Sunday, May 19, 2019

भाषा संपादन प्रक्रिया-१

भाषा संपादन प्रक्रिया- १
डाॅ.अमृता इंदूरकर
        मनुष्यामध्ये प्रथम भाषा संपादन करण्याच्या लक्षणीय गतीला त्याच्या जन्मापासूनच प्रारंभ झालेला असतो. ज्ञानार्जन करण्यासाठी प्रत्यक्ष शाळेत जायला लागण्याच्या कितीतरी अाधीपासूनच हे भाषा संपादन सुरु झालेले असते. भाषा संपादन करण्याच्या गतीबद्दल एक वस्तुस्थिती नेहमीच स्पष्ट झालेली अाहे की, लहान मुलांना अगदी उघडपणे कोणत्याही भाषा अात्मसात करणाऱ्या सूचना न देता किंवा त्यांच्या भाषा संपादन करण्याबाबत कितीही दुर्लक्षित वातावरण ते राहत असले तरी सर्वच लहान मुलांमध्ये भाषा संपादन करण्याबाबत एक प्रकारचा जन्मापासूनच नैसर्गिक असा अोढा, कल असतो. नव्याने जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये असणारी ही एक विशेष क्षमता अाहे, पण जन्मजात असणारी भाषिक संपादनाची क्षमताही पुरेशी नसते, हेही तितकेच खरे.
          तसे पाहिले तर, अापण भाषा ही मातेच्या गर्भातूनच शिकून येतो, असे म्हणतात. कारण नऊ महिने मातेच्या उदरात अव्यक्त असलेला जीव बाहेरचे सर्व ध्वनी, संवाद एेकत असतो. पोटावरून हात फिरवत मातेने अथवा कुटुंबातील इतरांनीही त्या जीवाशी बाहेरून साधलेला संवाद त्यांच्यापर्यंत ध्वनीरुपात सूक्ष्मपणे पोहचत असतो. (‘थ्री इडियट’ चित्रपटात याचे गमतीशीर उदाहरण अापण बघितले अाहे.) पण, याची दुसरी बाजूही समजून घेणे फार अावश्यक अाहे.
          भाषा अात्मसात करणे ही एक दुहेरी प्रक्रिया अाहे. केवळ भाषा एेकून, ती अात्मसात करून, तिचा परत वापरही करता अाला पाहिजे, तरच भाषा संपादन प्रक्रिया पूर्ण होते. लहान मूल जे एेकू शकत नाही किंवा भाषेचा वापर करू शकत नाही, ते भाषा नीटपणे संपादन करू शकत नाही. कारण यासाठी ते मूल भाषिक ध्वनींचे आदानप्रदान करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम असायला हवे. सर्वच तान्ही बाळे पहिल्या वर्षात ‘घूं- घूं (cooing) अावाज करीत असतात. पण, कर्णबधिर मुलांच्या बाबतीत मात्र सहा महिन्यांनी ही प्रक्रिया बंद होते. त्यामुळे भाषेचा वापर करण्यासाठी, बोलण्यासाठी अाणि ती एेकण्यासाठी देखील मूल सक्षम असायला हवे. एका भाषिक सर्वेक्षणात अाढळून अाले की, दोघेही कर्णबधिर असलेल्या अाई-वडिलांनी अापल्या सुदृढ व नैसर्गिक एेकण्याची क्षमता असलेल्या मुलाला टी. व्ही. व रेडियोवरील कार्यक्रम सतत दाखवले व एेकवले. परिणाम स्वरुप असे झाले की तो मुलगा बोलण्याची क्षमता संपादन करू शकला नाही. उलट तो वयाच्या तिसऱ्या वर्षी टी. व्ही., रेडिअोवरील अमेरिकन चिन्हांची भाषा परिणामकारकरीत्या शिकला व त्या चिन्हांच्या मदतीने अाई-वडिलांशी संवाद साधू लागला. म्हणजेच हे स्पष्ट अाहे की, ‘भाषेद्वारे दुसऱ्यांशी संवाद साधणे.’ ही भाषा संपादनातील एक महत्त्वाची गरज अाहे.
       ढोबळमानाने कमी अधिक प्रमाणात सर्वच सुदृढ मुलांची भाषा एकाच वेळी विकास पावत असते. लहान मुलांच्या वाढीचा जसा एक शरीरशास्त्रीय अाराखडा निश्चित असतो जसे, पालथे पडणे, रांगणे, उठून बसणे, उभे राहणे, चालणे, हात वापरणे अशा कितीतरी शारिरीक हालचाली त्याचप्रमाणे भाषा संपादनाची प्रक्रिया देखील याच धरतीवर निश्चित अशा टप्प्याटप्प्यांच्या अाराखड्याप्रमाणे होत असते. या शारीरिक विकसनाचा तान्ह्या मुलांच्या मेंदू विकसनाशी घट्ट असा परस्परसंबंध अाहे. लहान मुलांच्या सुरुवातीच्या वर्षामध्ये अापण हा विचार करतोच की, मुलांच्या शारीरिक वाढीसोबत त्या - त्या टप्प्यावर भाषिक भरही पडत असते. उदा. जन्मानंतरच्या पहिल्या महिन्यात लहान बाळ घरातील अवतींभोवती बोलणाऱ्या लोकांचे अावाज सतत एकून ‘ब’, ‘प’ या ध्वनीमधला फरक अोळखण्यास सक्षम होते. अशा भाषा संपादनाच्या प्रयत्नपूर्वक सक्षमतेला अखंडित सातत्यपूर्ण अशी भाषिक भर फार गरजेची असते. त्यामुळेच पुढे मुलं मोठी होताना जे- जे एेकलेले असते, ते-ते भाषिकदृष्ट्या वापरून बघण्याचा प्रयत्न करतात अाणि अापोअापच भाषा संपादन प्रक्रिया सक्रिय ठरते.
         कुटुंबातील अाई-वडिल, अाजी-अाजोबा इतर सदस्य यांचे सतत बोलणे सुरु असते. या सर्वांमध्ये काही गंभीर विषयांवर संवाद/ चर्चा होत असेल अाणि त्याच वेळी लहान वर्ष दीड वर्षांचे मूल तेथे अाले तर त्यांच्याशी मात्र असे गंभीर बोलले जात नाही, त्यांच्याशी लगेचच संवादाची पद्धत सहजपणे बदलली जाते. त्यालाच ‘केयर गिव्हर स्पीच’ म्हणतात. झोपेतून उठलेल्या मुलाला सहज विचारले जाते ‘उथ्था का तू? झाली का न्नी....न्नी?’भुकेसाठी रडणाऱ्या मुलासमोर म्हणतो, ‘दु-दु पाईजे की बाळाला अाव्वा खायचा अाहे? किंवा बाहेर जाताना, ‘चला भूर्रर्रर्र जायचं न!’यालाच इंग्रजीत ‘मदरीज’ किंवा ‘चाईल्ड डायरेक्टेड स्पीच’ म्हणतात. यामध्ये छोट्या छोट्या प्रश्नांचा वापर असतो, अती अाघातपूर्ण बोलणे असते. उच्च अावाज अथवा अावाजात कमालीचे उतार-चढाव अाणि मध्येच थांबत-लांबवत बोलल्या जाते. अशा पद्धतीचा संवाद हा ‘बाल-संवाद’ असतो. यामध्ये शब्दांचे सुलभीकरण केलेले असते, कधी शब्दाला छोटे रुप दिले जाते. साधे ध्वनी वारंवार वापरण्यावर भर असतो. लहान मुलं प्रत्यक्ष भाषा बोलणाऱ्याच्या वर्गवारीत येण्यापूर्वीच हा बाल संवाद फार महत्त्वाची भूमिका बजावतो. अापण एक संवाद बघुया
अाई: बघ
मूल : (पुस्तकातील चित्राला हात लावतो)
अाई : हे काय अाहे?
मूल: (काहीतरी तोंडाने पुटपुटण्याचा प्रयत्न करते)
अाई : हं... बरोबर... हा ससा अाहे.
मूल : (ससा म्हणण्याचा प्रयत्न करीत हसतं)
अाई : हं... ससा
सर्वसाधारणपणे असे निरीक्षण करण्यात अालेले अाहे की, मुलांसोबत अगदी रोज सातत्यपूर्ण अशा पद्धतीचा संवाद घडत गेला तर पुढे मूल भाषिकदृष्ट्या अधिकाधिक भाषा वापरण्यासाठी सक्षम होते.
        भाषा संपादन प्रक्रियेत काही टप्पे अाहेत. हे टप्पे अथवा पातळ्या एक -एक करून आत्मसात करीत मुलं संपूर्ण भाषा बोलणारे वापरणारे म्हणून तयार होत असते.
१. घूं...घूं... करणे अाणि अस्पष्ट बडबडणे (Cooing and babbling)
         बाळाच्या प्रारंभीच्या भाषासदृश्य ध्वनींना घूं-घूं करणे किंवा cooing म्हणतात. सुरुवातीच्या काही महिन्यातच बाळ स्वरसदृश्य, व्यंजनसदृश्य ध्वनी तोंडातून निर्माण करण्यास सक्षम होते. चार महिन्यांचे होता होता त्याच्यामध्ये जीभ प्रयत्नपूर्वक मागे घेऊन हलकीशी पडजीभेला स्पर्श करून कंठ्य व्यंजनाशी (क, ग, घ) साधर्म्य असणारे ध्वनी उच्चारण्याइतपत सक्षमता येते. घरातील लोक जेव्हा त्याच्यासमोर त्याच्याशी हसून बोलतात तेव्हा हा घूंऽऽऽ घूंऽऽऽ कार प्रतिसादासाठी दिला जातो. यालाच Cooing, gooing म्हणतात.
पाच महिन्यांचे झाल्यानंतर या सरावानेच पुढे बाळाला व्यंजनांना लागून येणाऱ्या स्वरांमधला फरकही कळायला लागतो. जसे बा, गा, दा, पा इत्यादी.
        सहा ते अाठ महिन्यांचा होता होता मूल असंख्य स्वर अाणि व्यंजनाची विविध असंबद्ध जुळवणी करून बडबडू लागते. जसे. बा, बा, बा, गा, गा, गा, दा-दा-दा यालाच babbling म्हणतात. म्हणूनच सर्वसाधारण पालकांचा अनुभव हा असतो की, अापल्या मुलाने, मुलीने पहिला शब्द ‘बाबा’ उच्चारला होता. इथून पुढे नऊ- दहा महिन्यांचे झाल्यावर अगदी अाठवून अाठवून या स्वर-व्यंजनाची वैविध्यपूर्ण जुळवणी सतत सुरु होतात. त्यामध्ये अनुनासिक ध्वनीही जमायला लागतात. मामाऽऽ नानाऽऽऽ इत्यादी.
         मुलं जेव्हा स्वत:हून उभे रहायला शिकते, त्या दरम्यान अवगत असलेल्या ध्वनींनी भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करायला लागते. हा बडबडण्याचा टप्पा त्यांच्यामध्ये अधिकाधिक गुंतागुंतीच्या स्वर व्यंजनाची जुळवणी करण्याचा असतो. अर्थात हे असंबद्ध असतात. मा- दा- गा- बा, बु- का- बु- का, डाॅ- ल- डाॅ- ल... इत्यादी. मुलाला येणारा अशा भाषापूर्ण ध्वनीचा वापर त्याला एकप्रकारचा सामाजिक, भाषिक दृष्टिकोन अथवा भूमिका देत असतो. कारण घरी पालक लगेच या बडबडण्याला प्रतिसाद देत असतात. इथे लहान मुलांचे भाषेच्या जगतात पहिले भाषिक, सामाजिक योगदान घडून येत असते. पुढच्या भागात अापण भाषा संपादन प्रक्रियेच्या पुढील पातळ्या बघणार अाहोत.

(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
दि.१९/०५/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

Sunday, May 5, 2019

वैशाखातील ग्रेसभुल

वैशाखातील ग्रेसभुल
-डाॅ.अमृता इंदूरकर
परत फिरून वैशाख अाला! तसा तो दरवर्षीच येतो. येताना काय काय घेऊन येतो! जसा बाहेर धगधगणारा वैशाख वणवा घेऊन येतो तसा काही अाठवणींचा वणवादेखील. हा स्मृतिजन्य वैशाख वणवा १० मे ची सतत अाठवण करून देतो. काय असते १० मे ला?या १० मे ला दरवर्षी कवी ग्रेस अापल्या काव्यरसिकांना उन्हाळा वाटून द्यायला येतात. सगळं काही विसरता येईल, पण १० मे ला असणारा कवी ग्रेस यांचा जन्मदिवस कसा विसरणार? त्यांच्या जन्माला चिकटून अालेला हा त्यांच्या कवितांचा वैशाखवणवा जणूकाही रणरणत्या उन्हात फुलणाऱ्या अमलताशप्रमाणे अाहे.
         समस्त नागपूरकरांसाठी असलेले भूषण म्हणजे ग्रेस. १० मे त्यांचा जन्मदिवस. ग्रेस नावाचे गारुड सोपे नाही. ग्रेस यांची कविता जोही प्रथम वाचतो तो त्या कवितेच्या प्रेमात पडतो. पण तेही तितकेच खरे की ग्रेसची कविता आवडते, भावते, वेड लावते, कधी रडायला लावते, कधी दु:ख बाहेर काढते, कधी आपलेच मनोगत वाटते. पण असे सगळे असूनही ती संपूर्णपणे कळत नाही. शब्दश: तिला पकडता येत नाही. त्या एका - एका ओळीची तपशिलवार संगती लावता येत नाही. ग्रेस यांची कविता आरशासारखी आहे. या कवितेच्या आरशात अापल्याला अापले प्रतिबिंब दिसते, पण त्याला ना स्पर्श करता येत, ना ते अापल्याला संपूर्णपणे प्राप्त होत. अशी अवस्था जवळ- जवळ सर्वच ग्रेसप्रेमी रसिकांची होते.
       ग्रेसच्या कविता असो की ललितबंध, पृथ्वीच्या पाठीवरचा असा एकही विषय नाही जो त्यांनी अस्पर्श ठेवला. काही विषयांचे तर त्यांना विलक्षण अाकर्षण होते. प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर त्यांना अार्ष महाकाव्य व त्यातील व्यक्तिरेखांचे फारच अाकर्षण होते. रामायण, महाभारत व त्यातील व्यक्तिरेखा ही त्यांची ध्यासस्थाने होती. थोडक्यात असे म्हणता येईल की जे - जे त्यांचे ध्यास विषय होते त्या विषयांची, चरित्रांची त्यांना भूल पडत असे, अाणि मग जणूकाही ती व्यक्तिरेखा ते जगायला लागत. ते पात्र त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत अाहे, अशा थाटात, अविर्भावात ते त्यावर काव्य अथवा ललितबंध लिहित. या कलातंद्रीतूनच त्यांच्या राम म्हणजे रघुपतीवरच्या, सीतेवरच्या अहल्या, उर्मिला तर महाभारतामधील अर्जुन, द्रौपदी, अश्वत्थामा, गांधारी, कुंती, कर्ण यांवरच्या कविता साकारल्या गेल्यात. ही सर्व पात्रे प्रतीकांच्या माध्यमातून त्यांच्या काव्यात पुनरावृत्त होत असतात. या सर्वांच्या अावर्तनाशिवाय अापला कवी म्हणून असणारा अात्मप्रत्यय पोरका होईल, असे भय त्यांना वाटत असावे. इतकी या सर्व चरित्रांची अनेकार्थसुचकता त्यांच्या कवितेत अाहे. त्यातही विशेष करून कर्ण, कुंती, द्रौपदी, गांधारी या व्यक्तिरेखांबद्दल त्यांना विशेष आत्मियता होती. जेव्हा जेव्हा अशा व्यक्तिरेखांची भूल त्यांना पडे ते त्यांचा उल्लेख असा करीत,
होता जोग्यांचा सांगावा
मागा तुळशीला फूल
अौंदुबराच्या फांद्यांना
नको मंजिरीची भूल
कर्ण कुंतीमधला जन्मजन्मांतरीचा संघर्ष तर त्यांना बऱ्याच मोकळ्या शब्दातून व्यक्त केला अाहे. ‘तृष्णेच्या पहिल्या फुलास गिळतो मकरंद अोठातला।कर्णाच्या घनतेत की वितळतो संभोग कुंतीतला’ कुंतीला ऋषी दुर्वांसाकडून मिळालेल्या वरदानरुपी मंत्रांच्या कुतुहलाची तृष्णा इतकी होती की त्या पहिल्या मंत्राला अोठांनी गिळताच कुंतीच्या वाट्याला अालेल्या नकळत संभोगाची परिणती पुढे कर्णाच्या घनतेत म्हणजे जन्मात होते. किंवा माता असूनही गांधारीने जाणूनबुजून घेतलेले अंधत्व, द्रौपदीला वस्त्र पुरवूनही नागडा राहिलेला कृष्ण किंवा कर्ण, अर्जुन द्रौपदी या त्रिकोणाबद्दलच्या काव्यमय अोळी ग्रेस यांनी वारंवार अापल्या कवीहृदय गाभ्यातून प्रकट केल्यात. अशीच त्यांची एक कविता ‘कर्णभूल’
त्याने दान मांडताना
तिची झोळी तपासली
चंद्र चांदण्याच्या खाली
होत्या वाळवीच्या साली.
उभा राजवाडा लख्ख
शोधे जादूची बासरी,
पट्टी डोळ्यांची फाडून
कुठे पाही ना गांधारी..
चंद्र सूर्याची सावली
त्यांचे सत्य हले डुले
स्वप्नसंगात सोडतो
कर्ण कवचकुंडले..
साधारणत: कर्ण म्हटले की अापल्याला अाठवते तो कुंतीच्या पोटी जन्माला अालेला कर्ण. ज्याच्या जन्माला समाजमान्यताच नव्हती. मग त्याच्या वाट्याला अालेले अनाथपण. उच्च कुळातला असूनही सर्वांकडूनच सूतपुत्र म्हणून मारले गेलेले वाक्बाण. पण, इथे या कवितेत मात्र ग्रेस अापल्याला कर्णाच्या जीवनाचा उलटा प्रवास सांगत अाहेत. वर्तमानाचे साक्षीदार राहून ग्रेस अापल्याला कर्णाच्या पूर्वजीवनात नेतात. एकप्रकारचे फ्लॅशबॅक म्हणता येईल.
महाभारतातील युद्धाला प्रारंभ झालाच होता. नित्यनेमाने कर्ण स्नान केल्यावर दान करण्यासाठी निश्चित स्थानावर जायचा. तिथे साक्षात राजमाता कुंती जेव्हा दान मागायला येते तेव्हाच्या प्रसंगाने ग्रेस कवितेला प्रारंभ करतात, त्याने दान मांडताना। तिची झोळी तपासली. कुंतीने तू माझा ज्येष्ठ पुत्र अाहेस, असा उलगडा करून मातृत्वाचे दान मागितले तेव्हा कर्णाने जणू तिच्या पूर्वायुष्याची झोळी तपासली. ही झोळी तपासताना लक्षात येते की ‘चंद्र चांदण्यांच्या खाली होत्या वाळवीच्या साली’. कुंतीचा वर्तमानकाळ तर चंद्र, चांदण्यांसारखा रुपेरी होती. पण, या चंद्र चांदण्यांच्या खाली मात्र तिच्या भूतकाळातल्या वाळवीच्या साली विखुरल्या होत्या. कशाच्या साली होत्या या? कौमार्यावस्थेत प्राप्त झालेल्या मातृत्वाला त्यागून दिलेल्या वात्सल्य भावनेच्या वाळलेल्या साली होत्या, पण अाज नशिबात असलेल्या चांदण्यांचे शिंपण करून ती वास्तवातील वाळवीच्या सालींना अोले करू शकत नव्हती. तो भूतकाळ जो अाज वास्तव म्हणून तिच्या समोर उभा होता.
        जेव्हा कर्ण हस्तिनापूरच्या राजवाड्याचाच एक भाग झाला, दुर्योधनाचा परममित्र झाला तेव्हाही त्याच्या अवतीभवती सर्वच होते. त्याच्या समोर कुंती होती. गांधारी होती, दुर्योधन होता.
‘उभा राजवाडा लख्ख। शोधे जादूची बासरी.’
एेश्वर्याने हा राजवाडा लख्ख उजळला अाहे. पण, सत्याचा तेथे प्रकाशच नव्हता. या राजवाड्यात साक्षात भगवंत असूनही सगळेजण जादुची बासरी शोधीत होते. कर्ण अापल्या हरविलेल्या अस्तित्वाची, मातृत्वाची बासरी, कुंती अापल्या हरवलेल्या अस्तित्वाची बासरी, कौरव-पांडव सत्तेची अशी जादूची; जीवनात मधुर स्वर निर्माण करणारी बासरी सर्वत्र शोधत होते. गांधारी तर सत्य बघण्याची क्षमता असूनही उघड्या डोळ्याने ते बघायला तयार नाही. ‘पट्टी डोळ्यांची फाडून। कुठे पाही ना गांधारी’ म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला जे सत्य अाले ते एका क्षणात भास ठरणारे अाहे, तर एका क्षणात स्वप्नही ठरणारे अाहे.
       अशा या राजवाड्याचा एक अविभाज्य भाग असलेला कर्ण, म्हटलं तर सर्वांचाच, म्हटलं तर कोणाचाच नाही. म्हणून ग्रेस पुढे म्हणतात. ‘चंद्र, सूर्याची सावली. त्यांचे स्वप्न हले-डुले.’ चंद्र हे स्वप्नाचे प्रतीक तर सूर्य हे सत्याचे, वास्तवतेचे प्रतीक. या चंद्र-सूर्याच्या सावलीत म्हणजेच स्वप्न, सत्याच्या सावलीत सूर्यपुत्र असूनही कर्णाच्या जीवनातील सत्य दोलायमान होत राहिले. हा जीवघेणा लंबक कधी स्वप्नापासून सत्यापर्यंत तर कधी सत्यापासून स्वप्नापर्यंत सततच झुलत राहिला अाणि या सर्वांची शोकांतिका पुढे ‘स्वप्नसंगात सोडताे? कर्ण कवचकुंडले’ यामध्ये झाली. कर्णाची शोकांतिका हीच की अापली कवचकुंडले सोडण्याबद्दलही त्याला स्वप्नदृष्टांतच होतो. म्हणजे तिथेही कर्ण पुन्हा सत्यापासून दूरच जातो. जीवनातले सर्वात मोठे सत्य त्याला स्वप्नात कळते यापेक्षा अजून दुर्दैव ते कोणते. परत वाट्याला येते ती मात्र त्याच्या जीवनाला चिकटून अालेल्या सत्याची शोकांतिका.
          ग्रेस इथे केवळ तीनच कडव्यांमधून कर्णाच्या जीवनकथेचे वर्तुळ पूर्ण करतात. कर्णाच्या अायुष्यातील कथासूत्र ज्या युद्धकाळातील दान देण्याच्या ठिकाणी अाले होते तिथे रसिकाला परत अाणून सोडतात. एक प्रकारच्या पूर्व सूत्रनिवेदन पद्धतीकडून कथेच्या शेवटाकडे ते काव्यमय पद्धतीने, संज्ञाप्रवाही प्रतिकांच्या माध्यमातून हा अनुभव अापल्याला देतात. अाजपर्यंत समस्त मराठी काव्यरसिकांना अापल्या अनुवंशहीन कवितेची भूल पाडणाऱ्या या दु:खाच्या महाकवीला ही रसग्रहणात्मक कर्णभूल समर्पित.
डॉ.अमृता इंदूरकर
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
दि.०५/०५/२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल