर आपल्या श्रावणसरींचे शिंपण करून मनाला निववणारा, सावरणारा श्रावण! पोपटांनी खाऊन खाली पडलेल्या पिकलेल्या लिंबोण्याच्या कडूसर, ओलसर गंधाने भारलेले रस्ते, श्रावणातली झड किंचित कमी होत नाही तर दडी मारुन बसलेल्या दयाळ पक्ष्याचा तार सप्तकातील सूर, कधी नव्हे ती मोकळ्या मैदानावर साचलेल्या पाण्यातील किडे खायला उतरलेल्या टिटवीची कर्कश आरोळी आणि विजेच्या, टेलिफोनच्या निर्जीव तारांवरून वर्गातील शहाण्या मुलांप्रमाणे रांग लावून टप टप गळणारे पावसाचे थंड थेंब आणि मुसळधार पावसात चिंब भिजलेल्या ललनेने एका जागी थांबून पाऊस थांबवण्याची शांतपणे वाट पहावी तशी चिंब भिजलेली, पानं पानं अंगाभोवती गुंडाळलेली हिरवी हिरवी झाडे. या श्रावणांची जितकी रुपे वर्णन करावीत, तितकी कमीच. कारण हा श्रावण याही पलीकडे अजून बराच आहे. जसा आपल्या मनातला तसा दुसऱ्यांच्याही मनातला. हे दुसरे कवीमन असेल तर मग या श्रावणाला चढलेला काव्यसाज त्याचे सौंदर्य अधिकच खुलविणारा ठरतो.
          श्रावणातली पावसाची पहिली दमदार सर आली की नकळतच आपले मन बालपणीचा ठेका धरते आणि गुणगुणायला लागते *श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे* बालकवींची ही अजरामर कविता. हा श्रावणमास तर बालकवींच्या भोवती फेर धरून आनंदाने नाचत होता. जिकडे बघावे तिकडे श्रावणसौंदर्याच्या खुणा विखुरल्या होत्या. वरती बघावे तर नभोमंडपात इंद्रधनुचा दुहेरी गोफ विणलेले मंगल तोरण दिसते. सूर्यास्त होता होता तरुशिखरे, गृहशिखरे पिवळ्या पिवळ्या ऊन रंगात रंगून जातात. आकाशात जमलेल्या जलदांना विविध संध्याराग सुंदरतेचे रुप रेखतात. मधूनच दूरवर उडणारी बगळ्यांची माळ ही जणू काही कल्पसुमाची माळ भासते. वरून खाली उतरताना ही माळा अवनीवर उतरणारे ग्रहगोलच भासतात. समस्त पशू, पक्षी, गोप, गोपी हा आनंद सोहळा साजरा करण्यात दंग असतात. कुठे सुवर्णचंपक फुलतो तर कुठे केवडा दरवळतो आणि पारिजात तर जणू काही सत्यभामेच्या रोष दूर करायलाच फुलतो. गावातल्या सुंदर बालांना या फुलांचे वेड लागले नाही तरच नवल. या फुलांच्या मोहापायी गावातील सुंदर बाला हातात परडी घेऊन फुले, पत्री खुडायला नगरवेशीपर्यंत जातात. हा श्रावणहर्ष त्यांच्या हृदयात मावत नाही तेव्हा त्यांच्या मुखातून श्रावण महिन्याच्या गीत गायनास प्रारंभ होतो.
           बालकवींनी हा श्रावणहर्ष थुई थुई उडणाऱ्या कारंज्याप्रमाणे व्यक्त केला. तर कवी अनिलांचा श्रावणहर्ष अंतर्मुख करणारा आहे. मनाची फार अस्वस्थ करणारी भावना कवी अनिल व्यक्त करतात.
श्रावण झड बाहेरी, मी अंतरी भिजलेला
पंखी खुपसून चोच एक पक्षी निजलेला...
बाहेर अखंड श्रावणझड सुरु आहे. आणि मी मात्र अंतर्मनातून भिजलो आहे. मन कसे सुप्तावस्थेत गेले आहे एखाद्या चोच खुपसून निजलेल्या पक्ष्याप्रमाणे. आकाशाच्या हृदयालाही हा ओला भार सोसवत नाही आहे थेंब थेंब पाझरून, विझलेला लांब दिवस चिंब करीत, तो देखील संततधार पाझरतो. जळात पसरलेल्या उथळ पालवीमध्ये मध्येच कुठेतरी काहीतरी क्षणमात्र हालचाल होते. तशीच मनाच्या तळात कुठेतरी अव्यक्त स्वरूपाची स्मृतिरुप क्षणजीवी हालचाल होते. कधीतरी काहीतरी आठवून मनाचे तळ ढवळल्या जातात आणि आपलेच प्रतिबिंब धूसर होते हे जाणून कवी अनिल म्हणतात,
चळते प्रतिबिंब जरा स्थिर राहुन थिजताना
बिंदुगणिक उठलेले क्षीण वलय विरताना
अशा झिमझिमणाऱ्या पाऊसवाऱ्यालाही एक स्थायी लय धरून असते.पण श्रावणाने केलेल्या या संमोहनाच्या निद्रेतून माझ्यातील शब्दांना देखील जाग कशी येणार असा प्रश्न शेवटी अनिल विचारतात.एका कवीमनाची शब्दविरहीत झड कधी थांबणार असा प्रश्न ते स्वतःलाच करतात.
            हा श्रावण डोळ्यांनी, कानांनी कितीही प्राशन करा, अगदी अंगांगावर गच्च माखुन घेतला, सर्वदूर पसरलेली हिरवाई सर्वांगावर लिंपून जरी घेतली तरी तनामनाचे समाधान होणार आहे का? हेच मर्ढेकर ' आला आषाढ-श्रावण'या कवितेतून म्हणत आहेत.हा आषाढ-श्रावण आपल्या परीने कितीही लुटला तरी 'किती चातकचोचीने/प्यावा वर्षाऋतू तरी? अशी अवस्था होते. इथे मर्ढेकरांनी चातकचोच म्हटले.पावसाच्या पाण्यावरच आपली वर्षभराची तहान भागविणारा चातक असा कितीसा?त्याची चोच अशी ती केवढी असणार?माणसासाठी अशा चातकचोचीची प्रतिमा वापरून श्रावण उपभोगण्यातला अपुरेपणा,असमाधान मर्ढेकरांनी चपखलपणे व्यक्त केले.या कवितेचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रत्येक कडव्याच्या दोन ओळी निसर्गसौंदर्य व्यक्त करतात व पुढच्या दोन ओळी रस्ते, घरे,घरावरील वाळणारे कपडे अशा वस्तुंचेही वर्णन करतात.पण यामुळे कवितेच्या सौंदर्याला,रसास्वादाला कुठेही बाधा येत नाही.एकीकडे ओल्या झालेल्या काळ्या ढेकळांचा गंध कळ्यांत भरला जातो तर दुसरीकडे काळा डांबरी रस्ता देखील निर्मळ, निवांत होतो.चाळीचाळीतून ओली चिरगुटे चिंब होतात आणि त्याच वेळी ओल्या कौलांमधे जणुकाही मेघ भरून जरा खाली येऊन त्या कौलांची लाली हुंगतात.पक्षी झाडावर बसल्या बसल्या ओल्या पानातल्या रेषा वाचतात आणि आख्खे रान पोपटी रंगाची नक्षी काढण्यात गर्क होते.अशावेळी मर्ढेकरांना अचानक यमदेवाची व विजेची आठवण होते.
                 खरेतर श्रावणसौंदर्य आणि यमाचा काय संबंध पण श्रावण हे सृजनाचे प्रतिक. या सृजनसोहळ्याला बघून विनाशाचे प्रतिक असणारा यम आणि वीज जरा ओशाळतात अशी ते कल्पना करतात. कारण वीजही कोसळली तर हे सौंदर्यच नष्ट होईल या भावनेने ती ओशाळते. अशी ओलसर गोडी आलेल्या भावनेने मनातील तापलेल्या तारा निवांत संथ होतात; सर्व दिशा पंथ, देखील निवतात.
            रिमझिम रेशिमधारांमध्ये झाडाझाडातून, पानापानातून पाडगावकरांचा श्रावणातील हा घननीळ सर्वत्र हिरवा मोरपिसारा फुलवत बरसत राहतो. श्रावणात हा पाऊस जिथे तिथे हिरव्या पाचूचा गिलावा करीत असतो. पाडगावकर हे निसर्गसौंदर्य अचूक टिपतात.
पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले
माझ्या भालावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा
पानोपानी विखुरलेल्या शुभशकुनाच्या खुणा बघून अंतर्यामीचा सूरही गवसतो आणि मन त्या आनंदातच रममाण होते. कोरड्या श्रावणाची तर आपण कल्पनाही करू शकत नाही. मग तो पावसाचा असो नाहीतर प्रेमाचा. असे कोरडेपण स्मृतिरुपाने जेव्हा ग्रेस यांना व्याकूळ करते तेव्हा हे थेंब उणे ऊन माळावर जळत असल्याचे वाटते आणि श्रावणाच्या ओलसर पारदर्शी काचेवर तडे गेल्याचे त्यांना दिसते. ग्रेस यांची 'श्रावण' ही कविता तर निसर्गातील श्रावणाचा आणि मनातील श्रावणाचा विलक्षण असा मेळ साधणारी कविता आहे. बाहेर श्रावण दूरपर्यंत गळतो आहे नदीला पूर येतोय तर आत हा श्रावण दूरपर्यंत रडतो आहे असा की मनातील तयमालाही त्याचा सूर प्राप्त होत आहे. या श्रावणाची धून एका मनाला स्तनांवर गळणाऱ्या निळ्या अस्मानावर आसक्त व्हायला भाग पाडते तर दुसऱ्या मनाला सगुण  फुलांच्या मंद क्षितीजात जडते.  मनाची ही द्वंद्वांत्मक अवस्था या श्रावणाच्या गारुडामुळेच होते. शांता शेळके यांचा श्रावण तर ओळखीची -अनोळखीची गूढ जाणीव घेऊन येणारा आहे. घडी करून फडताळात जपून ठेवलेल्या पैठणीला देखील कितीक श्रावणांचा गंध अजूनही चिकटला आहे. श्रावण आणि सणवार यांचा स्त्रीशी येणारा जीवाभावाचा संबंध आणि त्याच्या आठवणी शांताबाईंनी अगदी हळुवार शब्दांत टिपल्या आहेत.
धूप, कापूर, उदबत्त्यांतून जळत गेले किती श्रावण
पैठणीने या जपले तन.... एक मन.
आजतागायत मराठी कवींनी या श्रावणाची विविधांगी रुपे आपल्या काव्यातून रंगवली. तरी या श्रावणाचे वर्णन परिपूर्ण थोडीच झाले आहे. हा आषाढ, श्रावण रसिकचोचीने कितीही प्यायला तरी तो शिल्लक राहणारच आहे परत तृषार्ततेने तितकाच अधीर, तितकाच हळूवार...
(लेखिका समीक्षक,भाषाशास्त्र अभ्यासक आहेत)
संपर्क-mail id- amrutaind79@gmail.com
११/०८/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

Sunday, July 28, 2019

मातीशी एकरूप झिंजीर सांज...आणि...

मातीशी एकरूप झिंजीर सांज...आणि...
डाॅ अमृता इंदूरकर
वाचक हो, या सदरातील मागील लेखात साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांच्यातील क्रांतिकारक नाटककार आपण अनुभवला. प्रस्तुत लेखात  कवी म्हणून विष्णू वाघ  कसे निराळे आहेत, ते पाहू. वाघ एक नाटककार म्हणून परखड, सडेतोड, आक्रमक आहेत. मात्र, कवी म्हणून त्यांच्यामधील हळूवार, संवेदनशील पिंड प्रामुख्याने जाणवतो. कवी म्हणूनही त्यांचे भरपूर योगदान आहे.
झिंजीर झिंजीर सांज, फील गुड फेणी, सुशेगाद, वाघनखे, लोकोपनिषद, बच्चूभायची वाडी, सूदिरसूक्त हे कोकणी आणि ‘ती बाई मीच आहे’ ही त्यांची काव्यसंपदा प्रसिद्ध आहे. हे सर्व कवितासंग्रह बघितले तर असे लक्षात येते की आपल्या काव्याची नाळ मातीशी जुळवून ठेवतच त्यांच्या काव्यजाणिवांचा विकास झाला आहे. बालपणी मिळालेल्या सामाजिकतेच्या बाळकडूचे प्रतिबिंब त्यांच्या जवळ जवळ सर्वच काव्यामध्ये उमटलेले दिसते. वाघ हे आपल्या कवितेमार्फत समाज, संस्कृती, रीतिरिवाज, स्त्री मन या सर्वांनाच पुढे नेणारे कवी आहेत. या सर्व काव्यसंग्रहातून त्यांच्या प्रतिभेचे विविध पैलू अनुुवायला येतात. पण एक कवी म्हणून मात्र शेवटपर्यंत ते कायमच आत्ममग्न, अंतर्मुख राहिले.
विष्णू वाघ यांच्या काव्यपिंडाचे मूळ शोधायचे झाल्यास त्यांच्या ‘झिंजिर ​झिंजिर सांज’ या काव्यसंग्रहामध्ये ते मिळते. माझ्या डोंगरीत घुमे। पिढ्या-पिढ्यांचा रे ढोल।। मंद वाजते सुवारी। तिला काळजाची ओल।।असा आपल्या जन्मभूमीचा गौरव ‘माझी डोंगरी डोंगरी’ या कवितेतून ते करतात. जेथे आपण जन्मलो तेथल्या पारंपरिक लोक जीवनाशी, लोकसंस्कृतिशी कसे एकरूप झालाे आहोत, हे काव्याद्वारे लोकसाहित्याच्या अंगाने काव्यमय रुपात मांडायची वाघ यांची हातोटी वेगळीच आहे. गोव्यातील लोकजीवनामध्ये घडणाऱ्या विविध सामान्य, पण निरंतर अशा गोष्टींचे प्रभावी उल्लेख ‘झिंजीर सांज’ मध्ये येतात.
गोमंतकीय भूमीला लगडून आलेल्या ख्रिश्चन आणि पोर्तुगीज मिथकांचे दर्शन या कवितांमधून घडते. त्यांच्या सुवारी, इंत्रूज, धेंडलो, देवचार, भूतावळ, इंगर्ज, मेरी, रोंबाट या कवितांना अस्सल लोकजीवनाचा सुगंध लगडलेला आहे. गोव्यातील शिमग्याच्या सणातील वाजणाऱ्या ढोल, ताशा आणि कांसाळ्याच्या नादातून निर्माण होणारा आवाज  ‘घणचे कटर घण’हा त्यांना गोव्याच्या मातीतला आदीताल वाटतो. म्हणून गोव्याच्या भूमिपुत्राचा उल्लेख करताना ते म्हणतात, ‘घणचे कटर घण। पेटव रे भुईपुता। जिविताचे रण।’. हा शिमग्याचा जळणारा सण साजरा करण्यासाठी थोडी राख चाचपून ठिणगीचा कण शोधू, असे त्या भूमीपुत्राला आवाहन करतात. इंत्रूज म्हणजे अनंत उर्जा. न संपणाऱ्या अनंत उर्जेचा आनंददायी महोत्सव. पोर्तुगाल, स्पेन, ब्राझिल, अर्जेंटिना इथे याला ‘कार्निव्हल’ म्हणतात. तोच हा इंत्रूज. तो साजरा होत असताना प्रत्येकाला आनंदाचे उधाण येते, त्याचे वर्णन करताना वाघ म्हणतात, ‘पेड पिंपळाचे तिथे। देव शिंपतो गुलाल। भिडे ​काळजा काळीज। मिठी होते लालेलाल।’
धेंडलो’ ही गोव्यातील शेतकऱ्याच्या उत्सवावरील आहे. पाऊसपाणी बऱ्यापैकी झाले, शेती- भाती उत्तमरीत्या पिकली की कापणीचा आनंद व्यक्त करणारा हा ‘धेंडलो’. पण वाघ यांनी वर्णन केलेला ‘धेंडलो’ मात्र वाचकाचे मन विव्हळून टाकणारा आहे. पावसाने अवकृपा केली असल्याने हा धेंडलो नवसाला देखील पावला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ‘सुकले आसू डोळ्यांतले। भिजले गाणे गळ्यातले’ अशी झाली आहे. ‘सुंवारी’ ही कविता गोव्यातील आदिम लोकवादन प्रकारावर आधारीत आहे. तिच्या नादाची लय साधून त्यावर, अजाणता गर्भारपण भोगावं लागलेली एक कुमारी, वेदनेच्या झळा भोगते त्याचे वर्णन चपखल बसवले आहे. ‘नभाखाली माडावरी। वाजते सुंवारी। पोटातला गर्भ माये। लागतो जिव्हारी।’
सर्वत्र अंधार होता आणि या अंधारात प्रणवाच्या हुंकाराची खळबळ झाली आणि असे म्हणतात की तेव्हा मायेच्या गर्भातून विश्वाची निर्मिती झाली. म्हणजे मूळ माया या सृष्टी जन्माला कारणीभूत ठरली. पण, हे झाले ऋग्वेदाच्या नासदीय सूक्तांमधील सृष्टी उत्पत्तीचे ज्ञान. हेच ज्ञान मात्र जेव्हा विष्णू वाघ यांनी शेतकरी स्त्रियांच्या ‘धालो’ या लोकगीतातून ऐकले, तेव्हा त्यांना जाणवले की जणूकाही आपल्या आया-बहिणींच्या या गीतातून साक्षात वेदच ऐकला. धालो उत्सवात या स्त्रिया स्वत:ला ‘सरगीच्या देवरंभा’ म्हणवून घेतात. म्हणजे स्वर्गातील देवरंभा! आम्ही सरगीच्या देवरंभा साक्षात नक्षत्रांची चंद्रप्रभा चुंबून आलो आहोत. आम्ही ‘शारदेच्या रतनजुई। परमळाया आलो भुई। गंध मोर थुई थुई।’ असे त्या म्हणतात. यामध्ये वाघ यांनी गोव्याच्या लोकजीवनाचा अविभाज्य अंग बनलेले खारवी-गाबती, देवचार, जागोजागी दिसणारे खुरीस (क्रूस), शेतातली खोप, ग्रामदेवतेच्या पायाशी कौल घेणारा कोकणी माणूस, दर्या, किनारा अशा कितीतरींवर एकेक स्वतंत्र कविता लिहिली आहे. बालपणापासून हे सर्व मनात साठवून, जपून ठेवलेलं कवितेतून व्यक्त करताना जणू काही मनाची अवस्था त्या सागरातील भांग पाण्यासारखी होते. जिथे भरतीही नसते आणि सुकतीही नसते. अशा झिंजिर सांजवेळी आकाशात चंद्र असताना दगड पाण्यात भिरकावला की जणूकाही पाण्यात चांदणचुरा पडल्याचा भास होतो. या कविता लिहिताना अशीच काहीशी अवस्था विष्णू वाघ यांची झाली असणार म्हणून ते म्हणतात. ‘थरथरल्या हातांनी। लावला लामणदिवा। चंद्रिमाची चूड घेऊन। धाव आता देवा। सैरावैरा पाणियाला। कशी घालू बांध...... झिंजिर झिंजिर सांज।
कल्पना करा की समस्त कवी-कवयित्रींना प्रतिभारुपी परमन प्रवेशाचे वरदान नसते तर काय झाले असते? कवयित्रिंनी पुरुषांचे मन व्यक्त होणाऱ्या कविता लिहिल्या नसत्या तसेच कवी देखील कवितेतून स्त्रीमन व्यक्त करण्यास असमर्थ ठरले असते. पण, जेव्हा एखादा कवी याच्याही पलिकडे जाऊन म्हणतो ‘ती बाई मीच आहे’ तेव्हा त्याला नक्की काय म्हणायचे असतेे? याचे उत्तर विष्णू सूर्या वाघ त्यांच्या अगदी अलिकडचा कवितासंग्रह ‘ती बाई मीच आहे’ मधून देतात. प्रत्येक स्त्रीमध्ये सूक्ष्म रुपात स्त्रीत्व असते, या पुरुषातील बाईच्या शोधातून वाघ यांची ही दीर्घकविता जन्माला आली आहे. वैचारिक पातळीवर पुरुषामध्ये वसत असलेल्या बाईनेच या कविता लिहिल्या आहेत, असे वाघ स्वत: म्हणतात. हे समस्त विश्व बाईने व्यापलेले आहे. त्यावर असा एकही कोपरा नसेल जिथे फक्त पुरुष आहे, पण एकही बाई नाही. बाईच्या या विश्व व्यापकतेला समजून वाघ तिच्या असण्याचा व्यापक पट स्पष्ट करताना ती घरी-दारी, बंगल्यात-शहरात, चॅनलवर-पॅनलवर, जत्रेत-यात्रेत, मैफलीत-सहलीत, कवितेत-कवेत, श्वासात-ध्यासात, ग्लासात, पूजेत-मजेत, पदरात -उघडी - नागडी, विझवणारी - निजवणारी, अबोल- बोलकी अशी कितीतरी रुपे मांडली आहेत, पण शेवटी दोन्हीकडून थापा खाणारी मुकीच ढोलकी असते ती, असेही सांगतात.
वाघ यांच्या कविमनातील बाईचे पहिले रुप तीन प्रतिमांना साकारणारे आहे. पहिली आई, दुसरी आजी, तिसरी मुलगी. म्हणजे स्त्रीच्या जीवनात येणाऱ्या तीन स्थित्यंतरांना लक्षात घेऊन या तीन बाया साकार होतात. मुलीचा उल्लेख करता करता वाघ समस्त पुरुषप्रधान व्यवस्थेलाच एक बोचरा प्रश्न विचारतात की मुलीशी लग्न केल्यानंतर तुम्ही तिचे नाव बदलता. तिच्या बापाच्या जागी तुमचे नाव येते, पण खरंच का मग तुम्ही बापाची जागा घेता का? इथे तर तुमच्या असण्या-नसण्यावरुन बाईला विशेषणे लावली जातात. कुमारी- सौभाग्यवती- सवाष्ण -विधवा असा क्रम पिढ्यानपिढ्या चालत आला आहे, पण तुम्ही मात्र आयुष्यभर श्री किंवा मिस्टरच. समाजात चार वर्षाच्या मुलीपासून तर वृद्धेपर्यत ही बाई पुरूषाच्या वासनांध नजरेतून कधी सुटत नाही. शेतात पुरूषाच्या बरोबरीने राबणारी बाई असो किंवा मोलमजुरी करणारी मजूर बाई, मेहनताना तिला मात्र पुरुषापेक्षा अर्धाच दिला जातो. कारण काय तर ती बाई आहे म्हणून? खानदानी घरातली बाई असो किंवा गरिबीत जिवाचा आटापिटा करत जगणारी बाई, तिच्या बाजूला बसून तिच्या हातच्या गरम भाकऱ्या खाताना मात्र तिच्या करपलेल्या काळजाचा वास पुरुषांना कसे बरे येत नाही? खुळचट अंधश्रद्धेच्या लोकसमजुतीतून या बाईला देवाच्या नावाने सोडून दिले जाते. गावातल्या तमाम पुरुषांना लचके तोडायला तर कधी झारखंड, राजस्थान, छत्तीसगड, सारख्या ठिकाणी स्वत:च्या चारित्र्याची जपणूक करणाऱ्या बाईला अशुभ ठरवून डाकीण, चेटकीण ठरवून भर गावात निर्वस्त्र केले जाते.
बाईला अशी वागणूक देणाऱ्या समाजातील लोकांच्या मनोवृत्तीची पाळंमुळं वाघ यांना पूर्वसुरींमध्ये दिसतात. प्रत्येक धर्मात प्रारंभापासूनच धर्मकार्यापासून स्त्रीला ठेवले आहे. यावर ते प्रश्न विचारतात की तिला कधी गायत्री मंत्र म्हणण्याचा, यज्ञोपवित घालण्याचा अधिकार दिला नाही. तिला कायमच मशिदीत जाऊन नमाज पढण्यासाठी मज्जाव केला जातो. चर्चमध्ये कधीही प्रिस्ट होउन ‘सेरमन’ सांगण्याचा अधिकार बहाल केला? कधी साध्वी म्हणून वापरुन घेतली तर कधी धर्माच्या नावाचे साखळदंड तिच्या पायात अडकवले. पुराणात द​क्षाला देखील जेव्हा जाणीव होते की स्त्री निर्माण केली नाही तर सृष्टीचे सृजनचक्र चालणार नाही, मग दक्ष साठ कन्यांना जन्माला घालतो. म्हणजे नक्की कोणत्या स्वार्थातून या स्त्रियांचा जन्म झाला आहे, हे वेगळे सांगायला नको.
अहल्या, सावित्री, सीता, शकुंतला, सत्यवती, गांधारी, कुंती, द्रौपदी यांसारख्या भारतीय परंपरेत आदर्श असणाऱ्या स्त्रिया. मदर मेरी, मारिया या ख्रिश्चन धर्मातील पूज्य स्त्रिया आणि मुस्लिम धर्मात जिच्या संरक्षणासाठी कुराणालाही झाकून ठेवलंत शरीयतच्या काळ्या बुरख्याआड, अशा सर्व स्त्रिया आज आपल्यासमोर श्रद्धास्थानावर आहेत, पण खरंच का तेव्हा त्यांच्या वाट्याला खरा मान-सन्मान, आदर मिळाला एक बाई म्हणून? असा प्रश्न वाघ यांनी वारंवार विचारला आहे.
पुराणकाळापासून वर्तमानकाळापर्यंत बायांची विटंबना करणारी रुपे मांडल्यानंतर शेवटी वाघ यांनी या स्त्रीमधल्या शक्तीचेही रुप उलगडले आहे. गार्गी, मैत्रेयी सारख्या वेदांच्या अधिकारी बनल्या. कृष्णाला मदत करणारी सत्यभामाही आहे, पुत्राला या आर्यावर्ताचा राजा करणारी शकुंतलाही आहे. साक्षात ज्ञानियांच्या राजाला उपदेश करणारी मुक्ताबाई आहे, भरल्या बाजारी डोईचा पदर पाडून जाणारी जनाबाई आहे. शिवबाला स्वराज्य प्रेरणा देणारी जिजाऊ पण आहे. तुकारामाच्या भक्तीचा जळता अंगार पदरात बांधून घेणारी आवली पण आहे. वैधव्यावर मात करणाऱ्या पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर आहेत. ताराराणी, झाशीची राणी, कित्तूरची चन्नमा, रजिया सुलतान, ज्योतिबांची ढाल बनणारी सावित्रीबाई आहे. भीमाच्या पाठीशी असणारी रमाई आहे.
आज अशी कितीतरी स्त्रीची प्रेरणादायी रूपे आहेत. ज्यांनी इतिहास घडविला, देश बनविला, तरीही कवी वाघ यांचा शेवटचा उद्गार वाचकांना अंतर्मुख करतो,
यातली प्रत्येकजण
निश्चितपणे आहेच एक ठिणगी
पण प्रत्येकवेळी स्वतंत्रपणे पेटणारी
आणि म्हणूनच
तुमच्या निगरगट्ट मानसिकतेने
अद्यापही न स्वीकारलेली
ती बाई मीच आहे!
ज्या दिवशी प्रत्येक पुरुष त्याच्यात वास करणाऱ्या या बाईच्या विविधांगी रूपाला खऱ्या अर्थाने समजेल, त्या दिवशी ‘ती बाई आहे बरं’ असा वेगळा उल्लेखही करण्याची गरज पडणार नाही.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
२८/०७/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

Sunday, July 14, 2019

सिध्दहस्त नाटककार:विष्णू सूर्या वाघ

सिध्दहस्त नाटककार:विष्णू सूर्या वाघ
डाॅ.अमृता इंदूरकर

            कधी कधी असे वाटते की या ब्रह्मांडाच्या अवकाशात निर्माण होणारी प्रचंड ऊर्जा जेव्हा ब्रह्मांडालाच पेलवत नाही, मावत नाही तेव्हा ती पृथ्वीवरील काही लोकांमध्ये संक्रमित केली जाते. या लोकांच्या बाैद्धिक शक्तीचा जसजसा इतरांना अनुभव येतो तसतसे या त्यांच्यामध्ये असलेल्या ऊर्जेचे विविध आयाम स्पष्ट होऊ लागतात. असेच एक प्रचंड ऊर्जा अंगी वागविणारे, गोमंतकीय भूमीतील व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘विष्णू सूर्या वाघ.’
गेल्या फेब्रुवारीत ते आपल्यामधून निघून गेले. येत्या २४ जुलैला त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त नाटककार विष्णू वाघ आणि कवी विष्णू वाघ अशा दोन लेखांद्वारे त्यांचे स्मरण करून त्यांच्यातील साहित्यिक उर्जेचा एक स्रोत समस्त वाचकांपर्यंत पोहचविण्याचा एक प्रयत्न.

खरेतर केवळ नाटककार आणि कवी एवढीच विष्णू सूर्या वाघ यांची आेळख मर्यादित नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अजून काय काय होतं? असे विचारण्यापेक्षा काय काय नव्हतं? हे विचारणे अधिक योग्य ठरेल. नाटककार कवी यासोबतच उत्तम साहित्यिक, संगीततज्ज्ञ, चित्रकार, वक्ता, गायक, वादक, उत्तम अभिनय, पत्रकारिता, संपादनकार्य, राजकारण, प्रवचनकार, पुराणाचे गाढे अभ्यासक, अध्यात्मचिंतक अशा सर्व सर्व क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटविणारे उर्जस्वल रसायन होते ते. याशिवाय आमदारकी, कला अकादमीचे अध्यक्षपद, ‘काव्यहोत्र’ हा लोकप्रिय उपक्रम लीलया समर्थपणे हाताळणारे असे विष्णू सूर्या वाघ म्हणजे हरहुन्नरी, जिंदादील, झंझावाती व्यक्तिमत्त्व.

नाटककार म्हणून विष्णू वाघ सिद्धहस्तच होते. कोकणी व मराठी मिळून चाळीसहून अधिक नाटके त्यांनी लिहिलीत. ‘एका माणसाचा मृत्यू’ हे त्यांचं पहिलं नाटक. या चाळीस नाटकांमध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर ‘धर्मश्री’, ‘समुद्रपक्षी’, ‘साम्राज्य’, ‘तुका अभंग अभंग’, ‘पुन्हा एकदा’, ‘भगव्या मातीचा माणूस’, ‘घर थकलेले एकाकी’, ‘स्मशानवेद’, ‘शिवगोमंतक’, ‘सुंवारी’, ‘पेद्रू पडलो बायंत’, ‘तीन पैशांचो तियात्र’ यासारख्या नाटकांचा समावेश आहे. यापैकी, ‘तुका अभंग अभंग’, ‘शिवगोमंतक’ आणि ‘आदित्यचक्षू’ ही तीन नाटके ग्रंथ स्वरूपात प्रकाशित झाली व याचे बरेच प्रयोगही झाले. त्यातही यामध्ये ज्या दोन नाटकांनी इतिहास घडविला ती नाटके म्हणजे ‘तुका अभंग अभंग’आणि ‘आदित्यचक्षू’. ही दोन्ही वाखाणण्यासारखी नाटके.
दोन्ही नाटकांतील वाघ यांना जाणवलेले वेगळेपण आता पाहू.

नाटकांतील वेगळेपण :

‘तुका अभंग अभंग’ या शीर्षकावरुनच स्पष्ट होते की हे संत तुकाराम महाराजांवर आधारित नाटक आहे. आजवर मराठी साहित्यात संत तुकारामांवर कितीतरी लेखक, साहित्यिकांनी लिहीलेले आहे. मग या नाटकात वेगळे असे काय आहे? हा प्रश्न साहजिकच पडतो. उलट या नाटकात इतके असे काय वेगळे आहे, ज्यामुळे हे नाटक वादग्रस्त ठरले, त्यांच्या प्रयोगांवर बंदी आली होती, असे विचारणे अधिक संयुक्तिक ठरेल. सहा-सात वर्षे अखंडपणे वाघ यांच्या मनात तुकारामावरील नाटक लिहिण्याचा विचार घोळत होता. संतांपेक्षा तुकोबा वेगळे आहेत. ते केवळ भक्तीत अडकलेले नाहीत. त्यापलीकडे गेलेले आहेत. त्यांचा ‘विठ्ठल’ हा केवळ पंढरपूरच्या विटेवर उभी असलेली पाषाण मूर्ती नाही. त्यांची भाषा केवळ भावनेने आेथंबलेली नाही तर क्रांतीनेही पेटलेली आहे, हे सतत विष्णू वाघांना जाणवत होते. खऱ्या अर्थाने तुकारामाला आत्मसात करून पचवून घेताना विष्णूपंत पागनीसांनी रंगवलेला भोळा, रडका, व्यवहारशून्य तुकाराम तेवढा मराठी जनतेच्या मनात ठसला आणि भोवतालच्या प्रखर सामाजिक वास्तवातून आत्मभानाचा वेध घेणारा महाकवी तुकाराम मात्र अंधारात फेकला गेला, असे विष्णू वाघांचे ठाम मत होते. तुकोबांच्या चरित्रात वर्तमानाच्या संदर्भात गतकालीन घटना व प्रसंगांची पुनर्निर्मिती करण्याची ताकद होती.

अभंगाच्या चोपड्या इंद्रायणीवर तरंगल्या यावर आता कुणीही विश्वास ठेवणे अशक्य. उलट आताचा संत तुकारामाचा आस्तिक भक्त असो किंवा नास्तिक व्यक्ती हाच तर्क लावणार की त्या चमत्कार घडून तरंगल्या नाहीत तर ते अभंगच मुळात, जनमानसात इतके मुखोद्गत झाले होते की तत्कालीन लोकांच्या मुखाद्वारे सतत म्हटले जात असल्यामुळे अमर झाले. तुकोबांचे असे बहुजन समाजातील, तळागाळातील लोकांच्या मनात आदराचे, उच्च स्थान प्राप्त करणे तत्कालीन उच्चवर्णियांना सहन न झाल्याने मंबाजी सारखा, लोकांची दिशाभूल करणारा पंडित संत तुकारामाचा काटा वाढतो आणि संपूर्ण गावात भोळ्याभाबड्या जनतेचा चटकन विश्वास बसेल अशी आवई उठवतो की तुकाराम महाराज विमानात बसून सदेह वैकुंठात गेले. असा तर्कशुद्ध विचार करून वाघ यांनी या नाटकाचा शेवट लिहिला. पण, एरवी कजाग बायको म्हणून रंगविण्यात आलेली तुकोबांची पत्नी आवली मात्र मंबाजीचे हे कटकारस्थान आेळखते आणि बाणेदारपणे तिच्यामधील प्रखर स्त्रीवादाची झलक दाखवत म्हणते, ‘तुमच्या अंगाला वास येतोय माज्या तुकोबाच्या रगताचा, पन लक्षात ठिवा, तुमी लाख येळा मारलात तरी तुकोबा मरणार न्हाय.’

'आदित्यचक्षू’ हे मुळात उपनिषदकालीन एका अलक्षित राहिलेल्या महर्षीचे अनवट चरित्र मांडणारे नाटक आहे. महान दार्शनिक महर्षी याज्ञवल्क्य यांचे जीवन आणि तत्त्वज्ञानाचे दर्शन घडविणारे हे नाटक. भारतीयांना व्यास, वाल्मिकी, जैमिनी, शुक, वैशंपायन, दुर्वास, काश्यप, कपिल, पाराशर अशा कितीतरी ऋषींची माहिती आहे. मराठी साहित्यात यावर भरपूर लिहिलेही गेले आहे. पण याज्ञवल्क्य हे नाव माहीत असलेले मोजके सोडले तर एकूणच त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारे फारसे कुणी लिहिले नाही. ‘शाकल्य’ या आपल्याच गुरूबरोबर संघर्ष करणारा निर्भीड, बाणेदार शिष्य म्हणून याज्ञवल्क्याची प्रतिमा वाघ यांच्या मनात ठसली.
या तीन अंकी नाटकाच्या पहिल्या अंकात एेन कुमारवयात शाकल्य व वैशंपायन या दोन गुरूंशी याज्ञवल्क्याने केलेला वैचारिक संघर्ष व सूर्यदेवाची उपासना करून मिळवलेली ज्ञानप्राप्ती याचे दर्शन आहे. दुसऱ्या अंकात जनकाच्या दरबारात तत्कालीन दार्शनिकांची याज्ञवल्क्याने केलेल्या चिंतनात्मक द्वंद्वाचे चित्रण आहे. तर तिसऱ्या अंकात याज्ञवल्क्याचे सांसारिक जीवन व मैत्रेयीबरोबर त्याचा संवाद प्रामुख्याने मांडला आहे. या संपूर्ण कथानकाला जोडणारे पात्र म्हणजे वाघ यांनी आपल्या कल्पनेने निर्माण केलेले ‘वृत्तकार नारद’ हे पात्र. भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळांत लीलया भ्रमण करून शकणारा असा हा नारद वेळप्रसंगी त्या काळातून निघून अचानक वर्तमानातील प्रेक्षकांशी देखील संवाद साधतो. आजच्या परिस्थितीवर भाष्यही करतो. हे या संहितेचे वेगळेपण आहे.

दोन्ही नाटकांतील साम्य

दोन्ही नाटके संपूर्णत : वेगळ्या कालखंडातील आहेत, नाट्याची कथावस्तूही निराळी आहे तर दुसऱ्यामध्ये प्रखर ज्ञानाचे सार्वभौमत्व मांडलेले आहे. तरीही या दोन्ही नाटकांना एक समान सूत्र बांधून ठेवते ते म्हणजे ‘क्रांतिकारत्व.’ तुकाराम महाराज आणि महर्षी याज्ञवल्क्य यांच्या ठायी असणारे आचार विचारातील क्रांतिकारत्व. या दोघांनाही ते प्राप्त झाले ते त्यांचे ज्ञानचक्षू जागृत होते म्हणून. भटजीला, मंबाजीला भोळ्या भाबड्या जनतेला ते धर्माच्या नावाखाली हिडीसफिडीस करतात म्हणून तुकाबाचे संतापाच्या भरात शिव्या देणं किंवा पहिल्याच अंकात विलासी सुप्रिय राजा जेव्हा यज्ञाच्या पवित्र जलाचा अधिक्षेप करतो तेव्हा याज्ञवल्क्य ‘भरदिवसा हा व्यभिचार करताना आपणाला लज्जा कशी वाटत नाही?’ असा निर्भयपणे सवाल विचारतात. या घटना दोघांच्याही क्रांतिकारत्वाची झलक देतात. मी ब्राह्मणाच्या कुळात जन्मलो म्हणून ब्राह्मण नाही तर ज्ञानसाधना करून ब्राह्मणत्वाला पोहोचलो आहे, असा क्रांतिकारी विचार याज्ञवल्क्य मांडतात. कारण ज्ञानसाधनेचा अधिकार सर्वांनाच आहे. हाच समानतेचा विचार तुकोबा देखील आपल्या अभंगातून क्रांतिकारीपणे मांडतात. तुकोबाच्या अभंगातून व याज्ञवल्कयाच्या वाणीतून क्रांतिकारी विचारांची नवचेतना देण्याची शक्ती असलेला अक्षय ज्ञाननिर्झर दोघांच्या संवादातून पाझरत असतो.

विष्णू वाघ यांनी एक वेगळा तुकोबा मांडणे किंवा याज्ञवल्क्याला जे प्रखर बुद्धिमत्तेचे आदित्यचक्षू लाभले होते, त्याचा थोडा तरी प्रकाश या नाटकांद्वारे रसिकांपर्यंत पोहचावा आणि वाचकाने या दोघांचेही काळाला पार भेदून अजर अमर राहणारे विचार समजून घ्यावेत, या उद्देशाने ही नाटके लिहिली. यामागे त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर ‘महापुरूषाचं शारिरीक मरण हे तत्कालीन समाजाला घायाळ करणारं असतं यात वादच नाही. पण, याहून भयानक असते ती महामानवांची वैचारिक हत्या. भारताच्या इतिहासात अशा हत्या हरघडी होत आल्या. महापुरूषांचे विचार देव्हारे उभारून अंधश्रद्धांची मखरं सजवून महात्म्यांचे विचार गर्भकुडीत कसे गाडले जातात, हे तुकोबाच नव्हे तर अगदी अलीकडच्या काळातील चरित्रांवरूनही कळून येईल’. 

विष्णू वाघ यांनी अशा या दोन महात्म्यांचे विचार व जीवनचरित्र केवळ बासनात बंदिस्त राहू नये. अखिल जगाच्या विश्वमानव्याच्या हितासाठी यातले थोडे तरी किरण लोकांपर्यंत पोहचावे या हेतूने ही नाटके लिहिलीत, जी नि:संशय त्यांना सिद्धहस्त नाटककार म्हणून लाैकिक प्राप्त करून देणारी ठरली.

(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत)

दि.१४/०७/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल
L

Sunday, June 30, 2019

हरिपाठातील नामसंकीर्तन महात्म्य

हरिपाठातील नामसंकीर्तन महात्म्य
डाॅ. अमृता इंदूरकर
          ज्येष्ठाच्या पाठीवर जसा अाषाढ येतो तसाच ज्येष्ठ म्हणजे निवृत्तीनाथ तर अाषाढ म्हणजे ज्ञानदेव, असा विचार दरवर्षी अाषाढ येऊ घातला की मनात येताेच. अाजचा योगही पहा कसा जुळून अाला अाहे. अाज संत निवृत्तीनाथांची पुण्यतिथी देखील अाहे. अाजच्या या निवृत्तीनाथांच्या पुण्यतिथीच्या पर्वावर पुढे येऊ घातलेल्या अाषाढी एकादशीचा कौल घेऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचे महात्म्य उलगडण्याची संधी, हेही भाग्यच अाहे!
         प्राचीन काव्याचा एकूणच कालखंड बघितला तर संख्यात्मकदृष्ट्या संतांची व त्यांच्या काव्यनिर्मितीची श्रीमंती अापल्या लक्षात येते. त्यातही संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनातल्या माऊलीचे मूर्त रुपच. ज्ञानदेवांच्या साहित्यसंपदेचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. एक तत्त्वज्ञानात्मक व दुसरा भावात्मक. कारण त्यांच्या साहित्यातील ईश्वरी अस्तित्वाचे दार्शनिक स्वरुप वेगळ्या अंगांनी जाताना दिसते, तर भावनात्मक स्वरुप वेगळ्या अंगांनी जाताना दिसते. ‘चांगदेवपासष्टी’, ‘अमृतानुभव’ हे ग्रंथ त्यांचे दार्शनिकत्व सिद्ध करणारे अाहेत. या दोन्ही ग्रंथांत आध्यात्मिक तत्त्वज्ञानच स्पष्ट झालेले दिसते. ‘ज्ञानेश्वरी’ च्या बाबतीत थोडक्यात बोलायचे झाले तर ज्ञानेश्वरी ही खरोखर शब्दशः ‘भावार्थदीपिका’ अाहे. तत्त्वज्ञानाचा व भक्तिमय काव्याचा मनोज्ञ संगम यात झालेला अाहे. ‘जे जे भूत भेटेल तें तें भगवंत मानणे’ हाच ज्ञानदेवांच्या मते खरा भक्तियोग होय. ज्ञानेश्वरी ही ज्ञानदेवांसाठी अात्मानुभव होती. पण, ज्ञानदेवांची अभंगरचना, हरिपाठ मात्र त्यांचा स्वानुभव ठरते.
          ज्ञानदेवांनी रचलेले हरिपाठ म्हणजे सामान्य, अतिसामान्य समृद्ध भक्ताचा वेद अाहेत. या हरिपाठाची महती अशी की सामान्य भक्त पारंपरिक, आध्यात्मिक, कर्मठ अशा तत्त्वज्ञानापर्यंत पोहचू शकत नाही म्हणून ज्ञानदेवांनी हरिपाठाच्या रुपाने त्या तत्त्वज्ञानाचे सार अधिक सोपे, सरल करून केवळ नामभक्तीचा ठेवा हाती दिला. ज्ञानेश्वरीतही काही अशी नामसंकीर्तनगौरव अाढळतो, पण तो मुख्यत: गीतेतील सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता: अश्या श्लोकांवरील भाष्याच्या आलेला आहे.पण हरिपाठात मात्र नामस्मरण मार्गाचा स्वतंत्र थाट बघायला, अनुभवायला मिळतो. किंबहुना, त्यासाठीच त्याची निर्मिती झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्या समृद्ध जीवांना कर्मठ शक्ती, ईश्वरपूजा जमत नाही त्यांनी काय मग भक्ती करणे सोडून द्यायचे? नाही! या समस्येवरचा उपाय म्हणजेच ‘हरिपाठ’.
          हरिपाठात ज्ञानदेवांनी सरल, सहजभक्तीच्या अाड येणाऱ्या पाच समस्यांचा, अडसरांचा प्रामुख्याने उल्लेख केला अाहे. त्या समस्या म्हणजे
१)योगयागविधी २)तीर्थव्रतनेम ३)जप-तपकर्म ४) योगयागक्रिया ५) यज्ञयागक्रिया.
एखाद्या सिद्ध पुरुषाला, हठयोग्याला या मार्गाने उपचारांनी परमेश्वरप्राप्ती होणे कठीणच. मग त्यांनी कोणत्या मार्गावरून जायचे जेणेकरून ईश्वरसान्निध्य मिळेल तर यासाठी ज्ञानदेव हरिपाठाच्या प्रारंभीच फारच साधेपणाने अावाहन करतात.
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।तेणे मुक्ती चारी साधियेल्या।।
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी।।

शुद्ध मनाने फक्त या इष्टदेवतेच्या दारात क्षणभरच उभे रहा, तिथेच तुम्हाला चारही मुक्ती प्राप्त होतील. कारण पाप-पुण्याच्या हिशोबात भक्तीच जास्त वजा होत असते. तेव्हा भक्तीमध्ये पुण्याच्या हिशोब न करता नि:स्वार्थपणे हरिचा जप करा. कारण तो हरी अाणि अापला अात्मा हे जणूकाही जीवशिवएैक्य अाहे. हा हरी चराचरात वास करतो. ‘भरला घनदाट हरि दिसे’ मग ‘वाया तू दुर्गम न घाली मन’. त्या हरीच्या प्राप्तीसाठी मग व्यर्थच दुर्गम मार्ग का निवडतोस? ज्ञानदेव या हरीचे स्वरुप स्पष्ट करताना म्हणतात,
अव्यक्त निराकार नाही ज्या अाकार। जेथोनि चराचर त्यासी भजे।।’ शेवटी काय तर या सृष्टीमधली प्रत्येक गोष्ट त्या-त्या वैशिष्ट्यांसकट अात्मसात केली तरच ती अाकळते व प्राप्तही होते. यासाठी ते उदाहरण देतात की भाव विरहित भक्ती, भक्तीविरहित मुक्ती, बळविरहित शक्ती बोलू व दाखवू नये. उलट लोकांना दाखविण्यासाठी करण्यात येणारा योगयागविधि हा सिद्धीचा मार्ग तर नव्हेच उलट दंभमार्ग प्रकट करणारा अाहे. नाना तिर्थांची भ्रमंती करून मुखातील हरिनामात चित्तच नसेल तर ते सर्व व्यर्थच अाहे. उलट जो निर्मळ मनाने हरिचे उच्चारण करील त्याच्या अनंत-पापराशी क्षणमात्रच लयाला जातील, हा विश्वास ज्ञानदेव सामान्यांना देतात.
          दुसरी समस्या म्हणजे ‘तीर्थव्रतनेम’. केवल उपचार म्हणून तीर्थ, व्रत, नेम हे सर्व व्यर्थ अाहे, जर त्या कारणांमध्ये भावनेचा अभाव असेल तर अशा भावविरहित व्रतवैकल्याने मिळविलेली उपाधी वायाच जाणार. कारण सातत्याने हरीचा उच्चार हा यंत्रवत पद्धतीने होऊ शकत नाही. ही गोष्ट भावनेने अाकळण्याची अाहे म्हणून ते म्हणतात, ‘भावबळे अाकले येऱ्हवी नाकळे’. किमान भावनेने हा नाममहिमा समजण्याचा प्रयत्न केला तर कळेलही नाहीतर एरव्ही कळणारच नाही. अर्थात हेही वाटते तितके सोपे नाही, ज्याप्रमाणे जमिनीवर सांडलेल्या पाऱ्याचा कण पकडणे, उचलणे कठीण असते, त्याप्रमाणेच हे नाममहात्म्य अाहे.
‘पारियाचा रवा घेता भूमीवरी। यत्न परोपरी साधन तैसे। अाज नामस्मरण खूप केले, उद्या काहीच नाही, मग पुन्हा कालांतराने सोयीने असे नामस्मरण काही कामाचे नाही. ते तितकेच सहज,अनायास यायला हवे. कारण ‘रामकृष्ण’ नामाच्या नित्य स्मरणाने कळिकाळही दूर राहतो. अापल्या दैनंदिन जीवनाच्या अाचरणातील अनंत पापांचे कळप जळत जळत पुढे जातात. इतकी या नामाची सिद्धी अाहे.

        तिसरी समस्या अाहे ‘जप-तप-कर्म.’ ज्ञानदेव म्हणतात, सगळ्या वेदशास्त्र- श्रुती- स्मृती- पुराण यांचे सार एकच ते म्हणजे ‘नारायण’. त्यांच्या प्राप्तीसाठी खूप जप, कठोर तप, त्यातून येणाऱ्या कर्मकांडात्मक क्रिया या सर्व श्रम वाया घालविणाऱ्या अाहेत. उलट हरिनामाचे एकमेव शास्त्र असे अाहे जे कुळगोत्र वर्ज्य मानते. अात्मसिद्धीच्या दृष्टीने हे सगळे निरर्थक उपाधींचे अवडंबर अाहे. 
        चवथी ‘योगयोगक्रिया’ व पाचवी ‘यज्ञयोगक्रिया’ या समस्या देखील मानवाचे श्रम व्यर्थ ठरविणाऱ्या अाहेत. या अवडंबर मार्गापेक्षा नाम श्रेष्ठ अाहे. या नाममहात्म्यातून ज्ञानदेवांनी अप्रत्यक्षपणे व्रतधर्माचा, वर्णधर्माचा अधिक्षेप सुचविलेला अाहे. ‘योगयोग क्रिया धर्माधर्म माया। गेले ते विलया हरिपाठी।।’कारण जाती, वित्त, गोत्र, कुळ, शील हा विचारच मुळात लौकिक पातळीवरचा अाहे. नाम तर याहीपलीकडचे म्हणजे अलौकिक अाहे. नामसंकीर्तन हे या लटिक्या संसारातून तरून जाण्याचे सर्वात सोपे साधन अाहे. त्यासाठी काळवेळेची शुद्धी पाहावी लागत नाही. उलट नामसंकीर्तन हे कार्य ज्याप्रमाणे एखादा भ्रमर सुमनकालिकेमध्ये नकळतच गुंततो. त्याप्रमाणे हे नामसंकीर्तन व्हायला हवे.
           ज्ञानदेव सांगतात की मनाच्या मार्गाने जो जातो अाणि वासनेला बळी पडतो तो हरिनामसंकीर्तनातून मिळणाऱ्या अानंदाला मुकतो. ‘मनोमार्गे गेला तो तेथे मुकला’. पण, जो रामकृष्ण नामात तल्लीन होतो. त्याला उन्मनीच्या अानंदाचा लाभ होतो. रामकृष्णनामी उन्मनीच्या अानंदाचा लाभ होतो.
‘रामकृष्णनामी उन्मनी साधिली। तयासी लाधली सकल सिद्धी।’ हरिपाठाद्वारे ज्ञानदेव हेच सांगण्याचा प्रयत्न करीत अाहेत की, माणसाचे मन व या मनाचे व्यापार फार अतर्क्य असतात. मानवी स्वभाव फारच सहजरीत्या अापल्या इच्छा, अाकांक्षा, मोह यांना बळी पडून जीवनात त्यांनाच प्राधान्य देत असतो. या मनोव्यापारात मोडणारा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे नीती, अनीती, पाप-पुण्य, धर्म-अधर्म, कर्म- अकर्म माणुस अापल्या श्रद्धेची, भक्तीची, धर्माची, पुण्याची टक्केवारी शेवटी यावरूनच तपासत असतो. पण हरिनामाचा व यावरील सर्व गोष्टींचा एकमेकांशी काहीच संबंध नसतो. तुमचा धर्म, पुण्य कर्म हे काही भक्ती मोजण्याचे मापक नसते. नामभक्तीचे जग या सर्वांच्या पलीकडचे अाहे. कोणते भक्तीतत्त्व निश्चित करायचेच असेल तर ज्ञानदेव म्हणतात,
एकतत्त्व नाम दृढ धरी मना। हरीसी करुणा येईल तुझी।।
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद। वाचेसी सद्गद जपा अाधी।।
‘हरिनाम’ हे एकमेव तत्त्व मनात दृढपणे, कायम ठेवले तर हरीची प्राप्ती होणारच कारण ‘रामकृष्णगोविंद’ हे नामच इतके सोपे अाहे की ज्याला कोणत्या कर्मकांडी बैठकीची गरजच नाही. ज्याला रामाचा अाचार, कृष्णाचा विचार मनोमनी कळला तो रामकृष्णगोविंदमय झाला. या २६ व्या हरिपाठातून रामकृष्ण गोविंद नामसंकीर्तनाची महती ज्ञानदेवांनी सांगितली व शेवटी जाता जाता ते एका सूचनेकडे लक्ष वेधतात. ते म्हणतात, या हरिपाठाचे नित्यपठण करावे असे सांगतातच, पण पुढे म्हणतात, ‘असावे स्वस्थ चित्त एकाग्री मन। उल्हासे करून स्मरण जीवी।। अशा पद्धतीने हे नामसंकीर्तन व्हायला पाहिजे.
या हरिपाठातून हे स्पष्ट होते की, ‘हरिविण सौजन्य नेणे काही’ अशी ज्ञानदेवांची श्रद्धा अाहे. हरिपाठातील अभंगवाणीतून अाशय अभिव्यक्तीनुरुप प्रकट होणारी सहज सुलभता फारच तरल अाहे. एकूणच असे म्हणता येईल की हरिपाठात भक्तीचा अोलावा, तत्त्वज्ञानाचे सुलभीकरण, नाममहात्म्याची तल्लीनता यांचा अद्भुत असा त्रिवेणी संगमच झाला अाहे.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
दि.३०/०६/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

Sunday, June 16, 2019

भाषा संपादन प्रक्रिया-भाग ३

भाषा संपादन प्रक्रिया-भाग ३
डाॅ. अमृता इंदूरकर
          वयाच्या चवथ्या वर्षापर्यंत लहान मुलांचा स्वतंत्र शब्दकोश तयार होत असतो. एखाद्या क्रियेसाठी वस्तूसाठी, कशाहीसाठी रुढ शब्दापेक्षा त्याच्या मनोकोशात तयार झालेला शब्द अधिक योग्य ठरत असतो. इथूनच पुढे मुलांची वाक्यरचना विकसनाची प्रक्रिया सुरु होते. प्रत्यक्ष भाषा संपादन कसे होते हे आपण काही उदाहरणाद्वारे मागे बघितले. या लेखात त्यापुढील टप्पे बघूया..

६) वाक्यरचना विकसन : Developing sytax)
           याआधी बघितलेली मुलांची भाषिक स्वतंत्र रचना ही वाक्यविकसन होताना देखील कायम असते. एखाद्या लहान मुलाला कुणी मोठ्या व्यक्तीने सांगितलेले वाक्य जसे ऐकले तसे परत म्हणायला सांगितले तर ते मूल त्यांच्या स्वतंत्र शैलीमध्ये ते वाक्य म्हणून दाखवेल. उदा. 'जी म्याऊ चोरुन दूध पिते ती जोरात पळते’, मूल त्याच्या शैलीत ‘म्याऊ दूध पिते ती जोरात पळते’, असेही म्हणू शकतो, पण व्यक्त होताना मनात भाव, मात्र मोठ्यांनी म्हटलेल्या वाक्याचा असतो.
भाषा विकसनाच्या अंतर्गत लहान मुलांच्या वाक्य विकसन प्रक्रियेवर बराच सखोल अभ्यास झालेला आहे. वयाच्या त्या-त्या टप्प्यावर या वाक्य विकसनाचे वेगवेगळे टप्पे देखील आहेत. काही प्रश्नांचे स्वरूप असणारे आहेत. तर काही नकार दर्शविणारे वाक्य निर्माण करणारे आहेत. हे कोणते व कसे आहेत ते आपण बघू या. यामध्ये वाक्यविकसनाचा पहिला टप्पा १८ ते २६ महिन्यांमधला, दुसरा टप्पा २२ ते ३० महिन्यांमधला आणि तिसरा टप्पा २४ ते ४० महिन्यांमधला आहे. यामध्ये सामान्य मुलांमध्ये हा काळ कमी जास्त होऊ शकतो.
७. प्रश्न निर्माण करणे (Forming questions)
          प्रश्न निर्माण करण्याच्या पातळीमध्ये लहान मुलांच्या पहिल्या पातळीमध्ये दोन पद्धती असतात. भाषा आत्मसात करताना या विशिष्ट टप्प्यांत त्यांना ‘काय- कुठे’ पद्धत बरोबर अवगत होते. यालाच इंग्रजीत wh- form (where, who) म्हणतात. बोलण्यातून आपले भाव व्यक्त करण्यासाठी पालक एक तर सुरुवातीला किंवा शेवटी उच्चारामध्ये उतार, चढाव आणत या ‘काय- कुठे', पद्धतीचा अवलंब मुलांसमोर करतात. जसे - ‘म्याऊ कुठे आहे?’, ‘घोडा कुठे गेला?’, ‘खुर्चीत बसतो का?’, ‘भू- भू काय खातो?’ इत्यादी अशा  काय कुठे प्रश्नाचे अनुकरण मुलं लगेच करू लागतात.
       दुसऱ्या पद्धतीमध्ये वरील उदाहरणापेक्षा थोडे अधिक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात. पण, यामध्ये देखील उच्चारातील चढाव मात्र कायम असतो. असे आढळले आहे की, असे काय- कुठे प्रश्न मुलांकडून अधिकाधिक वापरल्या जातात. जसे- ‘पुस्तकाचे नाव काय आहे?’, ‘तुला खायचे आहे काय?’, ‘तो भू- भू बघितला का?’, ‘तू का हसतो आहेस?’ इत्यादी.
        तिसऱ्या पद्धतीमध्ये या प्रश्न स्वरूपात कर्ता आणि क्रियापदाची बऱ्यापैकी उलटापालट करून वापरण्याची गरज निर्माण व्हायला लागते. जसे- ‘मी जाऊ शकते का?’ आणि ‘मी जाऊ का?’ पण, अशी उलटापालट कितीही झाली तरी हे wh form प्रश्न संपत नाहीत. उलट पाचव्या- सहाव्या वर्षी शाळेत जायला सुरुवात झाल्यावर मुलं या wh form पद्धतीचा शिक्षकांशी संवाद साधताना अधिक वापर करतात. कारण तो त्यांना सोयीचा वाटतो. शिवाय या पद्धतीतून बालसुलभ कुतुहलाला भाषिक पद्धतीने सुयोग्य असे व्यक्तही होता येते. फार गुंतागुंत अथवा उलटापालट नसलेले मोठ्यांचे बोलणे सहज आत्मसात केले जाते. असे करताना खरे तर मुलांना बरेचदा शब्दांतर्गत येणाऱ्या क्रियापदांचा निश्चित वापर आत्मसात व्हायला वेळ लागतो. तरी आपलेही बोलणे आता मोठ्यांसारखे आहे या सुखावून जाणाऱ्या भावनेसाठी अशी वाक्यरचना लवकर आत्मसात करतात. जसे, ‘मला एक मिळेल का बिस्किट?’ किंवा ‘मला एक बिस्किट मिळेल का?’, ‘मला मदत करशील का?’, ‘हे कसे उघडते?’, ‘तू काय केलं?’, ‘मला हे जमलं का?’, ‘हे पिल्लू का उभे राहत नाही?’ इत्यादी...
८) नकारार्थी वाक्य तयार करणे :(Forming Negatives)
          नकारार्थी वाक्यरचनेत मुलांचा प्रारंभी फक्त नाही-नको हे दोनच शब्द वापरण्याकडे कल असतो. जसे- ‘नाही पडला’, ‘नको मला’, ‘तिकडे नको बसू’, ‘हा टेडी बियर नाही’ इत्यादी...
       दुसऱ्या पातळीत या ‘नाही, नको’ ची विविध रूपे वापरायला सुरुवात होते. क्रियापदाला जोडून हे नकार अधिक करुन येतात जसे- ‘मला हे नको आहे, ती आई नाही आहे, तू डान्स नाही करू शकत, मला हे नाही येत’, इत्यादी...
        तिसऱ्या पातळीपर्यंत येता- येता प्रारंभी वापर असणारे नाही, नको हळूहळू कमी व्हायला लागतात. आणि या नाहिशी संबंधित अधिक मोठी वाक्यरचना तयार होऊ लागते. ही पातळी बरीच उशीरा आत्मसात होते. जसे, मी त्याला पकडू शकत नाही, तो ते घेत नाही, ती जाऊ देत नाही मला, हे आईस्क्रीम नाही!’ इत्यादी नव्या वाक्यरचनांना प्रारंभ होतो.
९)अर्थ विकसन (Developing Semantics)
          भाषा संपादनाची प्रक्रिया संपूर्णपणे अवगत होणे म्हणजे लहान मुलांना भाषा आत्मसात झाली असे नव्हे. तर मुले भाषेद्वारे जे जे आत्मसात करतात व त्याचा संवादासाठी वापर करतात, त्यामध्ये अर्धविकसनही महत्त्वाचे असते. म्हणजे केवळ शब्द अवगत होऊन उपयोग नसतो तर अर्थही तितकाच महत्त्वाचा. बरेचदा असे होते की घरी मुलाला विशिष्ट शब्दाचा विशिष्ट अर्थ समजावून सांगितलेला असतो, पण नेमके बाहेर कुठेतरी त्या शब्दाचा अर्थ कुणाकडून विचारला गेला तर ते मूल त्याच्या भावार्थ कोशात जो अर्थ कायमचा पक्का झाला आहे, तोच सांगते.
   एका मुलाला सांगितले होते की, ‘माशी घाण असते. ती सगळीकडे जंतू पसरवते’. अन्य व्यक्तीने त्याला ‘जंतू म्हणजे काय?’ असे विचारले असता मुलाने ‘जंतू असं काहीतरी आहे, त्याच्यासोबत माशी खेळत असते,’ असे उत्तर दिले. यावरून जंतूचा अर्थ त्या मुलाच्या मनात कसा आहे हे स्पष्ट होते. अशाच प्रकारे मुलांच्या दैनंदिन जीवनातील क्रियेला, वस्तूंना त्याचा मूळ अर्थ माहीत असूनही आपला स्वतंत्र असा अर्थच गृहीत धरतात व तोच वापरतात.
उदाहरणार्थ-
मूल : आई, माझे डोळे काळे झाले आता!
आई : हो रात्र झाली आहे. त्यामुळे तुला खूप झोप आली आहे.
मूल : हो म्हणून माझे डोळे खूप काळे झाले आहेत.
आई : अरे.... म्हणजेच तुला खूप झोप आली आहे.
मूल : नाही... माझे डोळे खूप काळे झाले आहे.
यावरून हे स्पष्ट होते की मुलाच्या मनातील झोप येणे या क्रियेचा अर्थ डोळे काळे होणे, असा आहे.
याला अर्थाचा अतिविस्तार (Overextension) असे म्हणतात. बरेचदा एखाद्या शब्दाचा अर्थविस्तार अन्य वस्तूंच्या सारख्या आकार, ध्वनी, हालचाली, पोत इत्यादी वरून साम्य दाखविणारा ठरतो. म्हणजे ‘बॉल’ या शब्दाचा अर्थविस्तार हा सर्व गोल आकाराच्या वस्तूंना लागू होतो. जसे चंद्र, संत्र, मोसंबी, गोल बटाटा, टोमॅटो, कपाटाच्या दाराचे गोल नाॅब इत्यादी. इतकेच नाही तर भरल्या ढेमसाच्या भाजीला ‘बॉलची भाजी’ असे देखील मूल म्हणते. यासारखीच अनेक उदाहरणे आहेत. चपटा काळपट वाल (घेवडा) कानाच्या आकाराशी सामर्थ्य साधणारा असतो म्हणून ती कानाची भाजी असते. अंकुरीत मुग- मटकीची उसळ ही शेपटीवाल्या दाण्याची उसळ होते. इंग्रजीत सिझरचे (कात्री) सिझो होते व पुढे सगळ्या मेटलच्या वस्तूंना सिझो म्हटले जाते. प्रत्येक वस्तूची अर्थनिश्चिती करण्याच्या बालसुलभ कुतूहलापोटी हा अर्थ अतिविस्तार घडून येतो.
      मुलांच्या वाक्यविकासामध्ये अर्थ अतिविस्तारिकरणाची एक अंतर्गत व्यवस्था लागलेली असते. म्हणजे विशिष्ट आकाराच्या वस्तूला बघून अन्य तशाच आकारांना मुलं अर्थानुसारी तोच शब्द वापरत असले तरी मूळ अर्थाची वस्तू मात्र अचूकपणे ओळखू शकतात. यामध्ये ते सरमिसळ करीत नाही. एका सर्वेक्षणात २ ते ३ वयोगटातील मुलांचा गट ‘अॅपल’ म्हणून जवळपास सर्व गोल आकाराच्या वस्तूंना अॅपलच संबोधित करीत होता. जसे टोमॅटोला, बॉलला. पण ज्यावेळी त्याच्या समोर टोमॅटोचा ढीग व अॅपलचा ढीग ठेवला असता व अॅपल कोणते आहे विचारले असता त्याने बरोबर अॅपलच उचलले.
साधारणत: पाच वर्षांपर्यंत मुलं भाषा संपादनाचा जास्तीत जास्त आवाका आत्मसात करतात. म्हणूनच पाच वर्षानंतर नव्याने अन्य भाषेचा संपर्क आल्यास कोणतेही मूल ती देखील भाषा आत्मसात करू लागले. ही प्रक्रिया प्रथम, भाषेतून सुरु होऊन इतर नव्या भाषा आत्मसात करण्यापर्यंत कार्य करीत राहते. अशाप्रकारे भाषा संपादन प्रक्रियेच्या भाग १, २ व ३ मध्ये आपण एकूण ९ टप्पे बघितले, ज्याद्वारे मूल भाषा संपादन करीत असते.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
दि.१६/०६/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

Sunday, June 2, 2019

भाषा संपादन प्रक्रिया-भाग २

भाषा संपादन प्रक्रिया-भाग २
डाॅ.अमृता इंदूरकर
         मुलाला येणारा भाषापूर्ण ध्वनीचा वापर त्याला एकप्रकारचा सामाजिक, भाषिक दृष्टिकोन अथवा भूमिका देत असतो. कारण घरी पालक लगेच या बडबडण्याला प्रतिसाद देत असतात. इथे लहान मुलांचे भाषेच्या जगतात पहिले भाषिक, सामाजिक योगदान घडून येत असते....
मागील लेखात भाषा संपादन प्रक्रियेची पहिली पातळी (Cooing and babbling) बघितली होती. या लेखात त्याच्या पुढील पातळ्या बघूया.
२. एक शब्द संपादन पातळी (One word Stage)
             बारा ते अठरा महिन्यांच्या दरम्यान अाधी सतत एेकलेले व त्यामुळे अाता अोळखण्याजोगे असे लहानात लहान विविध शब्दसमूह (Single Unit) मुलं बोलायला लागतात. भाषा अात्मसातीकरणामध्ये या कालावधीला ‘एक शब्द संपादन पातळी’ म्हणतात. यामध्ये अगदी दैनंदिन जीवनात सतत संपर्कात येणाऱ्या कितीतरी वस्तूंचा, व्यक्तींचा समावेश असतो. जसे दुदू (दूध), म्याऊ (मांजर), भाता (भात), हम्मा (गाय), भू-भू (कुत्रा), बिशकित (बिस्किट) फूऽऽ (फूल), छछा (ससा), अाबा (अाजोबा) अाजी, पापा, आत (हात), पाय, नाई नाई, ये-ये इत्यादी. अर्थात प्रांताप्रमाणे ते बदलत जातात.
       याच कालावधीत या ‘एक शब्द पातळी’ चा एक वेगळा प्रकारही तयार होतो. तो म्हणजे अगदी लहानात लहान शब्दसमूह जे खरेतर छोटेखानी वाक्य किंवा शब्दसमूह असतात, ते लहान मुलांच्या भाषाविकसन प्रक्रियेत छोटे शब्दसमूह अथवा सिंगल युनिट ठरतात.
जसे, ‘हे काय?’,‘कुठे जायचं?’
‘काकाची पमपम’,* *‘ताईची खोली’इत्यादी. ज्या वातावरणात व जो संदर्भ जोडत ही वाक्ये तयार होतात ती मुलांसाठी शब्दच असतात.
लहान मुलांच्या भाषा संपादन प्रक्रियेत यांना वाक्य म्हणणे चुकीचे ठरू शकते. कारण लहान मुलांसाठी काका व त्याची गाडी एकच असतात. ज्या खोलीत ताई झोपते ती खोली व ताई एकच असतात. अशा शब्दसमूहांना *‘होलोफ्रेस्टिक’* अशी संज्ञा वापरली जाते. ज्यामध्ये शब्द एखादा वाक्प्रयोग किंवा वाक्य उच्चारदृष्ट्या समानच गृहीत धरला जाते. यामुळे लहान मुलांचे भाषा संपादन प्रक्रियेतील शब्दविश्व अधिकाधिक व्यापक होत राहते. त्याचप्रमाणे त्याचा प्रत्यक्ष वापर करण्यास मुलही उद्युक्त होत असते.
३) द्वैभाषा संपादन पातळी (Two Word Stage)
          अठरा ते वीस महिन्यांच्या दरम्यान जेव्हा लहान मुलांचे शब्दभांडार ५० च्या पुढे जाते, तेव्हा लहान मुल अापोअाप दोन शब्द संपादन करते. याच दरम्यान मुल दोन वर्षांचे होत अालेले असते. या काळात अवगत असलेल्या शब्दांनी व भर पडत असणाऱ्या शब्दांची मदत घेऊन कितीतरी शब्दांच्या मदतीने संयोगाने दोन शब्द उच्चारायला प्रारंभ होतो. जसे बाळाची खुर्ची, अाई जेवते, अाॅफिस गेले, भुर्रर्र जाऊ इत्यादी. अर्थात या दोन शब्दांचे संदर्भ वेळोवेळी लहान मुलांच्या कल्पनेत बदलत असतात. कारण संपूर्ण वाक्याच्या मदतीने लहान मुलं तो संदर्भ स्पष्ट करू शकत नाहीत. जसे ‘बाळाची खुर्ची’ असे म्हणताना ‘माझी खुर्ची’ असेही सांगायचे असते किंवा बाळाला खुर्चीत बसायचे अाहे, हे पण सांगायचे असू शकते किंवा या वस्तूला ‘बाळाची खुर्ची’ म्हणतात, एवढेच म्हणायचे असते. हे संदर्भ लहान मुलाच्या मनातला संदर्भ- रोख अोळखून समजून घ्यावे लागतात.
अशा शब्दांच्या उच्चारामागे लहान मुलांचा संवाद साधण्याचा हेतू निर्माण असतो. घरातील मोठे जसा संवाद साधतील, त्याच पद्धतीने मुलही संवाद साधायचा प्रयत्न करू लागते. इथे लहान मूल केवळ शब्द उच्चारत नसते तर आपलेही बोलणे हे घरातील सदस्यांची संवाद साधण्यातील एक योगदान होय, याची सतत निश्चिती करीत असते. दोन वर्षांचे झाल्यानंतर जेव्हा मुलं २०० ते ३०० शब्द संवादाच्या माध्यमातून व्यक्त व्हायला लागते, तेव्हा ते मुलं त्या शब्दाच्या पाचपट त्या शब्दांचे अर्थ समजण्यास पात्र होत असते. म्हणून मग या वयाचे मुल घरातील संवादामध्ये रंजन करणारे एक महत्त्वाची सहभागी व्यक्ति बनते.
४) भाषेची शब्दरुप साखळी (Telegraphic Speech)
          दोन ते अडीच वर्षाच्या दरम्यान मुलं मोठ्या प्रमाणात शब्दांचा वापर करून बोलण्यास सुरुवात करतात. असंख्य शब्दांचा सतत वापर करून ही भाषा आत्मसात करण्याचा अधिकाधिक प्रयत्न असतो. अशा व्यक्त होण्याचे एक सूक्ष्म वैशिष्ट्य असे की, शब्द मर्यादित असले तरी त्या शब्दांचे विविधांगी शब्दाविष्कार प्रकट व्हायला लागतात. या पातळीला भाषेची
‘शब्दरूप साखळी’ किंवा ‘टेलिग्राफिक स्पिच’ म्हणतात. शब्दांची विविधरुपी साखळी हे या पातळीचे प्रमुख वैशिष्ट्य अाहे. ही शब्दसाखळी कदाचित छोट्या वाक्प्रयोगात असेल किंवा छोट्या वाक्यात देखील असेल जसे ‘मी अोली होली’ (झाली हा शब्द वापरायचा हे बरेचदा कळत नाही) दूध पिऊ शकते नाही, बाबा गेले... टाटा (अाॅफिस शब्द सुचत नाही). इथे लहान मुल वाक्यरचना तयार करण्याची क्षमता बऱ्यापैकी अात्मसात करते अाणि शक्यतो वाक्याचा क्रम मोठ्याप्रमाणे बरोबर करण्याचा प्रयत्न देखील करते. अर्थात या वाक्यरचनेत लहान मुलाचे स्वतंत्र असे व्याकरण तयार होत असते.
        या दोन -अडीच वर्षांच्या कालावधीत लहान मुलांचे शब्दभांडार त्यांच्या शारिरीक वाढीसोबत देखील सहजपणे वाढत जाते. उड्या मारणे, धावणे यांसारख्या क्रिया जसजशा जमल्या की तसतसे नवे शब्द बोलण्यात अापोअाप यायला लागतात. बऱ्याचदा तिसऱ्या वर्षापर्यंत रोजचे नवे शब्दभांडार शंभरच्या पलीकडे जायला लागते. शिवाय मोठ्यांच्या उच्चारपद्धती, लकबी या अात्मसात करण्याकडे अधिक अोढा वाढतो. थोडक्यात घरातील ज्याच्या बोलण्याचा प्रभाव अधिक पडतो. त्यानुसार ही भाषा संपादन प्रक्रिया विकसित होते.
५) प्रत्यक्ष भाषा संपादन (Aquisition Process)
         एकूणच भाषाविचारात असे गृहीत धरले जाते की, लहान मुलांना भाषा शिकवल्या जातात. पण, खरेतर मुलं ज्या पद्धतीने भाषेचा वापर करतात, ते पाहता मुलांना भाषा शिकवल्या जातात या विधानाला काहीच अाधार मिळत नाही. घरात कधीच कुणी अगदी तान्हे असल्यापासून प्रत्यक्ष मुलाला, प्रत्यक्ष भाषा शिकवायला किंवा सूचना देत, घेऊन बसत नाही. अापणही असे कुठे अाजपर्यंत बघितले नाही की लहान मुलांचं डोकं अापोअाप शब्दांनी, वाक्यांनी भरले गेले अाहे. लहान मुलांच्या बाबतीत मुख्य हाच उद्देश असतो की त्याने स्वत:हून स्वतंत्र रचना करून त्याला जो मार्ग सोयीचा असेल, त्याने ती भाषा वापरली पाहिजे. लहान मुलांचे भाषाविकसन हे विविध शब्द रचनांचा प्रयोगरुप वापर करून ते संवाद प्रक्रियेस पात्र अाहेत की नाहीत, यामध्येच अधिक अाहे.
         वयाच्या चौथ्या वर्षानंतर मोठ्या मंडळींकडून ज्या लहान मुलांच्या बोलण्यातील चुका सुधारण्यात येतात, त्या प्रयत्नांना फार कमी यश येते. बरेचदा मोठ्या व्यक्तीने वारंवार सांगितलेली दुरुस्ती एेकूनही किंवा लक्षात येऊनही लहान मुलं त्याने जो स्वतंत्र्यरीत्या शब्द तयार केला अाहे, तोच वापरण्यावर भर देते. चौथ्या वर्षा लहान मुलं मोठ्यांच्या बोलण्याचे अनुकरणही करीत नाहीत अाणि मोठ्यांनी सुचविलेली दुरुस्ती देखील स्वीकारत नाही, असा पण एक टप्पा येतो. उदाहरणादाखल पुढील संवाद बघूया.
मूल : मी त्याला पडताना पाहितलं!
अाई : म्हणजे तुला ‘पाहिलं’ म्हणायचं अाहे का?
मूल : नाही, मी त्याला पडताना पाहितलं!
अाई : तुला ‘बघितलं’ म्हणायचं अाहे का? एकतर पाहिलं म्हण किंवा बघितलं म्हण.. पाहितलं असे म्हणायचे नाही.
मूल : नाही मी त्याला जोरात पडताना पाहितलं!!!
अशा पद्धतीने वयाच्या चवथ्या वर्षापर्यंत लहान मुलांचा स्वतंत्र शब्दकोश तयार होत असतो. एखाद्या क्रियेसाठी वस्तूसाठी, कशाहीसाठी रुढ शब्दापेक्षा त्याच्या मनोकोशात तयार झालेला शब्द अधिक योग्य ठरत असतो. इथूनच पुढे मुलांची वाक्यरचना विकसनाची प्रक्रिया सुरु होते. ती कशी? ते पुढच्या वेळी बघूया.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
दि.०२/०६/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल