.प्रमाण भाषा,पोटभाषा आणि बोली
➡️डाॅ. अमृता इंदूरकर
‘तुझ्या हातची चंद्रासारखी गोल भाकर फार गोड लागते’ आणि ‘तुह्या हातची चंद्रावानी गोल भाकर लई ग्वाड लागतिया’ ही दोन्ही वाक्ये सारखाच अर्थ प्रसवतात. दोन्ही वाक्ये वाचल्यावर पहिले वाक्य अधिक बरोबर आणि दुसरे वाक्य बरोबर नाही, असे म्हणता येत नाही. कारण पहिले वाक्य शिष्ट मान्य भाषेला साजेसे आहे म्हणून योग्य तर दुसरे वाक्य बोलीचा गोडवा व्यक्त करणारे आहे. म्हणून अधिक मधुर वाटते. भाषिक समाज दोन्ही वाक्यांना आदराने मान्यता देतो, कारण भाषा ही प्रत्येक व्यक्ती बरोबर बदलत असते. कारण प्रत्येक व्यक्तीचे उच्चारण भिन्न असते. आता ‘प्रत्येक बारा कोसावर भाषा बदलते!’ असे म्हणण्यापेक्षा भाषा ही प्रत्येक व्यक्तीगणिक बदलते. जात, धर्म, वास्तव्याचे ठिकाण, स्त्री-पुरूष, मुले आणि व्यवसाय या सर्वांनुसार बदलते, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.
भाषा खरे पाहता माैखिक ध्वनींची बनलेली असते. परंतु, ती लेखनबद्ध झाली की नियमांनी जखडली जाते. तिच्यात समाजाच्या सर्वांगीण प्रगतीबरोबर वाङमय निर्मिती होऊन ती वरिष्ठांची, प्रतिष्ठांची भाषा बनते. याच भाषेला मग प्रमाण भाषेचे महत्त्व येते. मुख्य भाषा, ग्रांथिक भाषा, प्रमाण भाषा अशा नावांनी ती आेळखली जाते. प्रमाणभाषा ही शिष्टसंमत असते. वृत्तपत्रे, शिक्षण, ग्रंथलेखन, शासकीय कामकाज इत्यादी व्यवहारात तिला मानाचे स्थान मिळते.
संस्कारबद्धता, थोर दर्जाचे साहित्य, सुशिक्षितांची मान्यता, नियमांचे बंधन इत्यादींनी ही प्रमाणभाषा संपन्न असते. प्रमाणभाषेच्या संदर्भात आजकाल बोलीचा व पोटभाषांचा वस्तुनिष्ठ अभ्यास होत आहे. नव्या संशोधनानुसार, प्रमाणभाषेपासून बोली वा पोटभाषा तयार होतात असे नसून एखादी विशिष्ट बोलीच राजकारण, समाजकारण, विचारक्रांती इत्यादी कारणांनी प्रमाणभाषेच्या अवस्थेला येते. यादृष्टीने ‘प्रमाणभाषा व बोली हे दोनही शब्द समानार्थी असून Language किंवा भाषा हा शब्द ग्रांथिक किंवा प्रमाण स्वरूप प्राप्त झालेल्या बोलीला उद्देशून आपण योजतो आणि तिच्यापासून भिन्न असे ते बोलीप्रकार त्यांना आपण Dialects किंवा बोली म्हणतो,’ हे भाषा संशोधक अ. का. प्रियोळकर यांचे विधान योग्यच आहे.
‘मुख्य भाषा जी मध्यवर्ती भाषा असते. ज्या भाषेत ग्रंथनिर्मिती होते आणि ती भाषा बोलणाऱ्या सर्व समाजातील घटकाने तिला मान्यता दिलेली असते. त्या भाषेला प्रमाणभाषा म्हणतात.’
प्रमाण भाषेला त्या त्या भाषिक समाजाच्या प्रत्येक घटकाने मान्यता दिलेली असते. शिवाय या भाषेची एक विशिष्ट लिपी, व्याकरण आणि भाषेचे सर्वसामान्य नियम यांचा स्वीकार भाषिक समाजाने केलेला असतो. मराठी समाजाने देवनागरी लिपीचा, तिच्या व्याकरणाचा स्वीकार केलेला आहे. मराठीच्या अनेक बोली असल्या तरी सर्वांना मान्य असे प्रमाण भाषेचे रूप आपण स्वीकारतो.
➡️पोटभाषा म्हणजे काय?
भाैगोलिक, सामाजिक व्यावसायिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक भिन्नतेमुळे मुख्य भाषेची जी वेगवेगळी रूपे दिसतात, त्या तिच्या पोटभाषा अथवा बोली होत, असे स्थूलमानाने म्हणता येईल. ‘व्यक्ती तितक्या भाषा’ हे सूत्र बरोबर असले तरी पोटभाषांच्या विचारात व्यक्तीपेक्षा समूहाचा विचार महत्त्वाचा आहे.
‘ध्वनी, शब्दसाधना, वाक्यरचना, अर्थ, शब्दसमूह, वाक्यप्रयोग इत्यादी बाबतीत मूळ भाषेपेक्षा वेगळेपणा व साम्य धारण करणारी कोणतीही सीमित क्षेत्राची वा कालाची भाषा म्हणजे पोटभाषा,’ अशी पोटभाषेची व्याख्या करता येईल.मूळ भाषा, प्रमुख भाषा अथवा प्रमाणभाषा हिच्याशी तिचे साम्यही हवे;साम्य नसेल तर पोटभाषा मूळ भाषेशी संबंधित राहणार नाही. विरोधही हवा. विरोध नसेल तर ती पोटभाषा म्हणून आेळखली जाणार नाही. मूळ भाषेशी समांतर असणारी अशी उपभाषा अथवा बोली म्हणजे पोटभाषा होय. उदा. आथिले, नाथिले, आइके, उलिसे, उमाप, चेवणे, चेडा, तण, दादुला, घोव, धुरी, पढियंता, पाइकु, पालव, पेण, बुंथी, मायंदळ, रांधणे, रुख, वाढोळ, शीग, होड, हडप असे कितीतरी शब्द ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथात आढळतात. हे शब्द आजच्या मराठीत, ग्रांथिक मराठीत, मुख्य वा प्रमाण मराठीत येत नसले तरी विविध पोटभाषांत सापडतात.
➡️बोली
‘विवक्षित समाजगटात परस्परांना सहज कळणारी पण लगतच्या समाजगटाच्या बोलीहून थोडी वेगळी असणारी आणि पुन्हा भिन्नतेेपेक्षा साम्य अधिक दाखविणारी ती बोली.’ बोलीची ही व्याख्या साहित्यिक गं. ब. ग्रामोपाध्ये यांनी केली आहे.
भाषेसारखाच भाषिक व्यवहारासाठी ‘बोली’ भाषेचा उपयोग होतो. ही बोली बदलणारी असते. बदलणे हा भाषेसारखाच बोलीभाषेचाही गुणधर्म आहे. काळ, भूप्रदेश आणि सामाजिक स्थितीमुळे बोलीत बदल होतो. भाषेचा विकास होणे हा बोलीभाषेचाही स्वभाव आहे. ही एखादी बोली जेव्हा लिपी स्वीकारते तेव्हा तिच्या या बदलण्याच्या प्रवृत्तीला थोडा अडथळा येतो. तरी तिचे परिवर्तनरूप कायम असते. लिपी असल्यामुळे बोली भाषा भाषिक पातळीवर येते, तेव्हा तिला ग्रंथरूप प्राप्त होते. या ग्रंथरूपतेला साऱ्या समाजाची मान्यता मिळाली की ही बोली अनुकरणीय होऊन तिच्यात सर्रासपणे ग्रंथनिर्मिती होऊ लागते. ग्रंथनिर्मितीबरोबर तिला राजमान्यता आणि समाजमान्यता मिळते. हळूहळू त्या बोलीभाषेला प्रमाण भाषेला प्रमाण भाषेचे स्थान प्राप्त होते. याचा अर्थ प्रमाण भाषा ही कधीतरी ‘बोली’ भाषाच असते.
एकभाषिक समाजातील सर्व व्यक्तींना बव्हंशी समजली जाणारी आणि समाजातील शिष्ट लोकांनी लेखनासाठी मान्य केलेली भाषा, शिष्टमान्य भाषा म्हणजे प्रमाणभाषा असते. बोलीचे क्षणभंगुरत्व या प्रमाणभाषेला नसते. बोलीमध्ये अनाैपचारिकता असते, त्यामुळे ती अकृत्रिम असते आणि प्रमाणभाषेला औपचारिकतेचा स्पर्श असतो. जसे, काय करते आहेस? (प्रमाण) -काय करून ऱ्हायली (नागपूरी), नदी (प्रमाण मराठी) - न्हंय (कोंकणी), अक्षयपक्ष- अक्षयतृतीया (प्रमाण)- अखरपक (वऱ्हाडी) नारळ, केळी (प्रमाण)- नारय, केयी (अहिराणी), महिना (प्रमाण) - मिहिना (डांगी) इत्यादी. बोलीमध्ये सहजपणे ‘मेला’, ‘खलास झाला’ असा शब्द वापरला जातो. तर प्रमाणभाषेत ‘वारला’ ‘देवाज्ञा झाली’, ‘कैलासवासी झाला’ असे म्हणतात किंवा केले- केलं, खाल्ले- खाल्लं, वाटले- वाटलं अशा पद्धतीने प्रमाणभाषा आणि बोली स्पष्ट करता येते. प्रमाणभाषा ही लिपीबद्ध असतेच, पण प्रत्येक बोली या माैखिक पातळीवरच जिवंत राहतात तर काही बोली लेखनासाठी अन्य भाषेची लिपी देखील स्वीकारता येते.
प्रमाणभाषा, पोटभाषा व बोलीभाषा यांचे संबंध पाहताना माैखिक स्वरूपातील वाङ्मय लिपीबद्ध होऊ लागले की, त्या विशिष्ट समाजाला प्रमाणभाषा जोडून घेत असते. स्वबोलीकडून पोटभाषेकडे, पोटभाषेकडून प्रमाण बोलीकडे आणि प्रमाण बोलीकडून प्रमाणभाषेकडे असा हा प्रवास चाललेला असतो. वाङ्मय मुखोद्गत असो की लिखित, त्यांचा परिणाम समाजजीवनावर होत असतो. ज्या भाषेतून वाङ्मय लिहिले जाते, ते सगळ्या समाजाला समजावे अशी जाणीव लेखक ठेवतो. अशावेळी सर्व समाजाशी विनिमय साधू शकणारी भाषा वापरली जाते. म्हणूनच शासकीय, कार्यालयीन, व्यावसायिक, शैक्षणिक, आर्थिक शासकीय व्यवहार इत्यादी क्षेत्रामध्ये भाषिक व्यवहार हा समान पद्धतीने व्हावा म्हणून सर्वत्र प्रमाणभाषा वापरली जाते. कारण प्रमाणभाषेमध्ये सहसा परिवर्तन होत नाही. झालेच तर भाषिक वृद्धी अवश्य होते. डाॅ. सुहासिनी लद्दू यांच्या मताप्रमाणे, समाजाच्या भाषेतील जास्तीत जास्त एकात्मता राखणारी भाषा ही प्रमाणभाषा आणि जास्तीत जास्त विविधता दाखविणारी भाषा ती बोली, असे समजायला हरकत नाही.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
दि.२२/०९/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल
#अमृतवेल