अलक्षित समाजवास्तवाचा वेध घेणारा नाटककार
— डाॅ. अमृता इंदूरकर
सर्वप्रथम १९८० च्या सुमारास दलित नाटकाचा प्रारंभ झाला असला तरी नाटक या स्वतंत्र वाङ्मय प्रवाहाचा विचार करता त्याचा आरंभ १९५६ साली म. भी. चिटणीस यांच्या ‘युगयात्रा’ या नाटकाने झाला. परंपरेने दलितांवर हाेणाऱ्या अत्याचाराचे चित्रण प्रस्तुत नाटकातून येत असले तरी या नाटकाने पुढील दलित नाट्यलेखकांना लेखनाची प्रेरणा दिली. त्यातूनच त्या काळात वि. तु. जाधव, नामदेव व्हटकर, मा. का. कारंडे याशिवाय अधिक पुढे टेक्सास गायकवाड, कमलाकर डहाट, अरुणकुमार इंगळे, रामनाथ चव्हाण, प्रकाश त्रिभुवन, संपत जाधव, गोपाळ सोनारीकर, रुस्तुम अचलखांब, हेमंत खोब्रागडे, दत्ता भगत आणि शिल्पा मुंब्रसकर या नाटककार मंडळींनी आपल्या नाट्यलेखनातून दलितांच्या व्यथा, वेदनेला शब्दरूप दिले.
साहित्यात जेव्हाही एखादा नवा प्रवाह निर्माण होतो, त्यावेळी त्यामध्ये लेखन करणाऱ्यांमुळे तो एका उंचीवर गेलेला असतो. पण कालौघात त्या प्रवाहामध्ये देखील नव्या जाणीवांच्या अभावामुळे एक प्रकारचे आवर्त तयार होते व कलाकृतींचा प्रभाव कमी व्हायला लागतो. अशावेळी या प्रवाहाला नव्याने केवळ उंचीच नाही तर खोली, व्यापकता व घनता याचे वेगळे परिमाण देणारा, या जाणिवांमधल्या नव्या कक्षांचा वेध घेणारा ताकदीचा लेखक हवा असतो. दलित नाट्यप्रवाहाबाबत मधल्या काळात काहीसे असेच झाले होते. पण, ही मरगळ दूर करणारा, वेगळ्या वाटा चोखाळणारा नाटककार दलित रंगभूमीला १९८० साली प्रेमानंद गज्वी यांच्या रुपाने मिळाला.
१५ जून १९४७ रोजी जन्मलेले प्रेमानंद गज्वी यांची चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळगाव ही जन्मभूमी. बालपण नागपूर जिल्ह्यातील कारगाव येथे गेले. जन्माने वैदर्भीय असणाऱ्या गज्वी यांची कर्मभूमी मात्र मुंबई आहे. २२, २३ तसेच आज २४ व उद्या २५ फेब्रुवारीला नागपुरात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे प्रेमानंद गज्वी हे नियोजित अध्यक्ष आहेत, ही गौरवाची बाब आहे. गज्वी यांच्या निमित्ताने समाजातील विविध रूढी, परंपरा, अन्यायांना आपल्या नाट्यकृतीतून वाचा फोडणारा, वेगळ्या विषयांना नाट्यरूप देणारा एक अग्र नाटककार संमेलनाध्यक्ष म्हणून प्राप्त झाला आहे.
एक नाटककार म्हणून आपली लेखनप्रेरणा, त्याचे बीज कशामध्ये आहे हे स्पष्ट करताना ते म्हणतात, ‘हे जग सुंदर कसे होईल या ध्यासातून मानवीमन, समाजभान, राष्ट्रमत, जनमत समजून घेण्याच्या चिंतनशिलतेतून वाङ्मयीन लेखन व समाज संरचनात्मक कार्य घडले आहे.’ नाटककार म्हणून गज्वी यांचा मूळ पिंड गंभीर लेखकाचा आहे. नातेसंबंधातील गुंतागुंत, कौटुंबिक तिढे तर कधी अतिजिव्हाळ्याचे संबंध यांचे चित्रण करण्यापेक्षा समाजामध्ये आजही कितीतरी अलक्षित असे वास्तव अव्यक्तच आहे. हे सामाजिक, राजकीय अलक्षित वास्तव गज्वींना नेमके टिपण्यात अधिक रस आहे. जेणेकरून त्यांचा प्रेक्षक सततच विचारप्रवृत्त झाला पाहिजे. नाटक बघणाऱ्या, वाचणाऱ्या प्रत्येकाला हे वाटले पाहिजे की, आपण ज्या समाजात सुखेनैव जगत आहोत, त्याच समाजात जगणाऱ्या काहींचे आयुष्य इतके विद्रूप भीषण आहे की, आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. या आंतरिक निकडीतूनच ‘एक गाव, एक पाणवठा’ सारखी एकांकिका सर्वप्रथम जन्माला आली. ‘देवनवरी’ हे त्यांचे पहिले नाटक जे खरेतर जयवंत देसाई यांच्या आग्रहाखातर एकांकिकेचे नाटक झाले. देवदासी म्हणजे देवाला सोडलेली, देवाशी लग्न झालेली अशी स्त्री. जिला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नाही. म्हणायला देवाला सोडलेली, पण दुसऱ्या बाजूने समाज उपभोग्य स्त्री. अशा या देवदासीवरील कलाकाराची बातमी वर्तमानपत्रात वाचून गज्वी यांच्यासारख्या समाजसंवेदनशील नाटककाराला ‘देवनवरी’ चे नाट्यकथाबीज सापडते. देवनवरीबद्दल नाटककार विजय तेंडुलकर म्हणतात, ‘आपल्यापाशी असलेल्या माध्यमातून गज्वींनी एक सामाजिक, अन्याय बोलका केला आहे. कोणत्याही अन्यायात त्यांना तीव्र नाट्य दिसते. अन्याय सहन केलेल्यांमध्ये सहजपणे ते नाट्य धरतात. आपल्याला जाणवलेल्या आशयाशी प्रामाणिक राहू इच्छितात.’
यानंतर गज्वी यांनी ग्रामीण जीवनातील जातीय गुंता उलगडणारे ‘वांझ माती’ हे नाटक वेठबिगारांचा मुक्तीसंघर्ष मांडणारे ‘तनमाजोरी’ हे नाटक, समर्थ रामदासांना एका वेगळ्या आयामातून मांडणारे ‘जय जय रघुवीर समर्थ’ ही नाटके लिहिली. स्वातंत्र्योत्तर काळापासूनच समस्याकेंद्री विद्रोही नाटकेच लिहिली जात होती. पुढे त्यामध्ये तोचतोचपणा यायला लागला होता. नेमक्या याचवेळी गज्वी यांनी या तोचतोचपणावर मात करीत दलित रंगभूमीच्या सर्वच सीमारेषा ओलांडल्या. त्या ओलांडणारे निमित्त ठरलेले नाटक म्हणजे ‘किरवंत’. जे गज्वी यांच्या नाट्यवाङ्मयाच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरते व गज्वी ‘किरवंतकार’ म्हणून ओळखले जाऊ लागले. आतापर्यंत स्वजातीतील दु:खवेदनेचा वेध घेणारे गज्वी ‘किरवंत’ मधून मात्र जातीमर्यादा ओलांडून केवळ वेदनेशी, समस्येशी नाते जोडताना दिसतात. केवळ दलितच नाही तर समाजात जो जो उपेक्षित, शोषित, बहिष्कृत, तिरस्कृत आहे, त्या सर्वांना कवेत घेणारी ही गज्वींची रुढ अर्थाच्या दलित चौकटीच्याही पलीकडे जाऊन बघणारी जीवनदृष्टी दिसते.
किरवंत म्हणजे मरणोत्तर क्रिया करणारा ब्राह्मण. कोंकणात हा ब्राह्मण किरवंत म्हणविला जातो. धर्मशास्त्रानुसार मरणकार्य हे पुण्याचे काम असले तरी प्रत्यक्षात मात्र, ब्राह्मण समाजाकडूनच दलितांसारखे बहिष्कृत जगणे यांच्या वाट्याला येते. कुठल्याही मंगलकार्यात या किरवंतांना निमंत्रण नसते. आज ब्राह्मण समाजाला देखील माहीत नसेल की, ब्राह्मणांमध्येही किरवंत प्रकार असतो आणि त्याच्या वाट्याला ते ब्राह्मणत्वही इतर ब्राह्मणांमुळे प्राप्त होत नाही. ‘किरवंत’ मधून गज्वी यांनी समान-जाती यांच्यातील श्रेष्ठ-कनिष्ठ प्रवृत्तीमुळे एखाद्या समाजगटाला दलितत्व लाभते आणि दुसरा श्रेष्ठ ठरतो. प्रत्यक्ष धर्म-मते आणि व्यवहार यात सोयीने सुसंगती-विसंगती येत असते हे मांडण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकाला लाभलेले सामाजिक परिणाम व त्यातून व्यक्त झालेली दलित जाणीव लक्षणीय ठरते. प्रत्यक्ष दलित जीवनाशय नसूनही हे नाटक दलित नाटक ठरते.
या व्यतिरिक्त राजकीय पार्श्वभूमीवर गज्वी यांनी एक वैचारिक द्वंद्व निर्माण करणारे नाटक लिहिले, ते म्हणजे ‘गांधी-आंबेडकर’. दोन महापुरुषांच्या वैचारिक भिन्नतेच्या कारणांचा शोध घेणारे हे नाटक आहे. अस्पृश्यता कायमची नष्ट झाली पाहिजे, हा हेतू या दोघांचाही असून या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी तेव्हाही दोघे एकत्र का नाही येऊ शकले, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या गरजेतून हे नाटक आकाराला आले. एकाच नाटकात दोन नायक घेऊन संपूर्ण नाटकच त्यांच्याभोवती फिरते ठेवणे, ही अजब किमया गज्वींना यात साधली आहे. इतक्या गंभीर विषयामध्ये या दोन नायकांना जोडणारा दुवा म्हणजे चक्क विदुषक हे पात्र म्हणजे तर गज्वींमधल्या अनवट प्रयोगशील नाटककाराला व्यक्त करते. शिवाय एक लेखक म्हणून, व्यक्ती म्हणून गज्वी यांच्या विचारतराजूंना आंबेडकरांकडे झुकला ना महात्मा गांधीकडे हे अतिशय महत्त्वाचे.
यानंतर गज्वी यांनी विविध विषयांना स्पर्श करणारी बरीच नाटके लिहिली. ‘पांढरा बुधवार, रंगयात्री, नूर मोहम्मद साठे, शुद्ध बीजापोटी, व्याकरण, अभिजात जंतू, द बुद्धा, छावणी, घोटभर पाणी, बेरीजवजाबाकी, कृष्णविवर, उतारा’ या एकांकिकांचे लेखनही केले. या सर्वच कलाकृतींमधून केवळ दलित नाटककार असे मर्यादित न राहता समाज- माणूस, माणूस- माणूस, समाज- समाज यांचा संघर्ष व यातील आंतरसंबंधाचा वेध घेतला. हे करताना त्यांची शैली देखील प्रयोगशील राहिली. या शैलीचा अविष्कार प्रचारकी नव्हता, आवेशपूर्ण नव्हता, पण प्रेक्षकांपर्यंत वास्तवाची दाहकता पोहोचवणारा होता.
प्रेमानंद गज्वी हे नव्वद टक्के नाटककार आहेत तर उरलेल्या दहा टक्क्यांमध्ये त्यांच्यामध्ये एक कवी, कथाकार, कादंबरीकार, वैचारिक लेखन, पटकथाकार इत्यादी वाङ्मयप्रकारांचे पैलू देखील आहेत. कवी मनाचे भावविश्व उलगडणारा ‘एकतारी’ हा कवितासंग्रह ‘लागण’ आणि ‘ढिवर डोंगा’ या कथा. याशिवाय वैदर्भीय बोली भाषेतील ग्रामीण जीवनाचा वेध घेणारी ‘जागर’ ही कादंबरी, ‘हवे पंख नवे’ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर : चरित्र आणि चारित्र्य दर्शन यावर आधारित कादंबरी. वैचारिक लेखनामध्ये त्यांनी भारताचा पाच हजार वर्षांचा सामाजिक- सांस्कृतिक- राजकीय- धार्मिक चळवळीचा इतिहास ‘बोधी कला- संस्कृती’ मधून मांडला. ज्ञानासाठी कला... हे सूत्र सिद्ध करणारी वाङ्मयीन मांडणी ‘आर्ट फॉर नॉलेज’ मधून केली. १९९० साली दूरदर्शनवरील ‘घर’ या मालिकेचे पटकथा, संवाद, गीत लेखन, अजिंठा- वेरूळचा अभ्यास दौरा आयोजित करून स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकलांचा अभ्यास केला आणि या आगळ्या-वेगळ्या उपक्रमावर ‘अजिंठा नाट्यलेणी’ या ग्रंथाची संकल्पना व संपादन त्यांनी केले. जवळ- जवळ सर्व वाङ्मय प्रकारांमध्ये मुशाफिरी करणारे नाटककार प्रेमानंद गज्वी ९९ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष आहेत. ही सर्व नाट्यरसिकांसाठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)
डॉ.अमृता इंदूरकर,नागपूर
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अमृतवेल