मर्ढेकरांच्या कवितेतील 'ती'
-डॉ.अमृता इंदूरकर
नुकताच महिला दिन साजरा झाला. खरेतर ८ मार्च हा एक दिवस महिला दिनाचा निश्चित असला तरी जगात हा महिनाभर महिला दिन कुठल्या ना कुठल्या रुपाने साजरा होतच राहतो. शेवटी महिला दिन म्हणजे काय? तर समस्त विश्वाला व्यापून असणारी, या विश्वाच्या केंद्रस्थानी असणारी ‘ती’. ‘ती’ च्याबद्दल जाणवणाऱ्या सर्व भावभावनांना व्यक्त करण्याचे एक निमित्त. मनापासून कुटुंबापर्यंत. कुटुंबापासून जगापर्यंत कब्जा केलेली ती एकरुपा नसून शतरुपा आहे. नुसते ‘ती’ म्हटले तरी प्रत्येकाच्या मनात ज्या ‘ती’ चे रुप कोरले गेले आहे, त्या सर्वच ‘ती’ क्षणात नजरेसमोर येतात. मराठी साहित्याला लेखिका म्हणून आणि लेखनविषय म्हणून या ‘ती’ने इतके व्यापले आहे की ‘ती’च्या शिवाय मराठी साहित्य प्राण नसलेल्या देहासारखे ठरेल. एक मराठी कवी माणूस बा. सी. मर्ढेकरांना या ‘ती’ ची जी रुपे दिसली ती त्या काळात क्वचितच कुणाला दिसली असतील. २० मार्च हा मर्ढेकरांचा स्मृतिदिन. यानिमित्ताने मर्ढेकरांच्या कवितेमधली ‘ती’ कशी होती? कोणकोणत्या रुपामध्ये होती? याचे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एक पुनर्मूल्यात्मक सिंहावलोकन करू या.
प्रामुख्याने तीन रुपे
मर्ढेकरांच्या एकूणच स्त्री चित्रणात्मक कवितांमधून तीन रुपे प्रामुख्याने आढळतात. स्त्रीप्रती असणारी त्यांची मातृपूजक कवीवृत्ती. समाजात वावरणाऱ्या स्त्रीच्या शोषणाची चित्रे आणि प्रेयसीरुपात भेटणारी स्त्री. अशा तीन रुपांमधून मर्ढेकरांच्या कवितेतील ‘ती’ आपल्याला भेटते. ‘शिशिरागम’ हे मर्ढेकरांचे पहिले कथाकाव्य त्यांच्या प्रेमव्याकूळ भावनांचे चित्रण करणारे काव्य आहे. प्रेमभंगातून निर्माण होणाऱ्या प्रेमनिराशेच्या गर्तेतून शिशिरागमातील नायकाला त्याची मातृपूजक वृत्ती वाचवते, असे त्यांनी चित्रण केले आहे. प्रेमभंग होताच नायकाला प्रकर्षाने जाणवते की, आयुष्यात एकवेळ बाई नसते पण आई तर असते. ‘माय असते. बाईल जरी नाही, प्रेमवंता तारी प्रेमवंचिताही’. प्रेमभंगाच्या असह्य दु:खावर फक्त आईच आपल्या ममतेची फुंकर घालून ते दु:ख सहन करण्याचे बळ मिळवून देते, असे हा नायक म्हणतो. ‘आई! येत म्हणून मस्तक तुझ्या अंकावरी ठेवण्या’.
मंगलमय मर्म
पुढे ‘काही कविता व आणखी काही कविता’ या कवितासंग्रहात स्त्री संवेदनेचा मेळ साधणाऱ्या, मातृगौरवाच्या विविध अशा छटा लक्षणीय पद्धतीने त्यांनी साकारल्या आहेत. संपूर्ण महानगराचा जडपणा आपल्या अंतरंगात वागवणारी मुंबापुरी मर्ढेकरांना न्हालेल्या, सोज्वळ, मोहक गर्भवतीसारखी भासते. त्यांची ही प्रतिमा स्त्रीत्वामध्ये साठवलेले मंगलमय मर्म उलगडणारी आहे. ‘पांडुर संध्या चौथ्या प्रहरी’ या कवितेत चार महिन्याचा गर्भ गळालेल्या मोलकरणीचे चित्रण करताना ‘पांडुर संध्या चौथ्या प्रहरी। विव्हळते नारी लाल फाटुनी’ या ओळींमधून चवथ्या प्रहरानंतर आरक्त झालेली संध्याकाळ जणू काही आकाशी सगळीकडे आपला लालपणा पसरून विव्हळते, तशीच चार महिन्याचा गर्भ गळालेली मोलकरीण विव्हळते, अशी कल्पना केली आहे. या तीव्रतेवर कळस म्हणून की काय, अशा या मोलकरणीचे मानसिक, शारिरीक दु:ख समजून घेणारी तिची मालकीण तिला मोठ्या मायेने जवळ बसवून घास भरविते. आजच्या स्त्रीवादी कविता, स्त्रीवादाचे शिक्कामोर्तब व्हावे यासाठी पाळीच्या स्त्रावामध्येच अडकलेल्या दिसतात. तिथे मर्ढेकरांनी मात्र मोलकरीण आणि मालकीणीमधील मालकीणीच्या रुपाने मातृत्व हरवलेल्या जखमेचे मनावरील व्रण हळूवारपणे भरून काढताना दिसतात. स्त्रीच स्त्रीची मनोवेदना, उदरवेदना समजून घेऊ शकते, हे अतिशय सूचकपणे, लक्षणेने सांगतात.
मातृत्वाचा गौरव
मातृत्वाच्या उंबरठ्यावर उभ्या असणाऱ्या भावी मातेचे इतके मंगलकारी, तरल, हळूवार वर्णन मर्ढेकरांसारखा कवी जेव्हा करतो तेव्हा रसिकवाचक अक्षरश: या मांगल्यभावनेत चिंब भिजतो. ‘बाळगुनी हा पोटी इवला गोळा’ या कवितेत आईच्या रक्तरुपी गंगेतून निघालेले रसद्रव्याचे ओढे, नाले त्या इवल्या इवल्या अवयवांना उगविण्यासाठी जाऊन मिळतात, असे ते म्हणतात.
‘रसद्रव्याचे ओढे नाले
तव रक्ताच्या गंगेलागी
कितीक मिळती झुळझुळ, इवले
अवयव उगवित इवल्या अंगी...’
तव रक्ताच्या गंगेलागी
कितीक मिळती झुळझुळ, इवले
अवयव उगवित इवल्या अंगी...’
तर ‘पोरसवदा होतीस’ या कवितेतून कालपरवापर्यंत जिच्या पायांमध्ये वारा खेळायचा ती अल्लड आज मोगरीची कळी जशी टपोरते तशी मातृत्वाच्या चाहुलीने टपोरली आहे. जिच्या कुशीतून उद्या छोट्या जीवाची साखळी पडणार आहे, अशा या भावी मातेचे मर्ढेकर ‘थांब उद्याचे माऊली। तीर्थ पायांचे घेईतो’ असे म्हणून गौरव करतात. ‘बोंड कपाशीचे फुटे’ या कवितेतून भेटणारी ग्रामीण स्त्री सकाळपासून रात्रीपर्यंत शेतात राबताना, भाकरी थापताना सतत पतीला आपला साजशृंगार आवडेल का? माझ्या हातची भाकर गोड लागेल का? याचाच विचार करते. पुरुषाच्या बरोबरीने शेतात राबराब राबणाऱ्या स्त्रीच्या मनातील सुखाच्या इवल्या इवल्या कल्पना देखील मर्ढेकरांनी जणू काही स्त्रीमन जाणून वर्णन केल्या. या सर्वच मातृत्वाचा गौरव करणाऱ्या कवितांमधून मर्ढेकर स्त्रीमध्ये नात्याचं असणाऱ्या महन्मंगलयतेतून प्रकटणारी शुभकारकता, सुखदायकता, परोपकारी वृत्ती, वात्सल्य ह्यांचे तितकेच निर्मळ चित्रण करतात.
अलक्षित स्त्रियांची व्यथा
आपल्या अवतीभवती असणाऱ्या संसाराचे जीवाख्य फार भयावह आहे. त्यातही या जीवाख्यात सर्वात अधिक भरडल्या जाते ती म्हणजे समाजातील प्रत्येक स्तरातील स्त्री. हक्काच्या नवऱ्यापासून तर स्त्रीला वेश्या बनवून तिच्या मनाचे, शरीराचे शोषण करणाऱ्या पुरुषी मनोवृत्तीच्या पार्श्वभूमीवर समाजगटातील या अलक्षित स्त्रियांची व्यथा, त्यांच्या शोषणाचे चित्रण मर्ढेकर अतिशय कलात्मक पद्धतीने मांडतात. मुंबईतील गिरगावातील गोंधळलेल्या आणि चिंचोळ्या अशा गल्लीमध्ये जगणाऱ्या बायका संसाराच्या निबरट, टणक खाईमध्ये पिचून हाडबंडले झाल्या. पतीच्या वासनेला कंटाळलेल्या असल्या तरी वाट्याला आलेल्या इवल्या जीवनात त्याही परिस्थितीत घरकामात चिमणे जीवन रेखाटण्याचा प्रयत्न करतात. ‘उष्टीभांडी उरकून बसल्या/ विणीत चिमणे जीवन..’ भरतकाम करताना वापरलेल्या पक्षांच्या प्रतिमा तेवढ्याच तिच्या स्वप्नांची फक्त कापडावरच पूर्तता करतात. त्या गल्ल्यांमधून फिरणारा कुल्फी-मलईवाल्याच्या जास्वंदी, नारिंगी बाटल्या या जणू स्त्रीचेच प्रतीक आहे.
वेश्येची व्यथा
तारुण्यात कधीकाळी रंगीबेरंगी सुंदर बाटल्यांप्रमाणे असणाऱ्या या स्त्रीया कामासक्त पतींकडून हाताळल्या जाऊन आता काळ्या, चिमट झाल्या तरी अखेरपर्यंत या वासनाचक्रातून त्यांची सुटका कधीच होत नाही, हे मर्ढेकर उपहात्मक शैलीत सर्वात मोठे विदारक सत्य मांडतात. सामान्य स्त्रीयांची ही परिस्थिती तर, जिच्यावर वेश्या होणे लादले गेले तिची काय अवस्था असणार? मर्ढेकरांपूर्वीपर्यंत कुठल्याच कवीने इतकी निर्भीडपणे वेश्येची व्यथा मांडली नव्हती. १९५९ चा काळ लक्षात घेतला तर वेश्येवरची कविता हेच मुळात पचण्यासारखे, रुचण्यासारखे नसताना मर्ढेकरांनी तर थेट वेश्येच्या अवस्थेचे वर्णन केले आहे. पोटच्या गोळ्याच्या क्षुधाशांतीसाठी आपल्या नग्न देहाचे प्रदर्शन करणारी, भीक मागत फिरणारी आई मर्ढेकरांना दिसली तर दुसरीकडे मुलाला पाठीशी बांधून काम करणारी, जगण्याची धडपड करणारी वडारीण सडक्या मनाच्या भोंदूच्या वासनेची शिकार होणार असते.
अध:स्तरातील स्त्रीघटक
कांदेवाडी, ठाकूरद्वारा यांच्या नाक्यावरील तंग हवेलीत राहणारी वेश्या रोज आपल्या गिऱ्हाईकासाठी ‘उत्साहाची ठिगळ चोळी’ घालून बसते. शिळ्या स्तनाग्रांना झाकण्यासाठी. तिच्या तारुण्याची रात्र संपून म्हातारपणाचा दिवस उगवतो तरी तिच्या भांग फाटून फाटून टक्कल होऊ घातलेल्या दिनक्रमात काहीच बदल होत नाही. मर्ढेकरांची ‘अशीच होती नकटी एक’ ही कविता तर वयोवृद्ध झालेल्या वेश्येच्या हलाखीचे वर्णन करते. दोन वेळच्या घासासाठी ढेप झालेल्या उरोजांचे प्रदर्शन करून ग्राहक मिळविण्याचा क्षीण प्रयत्न ती रोज करीत असते. या अवस्थेला पाहून मर्ढेकरांमधील कवी उद्विग्न होऊन-
काय हलाखी स्त्रीत्वाची ही,
माणुसकीचे काय विडंबन!
भोगशून्य करी भोगव्यथेचे
लिंग-गंड प्रच्छन्न प्रदर्शन!
काय हलाखी स्त्रीत्वाची ही,
माणुसकीचे काय विडंबन!
भोगशून्य करी भोगव्यथेचे
लिंग-गंड प्रच्छन्न प्रदर्शन!
अशी खंत व्यक्त करतात. त्या काळात समाजातील सर्वात अध:स्तरातील स्त्रीघटक कवीच्या काव्यनिर्मितीचा विषय होणे, ही सामान्य बाब निश्चितच नव्हती. अर्थात अशा काव्यनिर्मितीसाठी कलावंतांच्या अस्सल अभिव्यक्ती स्वातंत्र्याची प्रचंड मोठी किंमत त्यांनी मोजली. तत्कालीन समाजरक्षकांकडून अशा वेश्येवरील कविता आणि तिचे वास्तव जीवन मांडणाऱ्या मर्ढेकरांवर अश्लीलतेचा खटला भरला गेला. समस्त समाजाला आधारभूत ठरणाऱ्या स्त्री या घटकाबद्दल एक कवी म्हणून मर्ढेकरांच्या मनातील सहानुभूतीच्या, तिच्या वेदनेशी सहकंप पावणाऱ्या कक्षा किती व्यापक होत्या याची साक्ष वारंवार पटते.
व्याकूळ सौंदर्यरुप
मर्ढेकरांच्या कवितेतून व्यक्त होणारी प्रेयसीरुपी स्त्री ही तितकी वारंवार ठळकपणे चित्रित झाली नाही. ‘काही कविता’ आणि ‘आणखी काही कविता’ या संग्रहामध्ये तर अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच कविता त्यांनी लिहिल्या. कुणालाही हवेहवेसे वाटणारे असे प्रेयसीचे आदर्श रुप मर्ढेकरांनी ‘दवांत आलीस भल्या पहाटे’ या कवितेतून साकारले आहे. या कवितेची मोहिनी इतकी जबरदस्त आहे की, आजच्या प्रियकरातदेखील अशा प्रेयसी रुपाची अभिलाषा असणार. पूर्वायुष्यात येऊन गेलेल्या प्रेयसीच्या स्मृतिजन्य आठवणींना उच्चतम असे कलात्मक व्याकूळ सौंदर्यरुप बहाल केले आहे. ‘भटकत फिरलो भणंग आणिक’, ‘रहा तिथे तू’ या कवितांमधून प्रेयसीचे रुप परस्थ आहे. आयुष्यात प्रेयसीचे असणे म्हणजे ‘सांडावी जशी थेंबाची सर। चांदण्यात कुणी झाडावरली’ इतके अलवार आहे. तर दुसऱ्या कवितेत स्मृतीत जपून ठेवलेल्या प्रेयसीला अापल्या हृदय तडकलेल्या ठिकाणीच रहा, असे म्हणतात.
मर्ढेकरांच्या एकूणच विविध स्तरातील ‘ती’ ची कवितांमधून प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे मर्ढेकरांनी या कविता लिंगभेदाच्या पलिकडे जाऊन लिहिल्या. या कवितांमधून त्यांना gender identity पेक्षा human indenty महत्त्वाची वाटली. ती स्त्री असण्याआधी एक जिवंत व्यक्ती आहे. जिला समाज स्त्री म्हणतो, अशा व्यक्तीचे मन केवळ स्त्रीवाद सिद्ध करण्याच्या हेतूने व्यक्त केले नाही. वास्ततवादी शब्दांचा मितव्यय असणाऱ्या प्रतिमांनी हे चित्रण केले आहे, जे स्त्रीशोषणाच्या मूलस्रोतापर्यंत वाचकाला घेऊन जाते आणि हृदयाला हात घालून अंतर्मुख करतो.
मर्ढेकरांच्या एकूणच विविध स्तरातील ‘ती’ ची कवितांमधून प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे मर्ढेकरांनी या कविता लिंगभेदाच्या पलिकडे जाऊन लिहिल्या. या कवितांमधून त्यांना gender identity पेक्षा human indenty महत्त्वाची वाटली. ती स्त्री असण्याआधी एक जिवंत व्यक्ती आहे. जिला समाज स्त्री म्हणतो, अशा व्यक्तीचे मन केवळ स्त्रीवाद सिद्ध करण्याच्या हेतूने व्यक्त केले नाही. वास्ततवादी शब्दांचा मितव्यय असणाऱ्या प्रतिमांनी हे चित्रण केले आहे, जे स्त्रीशोषणाच्या मूलस्रोतापर्यंत वाचकाला घेऊन जाते आणि हृदयाला हात घालून अंतर्मुख करतो.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
डॉ.अमृता इंदूरकर,नागपूर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल
#अमृतवेल