Sunday, October 6, 2019

समाजऋण फेडणारा सच्चा कलावंत:निदा फाजली


समाजऋण फेडणारा सच्चा कलावंत:निदा फाजली

➡️डाॅ.अमृता इंदूरकर


ये तो चेहरे का फक्त अक्स है तस्वीर नहीं,
इस पे कुछ रंग अभी आैर चढाते रहिए।
आपल्या प्रतिभारंगाने कधी तरल तर कधी प्रखर जाणिवांनी शायरीला सजविणारे निदा फाजली हिंदी- उर्दू शायरीच्या क्षेत्रातले कोहिनूर आहेत. मुक्तदा हसन उर्फ निदा फाजली कवी, शायर, कलावंत यांचे आयुष्य सामान्य लोकांसारखे नसतेच. कुठली ना कुठली आख्यायिका त्यांच्याशी जुळलेलीच असते. निदा देखील याला अपवाद नाही. निदांच्या जन्माबद्दलची आख्यायिका अशी आहे की वडील मुर्तजा हसन आणि आई जमील फातिमा यांच्या भाग्यात आलेले हे तिसरे अपत्य, पण निदांच्या आईसाठी मात्र हे दुर्भाग्य होते. कारण त्यांच्या आईच्या इच्छेविरूद्ध या तिसऱ्या अपत्याचा जन्म झाला होता. त्यांचा बाल्यकाल व महाविद्यालयीन शिक्षण ग्वालियरला झाले. निदा फार लहान वयापासूनच लेखनसन्मुख झाले होते. ‘निदा फाजली’ हे त्यांनी खास लेखनासाठी घेतलेले नाव निदा या शब्दाचा अर्थ आहे, स्वर, आवाज, व्हाॅईस आणि काश्मिरच्या एका भागाचे नाव आहे, फाजिला. जिथून त्यांचे पूर्वज दिल्लीला येऊन स्थायिक झाले, म्हणून त्यांनी निदा या नावापुढे फाजली हे उपनाव जोडले.

शायर, कवी हा जन्म घेत नाही तर तो घडावा लागतो किंवा घडतो. जीवनाच्या गडद काळोख्या जंगलातून, रानावनातून चाचपडत वाटचाल करीत असतानाच अचानक लख्खकन आकाशीची वीज चमकावी आणि सारा अंधारच उजळून निघावा आणि पुढचा मार्ग दिसावा अशी ही प्रतिभा अचानक कवीला भेटते. ध्यानी-मनी नसताना ती त्या कवीचे अंतरंग पार ढवळून काढते. नव्या जाणिवेचे, नव्या अनुभवाचे असे काही अनवट आघात त्या कवीवर होतात की आत्मकोशाची बंदिस्त असलेली कवाडे आपोआपच उघडली जातात. अमूर्त स्वरूपातली जीवघेणी अस्वस्थता अलगदच शब्दरूप घेऊन समूर्त होते.

निदांच्याही बाबतीत हे असे घडले असणारच, किंबहुना घडले आहे. निदांच्या आयुष्यात दोन मोठ्या घटना घडल्या त्या त्यांना शायर निदा फाजली बनवून गेल्या. हिंदू- मुस्लिमांच्या दंग्यांना कंटाळून निदांच्या आई-वडिलांनी पाकिस्तानला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. पण, निदांनी मात्र त्यांच्यासोबत यायला कडवा विरोध दर्शविला आणि ते ठामपणे भारतातच राहिले. आई-वडील पाकिस्तानात तर निदा भारतामध्ये. इथूनच निदांच्या कवी मनातला संघर्ष सुरू झाला. ज्या मातीत आपण जन्मलो, ज्या मातीत आपली पाळंमुळं खोलवर रुजली आहेत व ज्या मातीतच आपला सृजनवृक्ष विस्तारला, बहरला आहे, त्या मातीशी एकनिष्ठ राहणे या कलावंताला महत्त्वाचे वाटले. म्हणूनच निदा फाजली यांच्या मनात मशीद, इस्लाम, नमाजी, धर्म याबाबतीत कोणतीही संदिग्धता नव्हती. ते म्हणायचे,

मस्जिदें है नमाजियों के लिए
अपने घर में कही खुदा रखना

त्यांच्या मनात सतत एक खंत होती, ती ही की मानव आणि माणुस यांच्यातले अंतर मिटत नसल्याची. मानवाने सर्वप्रथम माणुसपणासहित माणूस होणे, हे सर्वात महत्त्वाचे. पण तेही किती कठीण होऊ बसलेय? *‘बसकी दुश्वार है हर काम का आसाँ होना। आदमी को भी मयस्सर नही इन्सा होना,’* असा प्रश्न ते स्वत:लाच करतात.

निदांचा सर्वात लोकप्रिय आणि खास निदाप्रेमी रसिकांच्या तोंडी असलेला शेर  म्हणजे, ‘घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूँ कर लें, किसी रोते हुए बच्चे को हँसाया जाए।’पण हा शेर जेव्हा त्यांनी पाकिस्तानमधील एका मुशायऱ्यात म्हटला तेव्हा कट्टरपंथी मुल्लांनी त्यांना घेराव घातला व त्यांना विचारले की, ‘निदा आप किसी बच्चे को अल्लाह से बडा समझते है?’ तेव्हा निदांनी शांतपणे उत्तर दिले की, ‘मै केवल इतना जानता हूँ की मस्जिद इंसान के हाथ बनाते है, जबकी बच्चे को तो अल्लाह अपने हाथों से बनाता है।’धर्माने बनविलेल्या अल्लाहपेक्षा, देवापेक्षा माणसाच्या मनातला लहान मुलांमधला अल्लाह, त्यांना सुस्पष्टपणे दिसला.

 निदांच्या रचनाशैलीवर गालीबपेक्षाही कबीरदास, तुळशीदास, बाबा फरीद, सूरदास या संतकवींचा जास्त प्रभाव होता. अर्थात हे जाणूनबुजून केले गेलेले अनुकरण नाही. त्यामागेही त्यांच्या आयुष्यात घडलेली एक घटना कारणीभूत आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांच्या समोर एक मुलगी बसायची. नकळतच निदांचे तिच्यासोबत एक अव्यक्त, असे नाते तयार झाले होते. अचानक एक दिवस महाविद्यालयाच्या बोर्डवर एक सूचना त्यांनी वाचली, ‘Miss Tondon met with an accident and has expired’ हे वाचून निदा खूपच दु:खी झाले. या दु:खात बुडालेले असताना लवकरच त्यांच्या लक्षात आले की जे आतापर्यंत लिहिले आहे ते काहीच माझे दु:ख व्यक्त करू शकत नाही. इतके आतले दु:ख व्यक्त करण्यासाठी आतापर्यंतच्या सगळ्या शब्दकळा अपुऱ्या पडत आहेत. याच व्यथेत असताना एक दिवस ते एका मंदिरासमोरून जात होते आणि तेथे सूरदासाचे भजन सुरू होते ‘मधुबन तुम क्यों रहत हरे? बिरह बियोग श्याम-सुंदर के ठाढे क्याें न जरे?’ म्हणजे कृष्ण मथुरेहून द्वारकेला गेल्यावर वियोगात बुडालेली राधा आणि गोपिका त्या फुलवारींना विचारत आहे की तुम्ही का बहरलेल्या आहात? कृष्णवियोगात तुम्ही जळून का नाही गेलात? हे एेकल्यावर निदांना वाटले की हेच ते काहीतरी आहे, जे माझे दु:ख बाहेर काढू शकते. 

कोणतीही वेदना ही सौंदर्य निर्माण करीत असते. निदांच्या वाट्याला आलेल्या या वेदनेतून हिंदी-उर्दू मिश्रित भाषेच्या आविष्कार असलेली कविता निर्माण करता आली. कबीर आणि मीरेची भाषा त्यांना आपली वाटली. जणूकाही अमीर खुसरो, मीराबाई यांच्या दु:ख परंपरेतले ते एक पाईक होते.

 निदांनी हे दु:ख वारंवार, जाणिवांच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्या कवितेतून व्यक्त केले आहे. मग ते आपल्या वैयक्तिक जीवनातील शोकांतिकेचे दु:ख असो किंवा जाती, धर्मावरून होणाऱ्या सामाजिक, राष्ट्रीय अंध:पतनाचे दु:ख असो. त्यांच्या जीवनातील एक मोठी शोकांतिका म्हणजे ज्या आईला निदांच्या रूपाने जन्म घेणारे तिसरे अपत्य नको होते, त्याच आईचा जीव अखेरीस निदांसाठीच अडकला होता. पाकिस्तानमध्ये त्यांची आई अखेरचे श्वास मोजत होती. निदांच्या एका भेटीसाठी तिचे प्राण अडकले होते, पण नशिबाची खेळी अशी की निदांना पाकिस्तानचा व्हिसा शेवटपर्यंत मिळाला नाही आणि तिकडे आईचे प्राणोत्क्रमण झाले. संपूर्ण हयातभर काट्यासारखे सलणारे हे दु:ख निदांनी ‘परदेस में रोई माँ’ मधून व्यक्त केलेले आहे.

मैं रोया परदेस में भीगा माँ का प्यार
दुख ने दुख से बात की बिन चिठ्ठी बिन तार
छोटा करके देखिये जीवन का विस्तार
आँखो भर आकाश है बाहों भर संसार

 याशिवाय निदांच्या एकूणच कवितांमध्ये माणूस हा केंद्रवर्ती आहे. देशातला, देशाबाहेरचा माणूस कधी रक्ताच्या नात्यांपासून दुरावलेला माणूस, यंत्रवत जगणाऱ्या माणसांच्या गर्दीतला माणूस, सश्रद्ध माणूस, धर्माच्या नावावर दंगे माजवणारा माणूस तर कधी संवेदनशील माणूस. या सर्व माणसांचे आरशातल्या प्रतिबिंबासारखे चित्रण निदांनी त्यांच्या काव्यामधून केले. माणूस तोच असतो, फक्त त्याचा भवताल सतत बदलत असतो आणि मग त्याला जाती, धर्माचे रंग चढत जातात. म्हणून ते म्हणतात,

इन्सान में हैवान यहाँ भी, वहाँ भी
अल्लाह निगहबान यहाँ भी है वहाँ भी
रहमान की कुदरत हो या भगवान की मूरत
हर खेल का मैदान यहाँ भी है वहाँ भी,
हिंदू भी मजे में है मुसलमाँ भी मजे में है
इन्सान परेशान यहाँ भी है वहाँ भी।

निदांची राष्ट्रीय, सामाजिक कविता म्हणजे तर त्यांच्या आद्य हुंकारच आहे. एकूणच जातिधर्माच्या भिंती आेलांडून ते माणसाच्या दु:खाशी आपली नाळ जोडतात. अर्थात याची पाळंमुळं आई-वडिलांनी पाकिस्तानात स्थानिक होणं आणि वयाच्या ११ व्या वर्षी स्वत: भारतातच राहण्याचा निर्णय घेणं यामध्ये खोलवर रूजलेली आहेत, हे स्पष्ट होते. कलावंत हा समाजाचे कायमच काही देणे लागतो. किंबहुना ते त्याचे परमकर्तव्यच आहे. निदांनी हे समाजऋण एक सच्चा कलावंत या नात्याने वारंवार फेडले आहे. या संदर्भात त्यांची ‘माैला’ कविता हिंदी-उर्दू भाषेचा मेळ असलेले पसायदानच आहे.

कवीला त्यांच्या अंतरात्म्यामध्ये खूपसे अनुत्तरित प्रश्न छळत असतात. ते अनामिक दु:ख निश्चित स्वरूपात मांडता येत नाही. अस्वस्थतेचे काहूर अधिकाधिक वाढतच जाते. जाणिवांचा जितका गुंता सोडविण्याचा आपण प्रयत्न करतो तितके अधिकाधिक त्यात आपणच गुंतत जातो. निदा पण याला अपवाद नव्हते. मनातल्या कल्लोळांना कितीदा तरी त्यांनी शब्दात पकडलेले आहे.

‘बेनाम सा ये दर्द ठहर क्यूँ नही जाता. जो बीत गया है वो गुजर क्यूँ नही जाता?’ या आणि अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे निदा आपल्या शायरीतून शोधत राहिले. या प्रश्नांना त्यांनी चित्रपट गीतांचे रूपही दिले, जे अजरामर झालेत. ‘तेरा हिज्र मेरा नसीब है’ ‘कभी किसीको मुकम्मल जहाँ नही मिलता’, ‘तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है’ इत्यादी. येत्या १२ ऑक्टोबरला निदांचा जन्मदिवस आहे. ते आज आपल्यात असते तर त्यांचा ८० वा जन्मदिवस साजरा झाला असता. या भूमीचे अतिशय सहिष्णुतेने गाैरवगान करणाऱ्या या शायरला त्रिवार सलाम.

(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
दि.०६/१०/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल