Sunday, April 21, 2019

निर्मितीप्रक्रियेचे धूसर अस्तर

निर्मितीप्रक्रियेचे धूसर अस्तर
डाॅ.अमृता इंदूरकर
कविता हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. काव्य आवडत नाही, असे म्हणणारी क्वचितच कुणी विरळा व्यक्ती सापडेल. कविता ही कशी जमते किंवा कशी जन्माला येते हा प्रश्न जसा कवितेचा आस्वाद घेणाऱ्याला पडतो तसा व तितक्याच प्रमाणात ताे कविता करणाऱ्या कवीलाही पडतो, पण या प्रश्नाचे निश्चित असे उत्तर कवी देखील देऊ शकत नाही. पण, तो त्या उत्तराच्या शोधात निरंतर असतो.
कविता जन्माला येण्यासाठी तिची कोणती प्रक्रिया असते? ती कशी असते याचा विचार मात्र नक्कीच करावा लागतो. खरेतर असा शोध घेणाऱ्या कवीची अवस्था त्या कस्तुरीमृगासारखी असते. स्वत:जवळ असलेल्या कस्तुरीच्या मधूर गंधाने वेडा होऊन रानभर कस्तुरीचा शोध घेत हा मृग सैरावैरा जीवाच्या आकांताने धावत असतो, पण शेवटपर्यंत त्याला कळत नाही की ही कस्तुरी त्याच्यातच दडलेली आहे. अगदी हीच अवस्था आपल्या निर्मितीच्या उगमाचा शोध घेताना कवीची होते. मराठी कवितेला ज्यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करुन दिले व साहित्याच्या विस्तृत पटावर चिरंतन अढळपद मिळवून दिले, त्या सर्व कवींनी काव्यनिर्मिती प्रक्रियेचा सखोल विचार केलेला आहे. तो आधी लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते.
          केशवसुतांनी तर आनंदीरमण यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. कविता म्हणजे आकाशीची वीज आहे ती धरू पाहणारे शेकडा ९९ आपणास होरपळून मात्र घेतात. मी अशा नव्याण्णवांपैकीच आहे. म्हणजे यामधून हे स्पष्ट होते की कवितेसाठी झुरून झुरून तिच्या निर्मितीस्तव होरपळणे केशवसुतांना अपेक्षित आहे. याचा अनुभव त्यांनी नक्कीच घेतला असणार म्हणून ‘झपूर्झा’ कवितेत ते म्हणतात, ‘जाणिवेच्या ज्ञात कुंपणावरून धीर धरत उड्डाण करत ही प्रतिभारुपी वीज नेणिवेच्या अज्ञाताच्या प्रदेशात जाते. तिथे तिला अंधूक आकृती दिसतात, ज्या सतत गूढ गीत गात असतात आणि त्यातून मग त्या गीताचे ध्वनी निर्माण होतात आणि काव्यनिर्मिती होते’.
कवी ‘बीं’ नी तर काव्याची व्याख्याच केली आहे. "सौंदर्याची दिव्य प्रस्फुरणे आणि मूर्तिमंत सौंदर्य म्हणजेच काव्य" असे ते म्हणतात. काव्यनिर्मितीच्या बाबतीत तर कोणकोणत्या गोष्टींना मज्जाव केलेला असतो, ते सांगताना ते म्हणतात की, निर्मितीचा जो उत्कट क्षण असतो त्यावेळेला इंद्रियानुभूती जाणवत नाही. बुद्धीचे मापक लावून त्याचे प्रमाण ठरविता येत नाही. वृत्ती मधली कठीणता टाकूनच त्या प्रक्रियेशी एकरूप व्हावे लागते आणि जेव्हा हे सर्व साधेल तेव्हाच तो खरा काव्यानंद नि:स्संगपणे उपभोगता येईल, असे बी म्हणतात.
तर गोविंदग्रजांच्या दृष्टीने केवळ सौंदर्याचा आलेख, शोभा म्हणजे काव्य नव्हे तर काव्य कराया जित्या जिवाचे जातिवंत करणेच हवे. काव्य निर्माण करायचे असेल तर तुमचे भावहृदय जिवंत असायला हवे. नुसतेच अर्थरहीत सौंदर्याचे लेणे ल्यायलेले बोल काही खरे नाहीत. त्यामध्ये दर्जेदार आशयाचा प्राणही आवश्यक असतो.
कवीवर्य भा. रा. तांबे यांनी देखील "कविता ही परमोत्कर्षास गेलेल्या भावनांचा उद्गार होय" , असे वारंवार अापल्या पत्रव्यवहारातून मांडले अाहे. निर्मितीप्रक्रिया मूळात गूढ अाहे ती केव्हा, कशी स्फुरेल याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. एकीकडे कवीने कमळाच्या प्रेरणेतून प्रतिभारुपी काव्यमध रसिकांना पाजावा व रसिकानेही तो तितक्याच निश्चलतेने अास्वादावा अशी अपेक्षा करणारे तांबे, ‘मधुघटचि रिकामे पडति घरी!’ या जाणिवेने शंकीतही होतात. तांबेच काय पण प्रत्येक कवी मनातल्या मनात या दोन्ही भावनांनी झपाटलेला असतो. निर्मितीचे समाधान अाणि ही निर्मितीक्षमता कोणत्या क्षणी नष्ट होईल, याची भीती त्याला सतत भेडसावत असते.
निर्मितीपूर्व भय, त्यातील अात्मनाश अाणि परत निर्मितीचाच जन्म याबद्दल ग्रेस म्हणतात, "निर्मितीनाशाचे भय म्हणजे जसा निर्मितीचा नाश नव्हे, तद्वतच तो निर्मितीचाही नाश नव्हे. तर या भयाच्या दोलायमान अवस्थेवर अांदोलित होणारी सतेज निर्मितीशीलतेची वैराण, अनाथ अवस्था, तिचा निदिध्यास असे काहीसे कंप मला या अवस्थेत जाणवतात". मुळात प्रत्येक कवीला अापल्या सौंदर्यनिर्मितीचा संकेत अोळखता येतो, किंबहुना तो अोळखता यायला हवा. दैनंदिन जीवनात कितीतरी संवेदना अापल्यापर्यंत येत असतात, पण त्या सर्वच निर्मितीक्षम असतातच असे नाही. यासाठी एकप्रकारचे ‘अॅस्थेटिक जजमेन्ट’ महत्त्वाचे असते ही सौंदर्यानुभूती अाहे, याची जाणीव मुळात तीव्रतेने झाली पाहिजे. तितकी अात्मनिष्ठा असेल तर एखादी संवेदना येऊन भिडते तेव्हा मनात खळबळ माजते. एकप्रकारची अस्वस्थता निर्माण होते. या अस्वस्थेतेशी प्रामाणिक राहता यायला हवे. जोपर्यंत ही खळबळ शब्दात उतरविली जात नाही तोपर्यंत कवी जाणीव अाणि नेणीव या दोन्ही पातळ्यांवर शांत नसतो. ही अशांतताच उत्तम कलाकृतीचे बीज ठरणार असते. यानंतर प्रत्यक्ष निर्मितीसाठी अाशयाच्या अाकृत्या मनात तयार व्हायला लागतात. त्यांचा जेव्हा फार संयमाने पाठपुरावा होतो, तेव्हा अापोअापच काव्य साकार होते. अर्थात यासाठी कविला भावनात्मक पातळीवर खूप मोल द्यावे लागते. कारण हे सर्व प्रतिभेचे वादळ मनात घोंगावत असते.
        काव्यप्रक्रिया ही कोळ्याच्या जाळ्यासारखी असते. अापण हे जाळे प्रथम बघतो तेव्हा त्याचे वीणकाम पाहून थक्क होतो. पण, जे वरवर दिसते ते खरे वीणकामच नव्हे. जेव्हा त्या जाळ्यावर उन्हाची तिरपी पडते तेव्हाच त्यातील खरे सूक्ष्म धागेदोरे उलगडले जातात अाणि त्यातील खरी कलाकुसर दिसू लागते. काव्यनिर्मितीचेही असेच अाहे. वरवरचे वीणकाम तर प्रत्येकच कवीला जाणवते, पण प्रतिभेची तिरीप जोपर्यंत त्यावर पडत नाही तोपर्यंत ती कविता अापल्या सौंदर्यासकट प्रकट होत नाही. प्रत्येक कवीने ही तिरीप पडण्याची वाट बघायला हवी. कारण काव्यनिर्मितीचा काळ ठरीव नसतो. कदाचित ती एका झटक्यात संपूर्ण स्फूर्तीनिशी सुचेल, नाहीतर काही महिने पण लागू शकतील. एखाद्या संवेदनेचा, अाघात अापल्यावर कसा होतो त्यावर हे सर्व अवलंबून असते.
मर्ढेकरांनी या अाघाताचे दोन प्रकार सांगितले अाहेत. पहिला ज्यामध्ये एकदम तेजस्वी वीज दगडावर पडते, अाणि दगड तत्काळ दुभंगतो. त्याचप्रमाणे प्रतिभेचा उद्रेक असा काही होतो की एकदम अप्रतिम काव्य जन्माला येते. वाल्मीकी ऋषींनी पारध्याने मारलेल्या बाणामुळे विद्ध होऊन प्राण सोडणारा क्रौंच पक्षी बघितला अाणि त्यासाठी विलाप करणारी त्याची जोडीदारीण बघितली, त्या बरोबर त्यांच्या मन:पटलावर असा काही अाघात झाला की अचानक उत्स्फुर्तपणे तोंडून निघाले,
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम:शाश्वती: समा:।
यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधी:काममोहितम्।।
         तर दुसऱ्या प्रकारचा अाघात म्हणजे एखाद्या दगडावर बरेच वर्ष थेंब थेंब पाणी पडत असते अाणि कालांतराने तो दगड दुभंगतो. म्हणजेच घटना, अनुभव तुमच्या जीवनात येतात, पण ते नकळत कुठेतरी मनात दडून बसतात. वरवर जरी अापण ते विसरलो असलो तरी सुप्तावस्थेत भावनेवर त्याचा निश्चित परिणाम झालेला असतो. अाणि मग कालांतराने त्यावर कविता जन्माला येते. कवीचे एकच काम असते की तो अाघात बरोबर त्याने अोळखावा, पचवावा अाणि मगच काव्यसृजन करावे.
काव्यनिर्मितीची प्रेरणा बनणारे अाघात फार अतर्क्य स्वरुपाचे असतात. विविधांगी रुपाच्या या प्रेरणा असतात;अाघात असतात. कधी दिवसभराचा मनाचा व्यावहारिक व्यापार संपला की जेव्हा मन निवांततेच्या, नीरवतेच्या अावरणात शिरलेले, बंदिस्त असते, तेव्हा मध्यरात्रीच्या गाढ झोपेतही सुप्त अवस्थेतील मनातून कविता जन्म घेते. कुणासाठी निसर्गातील ऋतूबदलांचा काळ हा अाघात ठरतो अाणि त्या अवस्थेतून काव्य जन्माला येते. तर कधी वळिवाचा येणारा अवचित पाऊस किंवा पानगळींचा वर्षाव, पानाचा अोलसर खच ही अाघातांची कारणे ठरू शकतात. तर काहींसाठी अभिजात दु:खच इतके असते की त्या अाघाताने प्रतिभेचा दगड कायम दुभंगलेलाच असतो. याचे स्वरुप इतके अस्पष्ट असते ते सहजासहजी पकडता येत नाही.
अापल्या मनातून अापल्याशी कुणी बोलत असल्याचा भास होतो. क्षीण एेकून येणारा अातला अावाज एकांत मिळताच तीव्रपणे एेकू यायला लागतो. सगळ्या बहिर्मुख संवेदना संकुचित होऊन अात्मकोशात गुरफटायला लागतात. या अात्मकोशात प्रतिभेला मूर्त रुप देणाऱ्या तिरीपेसाठी प्रचंड घुसमट सुरु होते. ते निर्मितीचे साकार रुप बाहेर येईपर्यंत हा अात्मकोश कवीच्या जिवाला इतका गुदमरवतो की अाता या अात्मकोशातच अापला नाश अाहे, शेवट अाहे असे वाटायला लागते अाणि हलकासा उजेडाचा शब्दरूप कवडसा मिळतो अाणि काव्य साकार होते. पण, कवी मात्र या अात्मकोशातून एका झटक्यात बाहेर येऊ शकत नाही. त्याच्या मनोसंवेदनेला जेव्हा ज्ञात पातळीवर तो जिवंत असल्याची जाणीव होते, तेव्हा तो त्या कोशाच्या बाहेर येतो.
काव्याच्या अभिव्यक्तीला हे असे प्रचंड घुसमट होणारे धूसर अस्तर कायमचे चिकटलेले असते. या अस्तराचा पोत जितका तलम असेल तितकेच व्यक्त रुपातील काव्यही सौंदर्यपूर्ण कलारूप धारण करणारे असेल.
         कवितेच्या बाबतीत असे कधी होत नाही की, चला अाता दिवसभराची कामं अाटोपली अाहे. दुपारचा फावला वेळ अाहे. तर जरा कविता करू किंवा स्त्रीवादी, ज्वलंत घटना, शेतकरी समस्या अशा विषयांवर मागणी तसा पुरवठा म्हणून कविता करू. काव्य निर्मितीप्रक्रियेच्या या सर्व बाबी अापण जेव्हा लक्षात घेऊ तेव्हा एक चांगली कलाकृती जन्म घेईल. शेतात पेरणी झाल्यावर पीक यायला देखील ठरावीक वेळ जाऊ द्यावा लागतो. मूल जन्माला यायला सुद्धा नऊ महिन्याचा कालावधी असतो, मग काव्यसृजनाची घाई का करावी? कवीला परमोच्च अानंद मिळवून देणाऱ्या सृजनाची देखील संयमाने वाट पाहणेच योग्य.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
२१-०४-२०१९
दैनिक गोवन वार्ता
तरंग पुरवणी
गोवा
@डॉ.अमृता इंदूरकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल

Sunday, April 7, 2019

गीतरामायण:एक आनंदमयी शांतवन

गीतरामायण: एक आनंदमयी शांतवन
-डॉ.अमृता इंदूरकर
होळी संपताच मराठी मनाला वेध लागतात ते चैत्र महिन्याचे. चैत्र म्हणजे समस्त सश्रद्ध लोकांचा अानंदमहिना. घराघरात मोठ्या उत्साहाने दिनदर्शिकेत डोकावून चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे मराठी नववर्षाला प्रारंभ होणारा गुढीपाडवा, कधी अाहे ते बघितले जाते. मनात नववर्षाच्या अानंदाचा अाम्रवृक्ष जसा बहरलेला असतो, तसा या अाम्रवृक्षाला रामजन्मरुपी मंगलमयी सत्- चित्- अानंदाचा मोहरही फुलून अालेला असतो. प्रत्येक संवेदना त्या रामनामाच्या मंद गंधाने दरवळून निघालेली असते.
महाराष्ट्रातील प्रत्येकच मंदिराची, घराची मंगल पहाट गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच गीतरामायणाच्या प्रासादिक शब्द-सुरांमध्ये न्हाऊन निघते. जणु काही त्या दिवसापासून ते रामनवमीपर्यंत ही महाराष्ट्रशारदा अापल्या कंठात ग. दि. माडगुळकर निर्मित ‘गीतरामायण’ रुपी कौस्तुभमणी धारण करते. या गीतरामायणाने कितीतरी पिढ्यांची सांस्कृतिक घडण घडविली. याची अवीट मोहिनी अशी काही अाहे की,
जोवरि हे जग, जोवरी भाषण
तोवरी नूतन नित रामायण
ही प्रत्येकाचीच प्रचिती अाहे. मराठी माणसाच्या जीवनाचा अादी अाणि अंत या ‘राम’नेच होत असतो. दोन मराठी माणसं भेटतात तेव्हा नकळत तोंडातून ‘राम राम’ म्हणतात तर जेव्हा या जगाचा निरोप घेतात तेव्हाही ‘राम’ म्हणतच प्रयाण करतात. इतके मराठी जीवन राममय अाहे.
मराठी गीतनिर्मितीच्या क्षेत्रात गदिमांचे स्थान केवळ अजोड अाहे. प्राचीन मराठी काव्यातील गीतभांडाराला अर्वाचीन काळात माडगुळकरांनी अधिक समृद्ध केले.
गीतरामायणातील अनुरूप शब्द, त्यांची सुश्लिष्ट रचना, त्या गीतांच्या मधुर चाली, त्यामधील प्रसंगानुकूल भाषाविष्कार अशा सर्वांगसंपन्नतेमुळे ग. दि. माडगूळकर यथार्थाने ‘अाधुनिक वाल्मिकी’ ठरले. अाजचा एकूणच गतीमान काळ बघता, अाजच्या धकाधकीच्या, लगबगीच्या जीवनात लोकांजवळ काय नाही अाहे तर तो म्हणजे ‘वेळ’. मनाची निवांतता देखील वेगळा वेळ काढून प्राप्त करता येत नाही. पण, शेवटी शिणून गेलेल्या मानवी मनाला शांत करणारे. निववणारे तर हवे असते. ज्या अाधुनिक काळात माडगूळकर वावरत होते, त्या काळाची ही व्यक्तीमनांची नाडी त्यांना अचूक सापडली. मग रामायण कथेचा माग घेत एकेका रामायणी व्यक्तीच्या तोंडूनच गीतरुपाने त्यांनी प्रकट केला. शिवाय गीते ही गाण्यासाठी असल्यामुळे साहजिकच लोकांच्या कंठात बसतात. म्हणूनच की काय माडगूळकरांच्या या गीतांना सुधीर फडके यांच्यासारख्या सूरश्रेष्ठांचा कंठ लाभला. त्यामुळे समस्त महाराष्ट्रातील जनतेला एका गोड शब्दसूर संगमात डुंबत राहण्याचे सहस्रावधी सुख प्राप्त झाले.
गदिमांनी अवघ्या छप्पन गीतांमध्ये रामायण बांधले. हे करीत असताना कथानकावरची पकड कुठेही ढिली होऊ न देता प्रमुख कथाभाग घेऊन प्रत्येक प्रसंगाची शब्दरचना अशी काही श्रुतिमनोहर रुपात करीत अाणि कडव्यांच्या रुपाने त्याचा सौंदर्यपूर्ण विस्तार करीत. गीतरामायणाचा ‘कुश लव रामायण गाती’ या गीताने प्रारंभ करताना पहिल्याच कडव्यात फक्त चारच अोळीत पिता श्रीराम अाणि पुत्र कुश- लव यांचे व्यक्तिचित्रण करतात.
कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगति चरित पित्याचे
ज्योतिने तेजाची अारती
पुत्ररुपी ज्योतीने पितारुपी तेजाची अारती करण्याची उपमा केवळ विलक्षण भाव निर्माण करते. गीतरामायणात जवळ-जवळ सर्वच गीतांपासून करूण, वीर, रौद्र, भयानक, हर्ष, अद्भुत रसांचा परिपोष झालेला अाहे. एक राजा म्हणून सर्व काही ऐश्वर्यसंपन्न असताना राजा दशरथाचे पुत्रहीन असणे गदिमा ‘कल्पतरुला फूल नसे का? वसंत सरला तरी’ या सूचकतेने व्यक्त करतात किंवा कौसल्येच्या तोंडी येणारा ‘उगा का काळिज माझे उले। पाहुनी वेलीवरची फुले’ हे उद्गार तिच्या मातृत्वाला पारख्या झालेल्या दु:खाचा सल उजागर करतात. वनवासाला प्रस्थान करताना अत्यंत दु:खी, कष्टी झालेली कौसल्या करूण, व्याकूळ होऊन ‘उंबरठ्यासह अोलांडुनिया मातेची माया। नको रे जाऊ रामराया’ असे म्हणते. शिवाय ‘शतनवसांनी येऊन पोटी। सुखविलेस का दु:खासाठी?’ असा रामालाच प्रश्न करते. रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर तिच्या वियोगाने दु:खसागरात बुडालेले श्रीराम ‘अबोल झाले वारे पक्षी, हरिली का कुणि मम कमलाक्षी?’ असा तेथील लता, अशोक, वृक्ष, नद्या, वन्य मृग या सर्वांना अार्त प्रश्न करतात.
शेवटी जेव्हा लक्ष्मण सीतेला वनात सोडायला येतो, त्यावेळी सीता या वाट्याला अालेल्या दशेचा उल्लेख ‘कठोर झाली जेथे करुणा, गिळी तमिला जेथे अरुणा’ असा करते. कारण मला वनात पाठवणारे माझे पती राघव नाहीत ते केवळ नृपती अाहेत असे म्हणून ‘मज सांग लक्ष्मणा, जाऊ कुठे?’ असे साश्रूनयनांनी विचारते.
विश्वामित्रांच्या तोडून अादेशवजा अालेले ‘मार ही ताटिका’ या गीतांत वीर अाणि भयानक रसाच्या अनुभव येतो. ताटिकेचे वर्णन करताना भयानक रस तर तिला मारताना श्रीरामाच्या ठायी असणारा वीरभाव प्रकट होतो. ‘बांधा सेतू बांधा रे सागरी’ हे गीत तर वीररसाने ओतप्रोत भरलेले गीत ठरले. ‘सेतुबंधने जोडून अोढा समीप लंकापुरी’ असे सर्व वानरगण एकमेकांना म्हणत असताना संपूर्ण स्फूर्तीचे वातावरण निर्माण करतात. भरताला जेव्हा कळते की अापल्याच मातेच्या हट्टामुळे रामाला वनवास पत्करावा लागला त्यावेळी त्याचा संताप अनावर होतो अाणि क्रोधात तो कैकयीला ‘माता न तू, वैरिणी’ असे म्हणतो. क्रोधात तो ‘श्रीरामा ते वल्कल देता का नच जळले हात?’ असा प्रश्न करतो, असे म्हणून सुमंतासह भरत रामभेटीसाठी चित्रकूट पर्वतासाठी निघतो. वनात झाडावर बसून हवेत उडणारे धुळीचे लोट बघून लक्ष्मण अंदाज बांधतो की नक्कीच सेना घेऊन भरत अापल्याशी लढायला येत असणार. त्यावेळी रागाने लाल होत तो ‘भ्याड भरत काय हा बंधुघात साधतो, येऊ दे पुढे जरा, कंठनाल छेदतो’ असे म्हणतो.
गदिमांनी गीतरामायणात अानंदही तितकाच पेरला अाहे. कधी या अानंदाचे स्वरुप सात्त्विक तर कधी हर्षोल्हास साजरा करणारे असे अाहे. ‘राम जन्मला ग सखी’ हे गीत तर अानंदाला उधाण अाणणारे अाहे. रामजन्माची अचूक वेळ सांगताना गदिमा ‘दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला’ असे चपखल वर्णन करतात. सर्वत्र इतका अानंद व्यापला की तो सूर्यही दोन क्षण थांबला. हे गीतच असे रचले गेले अाहे की वाचकांच्या डोळ्यांसमोर अापोअापच उत्सवाचे स्वरुप येते.
कौसल्येच्या तोंडून राम मोठा होतानाचे कौतुकौद्गार ‘सावळा गं रामचंद्र’ वाचकाला सात्त्विक अानंद देतात. या गीतात गदिमांची खास शैली दिसते. संस्कृत साहित्य शास्त्रकार मम्मटाचार्य यांनी काव्याचे उद्देश काव्यप्रयोजन सांगताना एक प्रयोजन असे सांगितले अाहे, ते म्हणजे ‘कान्तासम्मिततयोपदेशयुगे’ म्हणजे पत्नी ज्याप्रमाणे पतीला हळूवार असा उपदेश करते तसेच काव्याचेही प्रयोजन असते. ‘सावळा गं रामचंद्र’ मध्ये कौसल्येच्या तोंडून गदिमांनी अगदी अशाच पद्धतीचा उपदेश श्रीरामाचे कौतुक करता करता दिला.
सावळा ग रामचंद्र, करी भावंडासी प्रीत
थोरथोरांनी शिकावी, बाळाची या बाळरीत
गीतरामायणातून निर्माण होणाऱ्या रसास्वादाव्यतिरिक्त यामध्ये मोहक निवेदनशैली, कथेची नाट्याची संपूर्ण जाण व नाट्य उभे करण्यासाठी निवडलेल्या प्रसंगाची चोखबद्ध निवड, गीतातील नाट्य फुलविण्यासाठी असणारी कल्पकता जात्याच गदिमांमध्ये होती. विशिष्ट दृश्यांना परिणामकारक करणारी एक विशिष्ट अशी दिग्दर्शकाची दृष्टी त्यांना होती. कदाचित चित्रपट व्यवसायात असल्यामुळे हा एक तिसरा डोळा त्यांना उपजतच प्राप्त झाला होता. माता कौसल्या, बंधू भरत-लक्ष्मण, दासभक्त हनुमान, भोळीभाबडी शबरी, निष्ठावंत मित्र सुग्रीव अाणि रावणाची कानउघाडणी करून देखील भातृकर्तव्याला जागणारा कुंभकर्ण यांच्यावर अाधारित एकेका गीतांतून गदिमांनी त्या त्या पात्राचे सारे व्यक्तिमत्त्व साक्षात समोर उभे होते. श्रीरामाला नदी पार करतानाचे गुहकाचे तोंडी असलेले गीत असो किंवा सेतू बांधताना वानरगणांच्या तोंडी अालेले गीत एकप्रकारचे सांघिक व्यक्तिमत्त्वच तालामध्ये व्यक्त करते. रावणाने सीतेला पळविल्यानंतर जटायू सोबत होणाऱ्या समरप्रसंगाचे वर्णन कसे काही अाले अाहे की, अापण चित्रपटच बघतो अाहोत की काय इतकी त्यामध्ये जीवंतता अाहे.
प्रेम अाणि पराक्रम, निष्ठा अाणि सौजन्य, त्याग अाणि सहनशीलता यांचे कल्पक दर्शन माडगूळकरांनी गीतरामायणातून घडविले. तेही अतिशय प्रासादिक अाणि चारुतेने युक्त अशा शैलीतून. कोणताही रसिक हे वाचेल किंवा एेकेल तरी दोन्ही रुपानं त्याला तत्काळ अानंदप्राप्ती होईल इतकी या रचनेची रसवत्ता अाहे. म्हणूनच गीतरामायणाबाबत असे म्हणतात की ते कुणी लिहिलेले नाही तर झालेले अाहे, अापोअाप गदिमांच्याही नकळत या रचनांनी जन्म घेतला अाहे.
याबाबतीत काहींना असे वाटू शकते की यामध्ये गदिमांचे श्रेय ते काय? यात असे अपूर्व काय अाहे? कारण मूळ कथानक तर तयारच होते. पण अशांनी एक लक्षात घ्यायला हवे की ही केवळ मूळ कथानकाची उजळणी नाही तर एक स्वतंत्र निर्मिती अाहे. निर्मिती अंतर्गत निर्मिती करून १९५६ पासून ते अाजतागायत रसिकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य केवळ अाणि केवळ ग. दि. माडगुळकर अाणि सुधीर फडके यांनाच जाते. खरेतर रावणाचे निर्दालन करून परतलेल्या राम-सीता कथाकाव्याचा समारोप झाला असता, पण माडगूळकरांनी रामसीतेच्या जीवनात अालेल्या उदात्त वियोगाचा उल्लेख करून सीतामाईचे वनात जाणे येथे हे कथाकाव्य संपते. गदीमांना अापल्या रसिकांना जाता जाता हेच सांगायचे होते की गीतरामायण तर संपले, पण सीतेचे दु:ख मात्र संपले नाही. हे दु:ख समस्त छंद अाणि विरामांच्याही पलीकडले अाहे. कधीही न सरणारे. हा भाव रसिकांच्या मनात रेंगाळत ठेवून गीतरामायणाची समाप्ती होते. पण चैत्रमास कायमचा पुनित होतो!
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल